Tuesday, May 25, 2010

नाईलच्या देशात : "निघालो होतो कैरोला......"

नाईलच्या देशात - १ : "निघालो होतो कैरोला......"

प्रवास सूचीवर मुंबई ते कैरो उड्डाण ७३७-८०० विमानाने असल्याचे वाचून थोडा विरस झाला. ही ३ * ३ आसन रचनेची विमाने देशांतर्गत प्रवसाला ठिक असली तरी मोठ्या प्रवसाला थोडी अडचणीची वाटतात. मात्र तिथे पोहोचण्याची / तिथुन परत येण्याची सोयीस्कर वेळ आणि वाजवी किमतीत हव्या असलेल्या तारखांना असलेली उपलब्धता - तिही ऐन मोसमात या निकषांवर इजिप्त एअर हा सर्वोत्तम पर्याय होता. संपूर्ण प्रवास नियोजन करुन देणार्‍या माझ्या मित्राने मला आगाऊ कल्पना दिलीच होती की ही विमानसेवा काही मोठी खास नाही पण वरील निकषांप्रमाणे योग्य आहे आणि वाइट नक्की नाही. आधी चौकशी केलेली बरी, नपेक्षा आयत्या वेळी उड्डाणे रद्द करणारी सेवा गळ्यात पडली तर सहलीचा बट्ट्याबोळ व्हायचा. रॉयल जॉर्डन चे विमान ठरलेल्या वेळेत निघतेच असे नाही आणि निघते तेव्हा ठरलेल्या स्थळी थेट जातेच असेही नाही; समजा मुंबईला निघालेल्या विमानाला अचानक कलकत्त्याचे घसघशीत मालवाहु भाडॆ मिळाले तर ते उड्डाण कलकत्तामार्गे मुंबई असे बदलण्यात येते असे ऐकुन होतो. बाकी एअर इंडियाने प्रवास केलेल्याला इतर कुठल्याही विमानसेवेबद्दल तक्रार असायचे काही कारण नसते म्हणा. असो.

मी, पत्नी व चिरंजीव असे तिघे होतो. तिघांना मिळुन साठ किलो बोजे सामानात नेता येत असतानाही (खांद्यावरचे ओझे वेगळे हो!)आपले सामान कमी आहे असे अनेकदा ऐकावे लागले. मी दुर्लक्ष केले. मात्र प्रवासात उगाच लोढणे नको म्हणुन मला माझी चित्रण तिपाई घेण्यास मनाई केली गेली होती. असो. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. दहाचे उड्डाण म्हणताना आम्ही नियमानुसार मुकाट्याने सातलाच दाखल झालो. खरेतर तिथे तीन तास ताटकळणे हा काही सुखाचा अनुभव नाही पण वेळ पाळलेली बरी. विमान आणि डॉक्टर यांची एकतर्फी शिस्त असते. तुम्ही उशीरा आलात तर तुमचे उड्डाण वा ठरलेली वेळ गेली. मात्र तुम्ही वेळेवर आल्यावरही तुम्हाला आपल्या सोयीने घेण्याचे अधिकार या दोहोंकडे असतात. त्यांची कारणे नेहमीच 'रास्त व अपरिहार्य' असतात, आपण काय ते रिकामटेकडे. विमनतळावर सर्व सोपस्कार संपवुन आम्ही उड्डाणद्वारासमोर येऊन स्थिरावलो. दिवसाचे उड्डाण म्हणजे कंटाळवाणा प्रकार.

उड्डाणपत्र, बहिर्गमन, सुरक्षा तपासण्या वगैरे सोपस्कार संपवुन आम्ही आमच्या निर्दिष्टीत उड्डाणदरवाज्या समोरील जागेत आसनस्थ झालो. पलिकडील खुल्या उपहारगृहात कर्मचार्‍यांची जमवाजमव सुरू होती. आमच्याच उड्डाणदरवाज्याने एअर ईंडियाच्या परदेशातुन आलेल्या उड्डाणाचे आता चेन्नाईला प्रस्थान होते. आता यांचे उड्डाण कोणत्या दरवाज्यावर लावले आहे ते जाहिर केले नव्हते की ते त्यांनाच आगाऊ माहित नव्हते हे तेच जाणोत, पण दर पाच मिनिटांनी होणार्‍या उद्घोषणेबरोबर दारावरचे तसेच आसपास वावरणारे कर्मचारी तोंडाने 'चेन्नै, चेन्नै' असे कोकलत होते. मला माझ्या लहानपणचे ठाणे स्थानक आठवले. स्थानका बाहेरील टॅक्सी अड्ड्यावर लाकडी बांधणीच्या डॉज, प्लायमाउथ गाड्या उभ्या असायच्या आणि चालक व त्यांचे अडते स्थानकाबाहेर पडणार्‍या उतारुंकडे पाहत 'भिवंडी एक शीट' असे ओरडत असायचे. गाडीची क्षमता वा उपस्थित उतारूंची संख्या काहीही असो, 'भिवंडी एक शीट' हे परवलीचे वाक्य होते.

कुठे घरी संपर्क साध, कुठे कॉफी घे, कुठे आपल्या बरोबर कुठले उतारू आहेत ते आजमावुन कुणी बोलका दिसल्यास नमस्कार चमत्कार कर, असे करीत वेळ काढत असताना अखेर आमचे उड्डाण जाहिर झाले आणि आम्ही सरसावलो. सुरक्षा रक्षकांबरोबर विमनसेवेचा सेवकवर्गही आत शिरणाऱ्यांच्या तपसणीत तैनात होत. कर्मचारी वर्ग हसतमुखाने वावरत होता हे पहुन बरे वाटले. विमानात शिरलो आणि आसन व्यवस्था बरी वाटली. दोन रांगांमध्ये बर्‍यापैकी अंतर होत. अगदी ऐसपैस नाही तरी गुडघे समोरच्या आसनाच्या पाठीला घासत नव्हते ही जमेची बाजु. जवळ पास सहा तास एकाच जागी बसायचे म्हणताना खरेतर बोईंग ७७७ श्रेणी वा एअर बस ३३० श्रेणी हवी. जनता दर्जाची आसनेही मोकळी व सुखद असतात. योगायोगाने आमच्या रांगेतील पलिकडच्या तीनही आसनांवर कुणीच न आल्याने ती ओस पडलेली लक्षात आली. चिरंजीवांनी विमानाचे दरवाजे बंद होण्याची उद्घोषणा होताच आम्हाला सोडुन त्या आसनांपैकी मधल्या आसनावर टोपी, जाकीट वगैरे टाकत स्वत: खिडकी ताब्यात घेतली. डोळ्यावर भगभगीत प्रकाश नको वाटत असला तरी खिडकीच्या झापा काही वेळ तरी उघड्या ठेवणे अनिवार्य होते. साधारण अर्ध्या तासाच्या खोळंब्यानंतर विमान आकाशात झेपावले. थोड्या वेळाने सेवक वर्ग न्याहरी घेउन आला. पलिकडील एका षौकिनाने 'फक्त खायलाच' का? अशी उघड विचारणा केली तेव्हा सेवकाने हॅ हॅ करीत साळसूदपणे सांगितले की आजकाल लोक फार पितात आणि मग इतर प्रवासींना त्याचा उपद्रव होतो त्यापेक्षा आम्ही अपेयपानाला थाराच देत नाही! सकाळी सकाळी कुणी पीत नसावे असा माझा समज मागे एकदा दुबई हून पहाटे साडेचारच्या उड्डाणात दूर झाला होता. उड्डाणानंतर पाउणेकतासात सेविका ढकल गाडी घेउन अवतरताच अनेक भाविकांनी पहाटे पाच सव्वा पाचला काकड आरती केलेली पाहुन मी थक्क झालो होतो. इथे पिण्याच्या आनंदापेक्षा 'फुकट आहे तर का सोडा' हा भाव अधिक प्रबळ असावा.

उड्डाण बव्हंशी आखाती देशांवरुन जात होत; कधी भूभाग तर कधी समुद्र. मी कॅमेरा काढला आणि मांडीवर घेउन बसलो. काही बरे दिसले तर टिपु असे म्हणत असतानाच खाली निळ्याशार पाण्याच्या कडेने पांढऱ्या वाळुच्या भूमीवर वसलेले कुठलसं शहर दिसलं. d1

मग बराच वेळ खाली निळं पाणी आणि वर निळशार आकाश, मधेच कुठेतरी पोह्यांवर नारळ भुरभुरल्यागत विखुरलेले पांढरे तुरळक ढग असे दृश्य दिसत होते. s2

काही वेळातच एक मजेशीर चाळा मिळाला. खाली सागरात निळे पाणी आणि लाटा यांवर तरंगत एक मालवाहु जहाज आपला मार्ग आक्रमीत होते. लवकरच आम्ही त्याला ओलांडले. आता ते जहाज अगदी बरोबर खाली होते. पुढे निळे पाणी आणि त्याला भेदत जाणारे जहाज व त्याच्या मागे फेसाचा शुभ्र पिसारा असे सुरेख दृश्य दिसत होते. आणि बघता बघता आमचे विमान वाळवंटी भूभागाकडे वळले तर ते जहाज उजव्या अंगाने निघुन गेले. आता नजर पोचेल तिथे फक्त वर आकाश आणि खाली वाळु होती. वाळुच्या टेकड्या म्हणताच आपल्या डोळ्यापुढे एक विशिष्ठ दृश्य उभे राहते. मात्र इथे जवळपास ३५ हजार फूट उंचीवरुन सरळ रेषेत खाली बघताना मात्र वेगळेच रुप दिसत होते. d2

आणि अचानक वाळवंटतातील तिरकस सरपटणार्‍या सापासारखा एक काळाशार रस्ता खालुन उलगडत गेला. रस्ता दुभजकावर जमलेल्या वाळुच्या कणांमुळे दुतर्फा पसरलेला तो रस्ता खरोखरच पाठीवर सोनेरी रेघ असलेल्या सर्पासारखा भासत होता. d3

तो देखणा रस्ता नजर खिळवुन ठेवणारा होता. मात्र पुढच्याच क्षणी मनात विचार आला, की आपण अशा रस्त्याने जात असताना मोटारीतले इंधन संपले वा यंत्रात बिघाड झाला तर???? अंगावर काटा आला.

वाळवंटात हिरवळ हा शब्दप्रयोग ऐकला होता, पण खाली अक्षरश: ओसाड वाळवंटात वर्तुळाकार वा अर्धवर्तुळाकार हिरवळी पाहुन मी थक्कच झालो. नक्कीच या हिरवळी गोलाकार भागात खास निर्माण केलेल्या असाव्यात आणि त्यांना विशिष्ठ आकार दिलेला होता. घड्याळात वेळ दाखविणारे काटे सरकताना सरकलेल्या भागात जर तबकडीचा रंग वेगळा झाला तर कसे दिसेल तदवत चतकोर, सव्वा चतकोरांसारखे अनेक वर्तुळाकार सलग दिसत होते. d4

सध्या जोमाने जाहिरात करत असलेल्या टाटा डोकोमो ला आपली अक्षर रचना या हिरवळीकडे पाहुन सुचली असावी का असा एक मजेशिर विचार मनात येउन गेला. हा काय प्रकार असावा हे कुतुहल अद्यापही मनात आहे. कुण्या आखातस्थाने यावर माहिती द्यावी ही नम्र विनंती. अशा हिरवळी अनेक ठिकाणी दिसल्या, माझ्या निरिक्षणानुसार त्या हिरवळी साधारण मोठ्या रस्त्याच्या आसपास होत्या.

जसजसे आम्ही अफ्रिकेकडे, खुद्द इजिप्तकडे जवळ सरकु लागलो, तसे खालचे वाळवंटही बदलले. वाळुच्या टेकड्या व पठारांची जागा आता मोठ्या खडकाळ पर्वतांनी घेतली होती. पर्वत म्हणजे जणु थिजलेला लव्हारस! एखाद्या मुशितुन साच्यात ओतुन एकसंध पाडावे असे कडे पर्वत माथ्यांवर पसरलेले होते. d5

एकुण पसरलेल्या पर्वतरांगा पाहताना आपल्या सह्याद्रीच्या पर्वतमाथ्यांवरील दुर्गांची आठवण न झाली तरच नवल. फरक इतकाच की कुठे हिरवळ वा मृदु जमिनीचा थांगपत्ताही नव्हता सगळा मामला दगडाचा. जणु खडक छिन्नीने फोडुन हा पर्वत कोरला असावा. या पर्वतांवरुन जलौघ वाहायचे दूरच, मात्र प्रवाही वाटांवरुन वाळु वाहत होती. अशाच वाळुच्या झर्‍यांनी सजलेल्या एका पर्वताच्या पायथ्याशी सोसाट्याच्या वार्‍याने धुरळा उडवायला सुरूवात केलेली दिसली. वाळुचे लोट आसमंतात पसरत टेकड्यांच्या माथ्यापलिकडे उधळताना दिसत होते.d5

मात्र एकाएकी या उदी तपकिरी निसर्गदृश्यात निळा रंग अवतरला! ते अविस्मरणीय दृश्य मी कधीच विसरू शकत नाही. d6

अलिकडे मऊसूत भासणार्‍या वाळुचे गालिचे, पुढे जेरी माउसच्या चीजसारखे दिसणारे व वाळुचे प्रवाह अंगावर वागवणारे पर्वत व त्या पलिकडे निळेशार पाणी!

आता प्रवास संपत आला होता असे घड्याळ सांगत होते. सेवकवर्गाचीही आवरासावर सुरू झाली. विमानातील चित्रपटलावर कैरोचा मार्ग दिसत होता, ठिपका जवळ येत होता. अचानक विमान डावीकडे झुकले व एक झोकदार वळण घेत विमान पुढे निघाले. विमान आता उंची कमी करीत बर्‍यापैकी खाली आले होते. एव्हाना वाळवंट गायब होऊन तिची जागा देखण्या निळ्याशार सागराने घेतली होती. मंचकावर भरल्यापोटी पसरून विश्रांती घेणारे ते समुद्रदेवतेचे रूप मोठे विलोभनिय होते. se1
निळ्या रंगाच्या अनेकानेक छटांनी नटलेले जणु ते निसर्गदृश्यच. संथ हलक्या लाटा, मधेच नितळ पाण्यातुन दिसणारा भूभाग तर किनार्‍याला जमिन व पाण्याचा तरंग असलेला काठ यांचा संगम असे ते दृश्य होते. विमान आणखी खाली झेपावले आणि तो क्षण अचूक साधत मी लाटांनी साय धरलेले जलपृष्ट व त्यावर परावर्तित होऊन चकाकणारे उन हे दृश्य टिपले.se2

आणि अचानक डोक्यात किडा वळवळला. नकाशात कैरो सरळ पुढे दिसत असताना आमचे विमान मात्र डावीकडे वळले होते आणि बराच वेळ तसेच जात होते. आतातर उंचीही घटत होती. वाईट शंका सहसा खोट्या ठरत नाहीत. मी उठुन काही विचारायच्या आतच उद्घोषणा झाली ' खराब हवामानामुळे कैरो विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे विमान आता कैरो ऐवजी हुर्घाडा येथे उतरविण्यात येत आहे' क्षणभर सन्नाटा आणि मग सर्वत्र एकच गलका उठला. 'आता काय?' या प्रश्नाने सर्वांना चिंतित केले होते. मुंबईहून निघालेल्या विमानात बहुसंख्य उतारु भारतिय होते, सगळेच पर्यटक होते. जर आज कैरोला पोहोचलोच नाही तर न्यायला आलेले सहल आयोजक कुठे भेटणार? आपले विमान आता येत नाही तर ते कधी येईल हे त्यांना कसे समजेल? प्रत्येकाचा मुक्काम एकेका ठिकाणी नेमका ठरलेला. जर पहिलाच दिवस बुडाला तर सगळेच ओंफस! बोंबला! जरा वातावरण निवळल्यावर कर्मचार्‍यांनी खुलासा केला की ईजिप्तचे हवामान अत्यंत लहरी अहे. हवा कधी पलटेल काही नेम नाही. बरोबरच आहे, अगदी अर्धा तास आधी आम्हालातरी कुठे माहित होते? मनात अनेक प्रश्न होते पण उत्तर नव्हते. जेजे होईल तेते पाहणे यापलिकडे हातात काहीच नव्हते. असो. आता जे आहे त्यांत बरे शोधा हे खरे. मी अर्चनाला म्हणजे माझ्या पत्नीला व चिरंजीवांना उसने अवसान आणीत म्हणालो, 'चला रे आपल्या रुपरेषेत हुर्घाडा नव्हते ते अनायासे फुकटात पाहायला मिळतयं तर बघुन घ्या'. हुर्घाडा हे लाल समुद्राकाठचे ठिकाण, पर्यटनासाठी प्रसिद्ध. आता पुढची चिंता करण्यापेक्षा हुर्घाडाचे सौंदर्य दिसतेय तितके टिपुन घ्यायला मी सज्ज झालो. विशाल सागरात मधेच पसरलेली बेटं आणि पांढर्‍या-बदामीसर वाळुवर निळ्या रंगाच्या पाण्याने रंगवलेल्या छटा टिपताना मी रंगुन गेलो. se3
se4

कुठे किंचित माथा वर असून बाकी पाण्याखाली गेलेली बेटे तर कुठे वाळुचे बेट असा खेळ चालला होता. अखेर हुर्घाडा विमानतळ आला आणि किनार्‍याची वस्ती दिसु लागली. ज्या वेळेस आम्ही कैरो गाठणार त्या वेळी आम्ही शेकडो मैल दूर हुर्घाडा येथे उतरून पडलो होतो.

हुर्घाडा विमानतळ ओसाड वाळवंटात वसलेला. इथे मला इग्लुच्या आकारचे अनेक आडोसे दिसले. बहुधा वाळुच्या वादळाप्रसंगी सुरक्षित राहायचा तो आसरा असावा. आमचे विमान थांबले. अलिकडे पलिकडे जन्मात कधीही नाव ऐकलेल्या विमानसेवांची विमाने उभी होती. समोर विमानतळाच्या छोटेखानी ईमारती होत्या. आम्हाला खाली उतरण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.(आता इथे मरायला कोण गुपचुप आत सटकणार होत?). प्रत्येकजण कर्मचार्यांना एकच प्रश्न विचारीत होता, आणि तो म्हणजे आम्हाला कैरोला कधी पोहोचविणार? मुख्य सेवकाने स्पष्ट केले की ते आम्हाला इथे नक्कीच ठेवणार नाहीत, ते कैरोला नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. आता हाती केवळ वाट बघणे होते. आणि अचानक माझ्या खिडकीतुन मला एक इंधनाची गाडी आमच्या विमानाच्या रोखाने येताना दिसली. ही बातमी मी आंत देताच जरा गारवा आला आणि सुकलेले चेहरे खुले लागले.ती गाडी खरोखरीच आमच्या पंखाखाली येउन स्थिरावली. नळकांडी बाहेर निघाली, विमानाच्या पोटात खुपसली गेली आणि जीव भांड्यात पडला. लगोलग उदघोषणा झाली की लवकरच विमान कैरोला रवाना होत आहे. उशीरा तर उशीरा. बघता बघता आम्ही सगळा हिशेब मांडला. मूळ वेळ तिथल्या .३० ची. रखडपट्टीत गेला एक तास. इथुन पुढे प्रवास आणखी एक तास. मग बाहेर पडुन सोपस्कार, सामान ताब्यात घेणे आणायला आलेल्या यजमान पर्यटन संस्थेच्या प्रतिनिधींना शोधुन काढणे याला अणखी एक तास. तरीही आम्ही साडेपाचला विमानतळाच्या बाहेर पडु शकत होतो! आमच्या आशा पल्लवित झाल्या. इतक्या लांबुन आलो तर काही राहुन गेले असे नको. मूळ कार्यक्रमानुसार आम्ही अडीच ला उतरुन साडेतीन पर्यंत बाहेर पडुन साडेचार पर्यंत हॉटेलवर जाणार. दोन-अडीच तास आराम करुन साडेसहाच्या सुमारास निघुन सायंकाळचा पिरॅमिड्सच्या पायथ्याशी असलेल्या उद्याना वजा खुल्या प्रेक्षागारात होणार्या दृक-श्राव्य कार्यक्रमास जाणार...

असो. आता यातली दोन अडीच तासांची विश्रांती घटवली तर गणित जमण्यासारख होतं. अखेर विमान उडालं आणि आम्ही पुन्हा खुषीत आलो. वाटेत सर्वत्र डोंगर, वाळुच्या टेकड्या मैलोगणती मानवी अस्तित्वाचा कुठलाही पुरावा देणारा प्रदेश. मध्येच मनगटा एवढा जाडा एखादा रस्ता दिसायचा. वाटेतले धूसर हवामान अपुरी दृश्यता सहज सांगुन जात होते की या आधी विमान कैरोला का येउ दिलं गेलं नाही. विमान उतरताना विमनतळाच्या अगदी जवळ बर्यापैकी खाली आल्यावर एक मजेशीर रस्ता पाहावयास मिळाला. हा बहुधा एखादा प्रमुख महामार्ग असावा. दोहो बाजुंनी रस्ता आणि मधोमध भरपूर रुंदीचा दुभाजक. पटकन एखादा लोहमार्ग असल्याचा भास झाला.
ca

अखेर एकदाची विमानाची चाके टेकली, बराच वेळ गरागरा फिरुन अखेर हक्काच्या स्थानावर आलं आणि मानवंदना दिल्यागत सर्व प्रवासी उठुन उभे राहिले. सवयीने खिशातला हस्तसंच बाहेर काढुन चालु केला आणि काही क्षणातच वोडाफोन इजिप्तचा स्वागतसंदेश झळकला आणि जरा हायसे वाटले. हो, उशीर झाला होता, आमच्या यजमानांना शोधणे अगत्याचे होते. तसे हे पर्यटन वाले कितीही उशीर झाला तरी आपल्या पाहुण्याला घेतल्याशिवाय जात नाहीत म्हणा पण समजा चुकामुक झालीच तर संपर्क साधन हातात होते हे उत्तम झाले.

आता शिताफिने चाल करुन गर्दी व्हायच्या आत सीमाधीकार्यांचे दालन गाठुन आपल्या पारपत्रावर देशागमनाचा इजिप्ती ठसा उमटवुन घेणे हे आद्य कर्तव्य होते. आणि ते बर्यापैकी जमलेही. पुढचं गोरं जोडपं पार पडताच आमचा क्रमांक. सहसा कुठेही गेलं तरी गोर्या कातडीला झुकतं माप मिळतं खरं. जो फरक देवाने निर्माण केला तो अद्यापही मानव विसरु शकला नाही की नजरेआड करू शकला नाही. इथे मात्र वेगळाच अनुभव आला! आधीच्या गोर्यांशी जितक्यास तितकं बोलत निर्विकार चेहेर्याने छाप उठवणाऱ्या त्या सरकारी अधिकार्याच्या चेहर्यावर आमची पारपत्रे हाती येताच एकदम स्नेहार्द्र भाव उमटले. 'ईंडिया! अमिताभ बच्चनस कंट्री' - " के ईंडिया, वेलकम टु इजिप्त!" 'आमिताभ आम्हाला खूप खूप आवडतो आणि आम्ही त्याचे सर्व चित्रपट आवडीने पाहतो' असे म्हणत त्याने प्रेमाने हस्तांदोलन करत झटपट शिक्के मारत आमची पारपत्रे आमच्या सुपुर्द केली बरोबर इजिप्त मधील वास्तव्य सुखाचे होवो अशा शुभेच्छाही दिल्या. त्या अधिकार्याचे आभार मानत आम्ही बाहेर पडलो. आजपर्यंत ज्याला आपण केवळ एक लोकप्रिय अभिनेता समजत होतो तो आपल्या देशाचा अशा प्रकारे राष्ट्रदूत आहे हे मला नव्यानेच उमगले. पुढे असा अनुभव अनेकदा आला.

लगोलग खर्चापुरते डॉलर, 'एल ' म्हणजे इजिप्शियन पौंडात (लिरे इजिप्शियन म्हणुन एल असे लघुरूप)परिवर्तित करुन घेतले आणि आम्ही सामान पट्ट्याकडे घावलो. विनाविलंब आणि विनाघोळ सर्व नग पोहोचले होते. सामान उचलुन आम्ही बाहेर आलो तर विशीतले दोन तरतरीत युवक आमच्या नावाचा फलक घेऊन उभे असलेले दिसले. आम्ही हाक मारताच त्यांनी जवळ येत ओळख पटवुन घेतली अदबिने खास इजिप्तच्या औपचारिक शब्दांत आमचे स्वगत केले " आपल्या या दुसऱ्या घरात अपले स्वागत असो"! ऐकायला खूप बरे वाटले. पुढे संपूर्ण प्रवासात हे वाक्य आम्हाला अनेकवेळा ऐकायला मिळालं. आमच्या सहलनायकांची नावे होती अहमद आणि महमद. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा, पुढील प्रवासाची तिकिटे, संकेतचिट्ठ्या वगैरे बाड आमच्या सुपुर्द करताना आपल्या मालक व्यवस्थापक यांची परिचयपत्रेही दिली. मालकाचे नाव अब्दुल अहमद तर व्यवस्थापकाचे नाव होते महमद गमाल. अरेच्च्चा! पुन्हा अहमद महमद ही जोडी आहेच की:)

एव्हाना सव्वापाच वाजुन गेले होते. म्हणजे हॉटेलवर जायला किमान सव्वासहा. विमनतळाच्या बाहेर आलो, हवा मळभट झाली होती. आमच्या सहलनायकांनी आम्हाला आमच्या सर्व नगांसह गाडीत बसवलं आणि आम्ही हॉटेलकडे निघालो. अचानक नजर वर गेली तर काय! सूर्य सोनेरी दिसता चक्क रुपेरी दिसत होता. जणु 'दिवसपाळीला आलेला चंद्र'. कॅमेरा पेटी मागे सामान कप्प्यात गेल्याने तो रुपेरी सूर्य टिपता आला नाही. विमानतळाचा परिसर सोडुन आम्ही गावाकडे निघालो आणि वाहतुक, गर्दी, खणलेले रस्ते, अपुरे राहीलेले उड्डाणपूल, बाहेरच्या भिंतींना गिलावा केलेली घरे हे सगळे दृश्य निश्चितच उत्साहावर पाणी फिरवीणारे होते. एकतर अनिश्चितता, उशीर, त्यात पुन्हा गेल्यावर सामान टाकुन जेमेतेम तोंड धुवुन पुन्हा बाहेर पडायचे आहे हा धोशा. बरे कार्यक्रम नको म्हणायची सोय नाही कारण हातात मोजका वेळ त्यामुळे थोडी चिडचीड होऊ लागली होती; त्यात गर्दी आणि वाहतुकीच्या रांगा. एका ऊड्डाणपूलाखालुन उजवीकडे वळताना आमचे सहलनायक दिलासा देत म्हणाले की आता वळल्यावर पाच मिनिटात आपण हॉटेलवर! वळलो आणि बघतो तर काय? समोर चक्क 'हमारा बजाज!' चक्क बजाजच्या ऑटोरिक्षा, त्याही काळ्या पिवळ्या हो! आणि बजाज मंडळींनी नुसत्या रिक्षाच नव्हेत तर त्या चालवायची विद्याही इकडे धाडली असावी. तेच झपकन वळणे, तेच अचानक थांबणे. एकुण दुस़र्या घरात आलो हे खरेच होते तर:)

हॉटेलवर सोपस्कार पूर्ण करून खोली ताब्यात घेतली, मस्त गरम कॉफी ढोसली, गरम कपड्यांचा थैला उघडुन थोडे कपडे घेतले आणि खाली उतरलो. सुदैवाने हॉटेल गिझा परिसरात अगदी हमरस्त्यावर असल्याने पिरॅमिड च्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रकाशाचा कार्यक्रम सादर होणारे प्रेक्षागृह बर्यापैकी जवळ होते. अवघ्या १०-१५ मिनिटात आम्ही त्या स्थळी पोहोचलो. आमच्या हातात तिकिटे देत अहमद-महमद द्वयिने 'खेळ संपवल्यावर बाहेर या, आम्ही हे इथे उभे असू" असे एका दुकानाकडे बोट दाखवित सांगितले आम्हाला आत सोडले. आम्ही आंत जाऊन बाकड्यांवर बसलो. साला या वाळवंटात अंधाराबरोबर थंडीही इतक्या बेमालूमपणे पसरत असेल याची कल्पना नव्हती. आम्ही समोरचे लेसर किरणांनी साकार होणारे कार्यक्रम पाहत होतो खरे, पण सकाळी साडेचार पासून उठणे, मग ताटकळणे, मग दिर्घ प्रवास या सर्वाचा परिणाम म्हणजे विलक्षण थकवा जाणवु लागला होता. पोटात भूकही बोलु लागली होती. समोर खरेतर एकुण इतिहास, राजघराणी, पिरॅमिड्स मागचा उद्देश, ते कसे बांधले, त्याला काय किती बांधकाम साहित्य लागले, रितीरिवाज कसे होते, मृत्युनंतरचे जीवन हे चिरंतन त्यामुळे अधिक महत्वाचे कसे वगैरे रंजक प्रकारे दाखविले/ ऐकविले जात होते. मात्र अगदी प्रामाणीकपणे सांगायचे तर खेळ संपला बरे वाटले. एकदा कंटाळा आला की सगळेच नकारात्मक दिसु लागले. खालुन झोत टाकलेले ते पिरॅमिड्स पाहताना अगदी क्षूद्रपणे विचार आला की इतक्या लांबवरुन जीवाचा आटापीटा करुन जगातले आश्चर्य म्हणून जे पाहायला आलो ते बस एवढेसेच? तेव्हा माहित नव्हते की उद्या सकाळी आपण कान पकडुन शन्नांचे वाक्य म्हणणार आहोत.

खेळ संपताच दिवे लागले. लोक दुसऱ्या बाजुने परतीच्या रांगा धरुन हलु लागले. बघतो तर आम्ही आत शिरलो त्या दरवाज्यालगत लोकांना उबेसाठी कांबळी ठेवलेली होती, खेळ संपला की परत करायची. आमचा पोपट झाला होता. आधी माहित असते तर कानावर वारा घेत कुडकुडावे लागले नसते ना! बाहेर आलो. अहमद-महमद हजर होतेच. गाडी सरळ सगळे छोटे रस्ते सारुन मोठ्या रस्त्याला लागली नदीकिनारी एका उपाहारगृहापुढे थांबली. पाटीवर मत्स्यवर्णन मत्स्यचित्र पाहताच आम्ही शाकाहारी असल्याची चिंता आम्ही बोलुन दाखविली. मात्र त्या द्वयीने इथे शाकाहारी जेवणही मिळत असल्याची ग्वाही दिली. उपाहारगृह परदेशी पर्यटकांनी गजबजलेले होते. आम्ही जे काही भोजन लावलेले होते त्यापैकी काय काय घेता येईल याचा अंदाज घेत बशा भरल्या आणि स्थानापन्न झालो. समोर अहमद-महमदच्या बशीवर नजर पडताच चिरंजीवांनी बशीतल्या मत्स्याची चौकशी केली आपण 'सर्वभक्षी' असल्याचे सांगत त्या स्थानिक माशाची फर्माईश केली. अहमद-महमदांनी ती आनंदाने पुरी केली. जेवण झाल्यावर आम्ही शिरशीरी आणणार्या वातावरणात गरम कॉफी मागवली. इजिप्तच्या कडक कॉफीविषयी बरेच ऐकुन होतो. बघतो तर समोर कप बशा, कॉफीच्या थैल्या, साखरेच्या पुड्या आणि उकळत्या पाण्याची किटली आली होती! एकूण आजचा दिवस हा पोपट होण्याचा दिवस होता. आम्ही हॉटेलकडे निघालो.

वर खोलीत शिरताच आठवणीने खिडकीत गेलो पडदा सारला. हॉटेलचे आरक्षण करताना आवर्जुन पिरॅमिड्स दिसणारी खोली मागितली होती मिळालीही होती. मात्र आता पिरॅमिड्सच्या परिसरातली रोषणाई संपल्याने ते दिसत नव्हते. एकदा सामानाची जमवाजमव केली. उद्या सकाळी निघताना सामान घेउनच निघायचे होते. सर्व आवराआवर जमवाजमव करून आम्ही अखेर बिछान्यात शिरलो. पहिला डाव देवाला असे म्हणत आम्ही आता पुढचा प्रवास मजेचा आणि अविस्मरणीय होईल अशी आशा व्यक्त केली. सहसा कुठल्याही प्रवासाचा पहिला दिवस हा फारसा रंजक नसतो असा माझा अनुभव आहे. असो. इजिप्तमधला पहिला दिवस संपला, मध्यरात्र येऊ घातली होती, उद्या लवकर नाही तरी निदान सात-साडेसातला उठायचे होते. मऊ मुलायम बिछान्यावर उबदार पांघरुणात शिरताच डोळे कधी मिटले ते समजलेच नाही.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive