Monday, March 29, 2010

श्रीमारुती आणि शनिपीडा

श्रीमारुती आणि शनिपीडा

 

मागच्या बुधवारी श्रीराम नवमी साजरी झाली आणि आज मंगळवारी हनुमान जयंती मोठया उत्साहाने साजरी होत आहे. प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमी आणि शौर्यसंपन्न चरित्राचा एकापरीने शिल्पकार म्हणून महाबली हनुमानाचे नाव आपल्या संस्कृतीने शिरोधार्य मानले आहे.

लोक शनीची साडेसाती सुरु झाली की मारुतीला पुजू लागतात. त्याच्यावर अंगावर तेल वाहातात , त्याला रुईच्या पानांचा हार घालतात. कोणी उडदाचे वडे त्याच्या गळयात बांधतात. अनेक प्रकारानी मारुतीची भक्ती , सेवा करीत असतात. हे ठीक आहे. पण हनुमान , मारुती म्हणजे काही साडेसातीतून सोडविणारा एवढाच विषय नाही.

मारुती हा सुग्रीवाचा मंत्री होता. सुग्रीव हा किष्किंधेच्या वानरराज्याचा अधिपती होता आणि सुग्रीव राजाचा डंका सर्वत्र गाजण्यासाठी हनुमानाचे परिश्रम आणि बुध्दिमत्ता ही मोठया प्रमाणात कारणीभूत झाली होती , असे रामायणावरुन दिसून येते. रामाच्या वनवासाच्या काळात मारुतीने त्याला जी मदत केली ती इतकी महत्त्वाची होती की प्रभुरामचंद्रांनी सुध्द , ' माझ्या कातडीचे जोडे करुन तुझ्या पायात घातले तरी तुझे उपकार फिटणार नाहीत ,' असे हनुमंताला सांगितले होते.

यावरुन हनुमंताचे लोकोत्तर स्थान ध्यानीं येईल. मारुती हा विद्वान् होता. त्याचे चारही वेदांचे अध्ययन झाले होते , असे उल्लेख रामायणात सापडतात. तो संगीताचा जाणकार होता. समर्थ रामदासस्वामींनी त्याला ' संगीतज्ञानमहंता रे ' असे म्हटले आहे. तो अजोड पराक्रमी तर होताच पण कुठे कसे वागावे , कोणत्या विषयात काय भूमिका घ्यावी ? ह्या सर्व गोष्टी त्याच्या ठायी उपजतच होत्या.

मारुतीला आपण शेंदूर लावतो. गणपती आणि मारुती ह्या दोन दैवतांना आपण शेंदुर लावतो , शेंदुर अर्पण करतो. यापैकी गणपतीला ज्या शेंदुराने विभूषित केले जाते तो शेंदूर नाही ते सिंधुरासुराचे रक्त आहे , असा उल्लेख सापडतो. सिंधुरासुर ह्या राक्षसाच्या नावावरुनच शेंदुर हे नाव पडले. त्याला संस्कृत आणि हिंदी भाषेत ' सिंदूर ' असेच म्हणतात. हा सिंदूर स्त्रिया भांगात भरतात.

ह्याबद्दलची एक कथा आहे. सीतामाई वनवासात असतानासुध्दा आपल्या भांगेत सिंदूर भरावयाच्या. एकेदिवशी त्या अशाप्रकारे सिंदूर लावीत असताना हनुमंताने पाहिले. त्यांने सीतामाईला विचारले , '' मातोश्री , हा सिंदूर आपण का लावता ?''

सीतामाई उत्तरल्या , '' बा मारुती , मी अशासाठी सिंदुर लावते की माझ्या स्वामींना दीर्घायुष्य मिळावे. ''

स्वामींना दीर्घायुष्य सिंदूर लावल्याने मिळते हे समजल्यावर मारुती चमकला. तो म्हणाला , '' हा तर अगदीच सोपा मार्ग आहे. '' आणि त्याच्या मनाने घेतले की जर मातोश्रींनी केवळ आपल्या भांगात शेंदूर भरल्यावर प्रभू दीर्घायुषी होणार असतील तर आपण आपल्या संपूर्ण शरीरालाच शेंदूर लावून का घेऊ नये ? एवढयाशा भांगात शेंदूर भरल्यामुळे प्रभुंचे आयुष्य जेवढे काही वाढणार असेल त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मी संबंध शरीराला शेंदुर माखुन घेतल्यावर वाढेल , यात काय संशय ? आणि त्या दिवसापासून मारुती अंगावर शेंदूर लावून घेऊ लागला , असे ह्या कथेवरुन आपल्याला कळते. अर्थात , ही कथा केवळ काल्पनिक आहे.

मारुती हा असा समज करुन घेण्याइतपत भाबडा नव्हता , हे तर नक्की. तो तसा भाबडा असता तर सुग्रीवाचा मुत्सद्दी प्रतिनिधी म्हणून राम-लक्ष्मणांनी त्याची स्तुती केली नसती.

मारुतीची उपासना केल्यावर शनिपीडा दूर होते , अशा जी श्रध्दा आहे. त्याबद्दलचीही कथा सांगितली जाते. शनिदेव सर्व त्रिखंडाला साडेसातीच्या फे-यात कधी ना कधीतरी अडकवितात. मात्र शनिदेवांचा एक नियम आहे. कोणाच्याही राशीला जाण्यापूर्वी ते त्याला त्याची कल्पना देतात.

ज्या राशीत एखाद्याच्या जन्माच्यावेळी चंद्र असेल त्याच्या आधीच्या राशीपासून त्याच्या पुढच्या राशीपर्यंत शनीचा मुक्काम असला की त्याला साडेसाती असे म्हणतात. शनी प्रत्येक घरात अडीच वर्षे राहातो. ह्या तिन्ही घरात मिळून त्याचा मुक्काम साडेसात वर्षांचा असतो. आजकालच्या काळात शनी आपण त्याच्या राशीत कधी येणार , हे प्रत्यक्ष सांगत नसला तरी ते काम पंचांगे आणि ज्योतिषी इमानइतबारे करीत असतात.

पूर्वी मात्र शनी प्रत्येक राशीत येण्यापूर्वी त्या राशीच्या व्यक्तीला आपण येत आहोत , याची जाणीव करुन देत असे. अशी जाणीव शनीने एकदा शिवशंकराला दिली आणि शंकर त्याला म्हणाले , '' तू माझ्या राशीला येतोस तर ये , पण मीसुध्द त्याचा कसा मुकाबला करतो पाहा. '' आणि शंकर हे देवाधिदेव असल्यामुळे ते कुठेतरी लपून बसले. साडेसातीच्या काळात शनीने शिवशंकरांना शोध शोध शोधले , पण ते त्याला सापडलेच नाहीत. साडेसातीचा काळ संपल्यानंतर शंकर प्रगट झाले आणि त्यांनी शनीला विचारले , '' तू माझे साडेसातीत काय वाकडे केलेस सांग ?''

शनी म्हणाला , '' माझ्या भयाने तुम्ही साडेसात वर्षे लपून बसलात हे काय थोडे झाले ?'' असे हे शनिमहाराज एकदा मारुतीला म्हणाले , '' आता मी तुझ्या राशीला येतो. '' मारुती म्हणाला , '' सुखाने या , पण माझी तुम्हाला एकच विनंती आहे की याल तेव्हा माझ्या मस्तकी आपण स्थानापन्न व्हा. तुम्हाला अक्षरशः शिरोधार्य मानावे , अशी माझी इच्छा आहे. ''

शनीने ते मान्य केले आणि तो मारुतीच्या डोक्यावर जाऊन बसला. मारुतीरायाने काय करावे ? त्याने आपल्या सर्व भक्तांना आज्ञा केली की आज कोणीही मला फुले वाहू नयेत. माझ्यावर केवळ दगडच वाहावेत. मारुतीचेच भक्त ते ! त्यांनी आपल्या देवाचे हे म्हणणे अक्षरशः मान्य केले आणि प्रत्येक जण मारुतीवर दगड मारु लागला. मारुती स्वतः वज्रदेही.

कोणा भक्ताने दगड भिरकावला की तो आपल्या बुध्दिकौशल्याने स्वतःच्या मस्तकावर स्थानापन्न झालेल्या शनीमहाराजांना लागेल तें पाही. ते दगड सतत अंगावर बरसत असल्यामुळे शनिमहाराज हैराण झाले आणि मारुतीला म्हणाले , '' बाबारे ,, मी तुझ्या डोक्यावरुन खाली उतरतो. मला माझ्या मार्गाने जाऊ दे. मी पुन्हा तुझ्या वाटयाला जाणार नाही. ''

त्यावर मारुती म्हणाला , '' माझ्या वाटयाला तर येऊ नकोसच पण माझ्या भक्तांच्या वाटेलासुध्द तू येता नयेस. '' शनिमहाराजांनी मारुतीचे हे म्हणणे मान्य केले आणि तेव्हापासून मारुतीच्या भक्तांना शनीपीडा जाणवण्याचें प्रमाण कमी झाले.

 

ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive