Friday, March 23, 2012

चव उगादी पच्चडीची - Marathi people in Hyderabad

हैदराबाद शहरातील मराठी बहुल सुलतान बाजार भागांतील संतोष प्रिंटिंग प्रेसमध्ये दाते पंचांग विक्रीसाठी दिसलं की चैत्र पाडव्याच्या आगमनाची चाहूल मराठी मनाला लागते! बाकी शहरातील मॉल्स आणि वाहने-इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूम्समधून 'तेलुगू न्यू इयर'च्या ऑफर्सची धूम असते. 'तेलुगू न्यू इयर' म्हणजे आपला गुढीपाडवा! आंध्र आणि कर्नाटक या राज्यांत चैत्र शुद्ध प्रतिपदा 'उगादी' (युग आणि आदी (आरंभ)-युगारंभ ) या नावानं साजरी होते.

हैदराबाद शहरात पूर्वापार स्थायिक मराठी समाज आणि 'हायटेक' सिटीत नव्यानं दाखल मराठी आयटीजन गुढीपाडव्याचा सण उत्साहानं साजरा करतात. जुन्या शहराच्या मराठी वस्त्यांतून भरजरी पितांबर, चांदीचे गडू आणि साखरेच्या गाठीनं सजलेल्या गुढ्या पाहताना एखाद्या मराठी बेटाच्या सफरीची प्रचीती येईल!

पण हैदराबाद व तेलंगणातील मराठी गटांचं अस्तित्व भिन्न भाषा-समाजाच्या परिघात असल्यानं दोन वेगळ्या सांस्कृतिक परिवेशात एकाच वेळी वावरल्याचा अनुभव येतो. शहरातील मराठी समाजातून पाडव्याच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण होते आणि 'उगादी शुभाकांक्षालू'नं तेलुगु समाजाशी संवाद साधला जातो!

पाडव्यासाठी बहुतेक मराठी घरांतून श्रीखंड-पुरीचा खासा बेत असतोच. आंध्रमधील मराठी माणूस 'पच्चडी' या उगादी स्पेशल आयटमशी अपरिचित नाही. कडूलिंबाची फुलं, गूळ, कैरी, हिरवी मिरची, मीठ, चिंचेचा रस यांच्या मिश्रणातून तयार झालेली 'पच्चडी' म्हणजे षड्रिपूंचे प्रतीक. तिच्यामुळं जीवनातील कडू-गोड अनुभवांना येणाऱ्या वर्षात सामोरं जाण्याचं बळ मिळतं, या भावनेनं हरएक तेलुगु घरांतून पच्चडीचं सेवन होतं! आपल्या श्रीखंड-पुरी प्रमाणं 'बोबटलू' (पुरण पोळी) ही उगादी स्पेशल तेलुगु डिश! तेलंगणात स्थायिक अनेक मराठी कुटुंबं पाडव्याला गुढी उभारतात आणि उगादी पच्चडी बरोबरच 'बोबटलू'चा भोजनात आस्वाद घेतात!

एकेकाळी मराठी समाजाच्या कार्य-कतृर्त्वाच्या गुढ्या तत्कालीन हैदराबाद राज्यात ठळकपणे उभ्या होत्या. आता काळ बदललाय. हैदराबादेत स्थायिक आणि स्थलांतरित मराठी समाजाच्या नव्या-जुन्या पिढ्या अनेक क्षेत्रांवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. मराठी परंपरा व संस्कृतीशी त्यांची नाळ तुटलेली नाही. पण हे मराठीजन स्थानिक लोकजीवनातही सामावलेत. त्यामुळं हैदराबाद व इतरत्र विखुरलेला मराठी समाज गुढीपाडवा आणि 'उगादी पच्चडी'चा सारखाच आनंद घेतो!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive