Friday, October 22, 2010

कोजागिरी पौर्णिमा साजरी

कोजागिरी पौर्णिमा साजरी

खरे तर प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येतच असते. प्रत्येक पौर्णिमेचे वेगळे माहात्म्य असते. पावसाळ्यात तीन-चार महिने आकाशात काळे ढग असतात. हवा कुंद असते. त्यामुळे तुम्हा-आम्हा सर्वानाच पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन होईलच याची खात्री नसते. आता पाऊस जवळजवळ संपल्यातच जमा आहे. आकाश कसे निरभ्र आहे! अशा वेळी म्हणजे आश्विन महिन्यातील पौर्णिमेला चंद्र-चांदण्यांनी चमचमणारे आकाश बघताना मनाला आनंद वाटतो. खूप दिवसांनी आपली आवडती व्यक्ती भेटली की आपण 'सेलिब्रेट' करतो ना! अगदी तसेच. बरेच दिवसांनी झालेल्या चंद्रदर्शनाचा आनंद आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करून व्यक्त करतो.
हा चंदामामा तुमचा म्हणजे बालगोपाळांचा, आवडता सवंगडी. लहानपणी कोणत्याही कारणाने रडू आले की, आईच्या कडेवर बसून तुम्ही बाहेर यायचा. आकाशात चांदोबाला शोधायचात. तो सापडला की, रडणे विसरून जायचात. तो हळूच पुन्हा निंबोणीच्या झाडामागे लपायचा. तुम्ही त्याला शोधत राहायचात. तो हळूच डोकावला की तुम्ही खूश होऊन हसायला लागायचात. दोन चिमुकले हात टाळ्या वाजवत राहायचे.
तुम्ही जसा हट्ट करता ना, तसा रामानेही एकदा 'पूर्ण चंद्र हवा' म्हणून हट्ट केला होता, अशी कथा आहे. रडून रडून म्हणे त्याने गोंधळ घातला. त्याची समजूत कशी काढावी, हे त्याच्या आईला, दास-दासींना, कोणालाही कळेना. आकाशातला चंद्र रामाला हातात आणून द्यायचा तरी कसा? तेवढय़ात सुमंत प्रधानाने मोठय़ा युक्तीने आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाला शांत केले.
हा खटय़ाळ चंद्र तुम्हाला अनेक गोष्टींमधून कवितांमधून भेटतो. चंद्राच्या अंगरख्याची गोष्ट माहिती आहे? एकदा आई चंद्राला अंगरखा शिवते. पण कधी त्याला अंगरखा घट्ट होत जातो तर कधी सैल होत जातो, कारण तिथेही तो खोडसाळपणा करत राहतो. शुक्ल प्रतिपदेला चंद्राची 'कोर' असते, ती वाढत जाऊन पौर्णिमेला तो पूर्ण गोल होतो. कृष्णपक्षात पुन्हा तो लहान लहान होत जातो. सतत आकार बदलत ठेवून तो आईला गोंधळात टाकतो आणि खुदूखुदू हसत बसतो. अंगरखा मापाचा होत नाही म्हणून आई मात्र खट्टू होते.
आणखी एक मजेदार गोष्ट ऐकली आहे तुम्ही़? - एकदा गणपतीबाबा आपल्या छोटय़ा वाहनावर, उंदरावर बसून चालले होते. पिटुकल्या उंदराच्या पाठीवर लंबोदर काया. मग काय, गणपती बाप्पा घसरले आणि ते पाहून चंद्र खटय़ाळपणे हसला. बाप्पाला आला राग. त्याने लगेच चंद्राला शाप दिला. गणेश चतुर्थीला जो कोणी चंद्रदर्शन घेईल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. सगळेजण आपल्याला बघायला उत्सुक असतात, हे चंद्राला माहीत होते. चोरीचा आळ येणार असेल तर कोणी आपल्याकडे ढुंकून बघणार नाही, हे लक्षात घेऊन चंद्राला खूपच वाईट वाटले. त्याला आपली चूक कळली. त्याने बाप्पाकडे :शाप मागितला. गणपतीनेही सगळा राग विसरून :शाप दिला की, दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेऊनच उपवास सोडला जाईल. याच गणपतीबाप्पाने आपल्या 'भालचंद्र' नावात चंद्राला पुढे बसवून त्याचे कौतुक केले आहे.
प्रभू रामचंद्रांचीही एक गोष्ट आहे- त्यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला. आकाशात सर्व ग्रह उपस्थित होते, पण चंद्र नव्हता. हा आनंदसोहळा बघता आल्यामुळे चंद्राला खूप वाईट वाटले. तो हिरमुसला. तेव्हा श्रीरामाने त्याला समजून घेतले. ते म्हणाले, 'मला तुझी मन:स्थिती कळतेमी तुला वचन देतो की, माझ्या पुढच्या अवतारात मी तुझ्या साक्षीने अवतरेन.' श्रीरामाने चंद्राला दिलेले वचन पाळले आणि श्रावण वद्य अष्टमीला त्यांनी रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला. रात्री १२ वाजता यासाठी की अष्टमीला चंद्र रात्री १२ वाजता उगवतो.
असा हा चंद्र पूर्वीपासूनच सर्वाचा लाडका आहे. त्याला पाहून सागराला भरती येते. तो पृथ्वीभोवती नेमाने फिरत असतो म्हणून 'ग्रहण' होते. मानवाने चंद्राचा मान राखला आहे तो कालगणनेने. मराठी कालगणना चंद्रकलांवर आधारलेली आहे. त्याच्या प्रसन्नदर्शनाने आपले मन शांत होते, प्रफुल्लित होते.
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा विशेष शक्तीचा वर्षांव करत असतो, असे मानले जाते. या दिवशी लक्ष्मी रात्रभर - 'कोजागर्ति?' म्हणजेच 'कोण जागे आहे?' असे म्हणत फिरत असते. म्हणूनच त्या रात्री काव्यशास्त्रविनोद करत रात्रभर जागरण करायचे, केशर-वेलचीयुक्त आटीव दुधाचा आस्वाद घ्यायचा, अशी प्रथा आहे. अर्थात जागे राहणे याचा व्यापक अर्थ आपण असाही लावला पाहिजे की, आपण आपल्या विद्यार्थिदशेतील कर्तव्यांबाबत जागरूक राहणे, शाळा-कॉलेजात व्यवस्थित अभ्यास करणे, मोठय़ांचा आदर करणे, प्रगतिपथावर राहण्यासाठी आपले ज्ञानचक्षू उघडे ठेवणे.
चंद्र हा पूर्ण जगाचा कुतुहलाचा विषय आहे. भारताने अलीकडेच राबवलेल्या चांद्रयान मोहिमेमुळे आपल्याला चंद्राचे अंतरंग समजणे शक्य होत आहे. त्याबद्दल तुम्ही वाचत असालच.
आजच कोजागिरी होती. केलीत साजरी? कसे दिसले आकाश? काल नसेल जमले तरी हरकत नाही. आज  रात्री जरूर गच्चीत किंवा मैदानात जा आणि चांदण्यांची चमचम बघा. आकाशातील या दोस्तांना ओळखायला शिका.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive