Thursday, December 8, 2011

रुचिरा - क्रिसमस केक - Chrismas Cake Recipe

१) मार्बल केक -
साहित्य - मैदा १५0 ग्रॅम, बेकिंग पावडर १ टी.स्पू., पांढरे लोणी १५0 ग्रॅम, अंडी ३, पिठीसाखर १५0 गॅ्रम, अर्धा टी.स्पू. व्हॅनिला इसेन्स, कोको पावडर २ टे. स्पू., दूध २ टे.स्पू.
कृती - मैदा व बेकिंग पावडर २-३ वेळा चाळून घ्या. लोणी व साखर हलकी होईपर्यंंत फेसा. फेसल्यावर त्यात १-१ करून अंडी घाला. प्रत्येक अंडी घातल्यावर मिश्रणात एकजीव होईपर्यंंत फेसा. त्यात थोडाथोडा मैदा घालत मिसळा. व्हॅनिला इसेन्स मिक्स करून मिश्रणाचे दोन भाग करा. एका भागात कोको पावडर व दूध घालून एकत्र करा. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यावर मैदा भुरभुरा. भांड्याचा कडेला थोडे पांढरे मिश्रण, त्याचे शेजारी कोकोचे मिश्रण असं आलटून-पालटून दोन्ही मिश्रण संपेपर्यंंत घाला. चमच्याने हलक्या हाताने दोन्ही मिश्रण ऐकमेकांत मिसळा. दोन्ही वेगवेगळे दिसले पाहिजे. ज्यामुळे केकला मार्बल इफेक्ट येईल. ओव्हन १८0 डिग्रीवर गरम करण्यास ठेवावे. थोडे गरम झाल्यावर केकचे भांडे बेकिंगसाठी २५ ते ३0 मिनिटे ठेवावे. बेक झाल्यावर ओव्हनमधून काढून गार झाल्यावर भांड्यातून काढावे.

२) चॉकलेट केक -
साहित्य - मार्गारेन किंवा पांढरे लोणी १/२ वाटी, साखर १/२ वाटी, अंडी ३, सेल्फ रायझिंग मैदा १/२ वाटी, कोको पावडर १ टे. स्पू., १ टी. स्पू. व्हॅनिला इसेन्स, आयसिंगसाठी- फ्रेश क्रीम २00 ग्रॅम, आयसिंग शुगर १00 ग्रॅम, १ टे.स्पू. कोको पावडर, १ टी. स्पू. व्हॅनिला इसेन्स, जेम्सच्या गोळ्या, चोकोचिप्स.
कृती - साखर व लोणी हलकी होईपर्यंंत फेटावे. त्यात १-१ करून अंडी घाला. प्रत्येक अंडी घातल्यानंतर चांगलं फेसा. मैदा व कोको पावडर २-३ वेळा चाळून घ्या व थोडं-थोडं अंडीच्या मिश्रणात मिसळा. केकच्या भांड्याला तूप लावून त्यावर कोरडा मैदा भुरभुरून मग त्यात केकचे मिश्रण घालून २५ ते ३0 मिनिटे बेक करा. केक बेक झाल्यावर बाहेर काढून थंड होऊ द्या. थंड झालं की, मधून कापून दोन भाग तयार करा. आयसिंग करण्यासाठी - फ्रेश क्रीममध्ये आयसिंग शुगर, व्हॅनिला इसेन्स-कोको पावडर घालून थोडं फेसून घ्या. आयसिंग केकच्या एका भागात पसरवून त्यावर दुसरा भाग ठेवा. केकच्या सर्व बाजूला आयसिंग लावून जेम्सच्या गोळ्या व चॉकलेट चिप्सने सजवा. फ्रीजमध्ये ठेवा. पूर्ण गार झाल्यावर खाण्यास काढा.

३) कॅरेट केक -
साहित्य - १00 ग्रॅम मैदा, १/२ टी. स्पू. सोडा, १00 ग्रॅम किसलेली गाजरे, १/२ टी. स्पू. बेकिंग पावडर, १/२ टी. स्पू. मीठ, ५0 ग्रॅम रिफाइन्ड तेल, ७५ ग्रॅम पिठीसाखर, दोन अंडी, २ टे. स्पू. काळे मनुके, २ टे. स्पू. अक्रोडचे तुकडे, १ टी. स्पू. जायफळ, दालचिनी पूड.
कृती - मैदा-सोडा-बेकिंग पावडर- जायफळ- दालचिनी पूड- मीठ एकत्र करून २-३ वेळा चाळून घ्या. तेल-साखर-अंडी चांगली फेसून एकजीव करा. मैद्याचे मिश्रण व अंडीचे मिश्रण एकत्र करून चांगले मिक्स करा. गाजराचे किस-ड्रायफ्रूट्स मिक्स करून-केकच्या टीनला तुपाचा हात लावून त्यात ओतून - गरम ओव्हनमध्ये १८0 डिग्रीवर ३0 ते ३५ मिनिटे ठेवून बेक करून घ्या. ओव्हनमधून काढून गार झाल्यावर भांड्यातून काढून घ्या.

४) क्रिसमस केक -
साहित्य - २00 ग्रॅम मैदा, चार अंडी, २२५ ग्रॅम लोणी, १७५ ग्रॅम कॅस्टर शुगर किंवा ब्राऊन शुगर, १ टी.स्पू. बेकिंग पावडर, २ टी.स्पू. जायफळ-लवंग-दालचिनी पूड, २ टे. स्पू. ब्रॅण्डी किंवा रम, २ टे. स्पू. कँडीड पील, २ टे. स्पू. चेरी व टुटी-फ्रुटी, अर्धी वाटी काजू-बदामाचे काप, २ टे.स्पू. काळे मनुके.
कृती - लोणी व साखर खूप फेटावे. अंडी १-१ करून घालून मिक्स करावी. मैद्यात-बेकिंग पावडर-जायफळ पूड मिक्स करून २-३ वेळा चाळून घ्यावी. मैदा सोडून सर्व साहित्य अंडीच्या मिश्रणात मिक्स करावे. चांगले ढवळून थोडं-थोडं मैद्याचे मिश्रण टाकून हलक्या हाताने मिक्स करावे. केक टीनला तुपाचा हात लावून केकचे मिश्रण ओतून- ओव्हनमध्ये ठेवून १८0 डिग्रीवर ४0-४५ मिनिटे बेक करावे. थंड झाल्यावर भांड्यातून काढून घ्यावे.

५) मावा केक -
साहित्य - २00 ग्रॅम मैदा, १२५ ग्रॅम लोणी, १५0 ग्रॅम साखर, ५0 ग्रॅम काजूचा चुरा, १00 ग्रॅम मावा, तीन अंडी, १ टी.स्पू. बेकिंग पावडर, ४ टे.स्पू. दूध, १ टी. स्पू. व्हॅनिला इसेन्स.
कृती - मैदा-बेकिंग पाव एकत्र करून चाळून घ्यावे. लोणी-साखर एकत्र करून फेटावे. कुस्करलेला खवा (मावा) थोडा-थोडा घालून मिक्स करावा. अंडी वेगळी फोडून त्यात घालावी. इसेन्स-काजूचा चुरा घालून थोड-थोडे करून मैदा मिक्स करावा. दूध मिक्स करावे. केक टीनला ग्रीस करून मिश्रण ओतून १८0 डिग्रीवर ओव्हनमध्ये ३५ ते ४0 मिनिटे बेक करावे.

- राजश्री शिन्दोरे

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive