Thursday, September 23, 2010

सकीनाबानूकडचा गणपति.

सकीनाबानूकडचा गणपति.

"मिडीयाच्या झोती खाली यांचा उदो उदो होत असेल पण आम्ही आमच्या घरी पिढ्यान पिढ्या गणपति उत्सव साजरा करतो."

"अगदी सकाळची वेळ होती.नुकतीच,पावसाची सर पडून गेली होती.झाडांच्या मागून सूर्यनारायणाने,डोकावून पहायला, नुकतीच सुरवात केली होती.
पावसाने ओलसर झालेली झाडांची पानं,सूर्य किरणामुळे मधून मधून चमकल्यासारखी दिसत होती.
घराच्या पडवीत एका कोपर्यात मोत्या, अंगाची गुंडाळी करून निवांत झोपला होता.बाहेर थंड असलं तरी घरात त्यामानाने उबदार वातावरण होतं.
गणपतिची मुर्ती प्रस्थापीत झाली होती.उदबत्तीचा घमघमाट येत होता.निरनीराळ्या फुलांनी, फुलांची परडी भरली होती.विशेष करून तांबड्या रंगाची फुलं-जासवंदीची,गुलाबाची,कमळांची,लाल देवचाफ्याची-डोळ्यात भरून येत होती.गणपतिबाप्पाला म्हणे लाल रंगाची फुलं फार आवडतात.

त्या वर्षी ईद आणि गण्पति उत्सव एकाच दिवशी आले होते.जवळचे नातेवाईक दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आमच्या घरी जमा झाले होते.
उकडीच्या मोदकांचा वास मधून मधून नाकावरून जात होता.आमचे आईबाबा आरतीची पूस्तकं साफसूफ करून इतर नातेवाईकांना देत होते.कारण आरतीची वेळ झाली होती.
मी,माझी धाकटी बहिण आणि मोठा भाऊ.स्वच्छ आंघोळ करून बाप्पा जवळ आरतीची वाट बघत बसलो होतो.
हे सर्व वातावरण मला मनापासून आवडतं.गणपतिची पूजा करायला आम्हाला आवडतं."
सकीनाबानू मला सांगत होती.

सकीना आणि उस्मान मुळचे कोकणातले.पिढ्यान पिढ्या कोकणात वास्तव्य झाल्याने इकडच्या मुस्लीम धर्माच्या लोकाना सगळेच सण आपलेसेच वाटतात.त्यातल्या त्यात गणपति उत्सव अगदी जवळचा वाटतो.मला आठवतं काही मुसलमानांच्या घरात गणपतिची मुर्ती आणून ते सण साजरा करायचे.सकीनाबानूच्या घरात असंच करायचे. सकीना मुळात खूप हुशार होती.तिच्या वडीलानी तिला जास्ती जास्त शिकवायचं ठरवलं होतं.ती बी.. पर्यंत मराठीत विषय घेऊन शिकली.तिला आणखी शिकायचं होतं.पण वडीलानी तिला लग्न करण्याचा आग्रह केला. मग नवर्याची सम्मती असल्यास पुढे शिकावंस असं तिचे वडील तिला म्हणाले होते.पण संसाराच्या आणि दुनियादारी्च्या भंवर्यात सापडल्यावर तिला विचार बदलावा लागला. पुढे उस्मानशी लग्न झाल्यावरही तिने गणपति पुजायची तिच प्रथा घरात चालू ठेवली उस्मानबरोबर भेंडीबाजारात संसार थाटल्यावर दोन-तिन मुलं झाल्यावर त्यांना भेंडीबाजारातली जागा अपुरी पडू लागली.
माझ्याच सल्ल्यावरून हे कुटूंब अंधेरीत रहायला आलं.
अंधेरीत आल्यावर मला ते चूकता गणपति दिवशी घरी बोलवायचे.आता त्यांची मुलं मोठी झाली होती.पण लहानपणापासून सकीनाने केलेले त्यांच्यावरचे संस्कार त्या मुलांनीही चालू ठेवले होते.
ह्यावेळी मी सकीनाच्या घरी गेलो होतो त्यावेळी ती मला आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगत होती.
"
ज्या ज्यावेळी आम्ही गणपति उत्सवाविषयी बोलू लागलो की लोकं सांगायची,
"
,सकीना तुम्ही मुस्लिम लोक.तुम्ही गणपति उत्सव साजरा करू शकत नाही."
पण मला नेहमी वाटतं आम्हाला कुठलाही उत्सव साजरा करायला आवडतो.आणि मला गणपति उत्सव साजरा करायला विशेष आवडतो.माझा वयक्तिक विश्वास ह्या उत्सवाच्या धार्मिक बाबत नसून दुसर्या बाबतीत आहे.ही दुसरी बाब म्हणजे ह्या उत्सवात निर्माण होणारं मंगल वातावरण,लहान मुलांपासून वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकजण घरात कुणी तरी नवीन पाहुणा आला आहे आणि त्याचा आदर-सत्कार करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे ह्या इरशेने वावरत असतात त्या बाबतीचं त्याचं वागणं,गणपतिला आवडणारे उकडीचे मोदक खास ह्या सणाला केले जातात त्याच्या मागचा घरातल्या बायकांचा उत्साह,आणि सर्वजण प्रेमाने भारलेले दिसतात त्या बाबत.

बरेच लोक माझ्या ह्या मताशी सहमत होणार नाहीत.पण मला वाटतं गणपतिचा सण फक्त धार्मिक बाबतच असता, फक्त गणपतीची मुर्ती प्रस्थापीत करण्यापर्यंत असता, आणि लोकं जमून उत्सव साजरा करण्यासाठी नसता,तर गणपतिच्या उत्सवात एव्हडं प्रेम आणि उत्साह उतू आलेला दिसला नसता.माझं म्हणणं जरा स्वार्थीपणाचं दिसेल- आणि कदाचीत असेलही.पण मला वाटतं माझं म्हणणं सत्य आहे. आजकाल देशात हा गणपतिचा सण एव्हड्या ठिकाणी साजरा केला जातो ते काय सगळे हिंदूच असतील का?अनेक पंथाचे,धर्माचे लोक हा सण देशभर आणि जगभर साजरा करतात.
अलीकडे तर निरनीराळ्या धर्माचे प्रतिष्टीत लोक, आमच्या धर्माचे धरून,उदा.सलमान खान,अमीर खान वगैरे घरी गणपति आणून पुजतात, असं मी वाचलं आहे.मिडीयाच्या झोती खाली यांचा उदो उदो होत असेल पण आम्ही आमच्या घरी पिढ्यान पिढ्या गणपति उत्सव साजरा करतो."

मला सकीना हे सर्व उघड करून सांगत होती.मला तिला विचारावसं वाटलं म्हणून तिला म्हणालो,
"
हिंदूंचे इतर आणखी अनेक सण आहेत.मग गणपतीचा सण तुला का आवडतो?"
"
मला तुम्ही छान प्रश्न विचारला.माझ्या मनातलं, खरं,खरं ते मी तुम्हाला सांगते"
असं म्हणून उकडलेल्या मोदकाची प्लेट मला देत म्हणाली,
"
बघा तुम्हाला खाऊन कसे वाटतात मोदक.माझ्या आई, आजी पासून उकडीचे मोदक कसे करतात ते आम्ही शिकत आलो आहो."
आणि नंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सकीना म्हणाली,

"आम्ही गणपतिबाप्पाचा सण साजरा करतो कारण आम्हाला त्यात चमत्कृति आढळते.ती सण आल्याची घटना, तो आवाज,सुवास,भावना,प्रेम ही सर्व गणपति सणाची चमत्कृती आहे.हे सगळं इतकं प्रभावशाली आहे की ते शब्दात वर्णन करणं जरा कठीण आहे. त्यात सुखाच्या,आकांक्षेच्या आणि जोषाच्या भावना आहेत.गणपति उत्सवाचा सुगंधच माझ्या नाकात भरतो.
जेव्हा मी श्वास घेते तेव्हा माझी ज्ञान-शक्तिच जागृत होते.अगरबत्यांचा सुगंध,फुलांचा सुगंध,कापूर जाळल्याने येणारा सुगंध,जमा झालेल्या लोकांनी आपल्या अंगाला लावलेल्या निरनीरळ्या पर्फ्युमचा सुगंध मला वेड लावतो.
कधी कधी वाटतं हे सर्व सुगंध एखाद्या बाटलीत भरून ठेवून मग त्याचा फवारा सगळीकडे मारावा.

गणपतिबाप्पाच्या आरत्या ऐकून मला खूप आनंद होतो. मला स्वतःला आरत्या पाठ म्हणता येतात.ह्या निरनीराळ्या आरत्यांच्या चाली आणि त्याच्या बरोबर वाजवलेले झांझांचे घंटानाद ऐकून माझं मन वेडं होतं.मला ह्या आरत्या गायला खूप आवडतं."
"
तुला व्यक्तिशः हा सण आवडत असेल पण घरातल्या इतरांनाही हा सण साजरा करायला मजा येते का?"
मी सकीनाला विचारलं.

माझा नवरा उस्मान धरून,माझ्या कुटूंबातसुद्धा सर्वाना गणपति सणाची ताकद भावते.कारण आम्ही सर्व एकत्र जमून गणपतीच्या सणाच्या प्रथा भक्तिभावाने सांभाळतो.प्रथम आम्ही सकाळी उठून गाडी बाहेर काढून गणपतिच्या कारखान्यात जाऊन, आम्ही अगोदरच ऑर्डर देऊन ठेवलेली मुर्ती घरी घेऊन येतो.हे काम म्हणजे एक आमची महा जोखीम आहे अशा तर्हेने जपून ती मुर्ती घरी आणतो.एव्हड्या गर्दीतून वाट काढून आपलीच मुर्ती
शोधून काढून मग त्या मुर्तीकडे आईबाबांच पण लक्ष वेधून आपल्या ताब्यात घेऊन घरी सुखरूप आणण्यात केव्हडं साहस असतं.पूर्वी आम्ही मिळेल ती मूर्ती घेत असायचो.पण बरेच वेळां आई म्हणायची ही नको ती, किंवा बाबा म्हणायचे ती नको ही, त्यामूळे एक मताने बाप्पाची मुर्ती मिळत नसायची.त्यावर उपाय म्हणून आता सर्वानुमते ठेरलेली मुर्तीच आम्ही अगोदर ऑर्डर करतो.आणि आदल्या दिवशीच बाप्पाला घरी आणतो.
मग रात्रभर आमचा सर्वांचा सजावट करण्यात वेळ जातो.गणपतिबाप्पाचा चौरंग आणि आजुबाजूची जागा छान सजवतो.ह्या साठी पूर्वी आम्हाला आमच्या शेजार्यांचा सल्ला घ्यावा लागायचा.पण आता सर्व सवयीने होतं.सर्व खोली झगमगते.खोलीतला प्रकाश उबदार आणि लुभावणारा वाटतो.हा दिवस मला खूपच आवडतो."

पुन्हा लहानपणाच्या आठवणी सांगण्यासाठी सकीना म्हणाली,
"
लहानपणचं मला आठवतं.त्यादिवशी माझी बहिण, मी आणि माझा भाऊ बाजारात जाऊन शॉपींग करायचो. आजुबाजूचे लोक आनंदात आणि कामात व्यस्त असतात हे पाहून मजा यायची.त्या वयात शॉपींग करायला मला मजा यायची कारण आम्ही भावंड त्या दिवशी भांडत नसायचो."

आरत्या होऊन गेल्यावर आम्ही सर्व नातेवाईक आणि मित्र मंडळी एके ठिकाणी जमून गप्पा गोष्टी करायचो.दुपारी मोदकाचं प्राधान्य असलेलं जेवण जेवायचो.संध्याकाळी नवे कपडे नेसून बाहेर आणि शेजारी इतर लोकांचे गणपति आणि सजावट पहायला जायचो,त्यावेळी खूप उत्साह यायचा.
प्रत्येकाच्या घरी सुगंधाची लयलूट घेता यायची."

"खरंच,ह्या सर्व प्रथामागे काही तरी चमत्कृती आहे हे नक्कीच.मला तुझं म्हणणं पटतं."
असं मी तिला म्हणाल्यावर मला म्हणाली,
"तुमचं म्हणणं मला ऐकायचं आहे."

मी माझं मत तिला सांगताना म्हणालो,
"
ह्या प्रथेमागे काही तथ्य आहे म्हणून लोक तसं करातात,किंवा गंमत म्हणून ते तसं करतात अशातला भाग नाही.
आता तुझं ऐकून  विचार केल्यावर माझ्या लक्षात येतं की सर्वच गोष्टी प्रत्येकाला आकर्षक वाटतील असंच नाही. काही लोक दीड दिवसासाठी गणपति

आणतात.रात्रभर जागून केलेली सजावट आणि इतर मेहनत दीड दिवसात संपवली जाते.परंतु,त्यातच खरी प्रथेची खासीयत आहे.सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी "काम" ह्या सदरात येतात त्या अशावेळी गंमत म्हणून स्वीकारल्या जातात.कारण ज्याला त्याला गणपती उत्सावाच्या वातावरणातली तडफ असते,मनःस्थिती असते.हाच त्या चमत्कृतीचा एक भाग आहे असं मला वाटतं."

"माझं मत मी तुम्हाला सांगते"
असं सांगून सकीना म्हणाली,
"ह्या चमत्कृतीत सर्वांनी भागीदार व्हायला हवं.मी आणि माझं कुटूंब, आम्हाला गणपति सण साजरा करायला मिळतो म्हणून, भाग्यवान समजतो.
मला माहित आहे काहींना एकवेळचं जेवण दुरापास्त असतं.मग सण साजरा करणं दूरच राहिलं.म्हणून आम्ही घरात ह्या दिवशी जास्त जेवण शिजवतो.जमेल त्यांना वाटतो.एका अर्थी ह्या सणाच्या चमत्कृतीत त्यांना भागीदार करतो.मला वाटतं प्रत्येक माणूस ह्या भावनेशी पात्र असायला हवा."

"माझ्या दृष्टीने वर्षातून एकदाच येणार हा गणपतिचा सण प्रत्येकाला आनंदी आणि उत्तेजित करतो.दीड दिवसाठी जीवनातलं दुःख विसरायला लावतो.
गणपति उत्सवाचा समय म्हणजे मन प्रसन्न ठेवण्यासाठी,गाणं,वाजवणं करण्यासाठी,देण्या आणि घेण्यासाठी, हसणं,हंसवण्यासाठी आहे.जास्त करून कुटूंबाला एकत्र येण्यासाठी,प्रेम वाटण्यासाठी आहे."
मी सकीनाला म्हणालो.

"माझाही ह्यावर विश्वास आहे.मला गणपती सण आवडतो."
असं म्हणून गरम मसाले दुधाचा कप मला देत सकीना म्हणाली,
"गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या"
ही आरोळी, तुमच्या सकट सर्वाना सांगून जाते की,
"ह्याला जीवन ऐसे नांव"

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive