Sunday, December 19, 2010

आइस्क्रीम (लेखक शरद कोर्डे)





 

प्रसंग लहानसाच, पण हृदयस्पर्शी आठवणी जागवणारा!

असाच एका संध्याकाळी पार्कमध्ये एकटाच बसलो होतो. मुलं खेळत होती. त्यांचे आईवडील जी काय हिरवळ बागेत होती त्यावर बसले होते. मुलं शहाण्यासारखी सीसॉ, घसरगुंडी, झोपाळा, यासाठी लाइन लावून उभी होती.

जरा एका बाजूला एक आइस्क्रीमवाला होता. त्याच्याभोवती मुलं नी त्यांचा हट्ट पुरवणारे पालक होते. आइस्क्रीम खाणारी मुलं आइस्क्रीमवाल्याच्या गर्दीपासून थोडी लांब उभी राहून आइस्क्रीम खात होती. त्यातल्या एका मुलानी आपलं आइस्क्रीम संपल्यावर दुसऱ्या आइस्क्रीमसाठी आपल्या वडलांकडे मागणी केली. बापलेक आर्थिक सुस्थितीत असल्याचं त्यांच्या पेहरावावरून दिसत होतं. बहुधा पार्कबाहेर त्यांची गाडी उभी असावी असं वाटत होतं.

थोड्या अंतरावर दुसरा मुलगा आपलं आइस्क्रीम संपवत होता. त्याच्याबरोबर त्याची आई होती. दोघांच्या पेहरावावरून त्यांची परिस्थिति बेताची असावी हे कळत होतं.

मुलाला बरोबर घेऊन त्याचे वडील पुन्हा आइस्क्रीमवाल्याकडे निघाले. आईबरोबरच्या मुलानी ते पाहिलं नि त्यालाही आणखी एक आइस्क्रीम हवंसं वाटायला लागलं. "आता नाही, पुरे आता" म्हणत ती त्याला दूर घेऊन जायला लागली. तिच्या आजच्या मजा करण्याच्या बजेटमध्ये ते बसत नसावं. तिचा मुलगा वडलांबरोबर आइस्क्रीमवाल्याकडे जाणाऱ्या मुलाकडे बोट दाखवून कुरकुरत होता.

मुलाबरोबरच्या वडलांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यानीही आपल्या मुलाला आइस्क्रीमसाठी नाही म्हंटलं नि ते त्याला आइस्क्रीमवाल्यापासून लांब नेऊ लागले. आईनी आपल्या मुलाला ते दाखवलं. मुलाची समजूत पटली नाही. पण आपल्याकडे मुद्दा राह्यला नाही हे त्याच्या लक्षात आलं.

माझ्यापासून थोड्याच अंतरावर हा प्रकार घडला होता. ओळखीची पर्वा न करता मी त्या मुलाच्या वडलांना गाठलं. आपणहून स्वतःची ओळख करून दिली. त्यांची ओळख विचारली. आम्ही बोलण्यात गुंतलो हे पाह्यलं नि मुलगा सटकला नि इतर मुलांत मिसळला. मी त्याच्या वडलांना विचारलं,

"तुम्ही मुलाला दुसरं आइस्क्रीम देणार होतात मग मागे का फिरलात?"

"म्हणजे? " ते गोंधळले. त्यांना माझा प्रश्न अनपेक्षित असावा. मी त्याना पाह्यलेला सर्व प्रकार सांगितला.

ते हसले नि म्हणाले, "अहो, त्या बाईंचा मुलगाही याचं पाहून हट्ट करायला लागला होता. तिच्याकडे त्यासाठी पैसे नसावेत असं वाटलं".

"त्या बाई तुमच्या ओळखीतल्या आहेत? "

"नाही. ओळखीतल्या असत्या तर माझ्याबरोबर त्यांच्याही मुलाला मी आइस्क्रीम घेऊन दिलं असतं. "

"ओळखीच्या नव्हत्या तरी तुम्ही त्यांचा विचार केलात? "

"हो. त्याचं काय आहे काका" आमच्या वयातलं अंतर लक्षात घेऊन ते म्हणाले, "मुलं हट्ट करतात. त्याना आपल्या आईवडलांची परिस्थिती माहीत नसते. फक्त दुसऱ्या मुलाना मिळतं ते आपल्यालाही मिळावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. पण त्यामुळे जे आईवडील ती पूर्ण करू शकत नाहीत त्यांची सार्वजनिक ठिकाणी गोची होते. त्यांना आपण इतरांसमोर उघडे पडतो म्हणून ओशाळलं वाटतं. मला त्या बाईच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. तिला त्यातून सोडवायला दोनच पर्याय होते. एकतर माझ्या मुलाबरोबर तिच्याही मुलाला आइस्क्रीम देणं किंवा माझ्या मुलालाच आइस्क्रीम नाकारणं. पहिल्या पर्यायानी ती ज्यास्तच ओशाळली असती. म्हणून मी दुसरा पर्याय निवडला."

"पण तुमच्या मुलाला वाईट वाटलं असेल... "

"त्याची भरपाई मी नंतर करू शकतो. एव्हाना तो ते विसरलाही असेल. पण त्यावेळी एका आईची मुलाच्या निरागस हट्टामुळे जी अवस्था झाली होती त्यातून तिला सोडवणं मला ज्यास्त आवश्यक वाटलं. "

"तुम्ही दुसऱ्यांचं मन जाणता असं दिसतं. " मी कौतुकानी म्हणालो.

माझ्या प्रशंसेमुळे ते जरासे संकोचले नि काहीशा गंभीरपणी म्हणाले, "अहो मीही लहानपणी खूप हट्ट करायचो. एक दिवस माझ्या लक्षात आलं की आपल्या हट्टामुळे आपल्या आईवडलांची चारचौघात ऑकवर्ड पोझिशन होते. त्या बाईंकडे पाह्यल्यावर मला त्याची आठवण झाली. "

त्यानी आपल्या मुलाला हाक मारली. "चला निघतो. बाय" म्हणून त्यानी निरोप घेतला.

ते गेल्यावर मलाही एक प्रसंग आठवला. आमची मुलं लहान असताना आम्ही सर्व नातेवाईक मिळून एकदा पिकनिकला गेलो होतो. आमच्यापैकी काहीशा सुस्थितीत असलेल्या एका नातेवाईकानी मी सर्वाना आइस्क्रीम द्यावं म्हणून आग्रह धरला. एकूण माणसं नि खिशातले मोजके पैसे याचा अंदाज घेऊन मी भीतभीतच हो म्हंटलं. दुकानात गेल्यावर हा नातेवाईक सर्वाना आग्रह करकरून आइस्क्रीम देत होता. प्रत्येक वाढत्या आइस्क्रीमबरोबर माझ्या काळजाचे ठोके वाढत होते. माझ्या एका बाजूला माझी दोन्ही मुलं उभी होती. हट्ट करण्याच्याच वयातली पण त्यावेळी काहीच मागत नव्हती. माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. मोठा धाकट्याला हळू आवाजात ", आपण आइस्क्रीम नाही घ्यायचं. बाबांकडे पैसे नाहीत. " म्हणाल्याचं मला स्पष्ट ऐकू आलं.

 


1 comment:


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive