Friday, May 14, 2010

Marathi Novel Ch-7: मन वढाय वढाय... (शून्य- कादंबरी )

Ch-7: मन वढाय वढाय... (शून्य- कादंबरी )

जॉन कारमध्ये जात होता. हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी त्याला कळविले होते की अँजेनीला डिस्चार्ज केले आहे आणि ती तिच्या घरी गेलेली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेडीकली ती पूर्णपणे सावरलेली होती. फक्त मेंटली आणि इमोशनली सावरायला तिला थोडा वेळ लागेल. सानीच्या पोस्टमार्टमचे रिपोर्टसुध्दा आले होते. जॉनला त्या संदर्भात अँजेनीशी थोडी चर्चा करायची होती. चर्चा तो फोनवर पण करू शकला असता. पण कितीही मनाला आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे मन ऐकत नव्हते. तिला भेटण्याची त्याची इच्छा बळावत होती. त्याने तिला तोंडाने कृत्रिम श्वासोश्वास दिला तेव्हा त्याला काही विशेष वाटले नव्हते. पण आता वारंवार त्याला तिच्या ओठांचा त्याच्या ओठांना झालेला स्पर्श आठवत होता. त्याने कर्र ऽऽ... ब्रेक दाबले. गाडीला वळविले आणि तो निघाला - अँजेनीच्या घराकडे.

जॉनची कार अँजेनीच्या अपार्टमेंटखाली येऊन थांबली. त्याने गाडी पार्किंगमध्ये वळविली. पार्किंगमध्ये बराच वेळ तो नुसताच गाडीत बसून होता. आपल्या मनाशी संघर्ष करीत शेवटी तो गाडीतून उतरला. मोठी मोठी पावलं टाकीत तो लिफ्टकडे गेला. लिफ्ट उघडीच होती. निर्धाराने तो लिफ्टमध्ये शिरला. लिफ्ट बंद होऊन वरच्या दिशेने धावायला लागली.

लिफ्ट थांबली. लिफ्टमध्ये डिस्प्लेवर 10 आकडा आला होता. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि जॉन बाहेर पडला. अँजेनीच्या फ्लॅटचे दार आतून बंद होते. तो दारापाशी गेला. पुन्हा तिथे थोडा वेळ घुटमळला. तो डोअर बेल दाबणार तेवढ्यात समोरचा दरवाजा उघडला. दरवाज्यात अँजेनी उभी होती. जॉन एकदम गोरा मोरा होऊन ओशाळल्यासारखा झाला.

"
काय झालं?" अँजेनी अगदी मोकळं खदखदून हसत म्हणाली.

इतकं मोकळं हसतांना त्याने तिला पहिल्यांदा बघितले होते.

"
कुठं काय?... काही नाही.... मला तुझ्याकडे केस च्या संदर्भात थोडी चौकशी करायची होती... नाही म्हणजे करायची आहे" जॉन कसाबसा बोलला.

"
ये की मग आत .... असा बोलतो आहेस जसं मी तुला चोरी करताना पकडलं आहे" अँजेनी हसत म्हणाली.

अँजेनीने त्याला आत घेऊन दार बंद केले.

जॉन आणि अँजेनी ड्रॉईंग रूममध्ये बसले होते.

"
पोस्टमार्टम रिपोर्टच्या अनुसार ... सानीला बंदुकीची गोळी छातीत डाव्या बाजूला अगदी हृदयात लागली होती ... त्यामुळे जो गोल भिंतीवर काढला होता तो सानीने काढण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे" जॉन आपला तर्क प्रस्तुत करीत होता.

"
म्हणजे मग तो आकार नक्कीच खुन्याने काढला असणार" अँजेनी म्हणाली.

थोडा विचार करुन ती पुढे म्हणाली " पण तो आकार काढून त्याला काय सुचवायचे असावे?"

"
तोच तर सगळ्यात मोठा प्रश्न सध्या आपल्यापुढे उभा आहे" जॉन म्हणाला.

"
जर आपण अशाप्रकारे यापूर्वीही एखादा खून झाला आहे का ... हे बघितले तर?" अँजेनीने आपले मत मांडले.

"
ते सगळे शोधून झाले आहे... रेकॉर्डला तशा प्रकारचा एकही खून नाही...." जॉन म्हणाला.

तेवढ्यात जॉनच्या मोबाईलची बेल वाजली. त्याने मोबाईलचे बटन दाबून तो कानाला लावला, "यस ...सॅम"

जॉनने सॅमचे बोलणे ऐकले आणि तो एकदम उठून उभा राहत म्हणाला, " काय?"

अँजेनी काय झाले म्हणून त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागली.

"
मी लगेच येतो" जॉन म्हणाला आणि दरवाज्याकडे जायला निघाला.

जॉनने मोबाईल बंद करून खिशात ठेवला.

जाता जाता तो अँजेनीला फक्त एवढंच म्हणाला, "मी तुला नंतर भेटतो ... मला आता लवकरात लवकर गेलेच पाहिजे..."

अँजेनी काही बोलणार त्याआधीच जॉन गेलेला होता.

(
क्रमशः ...)

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive