Thursday, May 12, 2011

एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर







अरे रोहन, रात्री जरा माझ्याबरोबर येशील प्लिज?", शरयु ने स्वयंपाक-घरातुन हात पुसत-पुसत विचारले. 
"आता कुठे? मोठ्या मुश्कीलीने शनिवार-रविवार मिळतात त्यात तुझी काम!", रोहन नाराजीच्या स्वरात म्हणाला.
"अरे, एअर-पोर्ट वर जायचे आहे. तुला ती राधीका आठवते? आपल्या कॉलेज मध्ये होती? माझी मैत्रिण? ती येणार आहे ऑस्ट्रेलियाहुन. तिला आणायला जायचे आहे." शरयु
राधीकाचे नाव ऐकताच रोहनचे कान टवकारले. राधीका, कॉलेजमधील एक हॉट-बेब, कुणालाही आवडावी अश्शीच. रोहनला ही आवडायची. पण तो कधी तिच्याशी याबद्दल बोलु शकला नाही. पुढे शरयुशी त्याची ओळख झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्न केले. ७-८ वर्षांनंतर मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असलेली 'राधीका' आणि तिच्या आठवणी रोहनच्या मनात उफाळुन बाहेर आल्या.

"हो.. आठवते आहे, थोडी-थोडी. पण ती कधी ऑस्ट्रेलियाला गेली?", रोहन
"अरे, तिला तिकडच्या विद्यापिठात स्कॉलरशीप मिळाली म्हणुन शिक्षणासाठी गेली होती. नंतर काही वर्ष नोकरी सुध्दा केली तिकडे. आता भारतात परतायचे म्हणतेय. एअर-पोर्ट तुला माहीतेय ना कित्ती दुर आहे, आणि रात्रीच्या वेळी टॅक्सी-रिक्षा सुध्दा मिळत नाहीत, त्यातुन तिने एकटीने येणे म्हणजे… म्हणुन तिच्या इमेलमध्ये मीच तिला म्हणले, मी येते न्यायला म्हणुन.. प्लिज.. चल ना रे रोहन!!", शरयु.

"एकटी? का? तिचा नवरा कुठे गेला?", रोहन
"अरे तिचे नाही झाले लग्न अजुन तर नवरा कुठुन येणार? एकटीच आहे अजुन ती", शरयु.
रोहनला उगाचच आनंद झाला. मग त्याने आढेवेढे घेत होकार दिला.
घड्याळाचा काटा मोठ्या मुश्कीलीने पुढे-पुढे सरकत होता. वेळ झाली तशी रोहनला पटकन उठुन आवरावेसे वाटत होते. पण उगाचच आपल्याला काहीच घेणे-देणे नाही अश्या आवेशात, उपकार केल्यासारखे तो थोडा उशीराच उठला.
"आओगे जब तुम, मेरे साजना… अंगना.. फुल खिलेंग..", लोकल एफ-एम वर गाणं लागलं होतं. रोहन शरयु चे लक्ष नाही बघुन सारखा आरश्यात बघुन स्वतःला ठिक-ठाक करत होता. 'कशी दिसत असेल राधीका आता? होती तश्शीच असेल का बदलली असेल?', मनात विचारांचे चक्र चालु होते. शरयुशी नजरा-नजर तो शक्यतो टाळत होता. आपल्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावरील ओसंडुन वाहणाऱ्या उत्साहवर त्याचेच नियंत्रण नव्हते. उगाचच शरयुला काही-तरी वाटेल म्हणुन तो तिच्याकडे पहाण्याचे टाळत होता.

एअर-पोर्ट वरील राधीकाची फ्लाईट एक तास उशीरा आहे कळल्यावर रोहन मनोमन अतिशय चरफडला होता. मनातली आगतीकता दाखवु न देता तो शक्यतो नॉर्मल रहाण्याचा प्रयत्न करत होता.
शेवटी 'सिडने' वरुन येणारी फ्लाईट उतरली आणि रोहनची नजर गेट कडे लागली. थोड्याच वेळात त्याला राधीका येताना दिसली. लाल रंगाचा गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक, तिचा ट्रेड-मार्क असणारा गॉगल, नेहमीच्याच स्टाईल-मध्ये केसांमध्ये अडकवलेला, खांद्याला पर्स, हातात स्ट्रॉली आणि दुसरा हात सतत चेहऱ्यावर कोसळणारे केस सावरण्यात. अगदी तश्शीच जशी रोहनने तिला शेवटचे पाहीले होते. किंबहुना वय वाढुनही अंगी बळावलेल्या आत्मविश्वासाने चेहरा, चालण्यातील ठसका अधीकच मन मोहुन घेणारा. 

रोहन उगाचच आपले लक्ष नाही असे दाखवत इतरत्र बघत होता, तरीही शक्य असेल तेंव्हा तो तिच्याकडे बघत होता.
"ए.. ती बघ राधीका आली", शरयु राधीकाकडे बोट दाखवत रोहनला म्हणाली, आणि तिच्याकडे जवळ-जवळ धावतच गेली.
ह्रुदयाची वाढलेली धडधड, श्वासाचा वाढलेला वेग, हाताला आणि पायाला सुटलेला कंप रोहनला जाणवत होता. दीर्घ श्वास घेउन तो आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करत होता. इतक्या वर्षांनंतर राधीका ओळखेल का आपल्याला? काय बोलेल? आपण काय बोलायचे याचाच विचार मनात चालु असताना राधीका आणि शरयु त्याच्या जवळ पोहोचले सुध्दा.

"हाय रोहन.. ओळखलंस?", राधीकाने आपली मिलीअन डॉलर स्माईल देउन रोहनकडे बघत हात पुढे करुन विचारलं
"म्हणजे काय? ओळखलं ना!", रोहनने तिच्याशी हात मिळवत उत्तर दिले. तिच्या स्पर्शाने रोहनच्या अंगातुन विज सळसळली.
"अरे, कित्ती बदलला आहेस तु? स्मार्ट झाला आहेस अजुन. शरयु लकी आहे हं" असं म्हणुन राधीका पुढे चालु लागली.
राधीकाच्या त्या अनपेक्षीत वाक्याने रोहनं एकदम खुष झाला. गाडीमध्ये शरयु आणि राधीकाच्या जोर-जोरात गप्पा चालु होत्या. रोहन जणु त्यांच्यात नव्हताच. रोहनही आपले जणु लक्ष नाही दाखवत होता, परंतु त्याचे पुर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होते. मधुनच तो आरश्यातुन राधीकाला न्याहाळत होता. एका बेसावध क्षणी अचानक आरश्यात त्याची आणि राधीकाची नजरानजर झाली तसा तो चपापला. मग मात्र त्याने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले.

रात्री बिछान्यावर पडल्यापडल्या रोहन राधीकाबद्दल विचार करत होता. शरयु स्वयंपाकघरातुन आवरुन बेडरुम मध्ये आली. आवरुन झाल्यावर ति रोहन शेजारी पांघरुणात शिरली आणि रोहनला बिलगली. रोहनने तिच्या विनंतीला मान देउन तिच्याबरोबर आला म्हणुन शरयु खुष होती. रोहनला इतक्या वेळानंतर प्रथमच शरयुची जाणीव झाली. "काय करतो आहेस रोहन तु? तुझ्या लग्नाला चार वर्ष होऊन गेली. शरयु तुझी बायको आहे आणि तु परस्त्रीचा विचार करत आहेस? शोभते का तुला? अरे कोण कुठली राधीका? किती वेळा बोलला आहेस तिच्याशी तु कॉलेज मध्ये? सगळे कॉलेज तिला 'फ्लर्ट' म्हणुन ओळखायचे, तिच्यासाठी तुला बायकोचा विसर पडला? शेम.. शेम".. रोहनला स्वतःच्याच कृत्याची लाज वाटली. मग त्याने मोठ्या कष्टाने राधीकाला मनातुन तात्पुरते का होईना दुर केले आणि दिवा मालवुन तो शरयुला जवळ घेउन झोपी गेला.

राधीकाच्या मनात काय होते? तिलाही रोहन-बद्दल आकर्षण वाटले होते का? त्या दोघांमध्ये काही केमीस्ट्री शिजत होती का? सर्व काही पुढील भागात..  
[क्रमशः]
कसं असतं ना.. असं म्हणतात की नवऱ्याच्या मनात काही पाप असेल तर बायकोला कळु नये म्हणुन तो तिच्याशी जास्ती प्रेमाने वागतो.. (असं म्हणतात बरं का..) दुसरा दिवस, रविवार सुट्टीचा पुर्ण दिवस रोहन ने शरयु बरोबरच घालवला. दिवसभर फिरणं, शॉपिंग, हॉटेलस. नविन आठवड्याला सुरुवात झाली आणि रोहन कामात मग्न होऊन गेला. राधीकाबद्दलचे त्याचे विचार हळु हळु कमी होत गेले.


शनिवारी संध्याकाळी रोहन टी.व्ही चाळत बसला होता इतक्यात बेल वाजली. रोहनने दरवाजा उघडला आणि समोर राधीकाला बघुन क्षणभर स्तब्ध झाला. गडद निळ्या रंगाचा सलवार-कुर्ता, हातामध्ये मॅचींग बांगड्या, डोक्यावर चढवलेला गॉगल, चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे कोसळणारे केस आणि चेहऱ्यावर तेच ते चार्मिंग स्माईल. 'गॉर्जियस', रोहन स्वतःशीच पुटपुटला. मागोमाग शरयु आल्यामुळे त्याला काही बोलताच आले नाही.


"सरप्राईज", राधीका शरयुला म्हणाली, "चल लवकर तयार हो.. आपल्याला बाहेर जायचे आहे".
"अगं पण कुठे?", शरयु ने विचारले.

"मस्त प्लॅन आहे पिक्चरचा. दोन तिकीटं काढली आहेत. नविन हॉरर सिनेमा लागला आहे विजयला, चलं पटकनं.." शरयुला जवळ जवळ ढकलतच राधीका म्हणाली.


"आत्ता? अगं पण आधी विचारायचसं तरी!", शरयु कपाळावर हात मारत म्हणाली.

"का? काय झालं? तुमचा काही दुसरा प्लॅन होता का?", राधीका

"नाही गं. प्लॅन वगैरे काही नाही. आम्ही आत्ता आई-बाबांकडे जाणार होतो. आई ने पापड काढले आहेत करायला.. तर मी जाणार होते मदत करायला.", शरयु म्हणाली.


"काय गं..:-( उद्या जा ना! मस्त आहे सिनेमा.", राधीका निराश होतं म्हणाली.

"नाही गं. आईने सगळी तयारी करुन ठेवली असेल. उद्या परत नाही जमणार. आणि तुझ्याबरोबर सिनेमाला आले तर रोहनचे जेवायचाही प्रश्न येईल कारण आम्ही आई कडेच जेवणार होतो त्यामुळे स्वयंपाकही काही केला नाही मी", शरयु


"श्शी बाबा.. माझंच चुकलं आधी विचारायला हवं होतं. आत्ता या तिकीटांचं काय करु? वायाच गेली म्हणायचं!", राधीका हताशपणे तिकीटांकडे बघत म्हणाली.

दोन क्षण शांततेत गेले.

मग शरयुच म्हणाली, "नाही तर एक काम करतेस का? रोहनला घेउन जा ना सिनेमाला. तसेही त्याला आई बाबांकडे यायचे नव्हतेच. उगाच तु काढलेली तिकीटं नको वाया जायला"

रोहन या अनपेक्षीत धक्याने दचकलाच होता.."ए नाही हा. मी नाही जाणार तुला एकटीला सोडुन, आपण जाऊ नंतर सिनेमाला."

"अरे खरंच जा रोहनं, मी आत आईबरोबर पापड करत बसणार तु तसाही कंटाळशील. त्यापेक्षा जा ना तिच्याबरोबर. आणि ती काय तुला नविन आहे का? कॉलेजपासुनची आहेच की ओळख", शरयु.


राधीका आपल्या भुवया थोड्याश्या उंचावुन म्हणाली, "बघं गं, मला काही प्रॉब्लेम नाही, पण नंतर तुच म्हणशील माझा नवरा पळवला म्हणुन!!" आणि दोघीही हसायला लागल्या.
रोहनने लगेच आपले कपडे बदलले. राधीकाबरोबर सिनेमाला जायचे यात एकदम थ्रिल्ल होते, पण त्याच बरोबर शरयुला एकटीला सोडुन जायला ही नको वाटत होते. शेवटी काय हरकत आहे. तसेही शरयु म्हणत आहे म्हणुनच जात आहे ना, लपुन-छपुन तर जात नाहीये. उगाच त्यांचे पापड-लाटणे बघण्यापेक्षा सिनेमा बघीतलेला बरा.. असं मनाला समजावुन तो बाहेर पडला.


दार लावतानाच शरयु म्हणाली.."आणि हो.. बाहेरच काही तरी खावुन या.. घरी काही केलेले नाहीये.."

गाडीत बसल्यावर पहीले काही क्षण शांततेत गेले. रोहनचे ह्रुदय जोरात धडधडत होते. त्याचा आवाज राधीकाला ऐकु जाईल की काय या विचाराने त्याने गाडीतील एफ.एम ट्युन केले.


"सोss", राधीका आणि रोहन एकदमच बोलले.
राधीका त्यामुळे छानसी हसली.. तिच्या हसण्याने गाडीतील ताण थोडा कमी झाला.. "बोल बोल.." राधीका रोहनला म्हणाली.

":-) सो.. कसे वाटले ऑस्ट्रेलिया? तु परत भारतात येणार आहेस असं शरयु म्हणाली", रोहन

"हो अरे.. कंटाळा आला मला तिकडे. भारतात जसं मस्त मोकळं, स्वतंत्र वाटतं ना तसं नाही वाटत तिकडे. आपलं असं कोणीच नाही. आणि परत सध्या भारतीयं लोकांवर चाललेले हल्ले, त्यामुळे आई-बाबा पण म्हणत होते ये इकडेच म्हणुन.. मला काय, काहीतरी कारणंच हवं होतं" राधीका बोलता बोलता वाऱ्याने उडणारे केस सावरतं म्हणाली.


पुढील काही वेळ ऑस्ट्रेलिया तेथील विद्यापिठ, नोकरीचा अनुभव यावर राधीका बोलतं होती आणि रोहन ऐकत होता.

"मग आता भारतात येउन लग्न करण्याचा विचार असेल नाही का? शरयु म्हणाली तु अजुन लग्न नाही केलेस, आश्चर्य आहे. बाकी तु अज्जीब्बात बदलली नाहीस, होती तश्शीच आहेस.", रोहन


"नाही रे.. अजुन मनासारखा मिळालाच नाही बघ. शेवटी सगळे शरयु सारखे लक्की थोडे ना असतात.. बाकी तु मात्र खुssप बदलला आहेस हं", राधीका

"तु पण ना.." असं म्हणत रोहनने गाडीला वेग दिला. थोड्याच वेळात थिएटर आले. गाडी पार्क करुन थिएटर मध्ये शिरताना तेथील चित्र बघुन राधीका घाबरली होती.


"तुला माहीतीए मला ना, जाम भिती वाटते भुतांची वगैरे. सगळे हसतात मला, लहान आहेस का म्हणुन. मग या वेळेला हा सिनेमा लागला तेंव्हा ठरवलेच होते, काही झालं तरी हा सिनेमा बघायचाच, एकदाची भिती घालवुनच टाकायची", राधीका विस्फारलेल्या डोळ्यांनी बाजुची भयानक चित्रं बघता-बघता बोलत होती.


सिनेमा सुरु झाला आणि राधीकाला वाटणारी भिती, टेंन्शन अंधारातही रोहनला जाणवत होते. खुर्चीला घट्ट पकडुन राधीका ताठ बसली होती. रोहनला खरं तर मनातल्या मनात हसु येत होते, पण मोठ्या प्रयत्नांनी तो हसु दाबुन ठेवत होता.


चित्रपटामध्ये नायीका रात्रीची एकटीच जंगलातुन जात असते. कॅमेरा हळु हळु तिच्या मागुन येत असतो. सगळीकडे धुके सदृश्य धुर असतो. नायीका घाबरलेली असते तरीही पुढे पुढे जात असते. कुठल्याही क्षणी कुठुन तरी कोणी तरी येईल अशी वेळ आलेली असते. अचानक रोहन त्याच्या हाताला झालेल्या स्पर्शाने दचकला. राधीकाने त्याचा खुर्चीवर ठेवलेला तळहात घट्ट पकडला होता. रोहनने तिच्याकडे बघीतले. राधीका अजुनही डोळे मोठ्ठे करुन पडद्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर पसरलेली भिती रोहनला स्पष्ट दिसत होती. कॅमेरा नायीकेच्या जवळ जवळ जात होता तसं-तशी राधीकाच्या हाताची रोहनच्या हातावरील पकड घट्ट होतं होती. आणि अचानक पडद्यावर भुताची ऐंन्ट्री झाली, त्याबरोबर राधीकाने डोळे घट्ट मिटुन घेतले आणि मान रोहनच्या खांद्यावर झुकवली.


तिच्या त्या दाट-कोमल केसांचा स्पर्श, हातावरील तिची पकड आणि दंडावरील तिच्या गरम-उच्छवासाने रोहनच्या अंगावर रोमांच उभे राहीले. थिएटरमधील थंडगार ए/सी मध्येही तिच्या हाताचा गरम स्पर्श रोहनला जाणवत होता. पडद्यावरील 'तो' सिन संपल्यावर राधिका बाजुला झाली.


"स्वॉरी हं.." आपले केस सावरतं राधीका हलकेच रोहनला म्हणाली, "..कसला भयानक आहे सिनेमा. मी नाही बघु शकत अजुन. प्लिज आपण बाहेर जायचे? प्लिज?"

"ओ.के", असं म्हणुन रोहन उठला, मागोमाग राधीकाही उठली आणि दोघं जण थिएटरच्या बाहेर पडले. राधीकाचा श्वासोच्छवास अजुनही जोरात चालु होता. ती अजुनही टेंन्स्ड दिसत होती.


मग रोहनच म्हणाला, "चल कॉफी पिऊ यात, तुला बरं वाटेल."

दोघांकडेही भरपुर वेळ होता..काय घडलं असेल पुढे?
 

कॉफी शॉप मध्ये राधीकानेच ऑर्डर दिली, "टु लात्ते (caffè latte) प्लिज!!"
रोहन, "तुला काय माहीत मला लात्ते आवडते?"
राधीका, "अरे म्हणजे काय, कॉलेज मध्ये नाही का एकदा आपण नविन कॅफे सुरु झाले होते तेंव्हा गेलो होतो.. तेंव्हा तु हिच घेतली होतीस कॉफी आणि म्हणाला पण होतास तुझी फेव्हरेट आहे म्हणुन!"
"असेल.. पण झाली त्याला आता ६-७ वर्ष!", रोहन मनोमन आपली आवड राधीकाच्या लक्षात आहे हे ऐकुन सुखावला होता.
"A Lot Can Happen Over Coffee", बाहेर लिहिलेल्या वाक्याकडे बोट दाखवत राधीका म्हणाली, "खरंच कित्ती साधे पण तितकेच परीणामकारक वाक्य आहे हे नाही?"
"हम्म.." कॉफी पित-पित, रोहन म्हणाला.."बरं ते जाऊ देत, काय गं, कॉलेज मध्ये तुझ्या मागे तो सुजित होता.. काय झालं पुढे त्याचे? नंतर काहीच कॉन्टाक्ट नाही ना?"
":-) नाही रे.. मला तर तो निटसा आठवत सुध्दा नाही. आणि तोच काय, कित्तीतरी जणं माझ्या मागे होते ), अगदी तु सुध्दा.. हो ना?", राधीका रोहन च्या डोळ्यात खोलवर पाहात म्हणाली.
"ए चल.. काहीही.. तसं काही नव्हते. आणि आपण असं कित्तीसं भेटलो होतो कॉलेज मध्ये?", रोहन तिची नजर टाळत म्हणाला.
"अरे सांग रे.. डोन्ट वरी, शरयुला नाही सांगणार मी, खरं सांग", राधीका
"नाहीsss, तसं काही नव्हते.." रोहन प्रयत्नपुर्वक आपल्या म्हणण्यावर ठाम रहात म्हणाला.
"बरं बाबा.. ठिक आहे", राधीका
रोहनने तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहीली होती, जी काही क्षणासाठी आली आणि परत निघुन गेली. नंतर दोघांनी खुप्प गप्पा मारल्या. विषय एक असा कुठलाही नव्हता. खरं कारण होतं ते म्हणजे दोघंही जण एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. मग त्यांनी एकत्र जेवण घेतले, (यावेळेसही राधीकानेच ऑर्डर दिली होती).

घरी परतत असताना राधीका वाकुन वाकुन गाडीचा स्पिडोमिटर बघत होती. शेवटी रोहनने न रहावुन विचारले, "काय झालं?"
"अरे स्पोर्ट्स कार ना तुझी? मग असा ४०-६० च्या वेगाने काय गाडी चालवत आहेस? जरा चालव ना वेगाने? का मी चालवु?" राधीका
मग रोहनने गाडीला तुफाने वेग दिला. बऱ्याच दिवसांनी त्याने त्याची लाडकी कार अशी पळवली होती. नाही तर शरयु असताना तिचे नेहमी तुणतुणं असायचं, "गाडी हळु चालव, गाडी हळु चालव." 'कित्ती फरक आहे दोघींच्यात!' रोहनच्या मनात विचार चमकुन गेला.

रोहनने राधीकाला तिच्या घरी सोडले आणि तो त्याच्या घरी परतला. खुप मस्त संध्याकाळ गेली होती त्याची. घरी आला तेंव्हा शरयु नुकतीच आली होती. नेहमीप्रमाणेच तिची स्वयंपाक घरात काहीतरि खुडखुड चालु होती. रोहनला बघताच ती म्हणाली, "अरे, बरं झालं तु आलास. अरे ह्या गॅस-हब ला बघ ना काय झालेय? सुरुच होतं नाहीये. आत्ताच तर आणला ना आपण? उद्या सकाळीच आपण दुकानात जाउन दाखवुन आणु. वॉरंटी मध्ये आहे तर तो करुन तरी देईल ना!"

रोहन चांगली संध्याकाळ घालवुन परतला होता. घरी आल्या आल्या शरयुची कटकट त्याला नकोशी झाली. "काय वैताग आहे हिचा.. काय अवतार आहे?", स्वतःशीच तो बोलत होता, नकळत त्याचे मन शरयु आणि राधीकाला कंपेअर करत होते आणि अर्थात त्याचे झुकते माप राधीकाच्याच बाजुला होते. कपडे बदलले आणि बेड-वर बसणार एवढ्यात त्याचा मोबाईल एस.एम.एस आला म्हणुन किणकिणला. "Thanks a lot for a wonderful evening, evening that i will cherish in my life", राधीकाचाच मेसेज होता. मेसेज वाचुन त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. मेसेज ठेवावा का काढुन टाकावा या विचाराने त्याची थोडी चलबिचल झाली आणि शेवटी त्याने तो मेसेज काढुन टाकला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी रोहन गाडीत बसला. कालचा राधीकाने लावलेला परफ्युमचा सुगंध अजुनही गाडीत दरवळत होता. काहीतरी जादु होती त्या सुवासामध्ये. मन वेड करणारा तो सुगंध रोहनलाही वेड करत होता. त्याला असं वाटत होतं तडक राधीकाकडे जावं आणि तिला आपल्या बाहुपाशात घ्यावे. मग अचानक तो भानावर आला. राधीकासाठी असणारी मनाची ओढ त्याला जाणवत होती, पण त्याचवेळी शरयुची आठवण त्याला मागे खेचत होती. मनाची ही ओढाताण त्याला असह्य करत होती. दिवसभराचे काम कसे तरी संपवुन तो घरी निघणार होता एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर राधीकाचा नंबर बघुन त्याने तो पटकन उचलला.

"हाय रोहन, कसा आहेस?", राधीका
"हाय!, मी मस्त मज्जेत. बोल कसा काय फोन केलास?". रोहनला माहीती होतं की तो मज्जेत नाहीये. कसली तरी अनामीक ओढ, हुरहुर त्याला शांत बसु देत नाहीये.
"अरे, काल तु एवढा मला सोडायला आलास आणि मी तुला घरी सुध्दा बोलावले नाही कॉफी साठी. संध्याकाळी काही करणार नसशील तर ये ना घरी. मी फार वेळ नाही घेणार तुझा", राधीका

"त्यात काय एवढं? ठिक आहे ना.. परत कधीतरी येईन. मी आणि शरयु दोघंही येउ, आज नको", रोहन
"तुम्ही दोघं यालच रे, पण मला तुला थॅक्स म्हणायला नको का? काय पण माझा मुर्ख पणा, एवढी साधी गोष्ट पण मी तुला विचारली नाही काल यासाठीच मन खातेय माझं मला. प्लिज!!?", राधीका विनवणीच्या स्वरात म्हणाली.
रोहनने एकदा नाही म्हणुन झाले होते.. परत नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मग त्याने शरयुला फोन करुन "क्लायंट मिटींग आहे, घरी यायला थोडा उशीर होईल" असे कळवुन टाकले होते. सकाळ पासुन पडलेला चेहरा आणि मुड-ऑफ असणारा रोहन आता एकदम खुलला होता. 

त्याच्या एका सहकाऱ्याने-मित्राने विचारले सुध्दा, "काय साहेब, एकदम खुशीत दिसताय? सकाळ पासुन तर सुतकी चेहरा करुन बसला होतात? काय भानगड काय आहे?"
तसा रोहन म्हणाला, "अरे फार द्विधा मनस्थीतीत आहे. काय करावं कळतं नाही. बायकोची एक मैत्रिण आहे रे.." आणि मग रोहनने कालचा प्रसंग सांगीतला.."मनातुन जातच नाहीये अरे ती. आणि मला असं वाटतेय की तिला सुध्दा मी आवडतो! आज संध्याकाळी कॉफीला बोलावले आहे तिने घरी.. एकट्याला."

"अरे व्वा.. तेरी तो निकल पडी!.. जा जा.. ऐश कर", मित्राने पाठीवर थाप मारत रोहनला म्हणले.
"अरे नाही रे.. एकीकडे सतत असे वाटत रहाते, आपण बायकोला फसवत तर नाहीये ना?", रोहन
"हे बघ, माझं वैयक्तीक मत तरी असं आहे की जो पर्यंत तु दुसऱ्या कुणाशी इमोशनली – मनाने ऍटॅच होत नाहीस तो पर्यंत तु जोडीदाराशी फसवणुक केली असं म्हणता येणार नाही. शरीर काय रे..नाशवंत आहे, मर्त्य आहे, आत्मा अमर आहे", मित्राने आध्यात्माची जोड दिली.

"बरं बरं प्रभु.. जातो आता, नाही तर उशीर होईल", असे म्हणुन रोहन निघुन गेला.
रोहनने बेल वाजवली तेंव्हा राधीकानेच दार उघडले. पांढरा टॉप आणि लेमन रंगाच्या स्कर्ट मध्ये राधीका नेहमीपेक्षाही अधीक सुंदर दिसत होती.
"काका, काकु नाहीत घरी?", रोहनने आतमध्ये येत विचारले.
"अरे नाही.. ते लग्नाला गेले आहेत नगर ला.. उद्याच येतील", राधीकाने उत्तर दिले.
रोहन तेथीलच एका सोफ्यावर बसला. हवेत सुखद गारवा होता. 'केनी.जी' ची रोमॅनटीक इंन्स्ट्रुमेंटल मंद आवाजात वाजत होती.
"तुला आवडतो केनी.जी?" राधीकाने आतुन कॉफी घेउन येताना विचारले. "कित्ती छान वाजवतो ना. काहीही धांगड्धिंगा नाही, हजारो वाद्यांचे ताफे नाहीत तरीही त्या ट्युन्स वेडं करतात, बेहोश करतात"
राधीकाचा तो परफ्युम्सचा सुगंधच खरं तर रोहनला वेड करत होता. राधीकाने कॉफीचा एक कप त्याला दिला आणि दुसरा स्वतःला घेउन त्याच्या शेजारीच बसली.
"रोहन, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, म्हणुनच खरं तर मी तुला घरी बोलावले. मला आजकाल फार असं वाटतंय की मी मोठ्ठी चुक केली आहे. कॉलेज मध्ये एक मुलगा होता. शांत, गरीब, लाजाळु. मला माहीती आहे, त्याला मी आवडायचे. आणि कदाचीत मला पण तो थोडाफार आवडायचा. पण आमच्या जास्ती गाठीभेटी झाल्या नाहीत. त्यामुळे मी ठरवु शकले नाही. त्याचबरोबर त्यावेळेस एक प्रकारचा माज, इगो मनात होता ना, मी म्हणजे कोण ग्रेट! आत्ता वाटत त्याचवेळेस त्याच्याशी बोलले असते तर बरं झालं असतं, आज पश्चात्ताप करण्याची वेळ माझ्यावर आली नसती. तुला माहीती आहे कोण होता तो मुलगा?", राधीकाने रोहनला विचारले.

"नाही", रोहन उत्तरला.
एक दीर्घ श्वास घेउन राधीका म्हणाली, "तु रोहन.. तु होतास तो मुलगा. इतक्या वर्षांनंतर तुला भेटले आणी वाटलं मी तुला गमावलं रोहनं. नंतर अनेक जण भेटले, पण नकळत सगळ्यांमध्ये मी तुझाच चेहरा शोधत राहीले जो मला कध्धीच सापडला नाही."

"अगं पणं…", रोहनचे वाक्य अर्धवटच राहीले. राधीकाने आपले बोट त्याच्या ओठांवर ठेवले.. "श्शुssss! काही बोलु नकोस", राधीकाने आपले हात त्याच्या मानेभोवती गुंडाळले. मला सगळे कळते रोहन, मला सगळे माहीती आहे, तु बोलायची आवश्यकता नाही. तिने आपले ओठ त्याच्या कानाजवळ न्हेले आणि त्याच्या कानात जाऊन हळुच म्हणाली, "माझ्यावर विश्वास आहे ना? मग मी सांगते तसं करं, प्रश्न विचारु नकोस. थोड्यावेळाने मला जोरात ढकल आणि फक्त म्हण 'हे होऊ नाही शकत'"

रोहनला काहीच कळत नव्हते, तो प्रश्नार्थक नजरेने राधीकाकडे बघत होता. शेवटी त्याने होकारार्थी मान डोलावली. थोड्यावेळाने त्याने राधीकाला जोरात ढकलले. राधीका सोफ्यावरुन खाली कोसळली. पाठोपाठ रोहन तिच्यावर ओरडला, "नाही राधीका हे नाही होऊ शकत.. प्लिज!"

त्याचबरोबर मागुन "येस.. मी जिंकले.. मी जिंकले" असा कुणाचा तरी आवाज आला. रोहनने मान वळवुन मागे बघीतले तर एका खोलीतुन शरयु नाचत बाहेर येत होती. शरयुला इथे बघुन रोहनला धक्काच बसला. तो आळी-पाळीने राधीकाकडे आणि मग शरयुकडे बघत राहीला.

शरयुने जवळ येउन रोहनला अलिंगन दिले आणि मग म्हणाली, "स्वॉरी आणि थॅक्स रोहन, सांगते सगळं सांगते. ही राधीका आहे ना.. हिला फार गर्व होता कि ती कुणालाही पटवु शकते, अगदी विवाहीत माणसालाही. मग मीच तिला इमेल मध्ये म्हणलं शक्यच नाही. माझ्या नवऱ्यासारखा, रोहनसारखा शोधुन सापडणार नाही. मला सोडुन तो परस्त्रीकडे बघणारच नाही. तेंव्हा हीनेच बेट लावली होती. पण आज तु तिला खोट्यात पाडलंस, तु दाखवुन दिलंस कि तु फक्त माझाच आहेस.. थॅक्स रोहन.. खरंच थॅक्स"

रोहनला काय बोलावं अजुनही कळत नव्हतं. तो राधीकाचा झाला होता. त्याने राधीकाचे प्रेमही मगाशीच स्विकारले असते. ऐनवेळेस राधीकाने त्याच्या तोंडावर बोट नसतं ठेवले तर रोहन काहीतरी बोलुन गेला असता. त्या विचारानेच त्याला कसंतरी होतं होतं "थोडक्यात वाचलो ह्या बायकांच्या मुर्खापायी मेलोच असतो", रोहन स्वतःशीच विचार करत होता.

थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर रोहन आणि शरयु जायला निघाले. जाताना रोहनने एकदा वळुन राधीकाकडे बघीतले. राधीका त्याच्याकडेच बघत होती. चेहऱ्यावर मिलीयन डॉलर्स स्माईल. हसतानाच तिचा उजवा डोळा नाजुकपणे बंद होऊन परत उघडला होता. रोहनने तो बरोब्बर टिपला.."यालाच मराठीत 'डोळा मारणं' असं म्हणतात", रोहनने मनाशी विचार केला.. "शरयु साठी हे सर्व एक नाटक असेल, पण राधीकासाठी हे नक्कीच नाटक नव्हते. नाहीतर जिंकण्यासाठी तिने माझ्याकडुन मगाशीच वदवुन घेतले असते की येस… आय लव्ह हर. पण तिने तसे केले नाही.. तिला तसे होऊ द्यायचे नव्हतेच. हे नक्कीच नाटक नव्हते.. आय नो.. राधीका लव्हज मी..शी इज माईन.. शी इज माय 'एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर

-- 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive