Wednesday, June 1, 2011

सचिनला शिव्या घालणा-यांसाठी...


सचिनला शिव्या घालणा-यांसाठी....(.मिलिंद कारेकर.....म.टा.1 Jun 2011)

 


- मिलिंद कारेकर


सचिन तेंडुलकरला देव मानणारे जसे कोट्यवधी चाहते आहेत, त्याचप्रमाणे त्याला शिव्या घालणारांचीही नवी जमात जन्माला आलीय... दरदिवशी टीकेचे बाऊन्सर त्याच्यावर उसळतायत. त्यापैकी एकाही टीकेला सचिनने उत्तर दिलेले नाही. परंतु मटा ऑनलाइनचे वाचक मिलिंद कारेकर यांनी मात्र सचिनसाठी बॅट हातात घेतलीय...
................


सचिन हा काही लोकांसाठी देव आहे देव! मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतो आणि स्वतःलाच त्रास करून घेतो. सचिनला शिव्या घालताना आपण नेहमी एक गोष्ट विसरतो की तो कधीच कायदा मोडत नाही. शाहरुख आणि अमिताभसारख्या नामवंत आणि श्रीमंत कलाकारांना आयकरात सवलत मिळते हे आपल्यापैकी किती जणांना या आधी ठाऊक होतं ? आपल्यापैकी किती जणं अशी आहेत की त्यांनी आतापर्यंत कधीच कर सवलतीसाठी खोट्या औषधाच्या किंवा घर भाड्याच्या पावत्या भरल्या नाहीत ? किराणा मालाच्या दुकानातून पावती पुस्तक आणून स्वतःच्या वडिलांच्या नावाने घरभाडे भरल्याची पावती बनवून HRA लाटणारे कमी आहेत ? हा खोटेपणा करून देशाचं नुकसान होत नाही ? मग आपण खोटेपणा करून देशाचं नुकसान केलं तर ते चालतं. पण सचिनने कायद्यात राहून जर स्वतःचा पैसा वाचवायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो काय ?

पैसा कमावणं जितकं कठीण असतं ना त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण असतं. नुसता आपल्या जवळ पैसा आहे म्हणून तो कसाही उडवून चालत नाही तर त्याची कदरही असावी लागते. तर श्रीमंती टिकून राहते. आणि घरात लक्ष्मी नांदते. आपल्या देशातले बहुतेक कुटुंब गरीब आहेत कारण त्यांना मिळालेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा हेच मुळात ठाऊक नाही. आज जर एका गरीब आणि श्रीमंत माणसाला प्रत्येकी दोन दोन हजार रुपये दिले तर श्रीमंत माणूस ते दोन हजार रुपये कुठे गुंतवले तर दोनाचे चार होतील ह्याचा विचार करेल. तर गरीब दोन हजारात कुठे टच स्क्रीन मोबाईल मिळतो का ते शोधत फिरेल. खोटं वाटतं तर तुमच्या आसपास बघा. ज्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे ना तीच लोकं थोडं वेळेच्या आधी घरून निघून बसने न जाता टॅक्सी आणि रिक्षाने फिरताना दिसतील.

सचिनने FSI वाढवून मागितला तर काय बिघडलं ? कायद्यात बसत नाही का ते ? त्याने अनधिकृत बांधकाम करायला जागा मागितली होती का ? स्वतःच्याच जागेत FSI वाढायला कायदेशीररित्या परवानगी मागितली तर त्यात आपल्या पोटात शूळ कशाला उठायला हवा ? बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं , पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही ?

' फेरारी ३६० मॉडेना ' ह्या गाडीवर कस्टमने सूट दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी खूप चिखलफेक केली. चिखलफेक करणार्‍या लोकांना कदाचित गाडीची खरी किंमत आणि तिच्यावर किती कर भरावा लागणार होता ह्याची कल्पना नसेल. खरं तर ज्या देशासाठी आपण खेळून बक्षीस मिळवलं त्याच देशात ते बक्षीस घेऊन जाण्यासाठी इतका कर भरणं व्यवहारिक दृष्टीने नुकसानीचं होतं. मग त्यात दुसरा पर्याय असा राहतो की ती गाडी त्याने परस्पर विकायला हवी होती. पण ह्याने देशाच्या प्रतिष्ठेला डाग नसता का लागला ?
सत्यसाईबाबांच्या बाबतीत देखील तेच म्हणेन. माझा स्वतःचा सत्यसाईबाबांवर विश्वास नाही. माझ्या फेस-बुकला पहाल तर मी स्वतः त्यांच्या बुवाबाजीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. पण माझा विश्वास नाही म्हणून सचिनचा देखील विश्वास नसावा अशी अपेक्षा मी करीत नाही.

कुणाची कुणावर श्रद्धा असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

एका खेळाडूला मानसिकदृष्ट्या खंबीर असावेच लागते. आणि ते मनोबल त्याला सत्यसाईबाबांच्या दर्शनाने , उपदेशाने किंवा सल्ल्याने मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे ? लहानपणी एका दिवाळी अंकात मी एक गोष्ट वाचली होती. ' सी. के. नायडूंची कॅप '. त्यातला नायक त्यांच्या कंपनीतल्या संघाचा मुख्य फलंदाज असतो. अचानक एकदा त्याचा बॅड-पॅच सुरु होतो. खेळाडू म्हणून नोकरीला लागला असल्यामुळे नोकरी जाते की काय अशी परिस्थिती निर्माण होते. अशावेळी त्याचे साहेब एक दिवस त्याला सी. के. नायडूंची त्यांच्या जवळ असलेली टोपी आणून देतात आणि पुढच्या सामन्यात ती टोपी घालून खेळायचा सल्ला देतात. ती टोपी घातल्यावर मानसिकदृष्ट्या त्याच्यामध्ये इतका फरक पडतो की , पुढच्याच सामन्यात तो शतक ठोकतो. अर्थात मी इथे खूप संक्षिप्तपणे गोष्ट सांगितली. खरी कथा मूळ लेखकाने खूप छान रंगवून लिहिली होती. कथेच्या शेवटी ते साहेब त्या नायकाला सांगतात की ती कॅप जी त्यांनी त्याला दिली होती ती त्यांच्याच मुलाची जुनी कॅप आहे. फक्त तुझे मनोबल वाढवण्यासाठी तुला मी ती सी. के. नायडूंच्या नावाने दिली होती. इथे कथा सांगायचं तात्पर्य हेच की सचिनच्या आयुष्यात जर नायकाच्या साहेबाचा रोल सत्यसाईबाबा करीत असतील तर आपल्याला अडचण कशाला यायला हवी ?

मुंबईत अमराठी लोकांना जेव्हा सचिनला शिव्या घालताना बघतो तेव्हा मी समजू शकतो. ते लोकं त्याला शिव्या घालत नसतात तर असा माणूस मराठी घरात का जन्माला घातलास ? म्हणून ते मनातून देवाला कोसत असतात. पण जेव्हा मराठी माणसालाच विचार न करता त्याला शिव्या घालताना पाहतो तेव्हा वाईट वाटतं.

आम्हाला भ्रष्ट मुख्यमंत्री चालतो. लालू , कलमाडी , ए. राजा आणि कनीमोळी सारखे घोटाळेबाज आम्ही सहन करतो. स्वतःच्या मनमानीने कारभार करणारे आणि नवनवीन कायदे अमलात आणणारे गृहराज्यमंत्री आम्हाला चालतात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाख लाख रुपयांच्या हंड्या बांधणारे नेते आम्हाला जास्त प्रिय. मग त्या चढाओढीत छोट्या मंडळातील कुणाचा अगदी जीव गेला तरी आम्हाला फिकीर नसते. ' पण सचिनने मात्र शॉवरखाली आंघोळ न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा. ' असा जरुरीचा सल्ला दिला तरी आम्ही तो मनावर घेत नाही.

सचिनने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी पाकिस्तानमध्ये जाऊन इम्रान आणि अक्रमच्या गोलंदाजीचा सामना केला, तो काही पुढे जाऊन त्याला इतका पैसा आणि प्रसिद्धी मिळणार आहे हे आधीच माहिती होते म्हणून नव्हे. वकार युनुसचा बॉल जेव्हा त्याच्या नाकावर बसला तो प्रसंग त्याच्यासमोर नॉन-स्ट्रायकर एंडला उभा असणार्‍या सिद्धूच्या तोंडून ऐकण्यासारखा आहे. सिद्धूचे बोलणे मी थोडक्यात लिहायचा प्रयत्न करतो. पुढील लिंकवर जाऊन व्हिडिओ पहाता येईल.

http://www.youtube.com/watch?v=gFWhSHWKom8

सिद्धू सांगतो , " पीच पूर्णपणे गवताने भरलेलं होतं , आणि इम्रान खानने आदेश दिला होता की , गवत कापलं तर मान कापून टाकीन. तो सामन्याचा पाचवा दिवस , तिथून बॉल जातोय. बॉल अंगाला शेकून छाती लाल झाली होती. माझं नुकतंच लग्न झालं होतं. मी देवाकडे प्रार्थना करत होतो. घरवालीला भेटू शकेन की नाही ? ह्यापेक्षा मला आऊटच कर. रवी शास्त्री दुसर्‍या बाजूला फलंदाजी करत होता. त्याला वकारचा एक असा बाउन्सर पडला , त्याने बॅट घातली आणि गलीमध्ये झेल उडाला. शास्त्री आऊट झाला! तो चरफडत निघून गेला आणि मी पाहिलं , मला तेंडुलकर येताना दिसला. मी मनात म्हणालो , " गुरु... आता काम झालं! हा तर बळीचा बकरा आहे. छोटू आहे , बच्चू आहे. हा तर आऊट होणार आणि मग आहेच कोण ? बस्स...!! कुंबळे शुम्बळे आहेत. सायकल स्टॅण्डप्रमाणे , एकाला धक्का दिला की गड गड गड गड गड ठपाक ..!

तेंडुलकर आत आला. पहिला बॉल , झुम्म...! आतून गेला. मी म्हणालो , " गेला बॉस गेला गेला!" आणि पुढचा चेंडू........... मी माझ्या आयुष्यात तो चेंडू कधीच विसरू शकणार नाही. वकारचा शॉर्ट बाऊन्सर , वेरी क्विक! तेंडुलकरने पूल करायचा प्रयत्न केला. बॅटची आतली कडा लागून बॉल सरळ तेंडुलकरच्या नाकावर बसला. तेंडुलकर खाली कोसळला. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या मनात विचार आला तो म्हणजे , ' मेला पोरगा! ' तो खाली कोसळल्याबरोबर मी त्याच्या दिशेने धावत गेलो. आणि मी पाहिलं , त्याचं नाक फुटलं होतं. तोंड पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं. सगळ्या शर्टवर रक्त! त्याचा श्वासोश्वास जोरजोरात चालू होता. मला भीती वाटली. वाचेल पोरगा की नाही वाचणार ? मी जोरात किंचाळलो , " बॉस स्ट्रेचर". मी समोर बघितलं तर मला अली इराणी येताना दिसला , आणि माझ्या अंगातली ताकदच निघून गेली. अलीचे उपचार म्हणजे तेंडुलकरच्या आजारपणापेक्षा वाईट होते. त्याच्याकडे एक सॅरीडॉनची गोळी असायची आणि दुसरी डोकं शेकायची बर्फाची पिशवी. आणि मला तो बर्फाची पिशवी घेऊन येताना दिसला. त्याने तेंडुलकरला शेकवायला सुरुवात केली. आणि सॅरीडॉनची गोळी त्याच्या तोंडात घातली. मी माझ्या जागेवर जाण्यासाठी मागे फिरलो. मनात विचार करत होतो. ६ आऊट झाले , हा वाचतोय की नाही काय माहिती ? मी माझ्या जाग्यावर पोहोचणार इतक्यात माझ्या कानावर नाजूक शब्द पडले. "मै खेलेगा!" मी गर्रकन मागे वळून पाहिलं. त्याच्या नाकातून कापूस पडत होता. रक्त सांडत होतं. आणि तो अलीला सांगत होता , " मै खेलेगा , मै खेलेगा.... अली मै खेलेगा!" अरे देवा! त्या परिस्थितीत मला लागलं असतं तर मी सामना संपल्यावर संध्याकाळी साडे-पाच नंतरच उठलो असतो. मी त्याच्याकडे पाहिलं आणि माझ्या अंतर्मनातून एक आवाज आला. "सरदारजी बघ त्याच्याकडे. तू अठ्ठावीस-तीस वर्षाचा आहेस , तो पंधरा वर्षाचा आहे. तू बघ तर त्याच्याकडे! ह्या वयात तो आपल्या देशासाठी लढायला तयार आहे आणि तू ? तू ह्या परिस्थितीमध्ये आपल्या बायकोचा विचार करतो आहेस ? मिळेल भेटायला की नाही ? ' जो भरा नही है भाव वो , बहती उस से रस धार नही! हृदय नही वो पत्थर है जिसमे स्वदेश का प्यार नही! '

त्या पुढचा वकारचा बॉल , यॉर्कर.... ताशी १५० किमी वेगाने सचिनच्या दिशेने! हा असला यॉर्कर मी मागच्या सामन्यात भोगलेला होता. एक तर आपले पाय वाचवायचे नाही तर विकेट फेकायची. मी आणि कपिल पाजी अशा चेंडूंवर आधीच्या सामन्यात आऊट झालो होतो. पण सचिनला वकारच्या ह्या चेंडूची जणू काही पूर्व कल्पनाच होती. तो आधीच दोन फुट मागे उभा राहिला होता. १५० किमीने त्याच्या जवळ जाणारा चेंडू सचिनने ताशी १८० किमी वेगाने माझ्या दिशेने टोलवला. मी माझे दोन्ही पाय फाकवले आणि माझ्या दोन पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडच्या होल्डिंगवर लागून परत आला. मैदानात पिन ड्रॉप सायलेन्स! वकार सचिनच्या दिशेने गेला आणि खुन्नसने सचिनकडे पहायला लागला. माझ्याकडे जर वकारने तसे पाहिले असते तर मी चंद्र तारे पहायला लागलो असतो. पण तुम्हाला सांगतो , सचिन पुढे झाला. त्याने वकारच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि तो काय म्हणाला ह्याचा अर्थ मला कळला नाही कारण तो मराठीमध्ये बोलत होता. पण ते त्याचे शब्द माझ्या अजून लक्षात आहेत. मला त्याचा अर्थ माहिती नाही. मी तो जाणून घ्यायचा कधी प्रयत्न पण नाही केला. पण तो वकारच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाला ,
" बटर , बटर तुझ्या आईचा घो.....!" वकार शांतपणे मागे गेला. त्या सामन्यात सचिन नाबाद ५७ आणि मी नाबाद ९७ राहून तो सामना अनिर्णीत राखला. "

सचिन खेळला की, आपण सामना हरतो , सचिनला भारतरत्न का द्यायचा ? असा विचार जे करतात त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की पाहावा. अरे ज्याला केलेल्या कामाचे पैसे पण देऊ नयेत, अशा सैफ अली खानला "पद्मश्री" देतात तेव्हा आमच्या तोंडून ' ब्र ' निघत नाही. ए. एस. दिलीपकुमार हे जन्मतः नाव असलेला माणूस महान संगीतकार ए. आर. रहेमान झाला आहे. त्याची वाच्छता कुठे होत नाही. पण सचिन तेंडुलकर हे नाव घेतलं की आपण लगेच बाह्या वर करून चर्चा करायला का लागतो ?

' तारे जमीं पर ' मध्ये आमीर खानने एका झाडाची गोष्ट सांगितली आहे. एक आदिवासी जमात आहे ती जंगलात जाऊन कधीच झाडं तोडत नाही. त्यांना ज्या झाडाला तोडायचं असतं ते दर दिवशी त्या झाडाजवळ जातात आणि त्या झाडाला शिव्या देत रहातात. एक दिवस आपोआपच ते झाड मरतं. सचिनमधला चांगुलपणा सुद्धा आपण असाच मारणार आहोत का ?

milindkarekar@yahoo.com
होता. भारताची २२ ला ४ अशी अवस्था होती. परिस्थिती वाईट होती. इथून बॉल जातोय त्यावेळी मला एक ओळ आठवली.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive