Thursday, May 31, 2012

रेल चक्र - नागाने काढला फणा! Railway snakes hood

रेल चक्र - नागाने काढला फणा!









पार्सल क्लार्क व गुड्सक्लार्क यांची ड्युटी बुकिंग क्लार्क पेक्षा थोडी निराळी असते. कारण इथे यांचा संबंध व्यापाऱ्याशी किंवा दलालाशी येतो. लगेज बुकिंग असलं तरच प्रवाशांशी संबंध येतो. पार्सल व गुड्स बुकिंगमध्ये व्यापारी व दलालाशी संबंध असल्यामुळे राजीखुशीने व्यवहार होतो. त्यामुळे तळतळाट हा प्रकार इथे नसतो. चालत आलेली पद्धत , प्रथा , व मागच्या पानावरून पुढे सुरू या तऱ्हेने इथे काम चालतं.

पार्सल आणि लगेज ऑफिसमध्येही काही चमत्कारिक गोष्टी घडतात. लोकांची पार्सल ऑफिसमध्येच पडून राहतात. घेऊन जायला कुणीच येत नाही. अशी पडून राहिलेली पार्सल ठराविक मुदती नंतर उघडली जातात व त्यातील वस्तुंची यादी केली जाते. ती पार्सल एलपीओमध्ये म्हणजे लॉस्ट प्रापटीर् ऑफिसमध्ये पाठवली जातात. अशीच एक पेटी मुख्य पार्सल बाबू व पोलिसांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. त्या पेटीमध्ये बक्षीसाचे शिल्ड , कप , सटिर्फिकेटस् , बक्षीस मिळालेली पुस्तकं इत्यादी वस्तु होत्या. त्या पेटीवर दीपा शेखर एवढंच नाव लिहिलेलं होतं. यावरून मुख्य पार्सलबाबू जोशींने एवढा अंदाज केला की ही बॅग दीपा शेखरची आहे. पुस्तकं चाळून तिचा तिचा पत्ता मिळवला. सेंट मेरी कॉन्हेण्ट स्कूल , नैनीताल. मुख्य पार्सल बाबूने वैयक्तिक पत्रव्यवहार त्या शाळेशी केला. शाळेकडून उतर आलं की ती आता अमेरिकेत आहे. तिचा अमेरिकेचा पत्ताही शाळेने दिला. अमेरिकेच्या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात आला. दीपाचे वडील अमेरिकेवरून आले. ती बॅग व त्यातली बक्षीसं पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते पार्सल बाबू जोशींना म्हणाले , ' मास्तर तुम्ही खरंच ग्रेट आहात. वैयक्तिक पत्रव्यवहार करून तुम्ही आम्हाला शोधलंत , बोला तुम्हाला काय देऊ ?

' मला काही नको. ' बाबू म्हणाले.

' असं कसं चालेल ? अहो माझ्या मुलीची अशी पेटी जर हरवली गेली असती तर मी त्याचा शोध घेतला नसता का ?'

' यू आर रिअली ग्रेट! खरं म्हणजे मी या पेटीचा क्लेम दक्षिण रेल्वेवर लावलाय व त्यांनी पंचाहत्तर हजार मंजुरी केले आहेत. ' दीपाचे वडील म्हणाले. ' आता तुम्हाला बॅग मिळाली आहे तसं त्यांना कळवून टाका. आम्हीही कळवतो. ' बाबू उत्तरले.

बॅग घेतल्यानंतर ते म्हणाले , ' खरं म्हणजे या बॅगेची किंमत पैशात होऊ शकत नाही. तरीपण तुम्ही फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी घ्यायला हवं. '

' अहो तुमची मुलगी ती माझीच मुलगी. मुलीचं काम केल्याबद्दल बाप कधी त्याचे पैसे घेतो का ?' असं ड्युटीवरचे जोशी म्हणाले.

जाण्यापूर्वी ते पार्सल बाबूंना म्हणाले , ' तुमच्या माणुसकीपूर्ण कर्तव्य तत्परतेमुळेच ही बॅग मला मिळाली. हे मी कधीच विसरू शकणार नाही. '

ज्या वेळी ट्रक वाहतुकीने नीटसं बाळसं धरलं नव्हतं तेव्हाची गोष्ट. तेव्हा सगळी मालवाहतूक रेल्वेनेच व्हायची. एकदा पंधरा फूट लांबीचा एकशे पन्नास किलो वजनाचा कासव रेल्वेने आला. त्या कासवाला ब्रेकमधून उतरवणं काही रेल्वेच्या हमालांना जमेना. पार्सल बाबूंनी हाफकीन इन्स्टिट्यूटला फोन केला. त्यांची माणसं बोलावून घेतली मग ते कासवाला घेऊन गेले. याच दरम्यान हाफकीन इस्टिट्यूटसाठी नाग-सापांची पार्सलसुध्दा यायची. एकदा नागाच्या पार्सलमधून एक नाग बाहेर आला व वेटोळे घालून पार्सलच्या खोक्या शेजारी बसला. एका लगेज पोर्टरनं पाहिलं व तो मास्तरकडे ओरडत आला. ' साहेब पार्सलमधून नाग बाहेर आला आहे आणि चांगलाच मोठा आहे. '

मास्तर पोर्टरबरोबर पार्सल ऑफिसच्या दाराशी आले. नाग पार्सल खोक्याच्या शेजारीच बसला होता. मास्तरांनी हाफकीन इन्स्टिट्यूटला फोन केला ते लोक आले व त्यांनी नागाला पकडलं व पार्सलमध्ये टाकून पार्सलचं खोकं पॅक बंद केलं.


- व्यंकटेश बोर्गीकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive