Friday, March 23, 2012

ब्रह्मध्वज - Brahmadhvaj - How to celebrate Gudhipadva in Marathi?



' ब्रह्म' ही भारतीय तत्त्वज्ञानातील एक सर्वश्रेष्ठ कल्पना आहे. 'ब्रह्म' हा शब्द बृह म्हणजे वाढणे, मोठे होणे या धातूवरून बनला आहे. जे बृहत्तम किंवा महत्तम आहे आणि ज्यात 'वाढणे' या क्रियेचे सर्व अर्थ समाविष्ट आहेत ते 'ब्रह्मा' आहे. गुढीचे पूजन म्हणजे ब्रह्मध्वजाचे पूजन
...........

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्ताचा दिवस! यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे.

ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी सृष्टी निर्मितीचा वाढदिवस दरवर्षी आपण मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो. शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला म्हणून या दिवशी शालिवाहन शकास प्रारंभ झाला. हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. प्रभू रामचंद्र रावणाचा पराभव करून चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येमध्ये आले. लोकांनी गुढ्या, तोरणे उभारून त्यांचे जंगी स्वागत केले, तोही हाच दिवस होता.

स्वत:मध्ये चांगला बदल करण्यासाठी, स्वत:चे आणि इतरांचे जीवन सुखी करण्यासाठी या सणाचा उपयोग करून घ्यावयाचा आहे.

दिवस संकल्पाचा

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम घर व परिसर यांची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल व उटणे लावून गरम पाण्याने अभ्यंगस्नान करावे. दरवाजा समोर रांगोळी घालावी. नवीन वस्त्रे परिधान करावीत. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) एक काठी घेऊन, ती स्वच्छ धुवून तिच्या टोकास रेशमी तांबडे वस्त्र, फुलांची माळ, कडुनिंबाचा टाळा, साखरेची माळ घालून त्यावर चांदीची किंवा पितळेची लोटी म्हणजे कलश ठेवावा. अशा रीतीने तयार केलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस 'ब्रह्माध्वज' असे म्हणतात. ब्रह्माध्वजाची पूजा करावी.

' ब्रह्म' ही भारतीय तत्त्वज्ञानातील एक सर्वश्रेष्ठ कल्पना आहे. 'ब्रह्म' हा शब्द बृह म्हणजे वाढणे, मोठे होणे या धातूवरून बनला आहे. जे बृहत्तम किंवा महत्तम आहे आणि ज्यात 'वाढणे' या क्रियेचे सर्व अर्थ समाविष्ट आहेत ते 'ब्रह्म' आहे. अनादी, अनंत, नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त तेच ब्रह्मा आहे. तैत्तिरीय उपनिषदात ब्रह्माचे स्वरूप 'सत्य, ज्ञान आणि अनंत' - 'सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म' असे दिले आहे. सत्य शब्द अबाधित या अर्थी, ज्ञान शब्द स्वयंप्रकाश, चैतन्य या अर्थी आणि अनंत हा शब्द व्यापक या अर्थी योजण्यात आला आहे. आपण जी गुढी उभारतो तो या ब्रह्माचा ध्वज आहे. हा 'ब्रह्मध्वज' किती महान आहे त्याची साक्ष यावरून आपल्या लक्षात येते. गुढीची म्हणजे या ब्रह्मध्वजाची पूजा करावी. प्रत्येक उपचार समर्पण करताना 'ब्रह्मध्वजाय नम:' असे म्हणावे.

' ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।

प्राप्तेस्मिनसंवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू।।'

असा मंत्र म्हणावा असे सांगण्यात आले आहे.

गुढीची पूजा केल्यानंतर कडुनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगले वाटावे. आणि सर्वांनी थोडे थोडे खावे. वर्षारंभी कडुनिंब खाल्ल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. मात्र कडुनिंबाचे अतिसेवन करू नये. त्यानंतर पंचांगातील वर्षफल वाचावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदाने घालवावा. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती उतरावी.

कालगणना

पंचांगामधील वर्षफलामध्ये कालगणना दिलेली असते. ४३ लक्ष वीस हजार सौर वर्षांचे एक 'महायुग' असते. अशा एक हजार महायुगांचा एक 'कल्प' होतो. 'कल्प' हाच ब्रह्मादेवाचा दिवस असतो. तेवढीच ब्रह्मादेवाची रात्र असते. १७ लक्ष २८ हजार सौर वर्षांचे एक कृतयुग होते. १२ लक्ष ९६ हजार सौर वर्षांचे एक त्रेतायुग होते. ८ लक्ष ६४ हजार एवढ्या सौर वर्षांचे एक द्वापारयुग असते. आणि ४ लक्ष ३२ हजार सौर वर्षांचे कलियुग होते. सध्या वैवस्वव मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या चतुर्युगसमुदायापैकी पहिली तीन युगे जाऊन चौथे कलियुग चालू आहे.

कलियुगातील पाच हजार एकशे तेरा वर्षे पूर्ण झाली. या गुढीपाडव्यापासून ५११४ युगाब्दाला प्रारंभ होत आहे. अजून कलियुगातील चार लक्ष सव्वीस हजार, आठशे सत्याऐंशी वर्षे शिल्लक आहेत.

सणांचा उद्देश

सण हे मनाला आनंद देण्यासाठी येतात. मनाचे आरोग्य सण साजरे केल्याने राखले जाते. शरीराचे आरोग्य सणासाठी ऋतूप्रमाणे ठरविलेल्या अन्नामुळे चांगले राहण्यास मदत होते.

गुढीची म्हणजे ब्रह्मध्वजाची आणि कालमार्गदर्शन करणाऱ्या पंचांगाची पूजा आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठी करावयाची असते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीची ताकद आपल्या मनात निर्माण व्हावी यासाठी ही पूजा करावयाची असते. आपण निर्व्यसनी राहावे. नीतीने वागावे, भ्रष्टाचार अनितीपासून दूर राहावे यासाठी या पूजा करावयाच्या असतात. त्यामुळे आपले मन निर्भय राहते. घरात प्रसन्न, आनंदी वातावरण राहते. येणारे दिवस सुख, समृद्धीचे जावेत यासाठी प्रार्थना करावयाची असते.

दा. कृ. सोमण

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive