Saturday, March 3, 2012

Marathi Katha - डरना मना है ! Darna Mana Hai



डरना मना है !



तुमच्या घरी कॉम्प्युटर येऊन जुना झाला. शाळकरी मुलंसुद्धा वापरतात. .पण तुम्ही? घाबरता !
नको बाई, लावला आपण हात, आणि काही बिघडलं तर?
.अशा का घाबरता तुम्ही?

‘कॉम्प्युटर’, ‘इंटरनेट’.. ते अगदी मायक्रोवेव्ह - सगळ्या गोष्टी बिनधास्त - न घाबरता - वापरण्याच्या युक्त्या !

अगं सारिका, मला जरा ते इंटरनेट प्रकरण शिकव गं. - एक दिवस माझी आई मला म्हणाली.
खरंतर मी कितीतरी दिवसांपासून तिच्या मागे लागले होते. इंटरनेट शिक म्हणून. आज आई स्वतहून म्हणतेय म्हटल्यावर मला कोण आनंद झाला. लगेचच आईचा इंटरनेट क्लास सुरू झाला. चार-सहा दिवस उत्साहात होती ती. सगळं बेसिक शिकल्यावर म्हणाली आता माझं मी वापरून बघते.
अरे वाह ! हे तर त्याहून छान. मग मी माझ्या कामात व्यस्त झाले आणि आई इंटरनेटचे धडे गिरवत असेल असं गृहीत धरून बसले. चार-एक महिन्यांनंतर आई पुन्हा एकदा म्हणाली, अगं जरा ते इंटरनेट पुन्हा एकदा सांग गं !
मला जरा धक्काच बसला कारण एव्हाना आई सराईतासारखी वापरायला लागली असेल असं मी गृहीत धरलं होतं.
आमचा इंटरनेटचा क्लास पुन्हा सुरू झाला. चार-सहा दिवसांत आईनं पूर्वीसारखंच मी आता वापरते असं म्हणत माझी रवानगी करून टाकली. पण यावेळी मी आईवर नजर ठेवून होते.
एक-दोन दिवसांतच माझ्या लक्षात आलं, आई कॉम्प्युटरवर बसते खरी पण म्हणावी तितकी तिच्या इंटरनेट वापरात प्रगती झालेली नव्हती. मग एक दिवस ती कॉम्प्युटरवर असताना हळूच मागे जाऊन उभी राहिले. माझ्या येण्याची जोवर चाहूल तिला नव्हती, तिचं बरं चाललं होतं, जसं तिच्या लक्षात आलं ती एकदम कॉन्शस झाली आणि मग सेण्ड कसं करू, कम्पोज कसं करू, असले बेसिक प्रश्न विचारायला लागली.
मला कळे ना, ही काय भानगड आहे. मी येण्याआधी ती निदान धडपडत तरी होती, पण मी आल्यानंतर तिनं एकदमच सगळी शस्त्र टाकून दिली. न राहावून तिला विचारलं तर म्हणाली, अगं भीती वाटते. एवढं महागाचं हे यंत्र, माझ्यामुळे बिघडायला नको. चुकून एखादं चुकीचं बटण दाबलं गेलं तर?
खरी गोम इथे होती तर!
माझ्या आईला कॉम्प्युटर आणि इंटरनेट नीट वापरता येत नव्हतं कारण तिच्या मनात या यंत्राबद्दल विचित्र भीती होती. मग तिच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं तिच्या वयाच्या बर्‍याच बायकांना ही भीती वाटते.
आमच्या या गप्पा चालू असताना, आमच्या शेजारच्या कुलकर्णी काकूंची सून तणतणत आली. तिची आणि आईची दोस्ती आहे, त्यामुळे सासूशी काही खटकलं की या सूनबाई आमच्या घरी आल्याच म्हणून समजा. आता काय झालं, म्हणून माझे कान अर्थातच उभे राहिले.
काकू, आई कशा करतात बघा ना, मी एवढा हॅण्ड मिक्सर आणला, म्हटलं, रवीनं ताक घुसळून आईंचे हात भरून येतात. रवीनं कसं सगळं सोप्पं जाईल. पण आज महिना होत आला तो हॅण्ड मिक्सर आणून, आई त्याला हात लावतील तर शप्पथ ! त्यांचं आपलं रवी पुराण चालूच आहे. म्हटलं कशाला वापरता ती रवी, तर म्हणाल्या मला भीती वाटते इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरायची. आता काकू तुम्हीच सांगा, यात काय घाबरण्यासारखं आहे?
आई माझ्याकडे आणि मी आईकडे बघत होते.. आणि कुलकर्णी काकूंच्या सुनेची तक्राराची टेप चालूच होती.
मध्यमवयीन किंवा त्यापेक्षा वयानं मोठय़ा असणार्‍या बायकांना सर्वसाधारणपणे दोन गोष्टींची भलतीच भीती वाटते हे त्या दिवशी माझ्या लक्षात आलं.
त्या दोन वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संगणक किंवा कॉम्प्युटर.
आपण हात लावू आणि या वस्तू खराब होतील ही त्यातली एक महत्त्वाची भीती. ही भीती का वाटते, ती का निर्माण झाली असेल याची चर्चा करण्यापेक्षा ती घालवायची कशी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संगणक सफाईदारपणे वापरायचा कसा याची माहिती घेणं आणि आत्मविश्‍वासानं या दोन्ही गोष्टी हाताळणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच मग यावरच मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे.
भीती वाटणार्‍या या दोन्ही क्षेत्रांबद्दल मूलभूत माहिती घेऊन, हाताळणी करायची कशी हेही आपण या नवीन सदरातून जाणून घेणार आहोत.
घाबरू नका.
इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संगणक या दोन्ही गोष्टी वापरत असताना सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तुमचा ‘अँटीट्यूड’. तुमचा दृष्टिकोन. घरातला मिक्सर सराईतपणे वापरणारी बाई मायक्रोवेव्ह किंवा ओटिजी वापरायचा म्हटला की बिचकते किंवा हॅण्ड मिक्सरला लांबूनच रामराम ठोकते. कशाला? जी व्यक्ती मिक्सर वापरू शकते, तिला ओटिजी वापरणं काहीच कठीण असत नाही. मुद्दा असतो तो ‘अँटीट्यूड’चा.
यंत्र नवीन आहे आणि आपण ते वापरलं तर ते खराब होईल हा विचार आधी मनातून काढून टाकला पाहिजे. ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर त्या कशा वापरायच्या असतात हे सांगणारी पुस्तिका मिळते त्याचप्रमाणे संगणकावर काम करत असतानाही प्रत्येक टप्प्यानंतर संगणक तुम्हाला प्रश्न विचारत असतो. त्यामुळे तुम्ही चुकलात तरी तुम्हाला योग्य मार्गावर नेण्याचं काम संगणक स्वतच करत असतो. मग घाबरायचं कशाला?
काही बायकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरताना शॉक बसला तर अशी भीती वाटते तर काही बायकांना संगणक वापरताना आपल्यामुळे तो बंद पडला तर अशी भीती वाटते. पण या दोन्ही भीतींना तसा काही अर्थ नसतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू नीट वापरली तर त्याचा शॉक बसण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि संगणक ही घाबरण्याची नाही तर दोस्ती करण्याची गोष्ट आहे हे आधी स्वतला नीट समजावून सांगा.
‘फ्रिज बंद पडला, बल्ब गेला, मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न करायचे आहेत, तर असल्या सगळ्या गोष्टी मी माझ्या नवर्‍याला करायला सांगते. का माहिते?’- माझी एक मैत्रीण म्हणाली. ‘कारण, सगळंच आपण करायचं म्हटलं तर घरकामातलं नवर्‍यांच्या वाट्याला काहीच येत नाही आणि आपल्या उरावर मात्र कामाची ओझी येऊन पडतात. म्हणून मग मी करतच नाही.’
या मैत्रिणीचं हे ‘लॉजिक’ कितीही बरोबर असलं तरी सोय आणि भीती यात फरक केलाच पाहिजे.
बल्ब मला बदलता येतो, पण या कामाची जबाबदारी नवर्‍यानं उचलावी असं म्हणत ते काम न करणं निराळं आणि मला येत नाही किंवा भीती वाटते म्हणून ते काम नवर्‍यानं करणं वेगळं. नातवाला किंवा नातीला तिची आवडती सीडी लावून द्यायची आहे, पण सीडी प्लेअर वापरता येत नाही, किंवा तो वापरण्याची भीती वाटते याला काहीच अर्थ नाही. स्त्री-पुरुष समानतेची चर्चा करताना, जसं पुरुषांना घरकाम करता आलंच पाहिजे, निदान स्वतच्या पोटापुरतं तरी अन्न शिजवता आलंच पाहिजे, तसंच बायकांनाही स्वयंपाक आणि ऑफिसातलं काम याव्यतिरिक्त असणारी अशी सगळी इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी संबंधित कामं करता आलीच पाहिजेत. कॉम्प्युटर आणि नेट वापरता आलंच पाहिजे.
बायकांनी, मला येत नाही, हे वाक्यच त्यांच्या डिक्श्नरीतून काढून टाकलं पाहिजे.
मी करेन त्यासाठी तुम्हाला मदत.
आहात तुम्ही तयार?

- सारिका बच्छाव

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive