Thursday, October 6, 2011

Book - 'The Steve Jobs' Author J. Illiot


इंग्रजी भाषेत 'मी' या अर्थाने जो 'आय' लिहिला जातो तो कायमच कॅपिटल लिहितात. पण एका माणसाने हा 'आय' स्मॉल लिहिला आणि त्याचा अर्थच बदलला. पाहता पाहता हा
'आय' एक ग्लोबल ब्रॅण्ड बनला. आयफोन, आयपॅड, आयक्लाउड या त्याच्या 'आय'ने जगाची बाजारपेठ हलवून सोडली. त्या स्टीव्ह जॉब्सच्या 'आय'ची ही गोष्ट त्याच्याच सहकाऱ्याने 'द स्टीव्ह जॉब्स वे' या पुस्तकातून सांगितलीय.

पर्सनल कॉम्प्युटिंगमध्ये स्टीव्ह जॉब्स या माणसाचे कर्तृत्व जगातील कोणीही नाकारू शकत नाही. अगदी बिल गेट्सही नाही. कारण ज्या विंडोजच्या ताकदीवर आज बिल गेट्सच्या मायक्रोसॉफ्टचा डोलारा उभा आहे, त्याची मुळे स्टीव्हच्या मॅकिन्टॉशमध्ये आहेत, हे कितीही नाकारले तरी कोणालाच पटण्यासारखे नाही. त्यामुळे स्टीव्ह जॉब्स ज्याला समजून घ्यायचा आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.

जे इलियट या 'अॅपल कम्प्युटर'च्या उपाध्यक्षांनी हे पुस्तक लिहिलेय. त्यामुळे 'अॅपल'चा सवेर्सर्वा असलेल्या स्टीव्हला त्याने जेवढे जवळून पाहिलेय, तेवढे क्वचितच इतर कोणी पाहिले असेल. इलियट यांचे हे जवळ असणे कधीकधी खूप काही आतले सांगून जाते तर कधीकधी काहीतरी राहिलंय असा आभास निर्माण करते.

स्टीव्ह हा काही व्यावसायिक उद्योगपती नाही. तो एक वेडा माणूस आहे. कॉलेज सोडलेला... त्यातच कॅलिग्राफी शिकलेला... गॅरेजमध्ये मित्रासोबत अॅपलची स्थापना करणारा... त्याची पॅशन हेच त्याचे भांडवल आणि काहीही करायची तयारी ही त्याची गुंतवणूक. एवढ्याच ताकदीवर या माणसाने तंत्रज्ञानाच्या जगात साम्राज्य उभे केले. पण त्याचा मार्ग इतरांपेक्षा वेगळा होता. तो मार्ग या पुस्तकातून सापडत जातो.

एका परिच्छेदात स्टीव्हच्या कामाच्या पद्धतीचे वर्णन करताना इलियट सांगतात, की त्याने कधीही इतर काय करतात यावर आपला रस्ता आखला नाही. आपले प्रोडक्ट हे अद्ययावत असले पाहिजे, पण ते किचकट असता कामा नये. आपले प्रोडक्ट अधिकाधिक लोकांना सहजपणे वापरता आले पाहिजे. कोणत्याही प्रोडक्टपेक्षा ते वापरणारा युजर अधिक महत्त्वाचा. जर एका युजरला ते सोपे आणि उपयुक्त वाटले की त्याची प्रसिद्धी करायची गरजच नाही. ते आपोआप अन्य लोकांपर्यंत पोहचेल, हा स्टीव्हचा विश्वास होता.

याच पद्धतीने स्टीव्हने आपली सर्व प्रोडक्ट बाजारात आणली. मग ते मॅकेन्टॉश असो की आत्ताचे आयक्लाउड. पण या प्रवासात त्याने जे काही पाहिलेय ते फार कमी लोकांच्या वाट्याला आलेय. एकीकडे आपल्याच कंपनीतून हाकलले जाण्याची मानहानी तर दुसरीकडे जीवघेण्या आजारामुळे अक्षरश: मरणाच्या दारातून त्याचे परत येणे या दोन्ही गोष्टी स्टीव्हची विजिगीषू वृत्ती अधोरेखित करतात.

या प्रत्येक संकटाच्या वेळी स्टीव्हने ज्या पद्धतीने मार्ग काढला ती विचार करण्याची पद्धत प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. ज्या गोष्टीवर माझे प्रेम आहे ती गोष्ट करण्यासाठी वेडे होता आले पाहिजे, मग भले त्यामध्ये काहीही आड आले तरी ते पार करता येते हे स्टीव्हने नुसते सांगितले नाही, तर जगून दाखवले. 'नेक्स्ट' आणि 'पिक्सार' या कंपन्यांची स्थापना हीच तर गोष्ट सांगते. कर्करोगामुळे फार तर सहा महिने जगू शकेल असे डॉक्टरांनी सांगितल्यावर स्टीव्ह प्रत्येक दिवस शेवटचा म्हणून जगला. सुदैवाने ऑॅपरेशन यशस्वी झाले आणि तो बरा झाला हा फक्त चमत्कार नव्हता तर स्टीव्हमधील 'आय'चा विजय होता. एवढ्या जीवघेण्या संकटातून उभे राहिल्यानंतरही तो थांबला नाही. त्याने पुन्हा एकदा अॅपलला मोठे करण्याचा संकल्प घेतला आणि आज ते वास्तवात येतेय.

स्टीव्ह जॉब्सच्या या यशोगाथेतून आपल्याला काय घेता येईल हे देखिल इलियट 'ऑॅन हीज फूटस्टेप्स' या शेवटच्या भागातून सांगतात. त्यांनी न लिहिलेला पण पुस्तकभर जाणवत राहणारा मुद्दा म्हणजे, स्टीव्हच्या या मार्गावरून चालण्यासाठी आपल्यालाही आपला 'आय' स्मॉल करावा लागेल!

- नीलेश बने

द स्टीव्ह जॉब्स वे, लेखक- जे. इलियट, प्रकाशक- जयको पब्लिशिंग हाऊस, पाने- २५९ , किंमत- २५० रुपये.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive