Saturday, January 7, 2012

महाराष्ट्रातील धार्मिक स्थाने - Hindu Temples of Maharashtra India

महाराष्ट्रातील धार्मिक स्थाने 
Hindu Temples of Maharashtra India
 
महाराष्ट्रातील धार्मिक स्थानांचा विचार करता मुख्यतः गणेश स्थानांचा क्रम सर्वांत प्रथम लावावा लागतो , कारण महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात श्री . गणेशाची प्रसिद्ध स्थाने आहेत . ह्या सर्व स्थानांचा नुसता उल्लेख करणे हे सुद्धा तसे अवघड काम आहे , पण त्यातील काही महत्वाच्या गणेश स्थानांचा येथे परिचय देत आहोत . गणेश स्थानांचा विचार करतांना सर्वात प्रथम अष्टविनायकांची आठ स्थाने नजरेसमोर येतात .

1 . मोरगावचा मयुरेश्वर : - पुणे जिल्ह्यातील भिमखडी तालुक्यात मोरगाव आहे . सिंधू राक्षसाला ठार मारणारा तो हा मयुरेश्वर होय . या मंदिराच्या चारही बाजूला 50 फूट उंचीचा कोट आहे . मयुरेश्वरच्या डोळ्यात व बेंबीत खरे हिरे बसविलेले आहेत . मस्तकावर नागाची फणी आहे . देवळाचे तोंड उत्तरेकडे आहे . त्याला 11 दगडी पायऱ्या आहेत . देवळात प्रवेश केल्यावर चौकातच दोन दिपमाळा आहेत . चौकातच गणपतीकडे तोंड केलेला उंदीर आहे . सभामंडपाला दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत . देवळाजवळ नगारखान्याची इमारत आहे . मोरगावला एस . टी . किंवा खाजगी बसने जाण्याची सोय आहे . रेल्वेने नाही .

2 . सिद्धटेकचा सिद्धीविनायक : - दौंड रेल्वे स्टेशनपासून जलालपूर एस . टी . फाटा आहे . त्या फाटयाजवळ सिद्धटेक नावाचे लहानसे गाव आहे . तेथे सिद्धीविनायकाचे मंदिर आहे . या मंदिराचा गाभारा 15 फूट उंच आहे . गणपतीचे मखर आणि महिरप पितळेचे आहे . सिंहासन दगडी आहे . आतील गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे , हे मंदिरही अहिल्याबाईंनीच बांधले आहे . बाहेरचा मोकळा सभामंडप बडोद्याच्या नारायण मैराळ यांनी बांधला आहे . चिंचवडचे मोरया गोसावी यांनी येथे प्रथम तपश्वर्या केली . भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे उत्सव होतात . कै . न . वि . उर्फ काका गाडगीळांचे आजोळ येथे आहे . म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी येथे येणाऱ्या प्रवाशासाठी धर्मशाळा बांधली आहे . भगवान विष्णूला सिद्धी देणारा असा हा सिद्धीविनायक होय .

3 . बल्लाळेश्वर किंवा पालीचा बल्लाळ विनायक : - रायगड जिल्हयात सुधागड तालुक्यात पाली हे गाव आहे . अगदी देवळाच्या जवळच सरसगड आहे . बाल बल्लाळाला प्रत्यक्ष दर्शन देणारा विनायक म्हणून बल्लाळेश्वर किंवा बल्लाळ विनायक होय . चिमाजी अप्पा पेशवे यांनी येथील मंदिराला एक मोठी घंटा दिली आहे व येथील मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला . सध्याच्या या मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आहे . उंदराची मूर्ती हातात मोदक घेऊन उभी आहे . सभामंडप चाळीस फूट लांब आहे . देवळासमोर दोन उत्तम प्रकारे बांधलेली तळी आहेत . पण या तळ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तळी पाण्याने भरलेली असूनसुद्धा त्यांचा फारसा उपसा होत नाही व वापरही होत नाही . विनायकाची मूर्ती तीन फूट उंच आहे . सिंहासन दगडी आहे . विनायकाच्या डोळ्यात व बेंबीत खरे हिरे आहेत . विनायकावर ऋद्धिसिद्धीच्या मूर्ती चौऱ्या ढाळीत आहेत . सभामंडपात दोन मोठाले हत्ती आहेत . माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . येथे एस . टी . नेच जाता येते .

4 . पालीचा वरद विनायक : - रायगड जिल्ह्यात खालापूर तालूक्यात झाडीत उंचावर बसलेले लहानसे महड गाव आहे . या गावी गणपतीमुळे गृत्समदचा गृत्समदचा गणनांत्वा हा गणपतीचा मंत्र सुचला . त्यात गृत्समद मुनीने येथे सर्व प्रथम गणपतीचे मंदिर बांधले होते . त्यानंतर स्थित्यंतरे होत होत प्राचीन काळापासून आजपर्यंत काळाच्या ओघात अस्तित्व टिकून असलेले हे मंदिर भोवतालच्या झाडीमुळे जरा वेगळे आणि निसर्गाला जवळ असलेले वाटते . मंदिराच्या मागील बाजूस एक मोठे तळे आहे . ते पाण्याने भरलेले असते . तेथे असंख्य कमळे फुललेली असतात . पण तळयाकडेसुद्धा मंदिर चालक किंवा गावकरी लक्ष देत नसल्याने हे उत्तम तळे तसे उपेक्षितच राहिले आहे . येथील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आहे . सिंहासन दगडी आहे . सभामंडप दोन असून आतील सभामंडप आठ फूट लांबी - रुंदीचा चौरस आहे आणि बाहेरचा सभामंडप चाळीस फूट लांब - रूंद आहे . या भागात पाऊस भरपूर पडत असल्याने या मंदिराची वास्तू लांबून एखाद्या कौलारू घऱासारखी दिसते . हल्लीची मूर्ती मंदिरामागील तळ्यात 1690 साली पौडकर नावाच्या गुरवाला सापडली . ती तेथे पेशव्यांचे सरदार बिवलकर यांनी मंदिराच्या स्वरूपात स्थापन केली आणि मंदिर संपूर्णपणे पुन्हा बांधले . 1892 सालापासून या देवळातील नंदादीप अखंडपणे तेवत आहे . येथे फक्त एस . टी नेच जाता येते . रेल्वेची सोय नाही .

5 . थेऊरचा चिंतामणी : - पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात थेऊर हे गाव आहे . तेथील गणपती चिंतामणी म्हणून ओळखला जातो . दुष्ट इंद्राला गौतम मुनींच्या शापामुळे जी हजार छिद्रे अंगावर निर्माण झाली होती त्या छिद्राचे हजार डोळ्यांत रुपांतर येथील गणपतीने इंद्रावर केलेल्या कृपेमुळे झाले होते . इतक्या प्राचीन काळापासून हे गणेशस्थान प्रसिद्ध आहे . देवळाचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे . पण गणेशाची मूर्ती पूर्वेकडे तोंड केलेली आहे . तेथील गणपती डाव्या सोंडेचा आहे . थोरले माधवराव पेशवे या गणपतीच्या दर्शनास वारंवार येत असत . त्यांनी आपल्या काळात या मंदिराचा सभामंडप बांधला आणि देवाचे सानिध्य लाभावे म्हणून देवळाजवळच राहण्यासाठी एक वाडाही त्यांनी बांधला होता . तेथे माधवराव आले म्हणजे मराठीशाहीचा दरबारच भरत असे . माधवराव अकालीच थेऊर मुक्कामीच वारले . त्यांची पत्नी रमाबाई येथेच सती गेली तिची समाधीही नदीकाठी आहे . मोरया गोसावी यांनी तेथेच गणपतीची तपश्यर्या केली . येथील गणपतीच्या व्यवस्थेसाठी या गावचा महसूल थोरले माधवराव पेशवे यांनी देवस्थानला इनाम म्हणून दिला होता .

6 . लेण्याद्रीचा गिरिजात्मक : - पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री नावाच्या डोंगरावर हे गणेश स्थान आहे . प्रत्यक्ष पार्वतीला प्रसन्न झालेला हा येथील गणपती होय . या देवळाचे दार दक्षिणेला आहे . हे देऊळ डोंगरात असल्याने , यास कोणी लेणीही म्हणतात . देवळाच्या बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत . सभामंडप ओलांडून आपण जरा बाहेर गेलो की आठ कोरीव खांब आहेत . थोडेस चालून पायऱ्या उतरून गेल्यावर दगडात कोरलेली भीमाची गदा दिसते . गदेवर वाघ , सिंह वगैरे प्राण्यांची तोंडे कोरलेली आहे . जवळच पाण्याच्या दोन टाक्या आहेत . येथील मखर लाकडी असून ते अगदी अलीकडील काळातील आहे , माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . येथूनच जवळच शिवनेरी किल्ला आहे . शिवाजी महाराज आपल्या बालपणी आपल्या सवंगडयासह वारंवार या भागात येत असत .

7 . ओझरचा विघ्नहर : - पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ओझर नावाचे गाव आहे . येथील गणपतीला विघ्नहर असे म्हणतात . हे मंदिर अती प्राचीन आहे . काळाच्या ओघात स्थित्यंतरे होत होत आज असलेल्या अवस्थेत दिसते . येथील गणपतीची स्थापना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्राचीन देवांनी केली असे म्हणतात . हे मंदिर गावात असून देवळाचे तोंड पूर्वेकडे आहे . येथील गणपती डाव्या सोंडेचा आहे . गणपतीच्या डोळ्यात दोन तेजस्वी रत्ने आहेत आणि कपाळावर हिरा बसविलेला आहे . त्यामुळे गणपतीचे तेज अधिकच झळकते . गणपतीच्या दोन्ही बाजूला पितळीच्या ऋद्धिसिद्धीच्या मूर्ती आहेत . सभामंडप आठ बाय दहा फूट मापाचा आहे . दरवाजापाशी असलेला काळा उंदीर जणू पळतो आहे असे वाटते . देवळात दोन दिपमाळा आहेत . त्रिपुरी पौर्णिमेपासून काही दिवस त्या पाजळत असतात . वसई जिंकून परत येत असताना चिमाजी अप्पांनी या गणेशाचे दर्शन घेतले आणि येथील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता .

8 . रांजणगावचा श्री . गणपती : - पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव हे एक लहानसे गाव पुणे नगर रोडवर लागते . रस्त्यापासून जवळच गणेशाचे मंदिर आहे . मंदिराचे दगडी पोत आणि आसपासच्या ओवऱ्या यांची बरीच पडझड झालेली आहे . हल्लीच्या देवस्थान कमिटीने या गोष्टीकडे लक्ष घालून जीर्णेद्धार करावयाचे काम हाती घेतले आहे . प्राचीन काळी त्रिपुरासूराला ठार मारण्याची शंकराला प्रेरणा देणारा हा श्री गणपती होय . या मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे . देवळाचा मुख्य गाभारा आणि मंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे . मराठे शाहीतील अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली होती . या मंदिरातील दोनही गाभारे थोरले माधवराव पेशवे यांनी बांधल्याची नोंद आहे . हा गणपती उजव्या सोंडेचा आहे . असे सांगितले जाते . की , अगदी प्राचीन काळी मूर्ती खाली तळघरात आहे . तिला दहा तोंडे आणि वीस हात आहेत . छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराला व्यवस्थेसाठी पहिली सनद दिली आणि थोरले माधवराव पेशवे यांनी हा गाव व्यवस्थेसाठी इनाम दिला . येथे फक्त एस . टी . नेच जाता येते . रेल्वेने नाही . या शिवाय इतरही गणेशस्थाने महाराष्ट्रात आहेत . प्राचीन कालापासून या स्थानांचे महात्म्य सांगितले आहे .

9 . चिंचवडचा श्री . मंगलमूर्ती : - पुणे शहरापासून 11 मैंलावर असलेल्या चिंचवड या गावी हे गणेश स्थान आहे . येथील उत्तम व्यवस्थेमुळे मंदिराचा सर्व परिसर काळाच्या ओघातही उत्तम प्रकारे सांभाळलेला दिसत आहे . मंदिर 30 बाय 20 फूट आकाराचे असून ते 40 फूट उंच आहे . ते दगडी आणि साध्या बांधणीचे आहे . सभामंडपाच्या मागे गणेशभक्त श्री . मोरया गोसावींची समाधी घेतली आहे . मोरया गोसावी यांनी 1655 मध्ये जिवंत समाधी घेतली होती . त्या समधीवरच 1659 मध्ये चिंतामणी गोसावींनी जे मंदिर बांधले तेच आजचे मंदिर होय . हे देवस्थान इतके श्रीमंत होते की , त्या काळी चिंचवडचा रुपया असे स्वतःचे नाणेही पाडले जाई आणि ते व्यवहारात चालतही असे . भाद्रपद माघ महिन्यात येथे उत्सव असतो . येथे जायला रेल्वे मार्ग असला तरी पुण्यापासून बसने जाणे अधिक सोयीचे आहे .

10 . शिव गणेश : - भोर तालुक्यात आंबवडे गाव आहे . तेथून धूर गंगेवरील झुलता पूल ओलांडून जरा पुढे गेले की , एक पडके देऊळ दिसते . ते शिवगणेशाचे मंदिर या गणेशाची स्थापना शिवाजी महाराजांनी केली म्हणून याला शिवगणेश असे म्हणतात . हे स्थान उपेक्षित राहिले आहे .

11 . पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणेश : - हे मंदिर 1636 साली माता जिजाबाई यांनी बांधले . ह्या मूर्तीच्या डोळ्यांत दोन हिरे बसविलेले आहेत आणि बेंबीत माणिक बसवलेले आहे . हे मंदिर मोठे प्रशस्त , सभामंडप व भोवती धर्मशाळाही आहे .

12 . सारसबागेतील सिद्धिविनायक : - पुणे शहरातील हे गणेश स्थान माधवराव पेशव्यांनी 1784 साली स्थापन केले . हैदरअलीवर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात माधवरावांनी थेऊरच्या गणेशाची प्रतिकृती स्थापन केली होती . ह्या मंदिराचा परिसर पुणे महानगरपालिकेने अलिकडे बाग बगीचा निर्माण सुशोभित केला आहे . मंदिराची सर्व व्यवस्था मात्र देवदेवेश्वर संस्थान पाहते .

13 . त्रिशुंड गणेश : - पुण्याच्या सोमवार पेठेत हे गणेश स्थान आहे . काळ्या दगडाचे मंदिर 1784 साली बांधण्यात आलेले आहे . गणेशाची मूर्ती मोरावर बसलेली असून त्याला सहा हात , तीन मुखे आणि तीन सोंडे आहेत . हे मंदिर दत्तगुरू गोस्वामी यांनी बांधले होते . त्यांची समाधी तळघरात आहे .

14 . नांदगावचा सिद्धिविनायक : - गेल्या सहाशे वर्षापासून हे गणेशस्थान या भागात प्रसिद्ध आङे . येथे फक्त एस . टी . नेच जाता येते . नानगाव हे रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिऱ्यापासून पाच मैलावर आहे . या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला आहे . येथील मूर्ती इतकी उंचावर बसवली आहे की तिचे कोणत्याही बाजूने दर्शन घेता येते .

15 . श्री . राम सिद्धीविनायक : - रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात कनकेश्वर गावाचे गाव आहे . या गावी हे देवस्थान आहे . साधारण दोन अडीचशे वर्षापूर्वी बापटांनी हे मंदिर स्थापन केले . ते परशुरामाचे भक्त होत . या मंदिराशेजारी लंबोदर स्वामींची समाधी आहे . या मंदिरात स्थापन केलेली मूर्ती बडोद्याचे श्रीमंत मैराळ यांचेकडील होय . कनकेश्वराला मुंबईहून रेवसपर्यंत सागरमार्गे जाता येते , रेवस ते कनकेश्वर अशी एस . टी . आहे . अलिबाग धरमतर एस . टी . नेही कनकेश्वरला जाता येते . कनकेश्वर हे गाव डोंगरावर झाडीत वसलेले आहे . मंदिराकडे गावापासून साडेसातशे पायऱ्या चढत जावे लागते . त्या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे . शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे . देवळाजवळ तलाव आहे . तलावापासून जवळच देवालयाचा धार लागतो . येथील उंदीर सुद्धा एक लहान स्वतंत्र मंदिरात आहे . या गणेशाचा चोहो बाजूला ऋद्धिसिद्धी यांच्या पांढऱ्या संगमरवरी पाषाणाच्या मूर्ती आहेत . येथील नंदादीप सतत तेवत असतो . वैशाख आणि जेष्ट महिन्यात येथे उत्सव असतात . येथे धर्मशाळा बांधलेल्या आहेत . त्या ठिकाणी राहण्याची व उतरण्याची सोय ट्रस्टने केलेली आहे . तेथे भांडीही भाडयाने मिळतात .

16 . उरण येथील विनायक : - रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उरण हे गाव आहे . या गावी मुंबईहून लाँचने मोरा बंदरापर्यंत जाऊन तेथून टांग्याने जाता येते . पनवेलहून एस . टी . बसनेही जाता येते . हे मंदिर सात आठशे वर्षापूर्वीचे आहे . थोरले माधवराव पेशवे याठिकाणी येऊन गेले असे म्हणतात . या गणपतीच्या नावावरूनच येथील गावाला विनायक हे गाव पडले आहे . मंदिराजवळ एक तळे आहे . मंदिर चिरेबंदी आहे . ते पांढऱ्या रंगाचे आहे . मंदिराचे काम आकाशी रंगाचे आहे . येथील सभामंडप दुमजली आणि चौरस आहे . गाभाऱ्यातील भिंतीवर कमळ आणि स्वस्तिक कोरलेले आहे . गाभारा मात्र चौकोनी आहे . विनायकाची मूर्ती चार फूट उंचीची आणि साधारण साडेतीन फूट रुंदीची आहे . हा विनायक डाव्या सोडेंचा आहे . विनायकाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना ऋद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत . माघ महिन्यात येथे मोठया प्रमाणात उत्सव होत असतो . बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी मंदिरातच राहण्याची सोय आहे .

17 . दिंगबर सिद्धीविनायक : - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कडाव या गावी हे स्थान आहे . कर्जत रेल्वे स्टेशनपासून सहा मैलावर हे ठिकाण आहे . कर्जतपासून येथे जायला एस . टी . बसची सोय आहे . हे मंदिर फार प्राचीन असून नाना फडणीसांनी या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केला असे सांगतात . येथील गणपतीची मूर्ती मोठया आकाराची आणि दगडाची आहे . ती एकदंत , शिल्पकर्ण आणि दिंगबर अशी आहे . माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . या मंदिराला पेशव्यांकडून तीन एकर जमीन इनाम म्हणून मिळालेली आहे .

18 . महा गणपती : - ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यात टिटवाळा नावाचे गाव आहे . त्या ठिकाणी हे स्थान आहे . माधवराव पेशव्यांनी तलावाच्या काठी त्या तलावातच सापडलेल्या गणपतीचे मंदिर बांधले . यालाच महा गणपती किंवा वड विनायक असे म्हणतात . या ठिकाणी जाण्याचा मार्ग रेल्वेचा आणि एस . टी . या असा दोन्ही आहे . टिटवाळा हे रेल्वे स्टेशन आहे . हे मंदिर लांबून एखाद्या कौलारू घरासारखे दिसते . देवळाच्या मागील बाजूला तलाव आहे . गाभाऱ्याजवळचा सभामंडप प्रशस्त आहे , मंदिराचा प्रवेश दरवाजा चांगला रुंद आहे . मंदिरात विजेची सोय आहे . सभामंडपात 300 ते 400 माणसे सहज बसू शकतात . मंदिराला 3 कमानीचे प्रवेशद्वार आहे . गणेशाची मूर्ती 3 ते 4 फूट उंचीची आहे आणि तेवढीच ती रुंद आहे . मूर्ती चतुर्भुज आहे . डोळ्यांची जागी दोन लाल माणके आहेत . बेंबीच्या ठिकाणीही एक लाल माणिक बसवलेले आहे . हा गणपती डाव्या सोंडेचा आहे . मूर्ती आसनस्थ आहे . माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . येथील पुजाऱ्याकडे राहण्याची व्यवस्था होऊ शकते .

19 . कमल चक्राधिष्टित गणेश : - ठाणे जिल्ह्यातील मोरबाड या गावी असलेले हे स्थान साधारण 100 वर्षापूर्वीचे जुने आहे . हा गणपती शुभ्र संगमरवरी दगडाचा असून तो कमलचक्रावर अधिष्टित झालेला आहे . माघ महिन्यात येथे उत्सव होतो .

20 . मुंबईतील प्रभादेवीचा सिद्धीविनायक : - मुंबईतील दादर भागातील सावरकर मार्गावर प्रभादेवी भागात हे गणेशस्थान आहे . साधारण दोनशे वर्षापूर्वीचे हे स्थान आहे . मूळ मंदिर फार लहान होते . मुंबईकरांच्या गणेशभक्तीमुळे या मंदिराचा परिसर आता खूपच वाढला आहे . मंदिराचा आतील गाभारा फक्त 15 बाय 15 फूटाचा आहे आणि बाहेरचा सभामंडप 12 बाय 30 फूटांचा होता . श्री . फाटक या गणेशभक्तामुळे गेल्या सुमारे 15 वर्षामध्ये या मंदिराचा कायापालट होत गेला . देवळाला लागूनच पुजाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आता करण्यात आली आहे . देवळाच्या डाव्या बाजूला पुष्कळ मोठी जागा आहे . देवळासमोर तीन दगडी दीपमाळा आहेत . गणेशाची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे पण आता मूळच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीला रंग दिल्यामुळे ती वेगळीच दिसते . साधरणपणे तीन फूट उंचीची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे . मूर्तीला चार हात आहेत . मूर्तीच्या दोन्ही बाजूंना ऋद्धि सिद्धी आहेत . मार्गशीर्ष , चैत्र , भाद्रपद महिन्यात येथे मोठे उत्सव होतात . तथापि दर महिन्यात संकष्टी चतुर्थीला दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या गर्दीमुळे या परिसरास जत्रेचेच स्वरूप येते .

21 . मुंबईतील गणेशवाडीतील श्री . गणेश : - साधारणपणे तीन चारशे वर्षापूर्वी हे मंदिर बांधण्यात आले . सुंदर बाबाजींनी बांधलेले हे मंदिर आहे . गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे . गणेश मूर्ती तीन फूट उंच आहे . गणेशाच्या मूर्तीच्या एका बाजूला दोन शिवलिंगे आहेत . प्रदक्षिणेची वाट वीस फूट परिघाची आहे . सभामंडप संपूर्ण संगमरवरी आहे . येथील एका दीपमाळेवर इ . स . 1700 असे कोरलेले आहे . त्यावरून ही दिपमाळा हरबाजी भिकाजी यांनी बांधल्याची समजते . येथील नंदादीप सतत तेवत असतो . भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे उत्सव होतात .

22 . गणपतीपुळे येथील गजानन : - रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी असलेले गणपतीपुळे हे गणपतीचे प्रसिद्ध स्थान आहे . मुंबईहून बोटीने किंवा एस . टी . ने गणपतीपुळ्याला जाता येते . बंदरात उतरून एस . टी ने गणपतीपुळ्याला जाता येते . पुण्याहून , कोल्हापूरहून रत्नागिरीला येऊन तेथून गणपतीपुळ्याला जाता येते . छत्रपती शिवाजी महाराज या गजाननाचे दर्शन घेऊन गेले आहेत . माधवराव पेशवे यांनी येथे धर्मशाळा बांधली आहे . हरभट पटवर्धन यांनाही पेशवेकाळात या गणेशाच्या कृपेने उत्कर्ष प्राप्त झाला होता . सांगलीच्या राजांनी येथील सभामंडप बांधला आहे . छत्रपती राजाराम महाराज व बडोद्याच्या गायकवाड सरकारने या देवालयाला मोठया देणग्या दिल्या आहेत . हे मंदिर समुद्रकिनारी असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आहे . घुमटावरच कळस सोन्याच्या मुलाम्याचा आहे . सभामंडप सात नंदादीप तेवत असतात . येथील मूर्ती संपूर्ण दिसत नाही . फक्त पुढे आलेली दोन गंडस्थळे खालील नाभी व पुढे आलेले दोन दात दिसतात . भाद्रपद व माघ महिन्यात प्रत्येकी पाच दिवस येथे उत्सव होत असतो . चैत्र महिन्यात पाडव्यापासून संध्याकाळी देवालयात वसंत पूजा सुरू असतो . त्याचप्रमाणे आश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत येथे रोज दीपोत्सव होत असतो . येथील पुजाऱ्यांकडे राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

23 . गलबतवाल्यांचा गणपती : - हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यात अगरगुळे येथे आहे . हे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वी बांधले गेले आहे . रत्नागिरीपासून दहा मैलावर रणपाल बंदराजवळ हे स्थान आहे . येथे एस . टी ने व बोटीनेही जाता येते . मंदिराचा चौथरा डोंगरकडेला धरून 40 फूट उंच आहे . मंदिरात जायला दारे आहेत . त्यांना झडपा नाहीत . पुढील बाजूच्या उघडया दालनाला दोन दरवाजे आहेत . दोन्ही दालनांना जोडणारी एक 11 फूट उंचीची प्रचंड शीळा आहे . ही शीळा म्हणजेच गणपती आहे असे समजून त्याची पूजा करतात . देवळानजीक 70 फूट खोदलेली एक विहीर आहे . भाद्रपद महिन्यात एक उत्सव होतो .

24 . खोदवी येथील लक्ष्मी गणेश : - हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात खोदवी या गावी आहे . हे मंदिर पेशवेकालीन आहे . येथे जाण्यास मुंबई दाभोळ बोटीने दाभोळला उतरून तरीने खाडी ओलांडून वेलदूर येथे जावे लागते आणि वेलदूर खोदवी असा एस . टी . प्रवास करावा किंवा मुंबई ते खोदवी असे एस . टी . ने ही जाता येते . हे मंदिर एका टेकडीवरील उपवनात आहे . सात फूट लांब आणि चाळीस फूट रुंद आणि पन्नास फूट उंच असे हे मंदिर आहे . गाभाऱ्यासमोरचा सभामंडप तीस फूट लांबी रुंदीचा आहे . मंदिरासभोवती दगडाचा भक्कम तट आहे , आवारातच दगडी दीपमाळ आहे . सुमारे तीस वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला . देवळाच्या आजूबाजूला उंच उंच डोंगर आहेत . सिंहासनावर बसलेली लक्ष्मी गणेशाची साडेतीन फूट उंचीचा दहा हात असलेली मूर्ती आहे . मूर्ती संगमरवरी असून डाव्या सोंडेची आहे . सोंडेत अमृतकलश घेतलेला आहे . मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे . भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे यात्रा आणि दीपोत्सव होतो . देवळाच्या जवळच धर्मशाळा बांधलेली आहे . या धर्मशाळेत कुटुंबाला स्वयंपाक करण्याला योग्य असे सर्व साहित्य मिळते .

25 उफराटा गणपती : - रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात गुहागर येथे हे स्थान आहे गुहागरला एस . टी . ने जाता येते . सुमारे तीनशे वर्षापूर्वीचे हे गणपती स्थान आहे . या संबंधी अशी एक कथा सांगितली जाते की , एकदा समुद्राचे पाणी वाढून सर्व गुहागर गाव बुडायची वेळ आली असता , गावकऱ्यांनी गणेशाची प्रार्थना केली . त्या वेळी चमत्कार असा झाला की , गणेशाने आपले पूर्वेकडे असलेली तोंड पश्चिमेकडे केले आणि समुद्राचे पाणी हटविले . तोंड उफराटे केले म्हणून याला उफराटा गणपती असे म्हणतात . मूर्ती पांढऱ्या सुभ्र वर्णआची चतुर्भुज आहे . ती डाव्या सोंडेची असून ती अडीच फूट उंच आहे .

26 . परशुराम गणेश : रत्नागिरी जिल्हाय्ताली चिपळूण तालुक्यात चिपळूणपासून सुमारे 12 कि . मी . अंतरावर परशुरामक्षेत्री हे गणेश मंदिर आहे . येथे बसने किंवा टॅक्सीने जाता येते . 1785 साली ही मूर्ती स्थापन केली गेली आहे . तत्पूर्वीची मूर्ती मोगलांच्या हल्यात भ्रष्ट झाल्याने ती वशिष्ठी नदीत विसर्जीत केल्यावर सध्याची ही नवीन मूर्ती बसविली आहे . परशुराम मंदिराच्या गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला हे स्थान आहे . मूर्तीच्या समोर लहान सभामंडप आहे . मूर्ती उकिडव्या मांडीच्या उजव्या सोंडेची आहे . ती शुभ्र पाषाणाची आहे . ती सिहांसनावर बसलेली असून तिची उंची तीन फूट आहे . भाद्रपद महिन्यात चार दिवस उत्सव चालतो आणि माघ महिन्यातही स्थापना उत्सव होतो .

27 . गणेशवाडीचा गणपती : - कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालूक्यातील कागवाडपासून जवळच गणेशवाडी येथे हे स्थान आहे . हे मंदिर हरभट बाबा पटवर्धन यांनी बांधले हे स्थान 56 विनायक स्थानांपैकी आहे . येथे एस . टी . ने जाता येते . हे मंदिर कृष्णा नदीच्या तीरावर आहे . गाभाऱ्यापुढे 3 दालनांचा सभामंडप , दगडी अष्टभुज खांबाचा आहे . मंदिर हेमाडपंती असून पूर्वेकडील दारावर नगारखाना आहे . गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची असून उकडवी बसलेली पूर्वेकडे तोंड केलेली आहे . येथे पाच नंदादीप आहेत . भाद्रपद महिन्यात येथे पाच दिवस उत्सव होतो . हे देवस्थान सध्या पब्लिक ट्रस्टकडे सोपविलेले आहे .

28 . जोशीराव गणपती : - हे गणेशस्थान कोल्हापूर शहरातच आहे . 1882 साली बांधलेले हे गणेश मंदिर आहे . यातील मूर्ती फार प्राचीन आहे . यालाच बिनखांबी गणेश मंदिर असे म्हणतात . कारण हे मंदिर खांबाशिवाय उभारलेले आहे . भाद्रपद महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . छत्रपती राजाराम महाराज यांनी हे मंदिर जोशी कुटुंबाला इनाम म्हणून दिले . ताराबाईच्या कारकिर्दीत कोल्हापूरचे छत्रपती जोशीराव म्हणून हे जोशी कुटुंब राहत असे .

29 . शिलाहारांचा गणपती : - कोल्हापूर जिल्ह्यातील बीड कसबा येथे हे गणेश स्थान आहे . हे गणेश स्थान सुमारे नऊशे वर्षापूर्वीचे असावे . शिलाहार राजांच्या काळातील हे गणेश मंदिर आहे . शिलाहार राजा झाला . त्याने गणेशाच्या नावाने सोन्याचे नाणे पाडले होते . त्या नाण्याच्या एका बाजूवर गणेशाची आकृती व दुसऱ्या बाजूवर त्रिशूळ होते . हे स्थान कोल्हापूरच्या नैऋत्येस दहा मैलावर भोगावती व तुलसी या नद्यांच्या संगमावर आहे . कोल्हापूरपासून तेथे एस . टी . ने जाता येते . ही गणेशाची मूर्ती चार फूट रुंद व सहा फूट उंच आहे . तिला चार भुजा असून ती डाव्या सोंडेची आहे . मंदिराजवळ तलाव आहे . तलावात शेषशायी विष्णूची मूर्ती आहे .

30 . गणपती पचायतन : - सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे हे स्थान आहे . येथे रेल्वेने किंवा एस . टी . ने जाता येते . परशुरामभाऊ पटवर्धन या तासगावच्या संस्थापकाने हे मंदिर 1785 साली स्थापन केले आहे . या गणपती पंचायतनात मध्यभागी सिद्धीविनायकाची मूर्ती आहे . तिच्या उजव्या बाजूला उभा रामेश्वर व डाव्या बाजूस श्री . विष्णू यांची मंदिरे आहेत . प्रदक्षिणेच्या वाटेवर सूर्यनारायणाचे व उमा देवीचे मंदिर आहे . मंदिराची रचना अशी आहे की , ही पाचही मंदिरे एकत्र असून सर्व देवतांची मुखे पूर्वेकडे आहेत . घडीव काळ्या पाषाणांचे नक्षीकाम केलेले हे मंदिर आहे . मंदिरात प्रवेश करताना कमानीची वेस लागते . ही वेस इतकी प्रचंड आहे की त्यातून हत्तीसुद्धा जाऊ शकतो . या वेशीवर नगारखाना आहे . वेशीतून आत गेल्यावर मोठा चौक लागतो आणि नंतर सात मजली गोपुराची मंदिराची आतील इमारत आहे . आतील आवार प्रशस्त आहे . सभामंडपही मोठा आहे . त्याची तीन दालने आहेत . या मंडपात सुंदर नक्षीकाम केलेले आहे . मंडपातून पायऱ्या चढून गेल्यावर गणेशाचे दर्शन होते . मंदिराच्या आवाराभोवती दहा फूट उंचीचा व चार फूट लांबीचा तट आहे , देवालय व तट यामधील जागेत बाग आहे . गणेशाची मूर्ती सोनेरी सिंहासनावर बसलेली उजव्या सोंडेची आणि शुभ्र गारेची आहे . ती दीड फूट उंच असावी . तिच्या दोन्ही बाजूला दोन उंदीर आहेत . ती चतुर्भुज आहे . प्रत्येक चतुर्थीला गणेशाची पालखी निघते फाल्गुन शुद्ध द्वितीयेला येथे उत्सव असतो . भाद्रपद महिन्यातही उत्सव असतो . भाविकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकते . हे देवस्थान ट्रस्ट कायद्याखाली नोंदवलेले आहे .

31 . सांगलीचा गणपती : - 1843 साली या गणेशाची स्थापना पटवर्धनांनी केली . गणेशाच्या मंदिरात शंकर , सूर्यनारायण , चिंतामणेश्वरी व श्री . लक्ष्मी नारायण अशा देवतांची मंदिरे आहेत . हे मंदिर अत्यंत भव्य आणि काळ्या दगडांनी बांधलेले आहे . देवळाचा गाभारा , पुढे पाच खणी ओटा , मोठा सभामंडप आणि नगारखाना ह महत्वाचे भाग आहेत . या मंदिराची लांबी 90 फूट आणि रुंदी 60 फूट आहे . हे कृष्णा नदीच्या काठावर आहे . गणपतीची पूजा मूर्ती सिंहासनावर बसलेली तांब्याची आणि लहान आहे . उत्सव मूर्ती खूप मोठी आणि सुंदर आहे . गाभाऱ्यात मध्यभागी आहे . ती चार भुजेची आणि डाव्या सोंडेची आहे . मूर्तीच्या दोन्ही बाजूला ऋद्धिसिद्धी आहेत . भाद्रपद उत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो . श्रावण ते माघ महिन्यात येथे उत्सव होत असतात .

32 . ढोल्या गणपती : - हे गणेशस्थान सातारा जिल्ह्यात वाई येथे आहे . वाईला एस . टी ने जाता येते . हे मंदिर 1762 साली सरदार रास्ते यांनी कृष्णा नदीच्या काठावर बांधले आहे . हे मंदिर उत्तम घडीव दगडाचे आहे . गाभाऱ्यापुढे सभामंडप भव्य आहे . गणपतीची मूर्ती अखंड पाषाणाची आणि रेखीव आहे . ती दहा फूट उंच आणि आठ फूट रुंद आहे . मूर्तीच्या ह्या आकारामुळेच लोक तिला ढोल्या गणपती म्हणतात . हा डाव्या सोंडेचा गणपती आहे . वैशाख महिन्यात व भाद्रपद महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . हे मंदिर देवस्थान ट्रस्ट म्हणून नोंदलेले आहे .

33 . अंगापूरचा कालीन गणपती : - सातारा जिल्ह्यातील अंगापूर ह्या गावच्या देशमुखांनी हे मंदिर छत्रपती शाहूंच्या काळात बांधले आहे . येथे एस . टी . ने जाता येते . हे मंदिर शिल्पकलेचा एक उत्तम नमुना होय . याच्या बांधकामात कोठेही लाकडाचा वापर केलेला नाही . ह्या मंदिराचा सभामंडप दोनशे फूट लांब व दिडशे फूट रुंद आहे . त्याला एकही खांब नाही . ह्या गणपतीची मूर्ती 3 फूट उंचीची आहे . भाद्रपद महिन्यात येथे मोठा उत्सव होतो . या देवस्थानचा ट्रस्ट झालेला आहे .

34 . खिंडीचा गणपती : - हे गणेशस्थान सातारा शहरात आहे . ते फार प्राचीन असून शिवाजी महाराजांनी अजिंक्यतारा जिंकला तेव्हा या मंदिरात सभामंडप बांधल्याचा उल्लेख आहे , हल्ली मंदिरात असलेली मूर्ती मेण , शेंदूर आणि राळ यांनी बनवलेली आहे . ती बसलेल्या स्थितीत आहे .

35 . ढोल्या गणपती : - हे स्थानही सातारा शहरातील ग्राम दैवत होय . हे स्थान फार प्राचीन म्हणजे शिलाहार राजांच्या कारकीर्दीतील आहे . राजा भोज याने सातारा किल्ला बांधला त्या वेळेस गावच्या व किल्ल्याच्या रक्षणासाठी त्याने गणेशाची स्थापना केली ही गणेशाची मूर्ती 12 फूट उंच असल्याने ह्याला ढोल्या गणपती म्हणतात .

36 . अक्षत्या गणपती : - हे स्थान अहमदनगर येथे आहे . येथे रेल्वेने किंवा एस . टी . ने जाता येते . हे मंदिर दोनशे वर्षापेक्षा जास्त काळापूर्वीचे आहे . गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची असून ती 3 फूट उंच आहे . देऊळ तसे फार मोठे पण ह्या गणेशाला विवाहप्रसंगी अक्षता देतात म्हणून अक्षत्या हे नाव पडले

37 . मोदकेश्वर : - हे स्थान नाशिक शहरी आहे . 56 गणेश स्थानांपैकी हे एक गणेशस्थान आहे . गणेशाची ही प्राचीन मूर्ती मोदकाच्या आकाराची आहे ती पाषाणाची आहे .

38 . पद््मालयाचा गणपती : - हे स्थान जळगाव जिल्ह्यात आहे . एरंडोल येथे जायचा मार्ग रेल्वे आणि एस . टी . चा आहे . एरंडोलला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीने म्हसावड स्टेशनावर उतरावे लागते . या म्हसवाद पासून एक मैलावर पद्मलयाचा डोंगर आहे . एस . टी . नेही येथे जाता येते . हे स्थान अत्यंत प्राचीन आहे . गणेशाच्या अडीच पीठापैकी हे अर्धे पीठ आहे . गणेश पुराणातही या स्थानासंबंधी कथा आलेली आहे . हा प्रवाळ गणेश आहे . गाभाऱ्यात गणेशाच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत . , एक उजव्या व एक डाव्या सोंडेची आहे . दोन्ही मूर्तींना चांदीचे मुकूट आहेत . भाद्रपद आणि कार्तिक या दोन महिन्यात आणि माघ महिन्यातही येथे उत्सव होतो यात्रेकरुंकरता येथे धर्मशाळेची सोय आहे . बाजीराव पेशव्यांनी काही उत्पन्नाची गावे या गणेशाला इनाम दिली होती . शिवाय या गणेश संस्थानच्या मालकीची काही शेतीही आहे . हे मंदिर डोंगर माथ्यावर आहे . डोंगर माथ्यावर पद्मालय तलाव आहे . त्यात कमळे भरपूर असतात . एका सिद्ध पुरुषाने या जुन्या देवालयाचा 19 व्या शतकाच्या आरंभी जीर्णोद्धार केला . एका प्रचंड घंटा देवळात आहे . सभामंडप मोठा आहे . सभामंडपात साधारण चार फूट उंचीचा दगडी उंदीर गणेशाच्या समोर आहे , मंडपाच्या पुढे गाभारा आहे .

39 . चिंतामणी गणेश : - विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात कळंब नावाच्या गावी हे गणेश स्थान आहे . 21 गणेश क्षेत्रांपैकी हे एक होय . थेऊरच्या गणेशाची जी कथा आहे तीच कथा या गणेशाची आहे . येथे जाण्यासाठी मोटार मार्ग आहे . वर्धा - नागपूर रोडवर असलेल्या कळंब गावातच हे मंदिर आहे . मंदिर जमिनीखाली 33 फूट खोल आहे . मंदिराची बांधणी साधी पण सुबक आहे . मंदिरातील गणेश चार मुखाचा आहे . एकाच दगडात चारही बाजूंना चार गणेश मुर्ती कोरल्या आहेत . तेथे पोहचल्यावर पुन्हा 29 पायऱ्या उतरुन गेले म्हणजे एक चौकोनी कुंड लागते . हे जिवंत झरे असलेले पावन तीर्थ आहे . समोरच्या गाभाऱ्यात मुख्य चिंतामणीची मूर्ती आहे . त्याच्या दोन्ही बाजूंना गाभाऱ्यात शंकराच्या दोन पिंडी आहेत . जमिनीवर खाली गणेश मंदिरात येण्यासाठी पायऱ्यांचे 3 मार्ग आहेत . मंदिराच्या चारही बाजूंना मजबूत दगडाच्या भिंती आहेत . मंदिर जमीनीखाली असून सुद्धा ते हवेशीर आहे . चिंतामणीजवळच अनूसयेची काळ्या पाषाणाची सुंदर मूर्ती आहे . माघ महिन्यात सहा दिवस येथे मोठा उत्सव होतो . त्यावेळेस होणारा दहीहंडीचा कार्यक्रम हे येथील वैशिष्टय होय . या मंदिराला काही शेते देणगीदाखल मिळालेली आहेत . शिवाय वार्षिक रु . 2000 उत्पन्न सरकारकडून मिळते .

40 . एकचक्र गणेश : - वर्धा जिल्ह्यात केळघर येथे स्थान आहे . येथे वर्ध्याहून बस जाते . सडकेला लागूनच केळघर गाव आहे . हे मंदिर पांडवकालीन आहे असे म्हणतात . पूर्वी हे मंदिर किल्ल्यात होते असे म्हणतात व ते पांडवांनी स्थापन केले असे म्हणतात . केळघर गावच्या उत्तरेला पण जरा उंच ठिकाणी हा एकचक्र गणेश आहे . पूर्वी तेथे किल्ला असावा असे म्हणतात . मंदिराच्या मागील बाजूस एक चौकोनी पुष्करणी भक्कम दगडात बांधलेली आहे . गाव फारच प्राचीन आहे . कारण येथे अनेक प्राचीन मूर्ती व अवशेष उत्खननात सापडत असतात . एकचक्र गणेशाची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे . भाद्रपद आणि माघ महिन्यात येथे यात्रा भरते . धर्मशाळेत उतरण्याची सोय आहे .

41 . शमी विघ्नेश : - नागपूर जिल्ह्यात आधासा नावाचं गाव आहे . या ठिकाणी हे गणेश स्थान आहे . येथे जाण्यासाठी रेल्वेने नागपूर छिंदवाडा गाडीने जाऊन पाटणसावंगी स्टेशनावर उतरावे लागते . मुदगल पुराणातील वर्णनाप्रमाणे येथील गणेश आहे . 21 गणेश स्थांनापैकी हे एक होय . प्राचीन काळापासून हे गणेश स्थान प्रसिद्ध आहे . या गणेशाची आराधना प्रत्यक्ष विष्णूने केली होती . शमी विघ्नेशाच्या जवळच वक्रतुंड नावाचा गणेश आहे . त्याची स्थापना प्रत्यक्ष वामनाने केली होती असे म्हणतात . विघ्नेश गणेशाची मूर्ती फारच मोठी आहे . ती उजव्या सोंडेची व काश्मिरी दगडापासून बनविलेली आहे . ती 11 फूट उंच , 7 फूट रुंद आहे . तिला दहा हात आहेत . ती सिंहासनावर बसलेली आहे . हे मंदिर टेकडीवर आहे .

42 . सिताबर्डी येथील गणेश : - नागपूर शहर सिताबर्डी भागात हे मंदिर आहे . सिताबर्डी किल्ल्याच्या पूर्व उतारावर हे देऊळ आहे . हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या काळातील असावे असे म्हणतात . हा भाग लष्काराच्या ताब्यात असल्याने येथे पक्के बांधकाम होऊ शकले नाही . त्यामुळे पाऊणशे वर्षापासून एका पत्र्याच्या खोपीतच हा गणेश आहे . पूर्वी येथे मंदिर असावे , मुसलमानी काळात ते उध्वस्त झाले असावे कारण त्याचे अवशष आजही दिसतात . येथील गणेश उजव्या सोंडेचा आहे , दोन पाय , चार हात . सोंड असे या गणेशाचे स्पष्ट रूप दिसत आहे , पण शेंदराच्या पुटामुळे ही मूर्ती झाकलेली आहे . ही मूर्ती 5 फूट उंच आणि 3 फूट रुंद आहे . या मूर्तीच्या बाजूला ऋद्धिसिद्धी नाहीत . हा गणेश ट्रस्ट खाजगी म्हणून नोंदला आहे . देवासमोर येणाऱ्या उत्पन्नातूनच येथील खर्च चालतो .

43 . गणेश लेणी : - औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा येथे जगप्रसिद्ध लेणी आहेत . यात गणेश लेणीही आहेत . येथे औरंगाबादहून एस . टी . बसने जाता येते . ही तीन हजार वर्षापूर्वीची लेणी असावीत . 850 फूट उंचीच्या अखंड दगडात ही गणेश लेणी आहेत . लेण्याच्या वरच्या भागातून पाण्याची धार सतत खाली पडत असते . लेण्याच्या तळाशी कमलकार तीर्थकुंड आहे . वरील धबधब्याचे पाणी या कुंडात येऊन पडते . हे लेणी चंद्राकार असलेल्या दरीत आहे . काही पायऱ्या उतरून बोगद्यातून आत गेले की या लेण्याते प्रवेशद्वार लागते . ते बारा फूट उंचीचे आहे . येथून आत गेले की ही लेणी दिसते . लेण्यात प्रवेश करताच 50 फुटांचा एक सभामंडप लागतो . त्या मंडपात मध्यभागी भिंतीत चार फूट उंचीवर हा गणेश आहे . मूर्तीच्या उजव्या खांबावर नरसिंहाचे व डाव्या खांबावर नटराजाचे शिल्प आहे . ही गणेश मूर्ती सिद्धासन घातलेली आणि डाव्या सोंडेची आणि पाच फूट लांबी रुंदीची आहे . येथे दर संकष्टी चतुर्थीला लोक दर्शनासाठी येतात . हे गणेश स्थान निसर्गरम्य परिसरात आहे .

44 . लक्ष विनायक : - औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ येथे हे स्थान आहे . येथे औरंगाबादहून एस . टी . ने जाता येते . हे स्थान अत्यंत प्राचीन आहे . शिवपुत्र स्कंदाने याची स्थापना केली . 21 गणेशास्थांनापैकी हे एक स्थान होय .

45 . द्वादस हस्त गणेश : - औरंगाबाद जिल्ह्यातच सातारा नावाचे गाव आहे . येथे एस . टी . ने जाता येते . पहिले बाजीराव पेशवे यांनी ही मूर्ती तयार करून घेतली होती . ती ही मूर्ती होय . ही मूर्ती पंचरथी धातूची आहे . तिला 12 हात आहेत व ती डाव्या सोंडेची आहे .

46 . वैरण्य पुत्र गणपती : - औरंगाबाद जिल्ह्यात राजूर नावाचे गाव आहे तेथे हे स्थान आहे . भारतातील साडेतीन गणेशपीठांपैकी हे एक पूर्ण पीठ होय . या गणेश स्थानाबद्दल पुढीलप्रमाणे कथा सांगितली जाते . वैरण्ये नावाच्या राजाचा एक वाडा होता . त्या वस्तीला मूर्ती राजापुरी व नंतर राजूर असे म्हणू लागले . या राजाने तपश्चर्या केली व त्याला गणेशकृपेने मुलगा झाला . पण तो दिसायला विचित्र असल्याने राजाने तो टाकून दिला . जवळच्या जंगलातील साधूंनी त्याचे संगोपन केले . पुढे राजाला आपली चूक कळून आली आणि त्याने त्या विचित्र पण हयात असलेल्या मुलाला आपल्याजवळ राहण्याचे विनवले , तोच हा राजूरचा गणपती होय . आजही या मंदिरात गणेशमूर्तीसमोर वरैण्य राजाची मूर्ती आहे . हे मंदिर गावाजवळ एका उंच टेकडावर आहे . 60 पायऱ्या चढून गेल्यावर हे मंदिर दिसते . मंदिर संपूर्ण दगडी बांधणीचे आहे . या मूर्तीसमोर 100 ते 125 समया नेहमी तेवत असतात . या समया नवसाच्या असतात . या समयांना लागणारे तेल नवस बोलणारे लोक तेथील टाकीत आणून टाकतात . या गणेशाच्या मस्तकावर रुप्याचा मुकूट , खाली अरुंद कपाळ आणि दोन डोळे एवढाच भाग मूर्तीचा दिसतो म्हणून यास स्वयंभू गणेश असेही म्हणतात . भाद्रपद महिन्यात आणि माघ महिन्यात येथे उत्सव असतात . यात्रेकरुंना उतरण्यासाठी गावात धर्मशाळा आहे . गणेशाच्या भक्तांनी त्याला अनेक जमिनी अर्पण केलेल्या आहेत . पंच मंडळ या गणपतीची व्यवस्था पाहते .

47 . भालचंद्र गणेश : - परभणी जिल्ह्यात गंगामसले या गावी हे स्थान आहे . मनमाड काचीगुडा रेल्वेने शिरूर स्टेशनवर उतरले असता या ठिकाणी जाता येते . हे स्थान गणेशाच्या 21 पवित्र स्थानांपैकी एक होय . पूर्वी याला सिद्धाश्रम क्षेत्र म्हणत असत . या ठिकाणी चंद्राने येऊन गणेशाची तपश्चर्या केली असे म्हणतात . आपला भक्त म्हणून चंद्राला आपल्या माथ्यावर धारण केली म्हणून त्याला भालचंद्र गणेश म्हणतात .

48 . त्रिकूट गणेश : - मराठवाडयातील नांदेड येथे हे गणेशस्थान आहे . अष्टविनायकाइतके हे प्रसिद्धही आहे . राजभ्रष्ट झालेल्या त्रिकूटाने गणेशाची आराधना केली आणि त्याला पुन्हा राज्यलाभ झाला अशी प्राचीन कथा आहे . हे स्थान गोदावरीच्या पाण्यात आहे . ह्या गणपतीच्या जवळपास त्रिकूट नावाचे एक लहानसे गाव आहे . नदीच्या पात्रात असलेले हे गणेश देऊळ दगडी व भक्कम बांधणीचे आहे . जवळजवळ संपूर्ण वर्षभर हे मंदिर पाण्यात असते . येथे गोदावरीचा प्रवाह रुंद व खोल आहे . त्यामुळे पाण्यात जलचर प्राणी आढळतात . नागपूरकरराजे भोसले यांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर बांधले गेले असे सांगतात .



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive