Wednesday, March 23, 2011

वेडात जपानी वीर दौडले सात




पराग पाटील
भूकंपा पाठोपाठ आलेली अजस्र सुनामी, ज्वालामुखीने आग ओकायला सुरुवात केलेली आणि त्यात परमाणु प्रकल्पांचा भस्मासूर गर्जना करू लागलेला. फुकुशिमा दाइचि परमाणु ऊर्जा प्रकल्पातले तीन मानवनिर्मित राक्षस भूकंपामुळे खडबडून जागे झाले होते. जपानी तंत्रज्ञ आणि संशोधकांच्या लोकविलक्षण हाराकिरीने हा भस्मासूररूपी किरणोत्सर्ग आटोक्यात ठेवला गेला.

तोक्यो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या मुख्य कार्यालयात सर्व संचालकांना तातडीने बोलावलं गेलं होतं. पंतप्रधान नाओतो कान व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे या बैठकीला हजर होणार होते. त्यावरून ही आपत्कालीन बैठक अत्यंत महत्त्वाची होती हे प्रत्येक संचालकाला माहीत होतं आणि या बैठकीचा एका ओळीचा अजेंडा वाचून प्रत्येकजण आतून हादरून गेला होता.
आदल्या दिवशी ८.९ रिश्टर स्केलचा झालेला भूकंप आणि त्यामागोमाग आलेल्या अजस्र सुनामी लाटेने गिळंकृत केलेलं सॅण्डेइ शहर टीव्हीवर दिसत होतं. पण तोक्यो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या संचालकांसाठी त्याक्षणी तरी जगाचं लक्ष वेधून घेणारी ती सुनामी महत्त्वाची नव्हती. त्यांच्यापुढे एक नवं संकट आ वासून उभं होतं. किरणोत्सर्गाच्या सुनामीचं..
तोक्यो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या आपत्कालीन पथकाची हेलिकॉप्टर्स फुकुशिमा दाइचि न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या सहा रिअ‍ॅक्टर्सच्या भोवती घिरटय़ा घालत होती. पैकी तीन रिअ‍ॅक्टर्स भूंकपाच्या वेळी देखभालीसाठी बंदच होते.
पण क्रमांक १, २ आणि ३ चे रिअ‍ॅक्टर सुरू होते. इथल्या कूलंट लीकेजच्या भीतीमुळेच मोठय़ा किरणोत्सर्गाची भीती उभी राहिली होती. परमाणु प्रकल्पातील सगळा स्टाफ एकवटला होता. विविध प्रकारच्या चाचण्यांची वाचनं-निरीक्षणं नोंदवली जात होती. ती शास्त्रज्ञांच्या पथकाकडे पाठवली जात होती.
क्रमांक १ रिअ‍ॅक्टरच्या इमारतीत अधिक धामधूम सुरू होती. जनरल इलेक्ट्रिक कंपनीने बांधलेल्या पहिल्या संयंत्राचं तापमान प्रचंड वेगाने वाढत होतं. या अणुभट्टीच्या इंधन सळईच्या वितळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आणि भूकंपानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने तिथली कूलंट सिस्टिम कोलमडून पडली होती. फुकुशिमातल्या अणुभट्टीतल्या संयंत्रांचं तापमान आटोक्यात कसं आणायचं, हाच मोठा प्रश्न होता.
संचालकांच्या आपत्कालीन बैठकीत सगळी रीडिंग्ज सामोरी आल्यावर सर्वप्रथम आपत्कालीन व्यवस्थेने निर्णय घेतला.. परिसरातली लोकसंख्या हलवण्याचा. तातडीने तसे आदेश दिले गेले.
सुमारे दोन लाख लोक काही तासातच हलवायचे होते. एरव्ही आपत्कालीन यंत्रणेने त्याचा प्लॅन तयार केला होता. पण आता परिस्थिती वेगळी होती. भूकंपाने आणि सुनामीने धुमाकूळ घातला होता. सगळी यंत्रणा सुनामीच्या विध्वंसाशी झगडत होती. त्यात परिसर रिकामा कसा करायचा?
पण जपानी माणसं हाडाची शिस्तप्रिय. आदेशाप्रमाणे ६० किलोमीटरचा परिसर रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
क्योडो या न्यूज एजन्सीच्या पत्रकारांचं पथकच या सगळ्या घटनाक्रमावर नजर ठेवून होतं. १० किलोमीटर अंतरावरून कॅमेरे रिअ‍ॅक्टर्सच्या दिशेने रोखले गेले होते. काहीतरी गडबड आहे हे कळत होतं. पण फोन बंद होते. अधिकृतपणे काहीही कळत नव्हतं. क्योडोच्या एका पत्रकाराजवळ टेप्कोच्या प्रकल्पात काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाचा सोर्स होता, पण भूकंपानंतर तो तुटलेला. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी भूकंपाचा छोटा धक्का आणि त्या पत्रकाराच्या मोबाइलचं व्हायब्रेशन एकाचवेळी झालं आणि तो दचकला. त्या अणुतंत्रज्ञाचा एका ओळीचा संदेश होता..
रिअ‍ॅक्टरमध्ये सीजियमचे अंश सापडले होते.
याचा अर्थ खूप गंभीर होता. रेडियो उत्सर्जन करणारं सीजियम सापडणं म्हणजे अणुभट्टीत काहीतरी बिघाड झालाय हे नक्की होतं. याचा अर्थ वितलन सुरू झालं होतं. अणुभट्टीतला इंधनाचा रॉड वितळू लागला होता. आता अणुभट्टीचं तापमान नियंत्रणाच्या बाहेर जाणार. भूकंपामुळे रिअ‍ॅक्टरमधली प्रशीतक यंत्रणा बंद पडल्याचं जपानमधल्या जवळ जवळ प्रत्येकाला माहीत होतं. याचा अर्थ एकच होता. आणि ती भीती तिथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटली होती.
त्या पत्रकाराने उलटसंदेश केला.. रेडिएशन किती आहे?
थोडय़ाच वेळात उत्तर आलं.. ८८२ मायक्रोसिव्हर्ट पर आर.
अरे देवा! ५०० मायक्रोसिव्हर्टपेक्षा जास्त! म्हणजे मर्यादा तर ओलांडली गेलीय.
ही प्रतिक्रिया येते न येते तोच समोर १० किलोमीटर अंतरावर स्फोटाचा प्रचंड आवाज झाला. इमारत क्रमांक १ च्या ठिक ऱ्या आकाशात उडताना दिसल्या. मोठा पांढरा धुरळा दिसला.
आता मेसेज येणार नाही हे क्योडोच्या पत्रकाराला कळून चुकलं.
सायरन मोठय़ाने वाजू लागला.
आपत्कालीन पथकाच्या गाडय़ा वेगाने फिरू लागल्या. काहीतरी भयानक घडतंय एवढंच लोकांना कळत होतं. एनएचके चॅनलवर रिअ‍ॅक्टरच्या स्फोटाची बातमी झळकली. लोकांच्या पोटात आणखी खड्डा पडला. आधीच निसर्गाचं रौद्र रूप. भूकंप, सुनामी, ज्वालामुखी तांडवनृत्य करत होते. त्यात हा मानवनिर्मित परमाणु भस्मासूर उभा राहिला तर काय होणार?
टेप्कोच्या मुख्यालयात आता पंतप्रधानांच्या आदेशाने आता आणखी एक माणूस आला होता. न्युक्लिअर सिक्युरिटी एजन्सीचा हेड. स्फोट होईपर्यंत जपानी शिरस्त्याप्रमाणे टेप्कोचा अंमल होता. स्फोटानंतर सगळी सूत्र सरकारच्या हाती गेली.
पाणी टाकून चूल विझवावी तशी अणुभट्टी स्विच ऑफ करता येत नाही. अणुभट्टय़ा शट डाऊन केल्या होत्या, पण रिअ‍ॅक्टरमध्ये विघटनाची प्रक्रिया सुरू झालेली असते. ती थंड करून नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं.
पहिल्या रिअ‍ॅक्टरच्या स्फोटानंतर आता पुन्हा चाचण्या वाचन आणि निरीक्षणाचे आकडे मुख्यालयाकडे येऊ लागले. जगभरच्या न्यूज चॅनेल्सवर आता सुनामीच्या क्लिपिंग्ज जाऊन रिअ‍ॅक्टरच्या स्फोटाचे चित्रं दिसू लागली. चेर्नोबिलच्या आठवणी निघू लागल्या. भारतातल्या टीव्ही चॅनेल्सवर जैतापूरचे कढ निघू लागले. काकोडकरांची परमाणू प्रकल्पाच्या समर्थनार्थ विधानं दाखवली जाऊ लागली. अणुवैज्ञानिक आणि परमाणू ऊर्जा नियामक बोर्डाचे शास्त्रज्ञ टीव्हीवर आपलं म्हणणं मांडू लागले. जगाला युरेनियम पुरवणाऱ्या ऑस्ट्रेलियातले अणुविरोधी एकवटले. ऑस्ट्रेलियन कंझव्‍‌र्हेशन फाऊंडेशनने जगभर निषेध खलिते फडकवले आणि सोशल मीडियावर अणुभट्टीविरोधी काळे झेंडे दिसू लागले.
त्याचवेळी तिकडे तोक्योतल्या न्यूक्लिअर सिक्युरिटी एजन्सीचं चौघाजणांचं पथक फुकुशिमा दाइची न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या क्रमांक ३ च्या तोशिबाच्या रिअ‍ॅक्टरकडे निघालं होतं. क्रमांक ३ च्या या रिअ‍ॅक्टरमध्ये प्लुटोनिअम ऑक्साइड आणि युरेनिअम ऑक्साइडचं मिश्रण होतं. प्लुटोनिअम हे लगेच बाष्पीकृत होत असल्यामुळे जास्त घातक होतं. या दोन्हींचा हवेशी संपर्क झाला आणि त्याचा ढग पसरू लागला तर हा किरणोत्सर्ग केवळ जपानलाच नाही तर आख्ख्या जगासाठी भयावह ठरणार होता. या मिश्रणाच्या वितलनाच्या आधीच त्यावर उपाय करायला ही पथकं निघाली.
न्यूक्लिअर सिक्युरिटी एजन्सीला या रिअ‍ॅक्टरवर बोरॉनचा शिडकावा करायचा होता. बोरॉनमुळे न्यूट्रॉनच्या विघटनाची अनियंत्रित चेन रिअ‍ॅक्शन नियंत्रणात येते. बोरिक अ‍ॅसिडमध्ये बोरॉन विपुल प्रमाणात असतं. बोरीक अ‍ॅसिड आणि समुद्राच्या पाण्याचं मिश्रण संयंत्राच्या अवाढव्य बुधल्यामध्ये उच्च दाबाच्या कोअर इंजेक्शन पद्धतीने सोडावं लागतं.
एजन्सीचं चार जणांचं हे पथक आता रिअ‍ॅक्टर क्रमांक ३ च्या इमारतीकडे निघालं. रिअ‍ॅक्टरचं तापमान प्रचंड वाढलेलं. क्रमांक १ प्रमाणे कधीही त्याचा स्फोट होऊ शकत होता. किरणोत्सर्गरोधी मास्क लावलेल्या पथकाच्या कप्तानाने आदेश दिला आणि बोरिक अ‍ॅसिडचा साठा घेऊन ते रिअ‍ॅक्टर ३ कडे अत्यंत वेगाने निघाले. सहज त्यांनी दूर क्रमांक १ च्या इमारतीकडे बघितलं. तिचा केवळ सांगाडा दिसत होता. तिथला अजस्र कंटेनर तुटला होता.
या चौघांना रिअ‍ॅक्टरमधल्या तीन तंत्रज्ञांची जोड मिळाली. बाकी सगळ्यांना तातडीने इमारत रिकामी करायला सांगण्यात आलं. कप्तानाच्या आदेशाप्रमाणे तातडीने ऑपरेशन सुरू झालं. प्रशीतन पूर्णपणे बंद पडलेलं होतं, मात्र त्यांना काम करणं आवश्यक होतं. रिअ‍ॅक्टरला बोरॉनची मात्रा देणं भागचं होतं. त्यांच्या हालचाली यांत्रिकपणे सुरू झाल्या. नोझल्स जोडली गेली, विविध खटके आणि बटणं दाबली गेली आणि अणुभट्टीत बोरॉनचा शिडकावा होऊ लागला.
दरम्यान अणुभट्टीमध्ये लिकेज सुरू झालं होतं. पांढऱ्या रंगाचा एक ढग भट्टीच्या भेगेतून वर पसरू लागला होता. तापमान काही कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. आता तिथं उभं राहणंही कठीण होतं. पण ते सातजण तिथे निश्चलपणे चेन रिअ‍ॅक्शनला जेरबंद करण्याचं त्यांचं काम करत होते.
दूर पुन्हा कॅमेरे सज्ज होते. तिसऱ्या रिअ‍ॅक्टरच्या तापमानाची बातमी एव्हाना सर्वदूर पोहोचली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता अचानक जमीन हादरवणारा आवाज झाला. तिसऱ्या अणुभट्टीत हायड्रोजन स्फोट झाला होता.
या स्फोटानंतर ४० मिनिटांनी तोक्यो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या मुख्यालयातून न्यूक्लिअर सिक्युरिटी एजन्सीचा प्रवक्ता पत्रकार परिषदेत सांगत होता..
रिअ‍ॅक्टर क्रमांक ३ मध्येही स्फोट झाला असला तरी तिथे असलेला किरणोत्सर्ग नियंत्रणात आहे. रेडिएशनचे आकडे उपलब्ध झाले आहेत आणि ते अगदीच मामुली आहेत. त्याच्या ५० पट अधिक रेडिएशन असतं तरच ते मानवी जीवनासाठी घातक मानलं गेलं असतं..
जगभर ही बातमी प्रसारित करण्यासाठी वार्ताहर धावत होते, आणि जग सुटकेचा निश्वास सोडत होतं.
उत्सर्गात हाराकिरी केलेल्या त्या सात जपान्यांनाही हेच समाधान असेल.




No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive