Monday, August 20, 2012

काचेतील (अ)पारदर्शी कौशल्यपूर्णता

काच हा मोटारीसाठीचा एक महत्त्वाचा घटक आहे. या काचेचे जसे महत्त्व आहे तसेच त्या काचेचे सौंदर्यही मोटारीला अधिक आकर्षक आणि हिऱ्याप्रमाणे दिलखेचक बनवित असते. चालकासमोरची काच जिला विंडशील्ड वा विंडस्क्रीन असे म्हणतात. वाहन चालविताना होणाऱ्या वाऱ्याचा त्रास कमी नव्हे तर नाहीसा करणअयासाठी काचेचा वापर होऊ लागला. तसेच अपघातात सुरक्षिततेसाठी सुरक्षित काचेची निर्मितीही झाली. इतकेच नव्हे तर मागील काच दमटपणामुळे वा बर्फाळ प्रदेशात पारदर्शी राहात नाही, असा साठी काचेमध्येच डिफॉगर बसविण्याची सोयही ज काचेतच करण्यात आली आहे. सूर्याच्या किरणांपासून होणारा उन्हाचा दाहकपणा कमी करण्यासाठी काचेला फिल्मचे आवरणही केले जाऊ शकते त्याचप्रमाणे एखाद्या हल्लेखोराच्या बंदुकीच्या वा पिस्तुलाच्या गोळीपासून संरक्षण करण्यासाठी बुलेटप्रूफ काचही तयार केली जाते. आज या काचेचा उपयोग मोटारीसाठी टाळता मात्र आलेला नाही. त्या काचेमध्ये अधिकाधिक सुरक्षितता आणणे आणि उपयुक्तता वाढविणे या बाबी मात्र अनेक मोटारींमध्ये वा मोटारींच्या उत्पादकांनी ग्राहकांसाठी विविध मॉडेल्समधून मांडल्या आहेत. केवळ सुरक्षितताच नव्हे तर मोटारीच्या उपयुक्ततेबरोबरच ती मोटार आकर्षक कशी दिसेल त्याचाही विचार काचेद्वारे केला गेला आहे. मोटारीला ती कशी सुबक दिसेल अशा पद्धतीने व विशिष्ट कोनातून बसविलेली दिसते. ज्यामुळे वाऱ्याचा अवरोध होतो, पावसाच्यावेळी पाणी झटकन निघून जाते किंवा बर्फाच्या वृष्टीमध्ये बर्फही सहजपणे साचू नये याची काळजीही याच काचेमुळे घेतली जाते. मोटारीच्या चालकाप्रमाणेच प्रवाशांनाही त्याचा फायदा होतो. अशा या काचेचे प्रकार व त्यात केलेली सुधारणा पूर्वीपासून होत आलेली आहे. सूर्याचे किरण थेट डोळ्यावर येऊ नयेत यासाठी काच विशिष्ट प्रकारे वाकविलेली व त्यामुळे सूर्याचे किरण थेट चालकाच्या डोळ्यावर येत नाहीत, अशी रचना त्या विंडशील्डची केलेली दिसते. त्यातून मग त्या विशिष्ट आकाराला सौंदर्यपूर्णता देण्याचाही प्रयत्न झाला कालांतराने काचेला चालकापुढील चौकटीत नीट बसविण्यासाठी नवनवीन शोधामुळे एकसंधपणा आला. ज्यामुळे चालकासमोर विस्तृत अशी काच दिसू लागली. काही काळापूर्वी ही काच दोन भागांमध्ये बसविण्यात येत होती. या दोन भागांसाठी दोन स्वतंत्र चौकटी असत. अर्थात त्या मोटारीही रूंदीने मोठय़ा होत्या पण त्यानंतरही त्या मोठय़ा मोटारींच्या विंडशील्ड एकसंध केल्या गेल्या. मोटारीच नव्हेत तर प्रवासी बस याही आज सौंदर्यपूर्ण काचमयतेचा अविष्कार बनल्या आहेत.
मोटारीच्या आरेखनानुसार काचेला दिलेला आकार, लांबी, रूंदी तसेच उंची इतकेच नव्हे तर त्या काचेची विशिष्ट जाडी या साऱ्या बाबी सुरक्षितता, सुविधा या बरोबरच सौंदर्यपूर्ण अविष्कारासाठीही उपयुक्त ठरू लागल्या. मोटारीच्या या सर्व ठिकाणी लावलेल्या काचेचे सौंदर्य अधिक खुलले पाहिजे त्यामुळे तुमची मोटार नक्कीच आकर्षक वाटू शकेल. अर्थात त्यासाठी त्या काचांची योग्य काळजी घेणेही तितकेच आवश्यक असते हे लक्षात ठेवायला हवे. वायपरचा वापर, त्या वायपरच्या रबरब्लेड योग्यवेळी बदलणे, लॅमिनेशन करणे, कचरा चिकटू न देणे आदी अनेक प्रकारे ही काळजी घेणे गरजेचे असते. काच पुसताना मऊशार कापडाचा वापर करणे, काच धुताना तीव्र अल्कली नसणाऱ्या साबणाचा वापर करणे, बाजूच्या काचां दरवाजामधील खाचांमध्ये जाताना त्यात कडक-कठोर वस्तू अडकणार नाहीत याची दक्षता गेणे अशा अनेक उपायांचा प्रभावी वापर आवश्यक असतो.
काही मोटारींना आज जणू काचेचेच आवरण असल्यासारखे वाटावे, इतका काचमय सौंदर्यपूर्ण अविष्कार या मोटारींना दिल्याचे दिसते. किंबहुना काचेचे त्या मोटारींसाठी असलेले स्वरूप हे आकर्ष तर असतेच पण तितकेच उपयुक्तही असते. अर्थात सर्व वातावरणामध्ये असे रूप प्रत्येकाला आवडते असे नाही. तरीही काचमय मोटार आज आकर्षक वाटतेच.
आरपार पाहाण्यासाठी अगदी आरसपानी पारदर्शकताही या काचेमध्ये जितकी छान वाटते तितकीच त्या काचेपलीकडे काय चालले आहे ते न कळण्याइतकीही अपारदर्शी काच मोटारींसाठी आज हवीहवीशी वाटते. केवळ चालकापुढील काच नव्हे तर बाजूच्या, मागील बाजूच्या आणि अगदी डोक्यावरही काचेचा डोलारा मोटारींना आकर्षक बनवू लागला आहे. काचेबरोबरच प्लॅस्टिक वा अन्य पर्याय उपयोगात आणले गेले आहेत. काही असले तरी काचेची पारदर्शक वा अपारदर्शक प्रतिमा मोटारीची प्रतिभाही उजळून टाकत असते हे नक्की!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive