Monday, January 16, 2012

ए शेंगदाण्या... peanut, bhuimug, shengdana

ए शेंगदाण्या...

शेंगदाणा म्हणा भुईमूग म्हणा वा फक्त दाणा, हा पदार्थ आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. लहानपणापासून ते दात पडेपर्यंत तो आपल्यासोबत असतो. बाटली दुधाची असो वा इतर कुठली, सोबत शेंगदाणा लागतोच लागतो !

...........

ए शेंगदाण्या गप जरा... जास्त बोललास तर सांगीन बाईंना...'

इसाईल या देशाची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी आपली राजभाषा हिब्रू ठरवली. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांतून तिथं लोक जमले होते. त्या सगळ्यांना ही भाषा शिकवण्याचं मोठं काम हाती घेतलं गेलं. एक दिवस या देशाचे पंतप्रधान कुठेतरी निघाले होते. रस्त्यावर मुलं खेळत होती. पंतप्रधान त्या खेळाच्या मधे आले. त्याबरोबर एका पोरानं त्यांना हिब्रूतून कचकचीत शिवी घातली. त्यांचे सुरक्षारक्षक पुढे धावले; पण पंतप्रधानांनी त्यांना अडवलं. ते खूष झाले होते. 'हिब्रू भाषा सर्वांपर्यंत पोहोचली, त्यांनी आत्मसात केली, त्याचंच हे खणखणीत उदाहरण आहे. त्याच्या मुळापर्यंत ही भाषा पोहोचल्यामुळेच त्यानं अत्यंत रागाच्या क्षणी त्याच भाषेतून शिवी दिली,' असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. शेंगदाणा ही तशी नगण्य वस्तू आपल्या आयुष्यामध्ये किती रुजली आहे, हे यावरून लक्षात यावं. आपण अगदी लहान असताना तिचाच शिवी म्हणून वापर करत असतो आणि का करणार नाही? अगदी बालपणी आपण गुळदाण्याचेच लाडू खाल्लेले असतात. एक शेंगदाणा मधून फोडायचा. त्यामध्ये गूळ चिकटवायचा आणि पुन्हा एकदा दाणा चिकटवायचा, की झाला लाडू! आपल्यापैकी बहुतेकांनी असे लाडू करून खाल्ले असतील आणि इतरांना खाऊ घातले असतील. भातुकलीच्या खेळात तर शेंगदाणा हाच सर्वेसर्वा. त्या पिटुकल्या गॅस शेगडीवरच्या तितक्याच पिटुकल्या कढईत शेंगदाण्याचेच तुकडे पडायचे आणि स्वयंपाक झाल्यानंतर गूळ किंवा चुरमुऱ्यांच्या साथीनं अंगतपंगत व्हायची... लहानपण ते दात पडेपर्यंतच्या मोठ्या कालखंडात हे शेंगदाणेच आपल्या साथीला असतात. वय वाढत जाईल, तसतसे तेही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. वेगळ्या शब्दांत सांगायचं, तर दुधाचा ग्लास ते 'त्या' ग्लासपर्यंत ग्लास बदलत जातात; पण शेंगदाणे तेच असतात! लहान पोर रडायला लागलं, की त्याच्यासमोर वाटीतून शेंगदाणेच आपटले जातात. तेवढ्यात आजी ओरडते, 'भाजलेले दे गं... नाहीतर पोटात दुखेल लेकराच्या...' ही एक भानगड आहेच. कच्चे शेंगदाणे खाल्ले, की पोटात तरी दुखतं नाहीतर पित्त तरी होतं. शेंगदाणा उघडला, की कोणत्यातरी भागाला चिकटून त्याची बी असतं. ते बी पित्तकारक, अशीही एक समजूत आहे. त्यामुळे टेबलावर इतर साऱ्या पसाऱ्यासोबत शेंगदाण्यांच्या बियाही पडलेल्या असतात. एखादी चविष्ट गोष्ट असली, की आरोग्याची काहीतरी भानगड असते, या गोष्टीला अपवादच असू नयेत का! तर आपला मुद्दा शेंगदाण्यांचा होता. लहानपणी समोर आपटलेल्या वाटीपासूनच आपली आणि त्याची दोस्ती सुरू होते. सुरुवातीला नुसते दाणे, मग दाण्याचा कूट, मग गूळदाणे, त्यानंतर दाण्याचा कूट आणि साखर, पुढे शेंगदाण्याची चटणी आणि उपवासाची शेंगदाण्याचीच आमटी... शेंगदाण्याची महती अजून काय सांगावी. तो उपासालाही चालतो आणि 'चकणा' म्हणूनही! म्हणजे दाक्ष असो, की रुदाक्ष शेंगदाणा आहेच! त्याला कुठंही 'नो एंट्री'चे बोर्ड अडवत नाहीत. आपल्या आयुष्यभर तो इतस्तत: हुंडदत असतो. अगदी दात पडले, तरी डोकावतोच. मग नातवंडांविषयीचं प्रेम उफाळून येतं. कुठेतरी काहीतरी खुपत असतं; पण आपल्या पोह्यांमध्ये आलेले दाणे बाजूला काढून ठेवले जातात आणि नातवंडांच्या पानात पडतात. कूट मात्र अगदी शेवटपर्यंत साथ देतो. आपलं आयुष्यच शेंगदाणेमय आहे. कच्च्या शेंगदाण्यापासून ते पोह्याच्या बशीपर्यंत, लाडूपासून ते तिखटमीठापर्यंत. स्वयंपाकघरात, तर त्याच्या अस्तित्वाशिवाय पान हलत नाही. भाजी असो, आमटी असो किंवा चटणी, शेंगदाणा नाही असं होतच नाही. मला अजूनही एक गोष्ट आठवते. तुम्हालाही आठवत असेल. कधीतरी दुपारी आई शेंगदाणे भाजायला काढायची. आधी निवडायची. त्यानंतर भाजणं. भाजणं झालं, की ती ते पाखडायची. भाजल्यानंतर त्याचं फोलपट निघायचं. पाखडून ती ते दूर करायची. आम्ही त्या खाली पडलेल्या फोलपटांच्या मागावर असायचो. फोलपटांबरोबर काही दाणेही खाली पडायचे, त्यावर आमचा डोळा. शेवटी आई वैतागून हातावर चार-चार दाणे ठेवायची; पण त्यांना त्या शोधलेल्या दाण्यांची सर कधीच आली नाही. मला ती शेंगदाण्याची गाडीही आवडते. मोठमोठ्या परातीत खारे, काजू, तिखट असे दाणे ठेवलेले असतात. त्यावर दोन-तीन छोटे छोटे माठ असतात. भोकं पाडलेल्या त्या माठांमध्ये विस्तव असतो. त्यामुळे दाणे कोमटसर राहातात. मला त्या भांड्याचं लहानपणीही आकर्षण होतं आणि आजही आहे. नेहरु गार्डनजवळ शेंगदाणेवाला असतो. त्याच्याकडे काबुली दाणे मिळतात. मिरचीचा खर्डा, लिंबू आणि काबुली दाणे मिसळून तो देतो. काय वर्णन करावं त्याचं... अशक्य चव... शेंगदाणेवाल्यांच्या त्या गोल पुड्याही भन्नाट असतात. दाणे खाऊन झाले, की त्याचं रॉकेटही करता येतं, हा डबल धमाका! या पुडीतला शेवटचा दाणा मात्र घात करतो. हे असं का होतं, ते अजूनही कोणालाही समजलेलं नाही. या नियमालाही अपवाद नाही. असलाच, तर ती व्यक्ती प्रचंड नशीबवान मानावी. आपल्या जीवनासारखंच आहे हे, आपल्या समोर त्यात चीजवस्तू भरली जाते. ती कधी एकदा हाती घेतो आणि उघडून मटकवायला लागतो, असं वाटतं. आपल्याबाबत असंच तर होत असतं. शेवटचा दाणा म्हणजे राहून गेलेल्या गोष्टी किंवा खोलवर, अगदी तळवटात दडपून ठेवलेल्या गोष्टी. (लगे रहो..!) शेंगदाणा या प्रकाराचा सवोर्च्च आविष्कार म्हणजे उकडलेल्या शेंगा. त्यांच्यासारखी चव अलम दुनियेत सापडायची नाही. त्यातही सवोर्त्तम चव हवी असेल, तर नियम क्रमांक एक, त्या उकडायला लावण्या आधी अजिबात धुवायच्या नाहीत. शेंगांसोबत जी माती येते, त्यासकट उकडायच्या शेंगा. आरोग्य आणि चव यांचं व्यस्त प्रमाण डोक्यातून फेकून द्यायचं. मुळात इतका वेळ पाण्यात उकळलेल्या गोष्टीत जंतू शिल्लक राहात नाहीत, हा सिद्धांत आपणच आपल्या मनाशी निर्माण करायचा आणि घट्ट धरून ठेवायचा. उकडलेल्या शेंगांमध्येही अगदी छोट्या कोवळ्या शेंगा असतात ना, त्यांची चव अधिक अफलातून... काही शेंगा तर न सोलता खाल्ल्या तरी चालतात. या छोट्याशा शेंगांमध्ये खारं पाणी शिरलेलं असतं. तेही भन्नाट लागतं. परवा नगरला निघालो होतो पहिल्याच टोल नाक्याला एकजण जवळ आला. 'उकडलेले दाणे हवेत का?' त्यानं विचारलं. दहा रुपयांची पुडी. तातडीनं घेतली आणि प्रवास अधिक सुखकर केला. या सगळ्या सांगण्याचं तात्पर्य हेच, शेंगदाणा असशी आणि शेंगदाणा राहशी...
 peanut, bhuimug, shengdana

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive