Wednesday, December 21, 2011

वाघ्याच्या स‌माधीची गोष्ट


 


वाघ्याच्या स‌माधीची गोष्ट

छत्रपती शिवाजी महाराजांचा कृष्णा घोडी आणि वाघ्या कुत्र्यावर फार जीव
होता. ही दोन्ही जीवाला जीव देणारी इमानी जनावरं. त्यातही वाघ्याच्या
स्वामीनिष्ठेची कथा काय वर्णावी! महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर
दुःखाने वेड्यापिश्‍या झालेल्या वाघ्याने राजांच्या चितेवर झेप घेतली आणि
आपलं जीवन संपवलं. मराठ्यांच्या इतिहासात या मुक्‍या जनावराची
स्वामिनिष्ठा सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. आजही धन्यावरील इमानाचा,
श्रद्धेचा दाखला देताना वाघ्या कुत्र्याचं उदाहरण दिलं जातं. धन्य तो
वाघ्या!

पण ही वाघ्याची कथा खरोखरच खरी आहे? खरेच असा कुत्रा महाराजांकडे होता?
त्याने खरेच महाराजांच्या चितेवर झेप घेऊन प्राणार्पण केलं? आणि हे जर
खरं नसेल, तर मग रायगडावर दाखविली जाते ती समाधी कोणत्या कुत्र्याची आहे?
या सवालांचे जवाब मोठे विस्मयकारक आहेत. वाघ्या, त्याचं प्राणार्पण आणि
त्याचं स्मारक ही सगळीच एक मिथ आहे. महाराजांच्या अंतकाळच्या वर्णनात ही
गोष्ट नाही. या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. शिवकालीन, शिवपूर्व वा
शिवोत्तरकालीन कागदपत्रांत कधीही, कुठेही, कोणत्याही कुत्र्याने आपल्या
धन्याच्या मृतदेहाबरोबर स्वतःला जाळून घेतल्याचा उल्लेख नाही.

ही कथा आली कोठून? तर कविवर्य राम गणेश गडकरी यांच्या कविकल्पनेतून ही
अचाट कहाणी निर्माण झाली. तीही केव्हा, तर राजांच्या निर्वाणानंतर
दोन-अडीचशे वर्षांनी. गंमत म्हणजे कुत्र्याच्या समाधीवर जो मजकूर आहे,
त्यातच ही कथा गडकऱ्यांच्या "राजसंन्यास' या नाटकावरून घेतली असल्याचा
उल्लेख "संदर्भ' म्हणून केलेला आहे.

आता असं जर असेल, तर मग कुत्र्याचे स्मारक तिथं आलं कुठून? याचीही एक
(सत्य)कथा आहे. 1918 मध्ये इंग्रजांनी रायगड जिंकला. त्यावेळी त्यांच्या
तोफांच्या भडिमाराने गडावरील सर्व इमारती जमीनदोस्त झाल्या. गडाची वाताहत
झाली. त्याच वर्षी पेशवाई बुडाली आणि मराठी साम्राज्याचा हा मणिहार,
रायगड विस्मृतीच्या काळोखात बुडाला तो पुढील तब्बल 67 वर्षे. 1885 साली
इंग्रज गव्हर्नरने रायगडाला प्रथम भेट दिली. त्यावेळी राजांच्या समाधीची
दुरवस्था पाहून तो इंग्रज अधिकारी कळवळला. म्हणाला, ""अरे, तुमचा राजा
केवढा थोर होता. आणि त्याच्या समाधीची ही अवस्था?'' त्याने समाधीच्या
तेलवातीसाठी पाच रुपये काढून दिले. त्यानंतर दरवर्षीच पाच रुपये अनुदान
त्याकामी मंजूर करण्यात आलं.

ही गोष्ट लोकमान्य टिळकांच्या कानावर गेली. त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार
करण्याचं ठरवलं. त्यासंदर्भात 1896 मध्ये एक सर्वपक्षीय सभा घेतली. पण
पुढं ते काम थंडावलं. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा स्मारक
समितीने उचल खाल्ली. स्मारकासाठी निधी जमवायला काही मंडळी इंदूरला
होळकरांकडे गेली. पण शिवस्मारकाच्या कामासाठी पैसे देणं हे इंग्रज
स्वामींना आवडणार नाही या भयाने हे संस्थानिक स्मारक समितीच्या सभासदांची
भेट घेण्याचं टाळू लागले. भेट टाळायची, तर त्यासाठी कारण काय; तर "महाराज
सुतकात आहेत'. सुतक कसलं, तर महाराणीसाहेबांचे लाडके कुत्रे साहेब मेले
होते त्याचे! समितीच्या सभासदांना तोवर महाराजांची नेमकी काय अडचण आहे हे
बरोबर लक्षात आलं होतं. तेव्हा त्यांनी त्यावर एक अफलातून तोडगा सुचविला,
की महाराजांनी त्यांच्या लाडक्‍या कुत्र्याच्या स्मारकानिमित्त देणगी
द्यावी आणि त्या देणगीचा काही अंश खर्चून समितीने त्या कुत्र्याचा पुतळा
उभारावा.

त्यानुसार त्या पैशातील काही भाग खर्चून रायगडावर कुत्र्याचा पुतळा
उभारण्यात आला. महाराजांची समाधी म्हणून 1926पूर्वी जो अष्टकोनी चबुतरा
दाखविला जातो, ज्यावर नंतर मेघडंबरी बांधली, त्या चबुतऱ्याजवळ जो चौकोनी
चौथरा दुर्लक्षिलेल्या अवस्थेत पडलेला होता, त्याची पुनर्रचना करून
त्यावर हा होळकरांच्या कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला.

संदर्भ -
- "इतिहास - सत्य आणि आभास' - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 98
- "शिवरायांची समाधी आहे कोठे?' - रविवार सकाळ, 28 मे 1995



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive