Thursday, August 23, 2012

मिशन ऑपरेशन - Mission Operaion

मंगळवार पेठ म्हणजे जुनं कोल्हापूर. तिथलं पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम) म्हणजे फुटबॉलशी अतूट नातं. "पीटीएम'मध्ये एक जुन्या काळातील नावाजलेलं नाव म्हणजेच पांडुरंग आनंदराव जाधव ऊर्फ अण्णा. अण्णा पोलिस दलात कॉन्स्टेबल. पंचगंगेच्या दूषित पाण्याचं निमित्त झालं अन्‌ अण्णांना काविळीनं गाठलं. काही महिने उपचार घेतल्यावर कावीळ बरी झाली. मात्र, 2008 मध्ये पुन्हा त्रास सुरू झाला. डॉ. अनिष आमटे यांनी लिव्हर खराब होत असल्याचं सांगितलं.

27 नोव्हेंबर 2011 ची सकाळ. अण्णांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला. लहानपणापासूनच अण्णांच्या घरात सातवा भाऊ म्हणूनच मी वाढलेलो. दिल्लीजवळ गुरगावला मेदांता मेडीसिटी हॉस्पिटलमध्ये अण्णांना घेऊन जा, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. मेदांता मेडीसिटीमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी स्वतंत्र विभाग असून, तेथील डॉ. ए. एस. सॉईन हे उपचार करतील, असं सांगण्यात आलं.

मी आणि अण्णांचा मुलगा पिंटू गुरगावच्या "मेदांता'त पोचलो. खर्च लाखात असून, डोनर मित्र होऊ शकत नाही. तसेच पत्नी, मुलं, भाऊ, भावाची मुलं, आई असे नात्यातीलच डोनर पाहिजेत, असंही सांगण्यात आलं.

मिशन ऑपरेशन
मिशन ऑपरेशन सुरू झालं. पुतण्या रोहित याची लिव्हर मॅच होत असल्याचा अहवाल आला. परंतु, लीगल कमिटीने एक शंका उपस्थित केली. अण्णा व रोहित हे काका-पुतण्या आहेत किंवा एकाच कुटुंबातील आहेत, याचा पुरावा हवा. पुरावा म्हणून फॅमिली फोटोही चालेल, असं सांगितलं. तो मिळविला. लीगल कमिटीने "ओके' केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या लीगल कमिटीची एक परवानगी लागत असल्याचं सांगण्यात आलं. तीही परवानगी मिळविली.
मेदांता मेडीसिटीमध्ये दररोज लाल दिव्याच्या अनेक गाड्या येतातच. पण, नेतेमंडळीही असतात. त्यामुळं त्या ठिकाणी आपला क्रमांक पटकन लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अखेरीस 30 जानेवारी ही तारीख मिळविली.

परप्रांतीयांवर वाद सुरू असताना आम्हाला आमच्या आणि परप्रांतातल्या मुलांनी रक्तदान करून मदत केली.
पहाटे रोहितला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. दुसरीकडे अण्णांनाही. पहिल्यांदा लिव्हर खराब झालेल्या अण्णांचं ऑपरेशन सुरू झालं. त्यांचं ऑपरेशन निम्मं झाल्यावर रोहितच्या ऑपेरशनची सुरवात झाली. रोहितच्या शरीरातील लिव्हरचा काही भाग अण्णांच्या खराब झालेल्या लिव्हरला जोडण्यात आला. तब्बल सतरा ते अठरा तासांनी पहिल्यांदा डोनर रोहितचं ऑपरेशन झाल्याचं सांगण्यात आलं. सुमारे तास-दीड तासानं अण्णांना याच ठिकाणी आयसीयूत आणून ठेवलं.

अण्णा आता ठीक होणार, हे माहीत झालं. नवीन अवयव शरीर लवकर स्वीकारत नाही. त्यासाठी बराच वेळ लागत असल्यानं लिव्हर ट्रान्सप्लांट केलेल्या पेशंटची अधिक काळजी घेतली जाते. रोहित वीस दिवसांनीच फिट झाला. दुसरीकडे अण्णाही फिट होऊ लागले.

हॉस्पिटलनं ई-ट्रीटमेंटची माहिती दिली. तुम्ही तपासण्या कोल्हापुरात करा. त्याचे रिपोर्ट मेल करा, गोळ्यांची नावं पाठवा, आम्ही त्यात बदल करून सुचवितो, अशी ई-ट्रीटमेंट सुरू झाली.

शरीरातील लिव्हरचा भाग किती महत्त्वाचा असतो आणि दुसरीकडे मेडिकल तंत्रज्ञानही किती प्रगल्भ झाले आहे, याचा अनुभव यातूनच मिळाला.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive