Sunday, May 2, 2010

देशभक्‍त डॉ. नारायण दामोदर सावरकर !

देशभक् डॉ. नारायण दामोदर सावरकर !

विद्यार्थीदशेपासूनच क्रांतीचे विचार !

          देशभक् नारायणरावांचा जन्म २५ मे १८८८ रोजी झाला. सावरकरांचे घराणे मुळात श्रीमान; परंतु एकावर एक आकस्मिकपणे कोसळत गेलेली संकट परंपरा आणि आपत्ती यांच्यामुळे नारायणरावांचे बालपण कष्टमय परिस्थितीत गेले. आई-वडिलांचे छत्र दैवाने लवकर हिरावून घेतल्यामुळे त्यांचे लालनपालन मोठे बंधू गणेशपंत तथा बाबाराव आणि त्यांची पत्नी सौ. येसूवहिनी यांनी केले.

          विख्यात लेखक आणि चरित्रकार .. गोखले `क्रांतीवीर बाबाराव सावरकर' या चरित्रग्रंथात म्हणतात,नारायणराव अर्भक असतांना मातेच्या ममतेने आणि पित्याच्या प्रेमळपणाने बाबांनी त्यांचे संगोपन केले. आपल्या तात्याप्रमाणे आपला बाळही देशभक् व्हावा, म्हणून ते नारायणरावांचे शिक्षण मोठ्या आशेने करत. त्यांची ती आशा नारायणरावांनी इंग्रजी तिसरीत गेल्यापासूनच पुरी करण्यास प्रारंभ केला. बाबा-तात्यांपासून त्यांनी जी स्फूर्ती घेतली तिच्या बळावर त्यांनी `मित्रसमाज' या विद्यार्थी संघटनेचा व्याप उभा केला आणि तो समर्थपणे सांभाळून क्रांतीकक्षेत कितीतरी तरुण आणून सोडले. आपल्या स्फूर्तीप्रद वक्तृत्वावर ते विद्यार्थीदशेपासून तरुणांना मोहवत आणि थोरांकडून वाहवा मिळवत.

          मॅट्रिकनंतर १९०८ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी बडोद्याला गेले आणि तेथे त्यांनी `अभिनव भारता'ची शाखा स्थापली. या शाखेत अजमासे दोनशे तरुण प्रतिज्ञित झाले होते. बडोद्याचे संघटनकार्य `मित्रसमाजा'प्रमाणेच नारायणरावांनी नावारूपाला आणले. त्याच वेळी अभ्यास सांभाळून माणिकरावांच्या व्यायामशाळेत कुस्ती, मल्लखांब, लाठी इत्यादींचे त्यांनी उत्तम शिक्षण घेतले.

          नारायणराव सुटीत नाशिकमध्ये आले की, तेथल्या मुलांशी या विद्येची देव-घेव चाले. नाशिकमधल्या उद्योगात सैनिक संचलन, नेमबाजी नि भिंतीवर चढण्याची कला यांचाही समावेश होता. हा `मित्रसमाज' म्हणजेच अन्यत्र उल्लेखलेला `मित्रमेळा'. मित्रमेळयाच्या साप्ताहिक सभा होत नि त्यात देशाविषयी वेगवेगळया पुस्तकांद्वारे चर्चा चाले. स्फूर्तीप्रद विचार मांडले जात.

सहा महिन्यांची शिक्षा !

          १८९९ ते १९०८- पर्यंत नाशिकमध्ये क्रांतीकार्य जोरात चालू होते. या क्रांतीकार्याच्या परिणामी वयाच्या केवळ अठराव्या वर्षीच इतिहासप्रसिद्ध `नाशिक कट' अभियोगात नारायणरावांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. (बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाली २१ नोव्हेंबर १९०९ या दिवशी. त्याआधीच कर्णावतीला झालेल्या ध्वमस्फोटांच्या संबंधात नारायणरावही पकडले गेले. लंडनमध्ये असलेल्या विनायकरावांवर ब्रिटीश शासनाची वक्रदृष्टी होतीच.) आरक्षींनी (पोलिसांनी) केलेली मारहाण सहन करून, शेवटी पुराव्याअभावी ते त्यातून निर्दोष बाहेर पडले. १८ डिसेंबर १९०९ ला ते घरी येऊन टेकतात, तोच २१ डिसेंबरला नाशिकलाच अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला. त्याच रात्री नारायणराव पकडले गेले नि पुन्हा छळयातनांच्या चक्रात सापडले.
          २१ जून १९११ ला सुटल्यानंतर त्यांना कोठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेना. शेवटी कोलकात्याच्या `नॅशनल मेडिकल महाविद्यालयात' प्रवेश मिळाला. आर्थिक चणचण, शासकीय गुप् आरक्षींचा ससेमिरा, पुन:पुन्हा होणार्या चौकशा यांना तोंड देत, १९१६ मध्ये नारायणराव `अँलोपथी' आणि `होमिओपथी' या दोन्हींचे पदवीधर झाले. `दंतचिकित्सा' या विषयातही त्यांनी पदवी घेतली. त्या दिवसांत शिक्षणव्यय भागवण्यासाठी त्यांनी अधूनमधून व्यापारी पेढ्यांवर कारकुनाचे कामही केले. विद्यार्थीदशेत त्यांना मॅडम कामा यांनी फ्रान्समधून पाठवलेल्या अर्थसाहाय्याचे मोलच करता येणार नाही!
           कोलकात्यामधील त्या दिवसांतच नारायणराव आणि डॉ. हेडगेवार यांची मैत्री झाली. त्या दिवसांतली एक गोष्ट सांगण्याजोगी आहे. तिघाचौघा मित्रांचा एक गट झाला होता. आर्थिक अडचण तर नेहमीचीच. खानावळीतून दोन व्यक्तींचा डबा मागवायचा आणि तो चौघांनी वाटून खायचा, असे चाले. अर्थातच तो अपुरा पडे. `तुम्ही पाठवता तो डबा पुरत नाही' असे खानावळवाल्याजवळ एकदा गार्हाणे केल्यावर थोडी वादावादी झाली; पण तो म्हणाला, ``तुमच्यापैकी एकाने एक दिवस इथे येऊन जेवावे. तो जेवढे खाईल तेवढे मी पाठवीन.''
           वसतीगृहावर आल्यावर विचारविनिमय झाला आणि डॉ. हेडगेवारांनी जेवण्यास जावे असे ठरले. हेडगेवार जेवायला गेले आणि त्यांनी बावीस-चोवीस पोळया खाल्ल्या ! खाणावळवाला पहात होता. त्याची दानत अशी की, त्याने शब्द पाळला. तो प्रतिदिन तेवढ्या पोळया पाठवू लागला आणि चौघांचे बर्यापैकी भागू लागले !
          या प्रसंगाविषयी विख्यात लेखक पु.भा. भावे एका लेखात म्हणतात, ``खादाडपणाची ही कहाणी हिंदुत्वाला अमृतवाणी ठरली. कारण त्या काळात खाल्लेला प्रत्येक घास हिंदुजातीचे आयुष्य वर्षावर्षाने तेज:पुंज पराक्रमी करता झाला. पुढे १९४० सालापर्यंत ठिकठिकाणी घडणार्या मुसलमानी अत्याचारांना ठायीठायी हाणण्यात आले ते याच सावरकर-हेडगेवार मैत्रीमुळे !''

चार पदरी संसार !

           वैद्यकीय पदवीग्रहणानंतर १९१६ मध्ये मुंबईतच वैद्यकीय व्यवसाय करण्याचे ठरवून डॉ. नारायणरावांनी औषधालय थाटले. या औषधालयाचे उद्घाटन करण्याची त्यांनी साहित्यसम्राट .चिं. केळकर यांना विनंती केली. त्यांनीही ती आनंदाने स्वीकारली, कारण त्यांनाही डॉ. नारायणरावांच्या देशभक्तीचे कौतुक होते. यापूर्वी म्हणजे १९१५ साली सौ. येसूवहिनींच्या आग्रहामुळे त्यांनी विवाह केला होता. त्यामुळे मुंबईत औषधालयाबरोबरच घर घेऊन त्यांनी संसारही थाटला.
            एकीकडे व्यवसाय, दुसरीकडे प्रपंच, तिसरीकडे गुप्तपणे क्रांतीकार्य क्रांतीकारकांना साहाय्य आणि प्रत्यक्षपणे करता येईल तितके समाजकार्य अशी चौपदरी जीवनक्रमाची त्यांची घोडदौड चालू झाली.

लोकमान्य टिळकांचे अनुयायित्व !

           लो. टिळकांच्या मुंबईतील सार्या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी झटणार्या अनुयायांत डॉ. नारायणराव पुढे असत. लो. टिळकांच्या दौर्यात ते अनेकदा त्यांच्याबरोबर असत. काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनांना ते नियमितपणे उपस्थित रहात. मुंबईतील सार्वजनिक कामांतील त्यांच्या नावलौकिकामुळे ते काही काळ मुंबई नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य होते. प्रारंभीच्या काळात अन्य अनेक नेत्यांप्रमाणेच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ब्रिटीशविरोधी सत्याग्रहात आणि विधायक कार्यक्रमांत भाग घेतला शिक्षा भोगल्या. १९२५ नंतर रा.स्व. संघाच्या प्रसारात मन:पूर्वक साहाय्य केले आणि त्यानंतर १९३७ पासून हिंदुमहासभेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले. या सर्व काळात अखेरपर्यंत हिंदुस्थानच्या हितार्थ स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि हिंदुहितासाठी कार्य हे सूत्र मात्र कधीही सुटले नाही. क्रांतीकार्याला त्यांचे गुप्तपणे साहाय्य असेच. स्वत:चे शिक्षण पूर्ण करून व्यवसाय आणि प्रपंच करतांनाच, प्रभावी वक्तृत्व, लेखन आणि विधायक सामाजिक कार्य यांद्वारे दोघा वडील बंधूंच्या कार्यास पूरक कार्य ते करत राहिले.

लेखनकार्य आणि समाजकार्य !

           अब्दुल रशीदने स्वामी श्रद्धानंदांचा खून केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ डॉ. ना.दा. सावरकरांनी `श्रद्धानंद' नावाचे साप्ताहिक चालू केले. `या साप्ताहिकातील लिखाणाचा बुद्धीवादाचा माझ्यावर खोल ठसा उमटला', असे पु.भा. भावे यांनी म्हटले आहे. १० जानेवारी १९२७ ते १० मे १९३० पर्यंत ते `श्रद्धानंद'चे संपादक- संचालक होते.
           लोकमान्यांच्या निधनानंतर गिरगांव चौपाटीवरील त्यांच्या दहनस्थानी कुठल्याही प्रकारे स्मारक उभारण्यास ब्रिटीश शासन अनुमती देत नव्हते. परंतु अनेक `टिळक भक्तांनी' त्या जागेचे पावित्र्य जपले. त्या जागेचा सांभाळ केला. पुढे १९३० मध्ये स्मारक उभे राहिले. त्या सर्व कामांत डॉ. नारायणरावांचा सहभाग होता. चौपाटीवर हिंदु धर्माची निंदा करून ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्या एका मिशनर्याला डॉ. नारायणराव, डॉ. वेलकर आणि सुरतकर या तिघांनी असा धडा शिकवला की, त्याने पुन्हा तिथे पाय ठेवला नाही !
             मुंबईत जागोजाग असणार्या पठाणांच्या जागी रक्षक म्हणून गुरखे आणणे हे डॉ. नारायणरावांनी केलेले आणखी एक कार्य. श्रद्धानंद महिलाश्रमाच्या प्रमुख संस्थापकांपैकीही ते एक होते. या आश्रम उभारणीसाठी आणि नंतर त्याच्या प्रत्यक्ष कार्यातही त्यांनी मन:पूर्वक कष्ट घेतले. गोव्यातील गावडे लोकांच्या शुद्धीकरणाची जी प्रचंड चळवळ विनायक महाराज मसूरकर यांनी सुरू केली, त्या कार्याला डॉ. नारायणरावांचे सर्व प्रकारे साहाय्य होते. १९२५, १९३७, १९३९ या वर्षी मुंबईत झालेल्या हिंदु-मुस्लिम दंग्यांत प्रत्याघात करणार्या हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी त्यांनी वाहिली !

विशेष साहित्यसेवा !

          ३० एप्रिल १९३० ला नारायणरावांना झालेल्या कारावासामुळे `श्रद्धानंद' साप्ताहिक बंद पडले. राजकीय कार्याच्या धकाधकीतही त्यांनी साहित्यसेवा केली. `वसंत' या टोपणनावाने लिहिलेले काव्य, १८५७ च्या समराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली `मरण कि लग्न' ही कादंबरी, `जातिहृदय' या नावाखाली लिहिलेली `समाजरहस्य' ही कादंबरी, `जाईचा मंडप' कादंबरी; सेनापती टोपे यांचे चरित्र, `हिंदूंचा विश्वविजयी इतिहास' इत्यादी त्यांचे साहित्य गाजले. स्वा. सावरकरांच्या `हिंदुत्व' आणि `हिंदुपदपादशाही' या महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवादही त्यांनी केले.
           ३० जानेवारी १९४८ ला गांधीवध झाल्यानंतर दुसर्या दिवशी त्यांच्या रहात्या घरावर गुंडांनी दगडफेक आणि हल्ला करून आजारी असलेल्या डॉ. नारायणरावांना भयंकर जखमी केले. ते बेशुद्ध झाले. तितक्यात आरक्षी पोहोचल्याने त्यांचे प्राण वाचले; परंतु त्यांना के..एम्. रुग्णालयात भरती करावे लागले. त्यांना अटक करण्याची शासकीय आज्ञा असल्याने तेथे त्यांच्यावर पोलीस पहारा होता. यातून डॉ. नारायणराव वाचले खरे, पण यामुळे खालावलेली त्यांची प्रकृती पूर्वपदावर आलीच नाही. ऑक्टोबर १९४९ च्या पहिल्या आठवड्यात पुणे येथील `दै. प्रभात'साठी `हिंदूंचा विश्वविजयी इतिहास' या लोकप्रिय झालेल्या लेखमालेतील लेख लिहित असतांनाच डॉ. नारायणरावांना अर्धांगवायूचा झटका आला ते बेशुद्ध पडले. १९ ऑक्टोबर १९४९ ला त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले.
         आपल्या दोन्ही बंधूंप्रमाणेच देशसेवेत अग्रेसर राहून डॉ. नारायणराव सावरकर यांनीही `सावरकर' कुलाचे नाव उज्ज्वल केले !

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive