Saturday, March 3, 2012

For Yogi - Alert for Foods purity

योगाच्या अभ्यासकांनी व उपासकांनी स्वत:च्या अन्नग्रहणाबद्दल फार जागरूक राहिले पाहिजे.

(६)
वरील सर्व संचार व संशोधन केल्यानंतर या विषयावर खालील सिद्धांत माझ्या मते सर्वथैव ग्राह्य ठरतात. प्रस्तुत पुस्तकाच्या वाचकाने या सिद्धान्ताचे नीट मनन करून आपली भूमिका नेहमी तर्कशुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा.
१)मानवमात्राचे ‘ऐश्वर्य’ स्वत: सिद्ध आहे. प्रत्येक मानवी व्यक्तीचे ठिकाणी ईश्वरतत्त्व (ईश्वरभाव म्हणजेच ऐश्वर्य) स्वयंसिद्ध असल्यामुळे मनुष्याच्या अतींद्रिय शक्तींना कोठेही मर्यादा नाही. जीवभाव व शिवभाव हे समकेंद्र आहेत पण समपरिघ व समक्षितिजही होऊ शकतील.
२)अतींद्रिय शक्तींच्या विकासाबद्दल व विकासाक्रमाबद्दल. एक स्वतंत्र शास्त्र असून ते प्रामुख्याने अनुभवनिष्ठ व प्रयोगनिष्ठ आहे. या शास्त्रालाच ‘योग’ ही संज्ञा समर्पक आहे. कारण, व्यष्टी व परमेष्टी, नर व नारायण यांचा योग म्हणजे ऐक्यसंबंध घडवून आणणारे हे शास्त्र आहे.
३)बहिर्मुख असलेल्या पदार्थविज्ञान शास्त्राने ज्याप्रमाणे अणुमधील अनंत शक्तीचा शोध लावला त्याचप्रमाणे अंतर्मुख योगशास्त्राला मानसिक अणुमध्ये गुप्त व सुप्त असलेल्या अनंत शक्तींचा, सर्व शक्तींच्या गंगोत्रीचा, शोध लावणे सर्वथैव शक्य आहे.
४)मंत्र शास्त्र हे मनाच्या अणूचे शास्त्र आहे. काही वैदिक मंत्रांत या शास्त्रांतील नियमांचे निदर्शन व निरुपण झाले आहे. वेद भाष्यकार सायणाचार्य म्हणतात त्याप्रमाणे ‘अलौकिक उपाय’ प्रकट करणे हे वेदांचे उद्दिष्ट व प्रयोजन आहे. प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांना अगम्य असणार्‍या उपायांची योजना करण्यामध्येच वेदांची ‘वेदता’ आहे.
प्रत्यक्षानुमित्या वा यस्तूपायो न बुध्यते।
एन विन्दति वेदेन तस्मात् वेदस्य वेदता।।
वेद हे अतींद्रिय ज्ञानाचे प्रसिद्ध व प्रभावी शास्त्र आहे.
योगशास्त्राला वेदविद्येचे अधिष्ठान आहे. वेदमंत्रांचा विनियोग या शास्त्राचे विकासास अतीव उपकारक असाच आहे. अतींद्रिय शक्ती व मंत्र-विद्या प्रकट होण्यास मनोमय कोशाचा स्फोट होऊन मनाच्या परमाणूंतील गुप्त शक्ती प्रकट होण्यास मानवी जीवनात परमावधीची एकाग्रता सिद्ध होणे आवश्यक आहे.
५)या एकाग्रतेच्या सिद्धीसाठी भगवान पतंजलींनी सांगितलेले यम व नियम आचरणात पूर्णपणे प्रतिबिंबित झाले पाहिजेत
६)वासना कोशाचे अस्तित्व व कार्य, निर्वेयक्तिक, अनासक्तियुक्त व अहंतेचा संपूर्ण निरास करून झाले पाहिजे.
७)प्राणमय कोश, प्राणायामादि शोधक पद्धतीने पुनीत केला पाहिजे.
८)अन्न हेच जीवनाचे आदिम साधन आहे. कर्मेद्रियांचा व्यवहार अन्नमय कोशावर अधिष्ठित आहे. अन्नशुद्धी हे कर्म-शुद्धीचे पहिले साधन आहे. छांदोग्य उपनिषदात सांगितले, अन्न अशितं त्रेधा विधीयते। इत्यादी, शरिरांतर्गत होणाऱ्या अन्नाच्या स्वरूपांतराचे निरुपण लक्षात घेऊन योगच्या अभ्यासकांनी व उपासकांनी स्वत:च्या अन्नग्रहणाबद्दल फार जागरूक राहिले पाहिजे.
जगातील सर्व संस्कृतीत पुढारलेल्या व मागासलेल्या - अन्नव्यवहाराच्या शुद्धतेबद्दल योगसदृश विषयांच्या अभ्यासकास निष्ठुर नियम घालून दिलेले आढळतात.
ऑस्ट्रेलियातले आदिवासी, उत्तर ध्रुव प्रदेशानजीकचे प्रांतातील मूळ रहिवासी, अन्नग्रहणाबद्दल व उपोषणाबद्दल फार दक्ष असलेले मला आढळले.
९)वैदिक मंत्र शास्त्र व भगवान पतंजलींचे योगदर्शन यांचा समन्वित अभ्यास केला व त्या अभ्यासाला आधुनिक अतिमानस (para psychology) शास्त्राची जोड दिली तर या अतींद्रिय शास्त्राचा विकास फार झपाट्याने होऊ शकेल. हे अभ्यास पूर्ण झाल्यावर योगशास्त्राच्या अभ्यासाला सुरूवात करावयाची असा याचा अर्थ नव्हे. वैदिक यौगिक व प्रायोगिक अशी तीन प्रकारची अंगे व दृष्टीकोन एकत्र करून थोडा अधिकार प्राप्त केल्यावर कोणीही याचा अभ्यास करावा.
योग-मार्गात विशेषत: अतींद्रियांचे प्रयोग करीत असताना गुरूसान्निध्य अतीव आवश्यक आहे.
प्रस्तुत पुस्तकात सांगितलेले समाधिसाधन, छाया-पुरुष, विराट-दर्शन, कुंडलिनी हे प्रयोग पुस्तकावरून करणे, माझ्या मते बरेच धोक्याचे आहे. या पुस्तकातील काही शब्दप्रयोग आज आक्षेपार्ह वाटतील पण ग्रंथकार कै.लक्ष्मण नारायण जोशी यांनी हे शब्दप्रयोग गहन विषय सहजसुलभ करण्यासाठी केले असावेत. शास्त्रीय परिभाषा निर्माण करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. Self hypnotism म्हणजे मानसिक समाधि, Spiritualism म्हणजे आवाहन विद्या असले भाषांतर शास्त्रशुद्ध नाही हे खरे पण अर्थसूचक आहे.
कै. ल. ना. जोशी यांनी एवढ्या गहन विषयावर इतका सुलभ, अनुभवप्रधान व मार्गदर्शक ग्रंथ लिहिल्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत.
या छोट्याशा, ग्रंथ गाभार्‍याचा जीर्णोद्धार करून त्याचे पुनर्मुद्रण व पुन: प्रकाशन श्री.स.ना.चव्हाण यांनी केले हे त्यांचे महाराष्ट्रीय योगजिज्ञासू जनतेवर महद् उपकार झाले आहेत.
या ग्रंथाने योगशास्त्रातल्या काही उत्तुंग धवलगिरीचे दर्शन होईल यात संशय नाही.
या अभ्यसनीय व आदरणीय पुस्तकाचे स्वागत सर्व महाराष्ट्रीय जनतेने करावे हीच प्रार्थना.
- धुं. गो. विनोद

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive