Thursday, May 31, 2012

रेल चक्र - 'राजा'चं पार्सल - Railway parcel of Raja

रेल चक्र - 'राजा'चं पार्सल

ही 1960 सालची घटना आहे. त्या वेळी वाडी स्टेशनवर मी तारमास्तर म्हणून नुकताच नोकरीला लागलो होतो. माझी रात्रपाळी होती. रात्री दोनच्या सुमारास पार्सल ऑफिसमध्ये आरडाओरडा सुरू झाला. काय झालंय म्हणून बघायला गेलो तर पार्सल क्लार्क रॉड्रिक्स हमालावर ओरडत होता. त्याचं ओरडणं संपल्यानंतर मी त्याला विचारलं , काय झालंय ? त्याने माझ्याकडे पाहिलं , ' हे बघ आता मी फार बिझी आहे व टेन्शनमध्ये आहे. नंतर सांगेन. '

' ठीक आहे ' म्हणून मी तार ऑफिसात आलो. त्यानंतर एक आठवडा रॉड्रिक्सची माझी भेटच झाली नाही. एक दिवस तो मला रस्त्यात भेटला. माझा प्रश्नांकित चेहरा पाहून तो म्हणाला , ' त्या दिवशी काय झालं याची हकिकत तुला ऐकायची आहे ना. ' तर ती अशी होती.

नालवार इथल्या दगडाच्या खाणीचे मालक , नांगियाशेठ मंुबईहून नालावारला येताना आपला ' राजा ' नावाचा कुत्रा लगेज म्हणून बुक केला होता. ते मंुबई-मदास मेलने नालवारला येणार होते. त्याच गाडीने कुत्र्यालाही पाठवावं असं त्यांनी स्टेशन मास्तरांना सांगितलं. स्टेशन मास्तरांनी त्यांच्याच गाडीने कुत्रा पाठवण्यात येईल , असं आश्वासन दिलं होतं. नालवारला नांगियाशेठ उतरले. परंतु त्या गाडीने त्याचा कुत्रा काही आला नाही. त्यांनी नालवारच्या स्टेशन मास्तरांना चौकशी करायला सांगितलं. ' मी चौकशी करतो. एक-दोन दिवसांत आपला कुत्रा येईल. ' मास्तरांनी सांगितलं.

चार दिवसांनी नांगियाशेठ स्टेशनवर आले. स्टेशन मास्तरांनी कुत्रा आल्याचं सांगितलं. नांगियाशेठनी कुत्रा मिळाल्याची डिलिव्हरी बुकामध्ये सही केली. मग त्यांनी विचारलं , ' कुठे आहे आमचा राजा , कुत्रा. '

' हे काय. ' असं म्हणत मास्तरांनी पोर्टर जवळ उभा असलेल्या कुत्र्याकडे हात दाखवला. ' काय , हा माझा कुत्रा! कुठलं मरतुकडं कुत्रं आणलंय. ब्लडी हेल! ' म्हणत नांगियाशेठनी त्या कुत्र्याला लाथ घातली.

' कुई कुई ' असं विव्हळत ते कुत्रं पळालं. शेजारी उभा असलेला पोर्टर तोल जाऊन पडला. नांगियाशेठ रागाने बेभान झाले होते , ' मास्तर हे कुत्रं माझं नाही. माझा ' राजा ' कुत्रा मला मिळालाच पाहिजे नाहीतर मी माझ्या कुत्र्याच्या बाबतीत हलगजीर्पणा केलेल्या मास्तराची नोकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. '

बुटाचा खाडखाड आवाज करत नांगियाशेठ स्टेशनबाहेर पडले. नालवारच्या स्टेशन मास्तरांना एकदम आठवलं की कुत्रा आल्यापासून वाडीचा पार्सल क्लार्क रॉड्रिक्स कुत्र्याची डिलिव्हरी झाली का , असं अधूनमधून विचारत होता. तेवढ्यात रॉड्रिक्सचा फोन आला , ' मास्तर कुत्र्याच्या पार्सलची डिलिव्हरी झाली का ?'

' झाली. ' मास्तर म्हणाले.

' सुटलो बुवा एकदाचा. ' रॉड्रिक्स आनंदाने म्हणाला. ' तुम्ही सुटलात हे खरं आणि त्या बरोबर नोकरी पण. '

' म्हणजे. ' रॉड्रिक्स हादरलाच.

कुत्र्याच्या डिलिव्हरीची सगळी हकिकत मास्तरांनी त्याला सांगितली. रॉड्रिक्स घाबरला , ' मास्तर माझ्या नोकरीवर गदा तर येणार नाही ना ?'

' पण नेमकं काय झालं होतं ते तरी सांग म्हणजे काहीतरी मार्ग काढता येईल. ' मास्तरांनी दिलासा दिला. रॉड्रिक्सने सुरुवात केली. नांगियाशेठचा कुत्रा मंुबई-मदास मेलने त्यांच्या बरोबर पाठवण्याऐवजी मंुबई-पुणे पॅसेंजरने पाठवला होता आणि पुण्याहून तो कुत्रा खरं म्हणजे पुणे-रायचूर पॅसेंजरने पाठवायला हवा होता. कारण नालवार स्टेशन रायचूर लाइनवर येतं. परंतु तो कुत्रा पुणे-सिकंदाबाद पॅसेंजरने पाठवला गेल्यामुळे वाडी जंक्शनवर उतरवण्यात आलं. कुत्र्याला घेऊन हमाल पार्सल ऑफिसकडे निघाला होता. तो धिप्पाड कुत्रा जागचा हलेना म्हणून हमालाने कुत्र्याला जोरात ओढलं. कुत्र्याचा गळा आवळला गेला. तो कुत्रा चिडला व त्याने हमालाच्या अंगावर झेप घेतली तसा हमाल खाली पडला. त्याच्या हातून कुत्र्याची दोरी सुटली आणि त्याने धूम ठोकली. पहाटे चार वाजता पुणे-रायपूर पॅसेंजर येणार होती त्याने तो कुत्रा पाठवायचा होता. कुत्रा पळाल्याने पार्सल मास्तर रॉड्रिक्स हमालावर ओरडला , ' काहीही कर आणि पुणे-रायपूर पॅसेंजर यायच्या आत ते कुत्रं पकडून आण. ' सगळे हमाल त्या रात्री त्या कुत्र्याला

शोधू लागले. पॅसेंजर यायची वेळ झाली तरी तो कुत्रा काही मिळाला नाही. एका हमालाने शक्कल लढवली आणि प्लॅटफार्मवर भटकणारं कुत्रं पकडून आणलं. तोपर्यंत पॅसेंजर फ्लॅटफॉर्मवर आलेली होती. ' पॅसेंजरमध्ये भरा. ' ऑफिसातून पार्सल क्लार्क रॉड्रिक्स ओरडला.

गाडी गेल्यावर त्या हमालाने पार्सल क्लार्कला तो कुत्रा न मिळाल्यामुळे भटकं कुत्रं पाठवून दिल्याचं सांगितलं. तसा तो पार्सल क्लार्क रॉड्रिक्स हादरला. तुम्ही माझी नोकरी घालवणार म्हणून हमालावर ओरडू लागला. त्यामुळे रोज तो नालवारच्या मास्तरांना फोन करून विचारत होता , ' कुत्र्याची डिलिव्हरी झाली का ?'

ही हकिकत ऐकून नालवारच्या मास्तरांनी नांगियाशेठना तक्रार करू नका म्हणून विनंती केली.

दुसऱ्या दिवशी नांगियाशेठ स्टेशनवर आले व मास्तरांना पेढे देत म्हणाले , ' पेढे घ्या मास्तर

आज आमच्या राजाचा वाढदिवस आहे. '

' तुमचा राजा कुत्रा मिळाला ?' मास्तरांना आश्चर्याचा धक्का बसला.

' त्या शिवाय का त्याचा वाढदिवस साजरा करतोय ?' नांगियाशेठ म्हणाले. ' कसा मिळाला ?' मास्तर म्हणाले.

त्या रात्री वाडी स्टेशनवर पोर्टरच्या हातून नांगियाशेठचा कुत्रा सुटला आणि भटकत दगडाच्या खाणीचे मालक अस्लमखाँच्या घरी गेला. कारण नांगियाशेठ कधीकधी घोड्यावरून नालवारहून वाडीला अस्लमखाँच्या घरी येत असत. त्यांच्याबरोबर कुत्राही असे.

त्यामुळे कुत्र्याला अस्लमखाँचं घर माहीत होतं. अस्लमखाँने नांगियाशेठला तसं कळवलं. अशा रीतीने कुत्रा त्याच्या मालकाच्या ताब्यात गेला आणि वाडीच्या पार्सल क्लार्कच्या नोकरीला जीवदानही मिळालं!

- व्यंकटेश बोरगीर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive