Thursday, June 21, 2012

शरीरालाच शस्त्र बनविणारी युध्दकला, A war art which makes weapon to body - Kalaripayattu

कधी जमिनीवर, तर कधी हवेत अधांतरी एकमेकांना जिवाच्या आकांताने भिडलेली दोन शरीरं. जिंकू किंवा मरू असे भाव चेहऱ्यावर. चपळाईने होणाऱ्या त्यांच्या हालचाली, कुठल्याही कोनात वळणारी त्यांची शरीरं... किंबहुना शरीर नसतंच तिथे. पूर्ण शरीराचंच झालेलं असतं एक हत्यार... शत्रूवर तुटून पडणारं.

मुंबईतील एनसीपीएचं वर्कशॉप असो वा ठिकठिकाणचे व्होकेशनल क्लासेस, केरळचं परंपरागत कळरीपायटू(मार्शल आर्ट) बघताना प्रेक्षकांवर नजरबंदीच होते. युध्दकलेचा तो आविष्कार तना-मनाला जखडून टाकतो. ही युध्दकला थेट तीनेक हजार वर्षांची परंपरा असलेली. पण आजही जशीच्या तशी जपलेली. तंत्र आणि मंत्रासहीत. विशेष म्हणजे या युध्दकलेचा निर्माता म्हणून लढवय्या परशुरामाचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे परशुरामाने समुदाला मागे रेटून अपरान्त म्हणजे कोकण प्रांत निर्माण केल्याच्या कथा आहेत; तशाच केरळची निमिर्तीही त्यानेच केल्याच्या कथा केरळमध्ये सांगितल्या जातात. साहजिकच कळरीपायटू ही युध्दकलादेखील त्यानेच निर्माण केल्याचं केरळी परंपरा सांगते. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे परशुरामाचं पीळदार नि लवचीक देहयष्टीचं चित्र. आज जे पंरपरागत कळरीपायटू बघायला मिळतं, त्यात योद्ध्याची लवचीकता आणि देहयष्टीच महत्त्वाची आहे. या साम्यामुळेच परशुराम कळरीपायटूचा निर्माता मानला जातो. अर्थात निर्माता कुणीही असो, कळरीपायटू ही एक शास्त्रशुध्द प्राचीन युध्दकला आहे, यात शंका नाही आणि या युध्दकलेचा प्रवास केरळ ते थेट चीन-जपान-कोरिआ असा झाला आहे. आज चीन-जपानमध्ये आढळणारे कुंग-फू, कराटेवगैरेंसारखे युध्दकलेचे प्रकार मूळ कळरीपायटूमधूनच निर्माण झाले आहेत. बौध्दधर्माच्या प्रसराकांबरोबर साधारणपणे इसवीसनाच्या चौथ्या शतकात कळरीपायटू चीनमध्ये आणि तिथून पुढे गेलं, असं म्हटलं जातं. या प्रवासात मूळ कलेत थोडाफार फरक झाला, तरी कुंग-फू किंवा कराटेचं मूळ कळरीपायटूत असल्याचं त्या-त्या कलेतील जाणकार आजही सांगतात.

कळरीपायटू हा जोडशब्द आहे. 'कळरी' म्हणजे आखाडा, जिथे सराव, युध्द केलं जातं. तर 'पायटू' म्हणजे प्रत्यक्ष युध्द. पारंपरिक युध्दकला म्हणून नावारूपाला आल्यामुळे आज केरळमध्ये कळरीपायटू शिकवणारे अनेक आखाडे आहेत. याचं शिक्षण गुरु-शिष्य पंरपरेनेच दिलं जातं. साधारणपणे वयाच्या सातव्या वषीर् विद्यार्थ्याला कळरीपायटूसाठी प्रवेश दिला जातो. मात्र यात पारंगत होता होता शिष्याची पंधरा वर्षं सहज निघून जातात. कारण युध्दाचे हात असोत वा युध्द करताना आघातासाठी-बचावासाठी मारायच्या उड्या असोत, शरीराला ती लवचीकता साधण्यासाठी एवढी वर्षं लागतातच.

कळरीपायटूचं शिक्षण सुरू होतं, ते व्यायामापासून. त्यानंतर तीन टप्प्यांत मुख्य युध्दकलेचं शिक्षण दिलं जातं. सर्वप्रथम केवळ अंगानेच शत्रुला भिडण्याचं शिकवलं जातं. दुसरा टप्पा असतो, लाकडी हत्यार चालवण्याचा. तर तिसऱ्या टप्प्यांत धातुची हत्यारं चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. मुंबईत प्रभादेवी येथील पु. ल. कला अकादमीत कळरीपायटूचे वर्कशॉप्स घेणारा विपीन काळीपूरथ (संपर्क- ९८१९५४९९२०)म्हणतो, 'लाकडी व धातूच्या हत्यारांमध्ये बांबूची छोटी-मोठी काठी, सांबराचं शिंग, खंजीर, तलवार अशा विविध हत्यारांचा समावेश असतो. मात्र हत्यार कुठलंही असो कळरीपायटूमध्ये खरं हत्यार असतं, ते शरीर. हवं तसं वळणारं, हवं तसं वाकणारं. हे शरीर जर आपल्याला वश असेल, तर शत्रूकडे कुठलंही हत्यार असलं तरी बेहत्तर!' यामुळेच 'कळरी' म्हणजे आखाड्यात पाऊल ठेवल्यावर सगळ्यात आधी शरीराला वळवण्याचं-वाकवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

शरीराच्या लवचीकतेचं असलेलं हे महत्त्व लक्षात घेऊनच अलीकडच्या काळात नाट्य-नृत्यांत जाणीपूर्वक कळरीपायटूचा वापर केला जात आहे. प्रसिध्द कथक नृत्यांगना दक्षा शेठ यांनी आपल्या सर्पगती, शिवशक्ती सारख्या नृत्यनाटिकांतून आवर्जून कळरीपायटूचा वापर केला आहे. तसंच प्रसिध्द मल्याळम लेखक-दिग्दर्शक कवलम् नारायण पणिक्कर यांनीही रंगभूमीवर आणलेल्या दूतवाक्यम्, उरुभंगम्, कर्णभारम् अशा नाटकांत कळरीपायटूचा प्रभावी वापर केला आहे. विशेष म्हणजे कथकली किंवा थिय्यमसारख्या शास्त्रीय कलांमध्येही कळरीपायटूचा समावेश झालेला आहे. कथक नृत्यांगना दक्षा शेठ तर थेटच म्हणतात-'मी कित्येक वर्षं कथक नृत्य करत असतानाही जी ग्रेस माझ्या नृत्यात नव्हती, ती कळरीपायटूमुळे आली.'

एकूण कळरीपायटू या केरळमधील पारंपरिक युध्दनृत्याचं स्वरूप पाहिलं, तर ते कलावंताला केवळ ऊर्जाच देत नाही, तर आकर्षक पीळदार शरीर, तना-मनाची चेतना, निरोगीपणा, लवचीकता आणि मजबूतपणाही देतं. त्यामुळेच अलीकडच्या समकालीन कलांमध्ये या युध्दकलेला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. मुंबई, बंगळुरू, हैदाबादसारख्या ठिकाणी कळरीपायटूचे सातत्याने होणारे वर्कशॉप्स त्याचेच निदर्शक आहेत.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive