Saturday, March 3, 2012

Marathi Katha - भिंती - Bhinti - Walls





भिंती


फक्त काहींनाच का जमतं
हातचं न राखता मदत करणं
परिस्थितीची पर्वा न करता
एखाद्याच्या अडचणीत धावून जाणं
आपल्या मनातल्या संशयाच्या,
अविश्‍वासाच्या भिंती
इतक्या आडदांड असतात की,
त्यापलीकडं जाऊन निरपेक्ष मदतीतील निरागस भावना आपल्यापर्यंत
पोहोचूच शकत नाही..
हे असं का होतं?

आपण कितीही सुसज्ज असलो, संपन्न असलो तरी आपल्यावर संकट येतं आणि जवळ काही नसलेली माणसं ही माणुसकीच्या ओढीनं मदत करतात, याचा प्रत्यय मी घेतलाय. आमचं पूर्ण कुटुंब सहलीला गेलं होतं. अगदी हिंदी चित्रपटातल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. हळूहळू दिवस मावळतीला आला होता. एका सुनसान रस्त्यावरून गाडी जात होती. रस्ता हळूहळू रहस्यमय वाटू लागला. अंधार केव्हा झाला हे कळलंही नाही. तितक्यात त्या गूढ रस्त्यावर आमची गाडी बंद पडली. त्या मार्गावर जवळपास कुठेही दुसरं वाहन किंवा राहण्यासाठी हॉटेल, लॉज, आश्रम काहीही नव्हतं. साधी विचारपूस करायला माणूसही दिसत नव्हता. आमची गाडी सुरू होता होत नव्हती. एकीकडे प्रचंड भीती वाटत होती. सोबत तहान व भुकेनं आमचा जीव व्याकूळ झाला होता. आमच्याजवळ सोन्या-चांदीचे दागिने व काही पैसेही होते. बाहेर निघावं तर कुठे जावं हा प्रश्न मनात धरून गाडी एका बाजूला लावली. दरवाजे व काचा घट्ट लावून गाडीमध्ये आम्ही सर्व जण दडून बसलो. काही वेळानं गाडीच्या काचांवर कोणीतरी थाप मारली व आम्ही घाबरून पाणी-पाणी झालो. कोणीतरी खूप वेळा थाप मारतंय म्हणून घाबरत घाबरत आमच्या ड्रायव्हरनं गाडीमधूनच काचांकडे डोकावलं, तर एक माणूस हातामध्ये मशाल घेऊन काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. लावलेल्या काचांमुळे आवाज येत नव्हता. मग थोडी हिंमत करून काच खाली केली. तो माणूस तेवढय़ात पटकन म्हणाला, ‘‘साहेब घाबरू नका. म्या हाय ना, चला, इथलं वातावरण लई भयानक हाय. इथं जवळच आमची वस्ती हाय. तुम्ही समदे काय काळजी करू नका बगा. तुमची समदी यवस्था व्हईल बगा आमच्या वस्तीत, चला बघू बिगी बिगी कायतरी इपरीत घडायच्या आदी चला!’’
आम्हाला काय करावं काहीच कळेनासं झालं होतं. एकीकडे हा अनोळखी माणूस, सभोवताली किर्र अंधार, दाट झाडी. त्या माणसावर विश्‍वास टाकण्यापलीकडे आमच्याजवळ कोणताच पर्याय नव्हता. मग जराही मनात नकारात्मक विचार न आणता आम्ही त्या माणसाबरोबर जायचं ठरवलं. गाडीतल्या गाडीतच सर्व दागिने, पैसे पर्समध्ये ठेवले. आणि पर्स बॅगमध्ये कुलूपबंद केली. बरंच अंतर त्या माणसासोबत मशालीच्या उजेडात चालत चालत आम्ही एका झोपडीत पोहोचलो. तेथे त्याची चार लहान लहान मुले व बायको होती. त्या माणसानं त्याच्या भाषेत आमच्याविषयी त्यांना सांगितलं. मग त्या सर्वांनीच आमचं हसतमुखानं स्वागत केलं. त्यांनी आम्हाला भाकरी व मातीच्या मडक्यातलं चांगलं मुरलेलं लोणचं जेवणास वाढलं. रोजच्या रोज कमावून उदरनिर्वाह चालवणारे ते लोक त्यांनी थोडाही मागचा पुढचा विचार न करता आम्हास जेवू घातलं. सर्वांनीच झोपण्याची तयारी सुरू केली. त्या घरातली सर्व मंडळी घराच्या बाहेर झोपली. तरीही असुरक्षिततेची भावना आमच्या मनात होतीच. रात्रभर आम्ही जीव मुठीत व बॅगा मिठीत धरून झोपलो. सकाळी आम्हाला जाग आली तेव्हा आमच्याजवळ बॅग पर्स काही नव्हते व घरात आणि घराबाहेरही कोणी दिसत नव्हते. आम्ही घाबरलो. कमीत कमी जीव तरी वाचला या विचारानं आम्ही आमची समजूत घालत होतो, तर कधी या माणसांवर विश्‍वास ठेवून चूक केली असं स्वत:ला कोसत दहा मिनिटं तरी आम्ही त्या झोपडीत नुसतंच बसून राहिलो. दहा मिनिटानंतर आमच्या गाडीचा आवाज आला म्हणून बाहेर येऊन पाहिलं तर ही सर्व लोक आमच्या गाडीभोवती होती व आम्ही दिसताच म्हणाले, ‘साहेब माफ करा. तुम्ही दमला होता ना म्हणून न्हाय उटीवलं. तुमची गाडी सरू झाली बरका. ह्यो आमचा शेजारी बंड्या- ह्यानं केली सुरू. लई हुशार हाय बगा गडी. पण, त्याचा इथं काय उपेगच होत न्हाय बगा. जाऊ द्या आमची बडबड सरायची न्हाय. तुमचं समदं सामान गाडीत ठिवलंय बगा. तपासून बगा काय कमी जास्ती असलं तर आमच्यावर बला यायला नग. काय?’
एवढय़ावरही आम्ही सर्व सामान चेक केलं व ते व्यवस्थित होतं. तिथून निघताना आम्ही थँक्स म्हणून त्यांच्या हातात काही पैसे दिले. पण ते त्यांनी घेतले नाहीत. शहरात गेल्या गेल्या सर्व दागिने खरे असण्याची सोनाराकडून खात्री करून घेतली व ते सर्व दागिने जसेच्या तसे आहेत हे पाहून खरोखर मनात पश्‍चात्तापाची भावना येऊन गेली. कोण कोणासाठी व विशेषत: अनोळखींसाठी एवढं करेल तरी का? पण, त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं व आम्ही त्यांच्यावर अविश्‍वास दाखवत साधं शहरात आल्यास आमच्या घरी या असं निमंत्रणही नाही दिलं. त्यांनी आमच्यासाठी जे काही केले ते आपण शहरातले कोणीच नाही करू शकत. एवढेच काय आमच्या शेजारच्या आजोबांनी त्यांच्या झाडाच्या रस्त्याकडील फांदीला लागलेली फुले एक बाई देवपूजेसाठी नेतात म्हणून त्यांनी अख्खं झाडच कापून टाकलं.
खरंच आपण शहरातली माणसं अशी संकुचित आणि संशयी का असतो? आपल्याला का नाही बरं जमत एखाद्याला जिवापाड मदत करणं, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अडचणीत धावून जाणं. खरंच का नाही जमत?

- संगीता सुरसे, गडचिरोली

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive