Monday, July 19, 2010

"हिंदू' हे भूसांस्कृतिक वैशिष्ट्य - नेमाडे

"हिंदू' हे भूसांस्कृतिक वैशिष्ट्य - नेमाडे

 

मुक्त शब्द मासिक आयोजित ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत भालचंद्र नेमाडे यांच्या बहुप्रतिक्षित "हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळया पॉप्युलर प्रकाशनाच्या कादंबरीच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन रविवारी रवींद्र नाटयमंदिरात झाले. निखिलेश चित्रे, जी. के. ऐनापुरे, प्रविण बांदेकर, सदानंद देशमुख, मेश इंगळे-उत्रादकर, कृष्णा खोत यांनी हे प्रकाशन केले. यावेळी जयंत पवार. अरुणा दुभाषी डॉ. रामदास भटकळ उपस्थित होते. (विद्याधर राणे - सकाळ छायाचित्र सेवा)

 
मुंबईइतिहासपूर्व काळापासून सिंधू नदीच्या अलीकडच्या लोकांना हिंदू म्हटले जात होते. या भागातील सर्वच हिंदू होते; परंतु पुढे "हिंदू' याचा अर्थ धर्म असा घेतला. वस्तुतः हिंदू हे भूसांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, हे सध्याच्या राजकारण्यांनी लक्षात घ्यावे. त्यातही या भारतीय उपखंडाची अनेकविध वैशिष्ट्ये आहेत. धर्म आणि कर्मकांड सर्वत्र समान आहेत. त्यातूनच आपली एक वेगळी संस्कृती निपजली. यापुढील युद्धे संस्कृतीविरुद्ध संस्कृती अशी होतील, असे प्रतिपादन प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी आज येथे केले. त्यांच्या "हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीच्या प्रकाशनानिमित्त झालेल्या मुलाखतीतून नेमाडे यांनी आपली भूमिका मांडली. पॉप्युलर प्रकाशनने ही कादंबरी प्रकाशित केली आहे.

नेमाडे यांच्या बहुप्रतिक्षित कादंबरीचे प्रकाशन आज जी. के. ऐनापुरे, रमेश इंगळे-उत्रादकर, सदानंद देशमुख, प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत वाचकांचे प्रतिनिधी निखिलेश चित्रे यांच्या हस्ते झाले. दिलीप प्रभावळकर यांनी या कादंबरीतील काही अंशाचे वाचन यावेळी केले. नाटककार जयंत पवार आणि अरुणा दुभाषी यांनी नेमाडेंची दीर्घ मुलाखत घेतली.

प्रदीर्घ मुलाखतीतून नेमाडे यांनी या कादंबरीसह एकूण भारतीय संस्कृतीचा आणि साहित्याचा आढावा घेतला. रसिकांच्या उत्सुकतेला या मुलाखतीतून खाद्य मिळत होते. पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच यातील काही मुद्यांवरून हिंदुत्ववादी संघटनांनी कंबर कसली आहे, त्याचाही उहापोह या मुलाखतीतून झाला. नेमाडे यांची "बिढार' ही कादंबरी प्रकाशित झाली तेव्हापासून "हिंदू' या शीर्षकाने कादंबरीची सुरुवात झाली होती. मात्र मधल्या 37 वर्षांच्या कालखंडात हा देश बदलला, खेडी बदलली, शेती बदलली, ताण वाढत गेला. अशावेळी सर्व दबावांना आत्मसात करणारा नायक हवा होता. म्हणून या काळाला हात घालण्यासाठी पुरातत्त्ववेत्ता असलेला नायक आपण शोधला, असे प्रा. नेमाडे यांनी सांगितले.

कादंबरीत इतिहासाची पुनर्मांडणी करण्यात आली आहे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना नेमाडे म्हणाले, ""आपण आपल्याकडच्या सांस्कृतिक युद्धाचा घटक असले पाहिजे. भृगु आणि अंगिरस यांच्यातील युद्ध आपल्याला माहीत पाहिजे, तसेच जमदग्नी आणि परशुराम कसे आले, ही इतिहासाची दुसरी बाजूही तपासून पाहिली पाहिजे. आपण देवतांचे मानवीकरण केले. आपणच आपले देव तयार केले. त्यातून ज्या रूढी निर्माण झाल्या त्यांना त्याकाळात काहीतरी अर्थ होता. ते आताही अस्तित्वात आहेत, म्हणजे त्या निरर्थक नाहीत. त्या सृष्टीतत्त्वाचा भाग आहे. पूर्वी आपल्याकडे सात वंश होते, पण मागच्या वर्षी 60 लाख नमुन्यांचा "जेनेटिक सर्व्हे' करण्यात आला. त्यात भारतात कुठेही वेगळा वंश आढळला नाही, एवढा वंशसंकर झाला आहे. एकाअर्थी जातीचा प्रश् आपण पूर्वीच सोडवला होता. पण इंग्रजांनी खानेसुमारी सुरू करून जातीचे विष पेरले आहे. एवढ्या मोठ्या कालखंडात हिंदू आणि बौद्ध पद्धती कशा रूढ झाल्या. याचा मुळात जाऊन कोणी अभ्यास करीत नाही. बौद्ध आणि हिंदू यांना वेगळे करणे राजकारण्यांना जमते. पण खऱ्या अर्थाने त्यातील स्पष्टरेषा दाखवता येत नाही.''

या कादंबरीच्या प्रकाशनापूर्वीच वाद सुरू झाला आहे. काही वृत्तपत्रांतून मुखपत्रांतून, तसेच डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी प्रा. नेमाडेंवर धमकीवजा टीका केली आहे. त्याचा परामर्श घेताना नेमाडे म्हणाले की, हिंदू धर्माचा मी मनापासून पुरस्कर्ता नाही किंवा द्वेष्टाही नाही. शेवडेंनी ही कादंबरी पूर्ण वाचावी आणि भाष्य करावे. व्यासांनी मुळात 25 हजार ओव्यांचे "जय' या नावाने लिहिलेल्या महाग्रंथाचे रूपांतर वैशंपायन यांनी 50 हजार ओव्यांत केले, तर उच्चश्रवाच्या वेळी ते दीड लाख ओव्यांत कसे झाले? मुळातील क्षत्रिय महाकाव्य ब्राह्मणी महाकाव्य कसे झाले? याची उत्तरे शोधा. त्यांना काय करायचे ते करावे, पण अशांना सुधारले पाहिजे.

नेमाडे यांनी आपल्या कादंबरीत सावरकरांना पाकिस्तानची निर्मिती हवी होती, असेही म्हटले आहे. त्यावर नेमाडेंनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी प्रेक्षकांतून आली. या प्रश्नाला जाणीवपूर्वक बगल देताना नेमाडे म्हणाले की, मी माझ्या मतावर ठाम आहे. ज्यांना उत्तरे हवी असतील त्यांनी माझ्या वर्गात येऊन बसावे. जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावर प्रा. नेमाडे म्हणाले की, शिवाजीवर अमेरिकन लोकांनी लिहू नये. लिहायचे असेल तर पूर्ण विचारांती लिहावे आणि ते इंग्लंडमध्येच विकावे. शिवाजींवर मराठीत इतकी पुस्तके असताना मला ते पुस्तक वाचायचीही इच्छा नाही. शिवाजी राजांनी औरंगजेबासहीत अनेकांच्या कारकिर्दी संपवल्या आहेत. त्यात जेम्स लेनची संपली तर आश्चर्य वाटू नये
 
नेमाडे उवाच -
-
लेखक समाजापासून वेगळा नसतो. समाजाच्या अबोध मनात बुडी मारून तो जे मिळवितो, ते लिहितो, तो लेखक. समाजमनात जे बाळगतो तेच लेखकानेही बाळगले पाहिजे.
-
उद्याचे संघर्ष हे देशात किंवा धर्मात नसतील. ते संस्कृतीत असतील. हिंदू ही भूसांस्कृतिक संकल्पना आहे. हे वैशिष्ट्य आपण मानलेच पाहिजे.
-
मी आणि माझा नायक यात फरक आहे. आपल्या पेशीमध्ये इतिहास बसलेला असतो. तो नाकारून, त्याचा द्वेष करून चालत नाही. आक्रमकता हे मानव जातीचे वैशिष्ट्य आहे, ते आवश्यकही आहे. त्याला कसे वळण द्यायचे, हे त्या-त्या समाजाने ठरवायचे असते.
-
आपल्याकडे पूर्वी जाती पाळण्याची प्रथा नव्हती. शोषण केवळ जात करते, असं नाही. खानेसुमारी सुरू करून इंग्रजांनी आपल्यावर जाती लादल्या. शोषण समाज करतो. शोषण नाही असा देश जगाच्या पाठीवर नाही. कोणतीही व्यवस्था ही शोषणाधारितच असते.
-
श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे फक्त दोन बाजूंचे दोन शब्द आहेत. चालीरीती समाजाची आवश्यकता म्हणून जन्माला येतात. त्यांना कुठे कुठे अर्थ असतोच. त्यातल्या काही नंतर निरर्थक होतात, पण केवळ तेवढ्या कारणावरून त्या का सोडायच्या?
-
वारकरी आता वारकरी पंथाची तत्त्वही कसोशीने पाळताना दिसत नाहीत. वारकरीपण आता केवळ पंढरपूरला जाण्यापुरतंच उरलं आहे. ब्राह्मणांनी त्यावर कब्जा केल्याने वारकरी पंथही आता निःसत्व झाला आहे.
-
शिवाजी महाराजांना आधी ब्राह्मणांनी यवनांविरुद्ध वापरलं. आता मराठा समाज त्यांना ब्राह्मणांविरुद्ध वापरतो आहे. यानंतर शिवसेना त्यांना उत्तर भारतीयांविरुद्ध वापरेल. आपल्या थोर नेत्यांना आपण किती वापरून घ्यायचं आणि किती वापरू द्यायचं, याचं तारतम्य आपण ठेवलं पाहिजे.
-
शिवाजी महाराजांवर अमेरिकन माणसाने (जेम्स लेन) कशाला लिहायचं? त्यांना त्यांचं काहीही कळणार नाही. जेम्स लेनचं पुस्तक मी वाचलं नाही. वाचणारही नाही. सेतुमाधवराव पगडी यांचं पुस्तक अजून मला वाचायचं आहे. मराठीत एवढी चांगली पुस्तकं असताना वाचायचं कशाला ते पुस्तक? आणि प्रकाशकांनीही इंग्रजी पुस्तकं छापून ती तिकडेच विकावीत. इंग्रजीचा धंदा विनाकारण आपण कशाला वाढवितो? आपल्या एकूण समाजात सहिष्णूता वाढली पाहिजे, एवढे मात्र खरे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive