Saturday, March 3, 2012

Marathi Katha ‘कच्च्या गाठी’ - Raw relations



‘कच्च्या गाठी’



अडनिड्या वयात झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होणं, दोघांमधलं प्रेम फक्त शारीरिक आकर्षणापर्यंत र्मयादित राहाणं, परस्परांविषयीची काळजी अधिकारशाहीत बदलणं यामुळे दोघांमधलं सुदृढ नातं तयार होत नाही. समजूतदारपणा,माघार, तडजोड यापैकी कुठलाच पर्याय न स्वीकारणार्‍या या लग्नापूर्वीच्या ‘कच्च्या गाठी’ मग लग्नाच्या नात्यात बांधल्याच जात नाहीत!

‘‘तुम्ही, प्लीज कल्पनाला मला फोन करायला सांगा ना मॅम, ती माझा फोन उचलत नाही. ती तुमचं ऐकेल. तिनं मला नकार दिला आहे पण तुमचं ऐकून ती मला होकार देईल.’’ अविनाश अत्यंत कळवळून माझ्याशी फोनवर बोलत होता.
अविनाश आणि कल्पनाची माझ्याशी झालेली ओळख अगदी अलीकडची. विवाहपूर्व समुपदेशनासाठी ही दोघं माझ्याकडे आली होती. त्या दोघांची मैत्री खूप जुनी होती. म्हणजे कल्पना आठवी अन् अविनाश नववीमध्ये असल्यापासून दोघांची मैत्री होती. मैत्रीमध्येच म्हणजे लहान वयातच दोघांमध्ये शरीरसंबंध आले आणि येत राहिले. पुढे शिक्षणाच्या निमित्तानं कल्पना पुण्यात आली. पाठोपाठ अविनाशही आला. परत मैत्री, भेटीगाठी, संबंध सुरू झाले. ‘शरीरसंबंधांविषयीचं जबरदस्त आकर्षण’ हा दोघांमधल्या मैत्रीचा दुवा असावा. कारण त्याव्यतिरिक्त दोघांचं कधीही एकमेकांशी पटायचं नाही. शिक्षण संपवून दोघंही नोकरीला लागले तरी रोजची भांडणं सुरूच. कल्पनाला अविनाशपेक्षा चांगली नोकरी होती. पगार चांगला होता. कल्पनाची प्रगती बघून अविनाशला जास्तच असुरक्षित वाटायला लागलं. त्यामुळे बेबनाव वाढले. खूप लहान वयात नातं निर्माण झाल्यामुळे अविनाश अर्थार्जनापेक्षा नातेसंबंधाचाच विचार करत होता. त्या तुलनेत कल्पनाचं ध्येय स्पष्ट होतं. नोकरी-करिअर याबद्दल ती विचार करणारी होती. अविनाश अत्यंत कर्मठ विचारसरणी असलेल्या कुटुंबातला. कुटुंबाबद्दल दुराभिमान असणारा, सरधोपट विचारसरणी असलेला अविनाश कल्पनावर दुरूनही अधिकार गाजवायचा. तिनं ऑफिसमध्ये कोणाशी बोलावं, कोणाशी नाही, कोणाबरोबर अन् कुठं जावं कुठं नाही, कोणते कपडे घालावेत, कोणते नाही हेदेखील अविनाश ठरवायचा. कल्पनाही अविनाशच्या बाबतीत काळजी करणारी पण अविनाशसारखा जाच ती करायची नाही. अविनाशची काळजी म्हणजे सत्ता आणि अधिकारशाहीच होती. शहरात आल्यावर कल्पनाला नवीन मित्रमैत्रिणी, नवे विचार मिळाले. स्वत:च्या सहकार्‍यांच्या तुलनेत अविनाशची काळजी घेणं तिला जास्तच त्रासदायक आणि जाचक वाटायला लागलं. मित्रमैत्रिणींशी होणार्‍या मनमोकळ्या गप्पा, चर्चा यांमधून कल्पनाला त्यांच्यातल्या नातेसंबंधांचा खरा अर्थ समजायला लागला. कोणताही कायदेशीर नातेसंबंध (लग्न) नसताना अविनाश इतका त्रासदायक वागू शकतो, तर लग्नानंतर तो किती त्रास देऊ शकेल, याची कल्पनाला जाणीव झाली. म्हणूनच त्याला घेऊन ती माझ्याकडे आली होती.
पहिल्या ओळखीच्या सत्रानंतर पुढचे तीन-चार सत्रं आम्ही ओळख, मैत्री, आकर्षण, प्रेम, शरीरसंबंध, पवित्र-अपवित्र, पाप-पुण्य अन् योनिशुचितेच्या वैयक्तिक आणि सामाजिक संकल्पना, आकर्षण अन् प्रेम यातला फरक, शरीरसंबंधांची नैसर्गिक आणि मानसिक गरज, लग्न, लग्नित नातेसंबंध अशा अनेक विषयांवर बोललो. अविनाशमध्ये खूप बदल होण्याची गरज होती. त्यानं प्रत्येक वेळी बदल करण्याचं आश्‍वासन दिल्यामुळे कल्पना हे नातेसंबंध टिकवण्यासाठी तयार होती. अनेकदा संधी देऊनही अविनाशच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होत नव्हता. एकेदिवशी मात्र भांडण विकोपाला जाऊन कल्पनानं अविनाशला ठाम नकार दिला आणि हे नातच तोडून टाकलं. कालांतरानं अविनाशला स्वत:च्या चुका समजल्या. तो समुपदेशनासाठी येत राहिला. पण कल्पनाचा ठाम नकार मात्र बदलू शकला नाही. हळूहळू होत चाललेल्या अविनाशमधल्या सकारात्मक बदलांमुळे त्याला नोकरीत मात्र फायदा झाला.
दुसरं उदाहरण नमिता आणि अजिंक्यचं . नमिता बुजरी होती. तिच्यापेक्षा एक-दोन वर्षांनी मोठय़ा असलेल्या अजिंक्यशी तिची मैत्री झाली. अजिंक्यनं तिच्यातला आत्मविश्‍वास जागवला. तिच्यातला बुजरेपणा काढून टाकायला मदत केली. तिचं राहणीमान बदललं. या कालावधीमध्ये दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले. त्याचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रूपांतर जन्मोजन्मी एकत्र राहण्याच्या शपथांमध्ये झालं. दोघांच्या घरून मान्यता होती. नमिताला वडील नव्हते. त्यामुळे अजिंक्यचा आधार तिला हवाहवासा वाटत होता. मुळात हुशार असलेल्या नमिताचा आत्मविश्‍वास तिच्यातला बदलामुळे जास्तच वाढला होता. नोकरीतही तिची घोडदौड सुरू झाली. पुढे लग्न पक्क ठरलं. मैत्रिणीची बायको होणार ही खात्री झाल्यावर अजिंक्यमधला ‘नवरा’ जागा झाला. साखरपुड्यासाठी नमिताच्या आईनं स्वत:च्या बजेटमध्ये बसणारा हॉल ठरवला. तो अजिंक्यनं नाकाराला. तिथे त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आडवा आला. ही गोष्ट नमिताला आवडली नाही. लग्न मोडलं. काही दिवसांनी दोघं परत एकत्र आले. पण अजिंक्यची अधिकारवृत्ती जाईना आणि नमितालाही त्याच्यासाठी एक पाऊल पुढं टाकणं म्हणजे त्याची अरेरावी सहन करणं असं वाटतं होतं. त्यामुळे दोघांमधलं नातं पुढे जाईना. दोघांमधली छोटी छोटी भांडणं, वादसुद्धा अजिंक्य फोन करून नमिताच्या आईच्या कानावर घालायचा. हे नमिताला अजिबात पटायचं नाही. लवकरच छोट्या छोट्या गोष्टींमधली दोघांतली मतभिन्नता त्यांच्या स्वत:च्याच लक्षात यायला लागली. पण नातं तोडवेना. या प्रेमाचं लग्नात रूपांतर होणं हे अजिंक्यच्या दृष्टीनं अर्थातच सोयीचं होत. नामिताला मात्र अजिंक्यच्या बायकोविषयीच्या विशिष्ट कल्पनांच्या साच्यात बसणं अवघड वाटत असल्यामळेु हे लग्न मोडलं.
वरच्या दोन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे खूप लहान वयात एकमेकांना लग्नासाठी दिलेला होकार! पहिल्या म्हणजे अविनाश-कल्पनाच्या उदाहरणात तर शारीरिक संबंध खूपच लवकरच आले. शारीरिक संबंध, त्याविषयीची शारीरिक समज, त्याकरता आवश्यक असलेली शारीरिक वाढ, या संबंधाकडे बघण्याची समाजाची विचारसरणी, शारीरिक बदलांमुळे येणार्‍या ऊर्मींना वाट देण्याचे इतर पर्यायी मार्ग, जीवनशैली जगण्याचा ढोबळ आलेख (बालपण, शिक्षण, अर्थार्जन, लग्न किंवा नातेसंबंध इ.), या आलेखाच्या क्रमवारीची उपयोगिता यापैकी कोणत्याच गोष्टींवर या मुलांनी विचार केला नव्हता.
अविनाश-कल्पना या दोघांच्या बाबतीत मैत्री फक्त शारीरिक संबंधावर आधारलेली असल्यामुळे त्यात प्रेम अन् विश्‍वासपेक्षा अधिकार अन् असुरक्षिततेची भावना अधिक होती. गुणात्मक पातळीवरची मैत्री नसल्यामुळे त्यात स्वत:ला पारखणारा, विकासाच्या दिशेनं नेणारा मार्ग नव्हता. महत्त्वाचं म्हणजे अत्यंत अपरिपक्व वयामुळे लैंगिकतेचा, लैंगिक संबंधांचा अर्थच समजलेला नव्हता. प्रेम, विश्‍वास आणि अत्युच्च प्रकारच्या एकत्वाचा, एकमेकांच्या संमतीनं, संगतीनं, निर्भयतेनं आणि पूर्ण जबाबदारीनं घेतलेल्या शरीरसंबंधाचा अनुभव म्हणजे ‘संभोग’. यात अधिकारशाही, छुपेपणा, चोरटेपणा, जबरदस्ती याचा लवलेशही नसतो किंवा नसावा. यासाठी योग्य वय, निकोप मन, निर्भयता आणि होणार्‍या परिणामांची जबाबदारी पेलण्याची क्षमता हवी! दुर्दैवानं या दोघांच्या नात्यात चोरटेपणा होता. केलेल्या कृतीची जबाबदारी घेऊन त्याचे परिणाम पेलण्याची क्षमताही नव्हती. मैत्रीचं हे नातं स्वओळख, स्वस्वीकार, एकमेकांची पुरेशी ओळख आणि एकमेकांचा आदरपूर्वक स्वीकार या कोणत्याही पायर्‍या पार न करता एकदम शरीरसंबंधावर उतरल्यामुळे गुणात्मकदृष्ट्या कच्चच राहिलं! त्यामुळे कालांतरानं अविनाशचं टिपिकल पुरुषी वागणं हे नात्याच्या आणि स्वविकासाच्या आड येणार आहे हे लक्षात आल्यामुळे कल्पनानं विचारपूर्वक नकार दिला. कोणत्याही नातेसंबंधामध्ये एकमेकांच्या आयुष्यातले बदल जाणून ते स्वीकारणं आवश्यक असतं. तसंच कोणत्याही नात्यामध्ये कोणीही कोणाचंही आयुष्य ताब्यात घेऊन त्यावर अधिराज्य गाजवायला लागलं तर ते नातं ‘रोगट’ होत जातं. अविनाश-कल्पनाचं नातं असंच ‘रोगट’ झालं होतं.
दुसर्‍या केसमध्ये अजिंक्यची आई गृहिणी आणि वडील मोठय़ा पोस्टवर काम करणारे होते. वडील अत्यंत आक्रमक, तर आई स्वभावानं गरीब. या नात्याचं प्रतिबिंबच अजिंक्य त्याच्या आणि नमिताच्या नात्यात शोधत होता. त्याच्या जोडीदाराविषयीच्या कल्पना साधारणपणे आईच्या प्रतिमेशी साधम्र्य असणार्‍या होत्या. याउलट नमिताला वडील नव्हते. आई नोकरी करणारी,स्वत:च्या जबाबदारीवर स्वत:चं आणि कुटुंबाचं पालनपोषण करणारी एक निर्णयक्षम स्त्री असल्यामुळे नमिताही त्याच वृत्तीची होती. संगनमतानं विकास होणारं, स्वातंत्र्य देणारं आणि अपेक्षांची ओझी नसलेलं नातं नमिताला हवं होतं. पाहिजे तसा जोडीदार मिळेपर्यंत थांबायची तिची तयारी होती. अजिंक्यचा नमिताविषयीचा स्वीकार कमी पडत होता आणि आता नमिताही अजिंक्यला बदलायला वेळ द्यायला तयार नव्हती किंवा तिचा धीर संपला होता. या दोन्ही केसेसमध्ये नासमज वयात दिलेला होकार समज आल्यानंतर नकारात बदलला होता. अर्थात हा नकार सहजासहजी दिलेला नव्हता. त्याला अनेक घटक जबाबदार होते. अर्थात लग्नानंतर ही नाती अधिक कोंदट किंवा रोगट होण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घेऊन नकार देणंच योग्य ठरतं!

- लीना कुलकर्णी

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive