Thursday, April 1, 2010

संस्कारशिदोरी

संस्कारशिदोरी


साहित्यवर्तुळात स्वत:चं स्थानिर्माण करणाऱ्या अनुपमा उजगरे यांनी कथा, कविता, ललित आणि संशोधनपर लेखन केलं आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत

. अनेक साहित्य संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत.

 

...........

 

''तुम्ही संस्कृत श्लोक, सुभाषिते, सुविचार यांची पेरणी निबंधात केली, तर परीक्षक चांगले गुण देतात,'' असं आमच्या शिक्षकांचं सांगणं असायचं. त्यामुळे अशा वह्यांचा संग्रह बहुतेक विद्यार्थ्यांकडे असायचा. त्याचा वापर प्रत्येकाने आपल्या लेखनात किंवा जीवनात कसा केला हे ज्याचं त्याला ठाऊक. एक मात्र नक्की की, आमच्या पिढीला चांगल्या संस्कारांचा लाभ त्यामुळे मिळत गेला. असे संस्कारवर्ग कुठल्याही फीशिवाय घेणारी माणसंही त्यावेळी होती. 'मोठ्ठे बाप्पा' हे त्यापैकी एक.

 

रोज रात्री जेवणं आटोपून आम्ही सगळी मुलं ठोंबरेंच्या अंगणात जमत असू. आठ-आठ दिवस संपणाऱ्या गोष्टींची मेजवानी तिथे आम्हाला मिळायची. रात्री साडेआठचा भोंगा नगरभर ऐकू यायचा. भोंगा वाजायला सुरुवात झाली की, तो संपायच्या आत गोष्टीला तिथेच पूर्णविराम देऊन आम्ही सगळी मुलं समोरच्याच मोठ्ठे बाप्पांच्या अंगणात ठोंबरेंच्या अंगणाकडे पाठ करून बसत असू. धर्मविषयक गोष्टी सांगण्याचं कंत्राट मोठे बाप्पांकडे असायचं. त्यानंतर प्रत्येकाने उठून गीतेमधील एखादं तरी सुवचन बोलून दाखवायचं. कधी कधी स्तोत्रं-गाणी पाठ म्हणून दाखवावी लागत. गैरहजेरीचा बहाणा अजिबात चालत नसे. 'आपल्या प्रत्येकाच्या नावाचा एक शुभ्र देवदूत असतो. आपण पाप केलं तर त्याच्या शुभ्र कपड्यांवर काळा डाग पडतो. न्यायाच्या दिवशी सर्वांसमोर आपल्या देवदूताला उभं केलं जाणार आहे, तेव्हा देवदूत स्वच्छ असेल अशी काळजी घ्या.' मोठे बाप्पा म्हणायचे. 'देवदूताचे कपडे डागाळले तर अमूक एक धुलाई पावडर किंवा एखाद्या चांगल्या लाँड्रीची सोय त्यावेळी नव्हती का? असा आजच्या मुलांकडून विचारला जाऊ शकणारा प्रश्ान् आमच्या मनातही कधी आला नाही. देवदूताच्या मलीन होण्याची भीती मनात बसली ती आजतागायत.

 

शब्दकोडी सोडवण्याचा एक फार छान खेळ त्यावेळी मोठी मुलं खेळायची. एखाद्या शब्दाची अक्षरसंख्या सांगायची. उदाहरणार्थ, एक तीन अक्षरी शब्द आहे. पहिलं अन् शेवटलं अक्षर घेतलं की, एक खाण्याचा पदार्थ असा अर्थ होतो. पहिलं अन् दुसरं अक्षर घेतलं तर वजन असा अर्थ निघतो. दुसरं अन् तिसरं घेतलं तर मग्न आणि तिन्ही अक्षरं घेतली तर मुलाचं नाव होतं. -तो शब्द कोणता? बरं, ही सगळी कोंडी तोंडीच चालत. कठीण शब्दांची आणि जास्त अक्षरसंख्या असलेली, जास्त अर्थ निघतील अशी कोडी घालण्याची चुरसच लागायची. शाळेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अशी कोडी घालून मराठी शब्दांचा त्यांचा संग्रह वाढवण्याच्या माझ्या प्रयोगात मुलांनाही मौज वाटायची. पुढच्या वेळी असे शब्द पुस्तकातून शोधून, माझ्या मदतीने आणखी अर्थ जमवत वर्गात फळ्यावर हा खेळ ती आवडीने खेळत. महिन्यातला शेवटचा माझा तास हा अशा खेळांसाठीच मी ठेवला होता. शब्दांशी खेळण्यातली गंमत कळू लागल्यावर याच विद्यार्थ्यांकडून गोष्ट, कविता जे वाटेल ते मराठीतून चार-पाच वाक्यात लिहिण्याच्या प्रयोगाला तर पुढे असा प्रतिसाद मिळाला की, काही अमराठी मुलांनी चक्क कविता लिहून दाखवल्या!

 

माझ्या विषयात वर्गात मुलं छान रमत; पण बडोद्याहून आलेल्या एका गुजराती मुलाच्या चेहऱ्यावर मराठी भाषा शिकण्याचा कायम कंटाळा स्पष्ट दिसायचा. एक दिवस त्याने मला विचारलं, ''ये सबका रोकडा कितना मिलेगा?''

 

''म्हणजे?'' मी अचंबित. गोंधळलेली. नंतर लक्षात आलं, 'या सगळ्या गोष्टी परीक्षेत किती गुण मिळवून देणार आहेत?' असं त्याला विचाराचंय. त्याला मराठी भाषेतील सौंदर्यस्थळं आणि संदर्भ-स्पष्टीकरणं यांच्याशी काडीमात्र कर्तव्य नव्हतं. त्याने केलेला सवाल त्याच्या दृष्टीने रोकडा होता!

 

केजीतल्या एकाला आपल्या शेजारी बसलेल्या मुलाच्या टिफिनमधलं क्रीम बिस्किट हवं होतं. दुसरा मुलगा नुसता 'नाही देत' म्हणून गप्प बसला नाही, तर आपल्या नकाराला त्याने पुस्ती जोडत म्हटलं, ''तेरा बाप भी तो कमाता होगा, बोल उसको लाने को.'' हे ज्या कुणाचे संस्कार त्याच्या तोंडून बोलले गेले त्यामुळे मी अस्वस्थ झाले. एक तीळ सात भावांनी वाटून खाल्ल्याची कथा त्या छोट्याच्या आधीच्या पिढीपर्यंत पोहोचलीच नव्हती! कुठे गहाळ झाल्या त्या सगळ्या त्यागाच्या, औदार्याच्या कथा? किती बदललाय माणूस!

 

... कृष्णामाईचा पान्हा सुकून गेला आहे

 

आणि प्रतिबिंब पाहायला म्हणून जावे

 

तर गंगेच्या पाण्यात गाळ साचला आहे.

 

आता कुठे शोधावा मी माझा चेहरा

 

साने गुरुजींच्या कथामालेतला?

 

... माणूस नावाच्या माझा पत्ता

 

आज मी शोधते आहे

 

हरवले आहे माझे बरेच काही

 

गेल्या काही वर्षांत...

 

- अनुपमा उजगरे

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive