Saturday, March 20, 2010

मशीनवुमन



मोटरमनऐवजी मोटरवुमन पाहण्याची सवय प्रवाशांना झाली, ती सुरेखा यादव यांच्यामुळे. पण, आज संपूर्ण भारतात रेल्वे मशिनरी हाताळणारी एकमेव स्त्री शिवानी

कुमार यांचं कर्तृत्वही तेवढंच कौतुकास्पद आहे!
...

रेल्वे म्हणजे मुंबईची लाइफलाइन. मुंबईला घेऊन २४ तास पळणाऱ्या या ट्रेन्सची चाकं दिवसभर ट्रॅकवर घासली जातात. त्यामुळे चाकांचा आस बदलतो. यासाठी चाकांची मशागत करावी लागते. ही मशागत करायची, तर ते हात कणखर असायला हवेत. अर्थातच, आता कणखर हात म्हटल्यावर हे हात पुरुषांचेच असणार असं वाटतं. पण, मध्य रेल्वेच्या माटुंगा इथल्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या अनेक कणखर हातांपैकी दोन हात आहेत, ते शिवानी कुमार यांचे.

चाकांची दुरुस्ती करणं सोपं काम नाही. खडबडीत झालेल्या दोन्ही चाकांचा व्यास समसमान करण्यासाठी त्यांना व्हील रिपेअर मशीनवर चढवलं जातं. दोन्ही चाकांचा व्यास आणि ती घासून गुळगुळीत करण्यासाठी नेमका किती व्यास कमी करावा लागेल, ते ठरवावं लागतं. त्यानुसार यंत्र सुरू केलं जातं. चाकांच्या ठिणग्या पडायला सुरुवात होते. चाक सर्वत्र एकसमान घासलं जातंय, दोन्ही चाकांचा व्यास नीट जुळवला गेला आहे ना, यावर लक्ष ठेवलं जातं. या सगळ्या प्रक्रियेतून दोन्ही चाकं नीट झाली नाहीत तर पुन्हा ही सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या बाराशे-तेराशे गाड्यांपैकी प्रत्येकीची चाकं दर १८ महिन्यांनी या वर्कशॉपमध्ये आणली जातात. आणि शिवानी कुमार गेली तब्बल नऊ वर्षं चाकांना दुरुस्त करत आहेत.

शिवानी कुमार यांनी रेल्वेत काम करायला सुरुवात केली २० वर्षांपूवीर्. फारसं शिक्षण झालं नसल्याने पहिली बारा वर्षं त्यांनी खलाशी म्हणून काम केलं. खलाशी म्हणजे झाडू मारणं, साफसफाई करण्यापासून चहा पोहचवण्यापर्यंत सर्व काही. पण रेल्वेत घेतानाच त्यांना त्यांच्या कामाची कल्पना दिली असल्याने शिवानी कुमारची काही तक्रार नव्हती. शिवाय नोकरी हातातून जाणंही परवडणारं नव्हतं. पण बारा वर्षांनंतर केंदाच्या नियमानुसार त्यांना बढती देण्याची वेळ आली. तेव्हा मशीनवर काम करायचा पर्याय होता. सुरुवातीला त्यांचाही नकार होता. पण त्यांच्या नवऱ्यानेच त्यांना पाठबळ दिलं. मशीन चालवणं पुरुषाला जमू शकतं तर तुला का नाही जमणार? तू तर हुशार आहेस. महिन्याच्या ट्रेनिंगनंतर त्यांनी लेखी परीक्षा दिली, प्रॅक्टिकल केलं, मुलाखत दिली. मग त्यांची नेमणूक झाली. तेव्हापासून त्यांनी हे मशीन आपलंसं केलं आणि मशीननेही त्यांना. आज त्या सफाईने मशीन सुरू करतात.

एवढ्या अवजड मशीनची भिती वाटत नाही का, अपघात होईल असं वाटलं नाही का, असं विचारल्यावर त्या सांगतात, 'सुरुवातीला थोडी भिती होती. पण हे काम करताना डोकं जागेवर ठेवलं की बस्स!' त्यांच्या या कामासाठी त्यांना रेल्वे प्रशासनाकडून आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

लोकलच्या केबिनमध्ये मोटरमनऐवजी मोटरवुमन पाहण्याची सवय मध्य रेल्वेच्या प्रवाशांना झाली आहे. स्वत:च्या निश्चयाने, कर्तृत्वाने तिथेपर्यंत पोहचलेल्या सुरेखा यादव या कौतुकाला पात्र आहेतच. पण पतीच्या निधनानंतर इतर कुठला पर्याय नसल्याने नोकरी करायला लागलेल्या आणि आज संपूर्ण भारतात रेल्वे मशिनरी हाताळणारी एकमेव स्त्री असलेल्या शिवानी कुमार यांचं कर्तृत्वही तेवढेच कौतुकास्पद आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive