Thursday, May 13, 2010

Marathi Novel Ch-3:वर्ल्ड अंडर अंडरवर्ल्ड (शून्य- कादंबरी)

Ch-3:वर्ल्ड अंडर अंडरवर्ल्ड (शून्य- कादंबरी)

एका कॉलनीत एक टुमदार घर. बाहेर एक कार येऊन थांबली. कारमधून उतरून एकजण घराच्या आवारात शिरला. तो जवळपास पंचविशीच्या आसपास असावा. त्याने काळा गॉगल घातला होता. चालता चालता आवारातील गार्डनवर नजर फिरवीत तो दरवाज्यापाशी पोहोचला. आपल्या कारकडे एक नजर टाकीत त्याने दारावरची बेल वाजवली. दार उघडण्याची वाट पाहत तो कॉलनीतल्या इतर घरांकडे बघायला लागला. दार उघडण्यासाठी बराच वेळ लागत होता. दारासमोर शतपावली केल्यासारखे फिरत तो दार उघडण्याची वाट पाहू लागला. आतून चाहूल लागताच तो आत जाण्याच्या पावित्र्यात दारासमोर थांबला. दार उघडले. समोर दारात त्याच्याच वयाचा एकजण उभा राहिला. आतला दारातून बाजूला झाला आणि बाहेरचा घरात शिरला. ना बोलण्याची ना हावभावांची काहीच देवाणघेवाण नाही. बाहेरचा आत गेल्यावर आतून दार बंद झालं. त्यांचं राहाणीमान ,पेहराव आणि शरीराची ठेवण यावरून दोघांचंही मूळ अमेरिकन तर नक्कीच वाटत नव्हतं. दोघंही चुपचाप चालत घराच्या तळघरात येऊन पोहोचले. घराच्या रचनेवरून या घरास तळघर असावं असं बिलकुल वाटत नव्हतं.
जो बाहेरून आला होता त्याने विचारले, " बॉसचा मेसेज आला का?"
"
अजून नाही.... कधी काय करायचं बॉस सगळं मुहूर्त बघून करतो" दुसरा म्हणाला.
पहिला गालातल्या गालात हसत म्हणाला " एकेकाचं एक एक खूळ असतं"
दुसरा गंभीर होऊन म्हणाला "कमांड2 तुला जर आमच्यासोबत काम करायचं असेल तर सगळं कसं समजून घ्यावं लागेल. इथं सगळ्या गोष्टी तोलून मोलून प्रिकॅलक्यूलेटेड असतात"
कमांड2 नुसता त्याच्याकडे बघायला लागला.
"
कोणतीही गोष्ट करायच्या आधी बॉसला त्याचा रिझल्ट माहित असतो" कमांड1 म्हणाला.
एव्हाना ते अंधाऱ्या तळघरात येऊन पोहोचले. तिथे मध्यभागी एका टेबलवर एक कॉम्प्यूटर ठेवलेला होता. दोघंही काम्प्यूटरच्या समोर जावून उभे राहिले . कमांड1ने कॉम्प्यूटरच्या समोरच्या खुर्चीवर बसून कॉम्प्यूटर सुरू केला. कमांड2 त्याच्या बाजूला एका स्टूलवर बसला. कॉम्प्यूटरवर लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम सुरू होतांना दिसायला लागली.
"
तुला माहित आहे मी लिनक्स का वापरतो?" कमांड1 म्हणाला.
आश्चर्याने बघत कमांड2 ने फक्त नकारार्थी आपलं डोकं हलविलं.
"
कॉम्प्यूटरच्या जवळपास सगळ्या ऑपरेटींग सिस्टीम ज्यांचा कोड दिला जात नाही कुठल्या कंपन्या बनवितात?" कमांड1 ने विचारले.
"
अमेरिकेतल्या" कमांड2ने उत्तर दिले.
"
तुला माहित असेलच की ज्या सॉफ्टवेअरचं कोड कस्टमरला दिलं जातं त्यांना 'ओपन सोर्स' सॉफ्टवेअर म्हणतात... म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये काय होतं हे कस्टमरला कळू शकतं... आणि ज्या सॉफ्टवेअरचा कोडच कस्टमरला दिला नसेल त्या सॉफ्टवेअरमध्ये दुसरं असं बरंच काही होऊ शकतं जे व्हायला नको." कमांड1 सांगत होता.
"
म्हणजे?" कमांड2 ने मध्येच विचारले.
"
म्हणजे तुला माहित असेलच की मायक्रोसॉफ्टने एकदा जाहिर केले होते की ते त्यांच्या प्रतिर्स्पध्यांना शह देण्यासाठी त्यांच्या विंन्डोज ऑपरेटींग सीस्टीममध्ये 'टॅग्ज' वापरणार आहेत" कमांड1 म्हणाला.
"
हो ... तर ?" कमांड2 पुढे ऐकू लागला.
"
आणि त्या 'टॅग्ज' मुळे कंपनीला जे पाहिजेत तेच प्रोग्रॅम व्यवस्थित चालतील आणि दुसरे एकतर स्लो किंवा बरोबर चालणार नाहीत" कमांड1 म्हणाला.
"
त्याचा लिनक्स वापरण्याशी काय संबंध?" कमांड2 ने विचारले.
"
आहे ना ... अगदी जवळचा संबंध आहे... हे बघ जर ते आपल्या प्रतिर्स्पध्यांना शह देण्यासाठी असे 'टॅग्ज' वापरू शकतात की जेणे करून त्यांच्या प्रतिर्स्पध्यांचा एकदम खातमा होऊन जाईल... असंही शक्य आहे की ते त्यांच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये असे काही 'टॅग्ज' टाकतील की ज्याच्यामुळे सगळ्या जगातली महत्वाची माहिती इंटरनेटद्वारा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल ... त्यात आपल्यासारख्या लोकांच्या कारवायासुध्दा आल्या ... विशेषत: 9-11 नंतर हे त्यांना फार महत्वाचे झाले आहे" कमांड1 कमांड2कडे बघत त्याची प्रतिक्रिया घेत म्हणाला.
"
हो तू बरोबर बोलतो आहेस ... असं होऊ शकतं" कमांड2 ने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
"
म्हणून मी काय केलं माहित आहे?... लिनक्सचं सोर्स कोड घेऊन त्याला कंपाइल केलं आणि मग या कॉम्प्यूटरमध्ये इन्स्टॉल केलं ... आपल्याला सर्वेतोपरी काळजी घेणं फार आवश्यक आहे" कमांड1 सांगत होता.
त्याच्या शब्दात गर्व आणि स्वत:ची शेखी स्पष्टपणे जाणवत होती.
"
अरे ही अमेरिका काय चीज आहे हे तुला माहितच नाही ... जगावर राज्य करण्याचा त्यांचा मनसुबा आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात" कमांड1 पुढे सांगायला लागला.
कमांड2ने कमांड1 कडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.
"
चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल केव्हा पडले ?... तू शाळेत शिकला असशील नं?" कमांड1 ने प्रश्न केला.
"
अमेरिकेने चंद्रावर पाठविलेल्या यानातून 1969 साली नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले" कमांड2 ने चटदिशी उत्तर दिले.
"
सगळ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या डोक्यात हेच कोंबलं जात आहे... पण लोकांनी सत्य काय आहे याचा कधी विचार केला? ... जो व्हीडीओ अमेरिकेने टी व्ही वर दाखविला होता त्यात अमेरिकेचा झेंडा फडफडतांना दिसत होता... जर चंद्रावर हवाच नसेल तर झेंडा फडफडणार तरी कसा... लोक चंद्रावर उतरले त्यांच्या सावल्या ... यानाची बदललेली जागा... असे कितीतरी पुरावे आहेत जे दर्शवितात की अमेरिकेचे यान चंद्रावर गेलेच नव्हते" कमांड1 आवेशात बोलत होता.
"
काय बोलतोस तू ... मग काय सगळं खोटं आहे? ... पण हे सगळं खोटं कशासाठी?" कमांड2 ने आश्चर्याने विचारले.
"
खोटं ... निखालस खोटं... एवढंच काय त्याच वेळी अवकाशातून सॅटेलाईटमधून जमिनीच्या घेतलेल्या चित्रात जो सेट त्यांनी तयार केला होता त्याचं चित्रसुध्दा मिळालं आहे... आणि हो तू बरोबर विचारलंस ... हे खोटं कशासाठी... हा एवढा खटाटोप आणि आटापिटा कशासाठी?... ज्यावेळी अमेरिकेने चंद्रावर मानव गेल्याचं जाहीर केलं तेव्हा रशिया हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी होता... आपण रशियापेक्षा वरचढ आहोत हे दाखविण्यासाठी हा सगळा अट्टाहास अमेरिकेने केला होता... आणि त्यात ते सफलसुध्दा झाले होते." कमांड1चा आवेश शब्दागणिक वाढत होता.
"
बापरे ! म्हणजे एवढा मोठा धोका आणि तो पण संपूर्ण जगाला ..." कमांड2 च्या तोंडातून निघाले.
"
अमेरिका सध्या ब्रिटिशांच्या मार्गाने जात आहे. दुसऱ्या महायुध्दापूर्वी ब्रिटिशांनी जगावर राज्य केलं. त्यावेळी त्यांच्या राज्यावरचा सूर्य कधीच अस्ताला जात नसे. आता अमेरिका ते करू पाहत आहे. फरक एवढाच की ते प्रत्यक्षपणे राज्य करता अप्रत्यक्षपणे राज्य करीत आहेत म्हणजे 'प्रॉक्सी रूलींग'. अफगाणिस्थान, इराक, कुवेत, साऊथ कोरिया इथे ते काय करीत आहेत प्रॉक्सी रूलींगच की"
"
हो बरोबर आहे तुझं" कमांड2ने दुजोरा दिला.
"
आणि हेच अमेरिकेचं वर्चस्व नाहीसं करणं हे आपलं परम उद्देश्य आहे .." कमांड1 जोशात म्हणाला.
कमांड2 च्या चेहऱ्यावरून असं दिसत होतं की तो कमांड1 च्या बोलण्याने अतिशय प्रभावित झाला आहे. आणि कमांड1 च्या चेहऱ्यावर आपण कमांड2चं ब्रेन वॉश करण्यात सफल झालो आहोत याचं विजयी हास्य तरळत होतं.
तेवढ्यात सुरू झालेल्या कॉम्प्यूटरवर बझर वाजला. कमांड1ला मेल आलेली होती. कमांड1ने मेलबॉक्स उघडला. बॉसची मेल होती.
"
हा बॉस आहे तरी कोण?" कमांड2ने उत्सुकतेने विचारले.
"
हे कुणालाच माहित नाही ... आणि ते महत्वाचंसुध्दा नाही की तो कोण आहे? ... आपल्या सगळ्यांना जोडलं आहे ते एका विचारधारेने... आणि ती विचारधाराच महत्वाची... आज बॉस असेल उद्या नसणार ... पण त्याची विचारधारा ही नेहमी जिवंत राहिली पाहिजे." कमांड1 ने मेल उघडता उघडता सांगितले.
मेलमध्ये फक्त 'हाय' असे लिहिलेले होते आणि मेलला काहीतरी अटॅच केलेले होते. कमांड1 ने अटॅचमेंट ओपन केली. ते एक मॅडोनाचे 'बोल्ड' चित्र होते.
"
बॉसने हे चित्र पाठविलं?" कमांड2 ने आश्चर्याने विचारले.
"
तू अजून नवीन आहेस तुला कळायला अजून वेळ लागेल की दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात" कमांड1 चित्राकडे पाहत गालातल्या गालात हसत म्हणाला.
कमांड1 ने पटापट कॉम्प्यूटरच्या कीबोर्डची चार पाच बटने दाबली. समोर मॉनिटरवर एक सॉफ्टवेअर उघडले. कमांड1ने त्या मॅडोनाच्या चित्राला डबल क्लीक केले. एक निळा प्रोग्रेस बार हळू हळू सरकायला लागला. कमांड1 ने कमांड2 कडे गूढतेने बघितले.
"
पण हे काय करतो आहेस ..."कमांड2 म्हणाला.
कमांड1ने चटकन कमांड2च्या तोंडावर हात ठेऊन त्याचे तोंड दाबले.
"
चुकूनही तुझ्या तोंडात माझं नाव येता कामा नयेे ... तुला माहित आहे? ... भिंतीलासुध्दा कान असतात.
"
सॉरी" कमांड2 ओशाळून म्हणाला.
"
इथे चुकांना क्षमा नाही" कमांड1 दृढतेने म्हणाला.
तोपर्यंत प्रोग्रेस बार सरकून पूर्णपणे निळा झाला होता.
"
याला म्हणतात स्टेग्नोग्राफी ... म्हणजे चित्रामध्ये माहिती लपविणे ... बघणाऱ्याला फक्त चित्र दिसेल ... पण या चित्रातसुध्दा बरीच महत्वाची माहिती लपविली जाऊ शकते" कमांड1 त्याला समजावून सांगू लागला.
"
पण चित्र इथे यायच्या आधी कुणाच्या हाती जर लागले तर?" कमांड2 प्रश्न उपस्थित केला.
"
ती माहिती फक्त या सॉफ्टवेअरनेच बाहेर काढता येते ... आणि त्याला पासवर्ड लागतो... हे सॉफ्टवेअर बॉसने स्वत: लिहिलेले आहे... त्यामुळे ते दुसऱ्या कुणाकडे असण्याची अजिबात शक्यता नाही." कमांड1ने त्याच्या प्रश्नाला समर्पक असे उत्तर दिले.
"
काय माहिती लपविली आहे त्यात? कमांड2 ने उत्सुकतेने विचारले.
तेवढ्यात मॉनिटरवर एक मेसेज दिसायला लागला 'पुढच्या कामाला लाग... त्याची वेळ मागाहून कळविण्यात येईल.'
(
क्रमशः ...)

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive