Thursday, August 23, 2012

कमी वेळेत मल्टी स्किलिंग - Multi Skilling


माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासामुळे रोजगाराच्या संधी जरी वाढत असल्या तरी आता कंपन्या नव्या उमेदवाराकडून तसेच असलेल्या कर्मचा-याकडूनही अधिकाधिक ज्ञान आणि कौशल्याची अपेक्षा करू लागल्या आहेत. मल्टी स्किलिंगचे महत्त्व सतत वाढत आहे. कित्येकदा या क्षेत्रातील प्रचंड उलाढालीमुळे केवळ पदविकेवर एखाद्याला 50,000 रुपयांची उत्तम नोकरी मिळते, पण पुढील पदोन्नतीसाठी अनेकांना नंतर पदवी घेणे गरजेचे ठरते. ती त्यांना कमी वेळेत  हवी आहे.  थोडक्यात, आता प्रत्येक डिग्री किंवा डिप्लोमासाठी वेगळी 2 किंवा 3 वर्षे देणे कुणालाही आवडणार नाही. कमी वेळात अनेक कौशल्ये आणि अनेक विषयातले ज्ञान घेण्याचे हे युग आहे. 

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने याबाबत काही निश्चित योजना याआधीच राबवल्या आहेत. याशिवाय आता तर घेतलेले ज्ञान आणि कौशल्ये यांचे सतत अद्ययावतीकरण (अपडेटिंग) करणेही गरजेचे झाले आहे. त्यासाठी प्रत्येकाला आयुष्यभर शिकत राहावे लागणार आहे. ही उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी मुक्त आणि दूरशिक्षण पद्धती हाच खरा मार्ग आहे. या शिक्षण पद्धतीत रोज महाविद्यालयात जायची गरज नसल्याने पारंपरिक विद्यापीठाची एक पदवी घेत असताना विद्यार्थी मुक्त विद्यापीठाची आणखी एक पदवी किंवा पदविका घेऊ शकतो.

एक पदवी घेण्याच्या कालावधीत म्हणजे 3 वर्षांतच दोन पदव्या किंवा एक पदवी आणि एक पदविका घेणे मुक्त शिक्षण पद्धतीमुळे शक्य होते. अनेकदा प्रश्न पडतो, की आठवड्यातून केवळ एकदा महाविद्यालयात जाऊन पदवी घेणे शक्य आहे का? याचे उत्तर मोठे रंजक आहे. महाराष्ट्र शासनाने जेव्हा 1989 मध्ये एक विशेष कायदा करून हे विद्यापीठ स्थापन केले, तेव्हापासून आजपर्यंत 30,00,000 विद्यार्थ्यांनी या पद्धतीचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. पारंपरिक विद्यापीठे सहसा पाठ्यपुस्तके देत नसतात. केवळ अभ्यासक्रम निश्चित करणे हेच त्यांचे काम मानले जाते.   कारण त्यांच्या विद्यार्थांना रोज महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक असतात. 

मात्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अत्यंत विद्यार्थी-स्नेही (स्टुडंट-फ्रेंडली) अशी पुस्तके विनामूल्य दिली जातात. जगभरच्या मुक्त विद्यापीठात झालेल्या  Instructional Technology या विषयातील संशोधनावर आधारित असे त्यांचे डिझाइन असल्याने विद्यार्थी स्वतंत्रपणे सहज शिकू शकतो. शिवाय त्याच्या शंकांचे निरसन करायला किंवा एखादा अवघड भाग समजावून द्यायला प्राध्यापक रविवारी महाविद्यालयात उपलब्ध असतात. आता प्रश्न येतो संगणकासारखे शिक्षणक्रम आठवड्यातून एकदाच शिकून कसे येणार? पण हाही प्रश्न सोडवण्यात आलेला आहे.

मुक्त शिक्षण पद्धतीत रोज क्लासेस असूच नयेत, असा काही नियम नाही. त्यामुळे कोणताही चाकोरीबद्ध किंवा पोथीनिष्ठ विचार धरून न बसता मुक्त विद्यापीठाने संगणकासारख्या शिक्षणक्रमांना रोज शिकण्याचीही व्यवस्था केली आहे. मात्र वर्ग दररोज असले तरी ते विद्यार्थ्यांच्या सोयीच्या वेळी असल्याने नोकरी करून शिकता येते. आणि उगीच अव्वाच्या सव्वा फी भरून एखाद्या खाजगी संस्थेचे प्रमाणपत्र घ्यायची गरज न पडता शासनमान्य विद्यापीठाची पदवी/पदविका मिळवता येते. 

नुकताच बारावीचा निकाल लागला. त्याची आकडेवारी पाहता यंदा 9,00,865 विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व आता पारंपरिक महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतात. बदलत्या काळाची पावले ओळखून त्यांना आताच एक अत्यंत स्मार्ट खेळी करणे शक्य आहे. पारंपरिक विद्यापीठात जर ते बी.कॉम.ला प्रवेश घेत असतील तर त्यांनी मुक्त विद्यापीठात बी. ए. ला प्रवेश घ्यावा किंवा पारंपरिक विद्यापीठातील पदवीबरोबर मुक्त विद्यापीठाच्या संगणकशास्त्र शाखेतील एखाद्या डिप्लोमाला प्रवेश घेऊन एका पदवीच्या कालावधीत दोन पदव्या मिळवाव्या.

जेव्हा फारसा विचार न करणारे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी. कॉम. किंवा बी. ए. किंवा बी. एस्सी. अशी एकच पदवी घेऊन 3 वर्षांनी जॉब मार्केटमध्ये उतरतील, तेव्हा स्मार्ट विद्यार्थी मुंबईची एक आणि मुक्त विद्यापीठाची एक अशा दोन सरकारमान्य पदव्या घेऊन स्पर्धेत आलेले असतील. याचा परिणाम सरळ आहे. पण तो साधण्यासाठी दूर आणि मुक्त शिक्षण पद्धतीबद्दलचे चुकीचे पूर्वग्रह सोडून द्यावे लागतील. आज देशातील सर्व 14 राज्य पातळीवरील मुक्त विद्यापीठांपेक्षा महाराष्ट्राच्या मुक्त विद्यापीठात सर्वात जास्त म्हणजे 206 शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. केवळ बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा विचार केला तर -

1) स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे बी. ए. पब्लिक सर्व्हिसेस, 2) आज युवावर्गात अतिशय लोकप्रिय झालेल्या मीडिया क्षेत्रात जाण्यासाठी पत्रकारिता पदवी-पदविका शिक्षणक्रम, 3) बी. ए. (माध्यम : मराठी, हिंदी आणि उर्दू), 4) बी. कॉम. (माध्यम : मराठी आणि इंग्रजी), 5) बी. एस्सी. (ऑप्टोमेट्री), 6) बी. एस्सी. (एम.एल.टी.), 7) बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, 8) कृषी विषयातील पदवी आणि पदविका, 9) संगणक शास्त्रातील इइबी. सी. ए. सारखी पदवी, 10) याशिवाय संगणक शास्त्रातील अनेक पदविका, 11) डिप्लोमा इन हार्डवेअर मेंटेनन्स अ‍ॅन्ड नेटर्वकिंग टेक्नोलॉजीज, 12) बी. एस्सी. इन हॉटेल मॅनेजमेंट, 13) डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी, 14) योगशिक्षक पदविका , 15) डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग.

असे एकूण 206 शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. यापैकी संगणकाचे बहुतेक शिक्षणक्रम हे ऑनलाइन आहेत. याशिवाय सेवांतर्गत शिक्षकांसाठी बी. एड., एम. एड., शालेय व्यवस्थापन पदविका, एम. ए., बी. टेक. (मरीन इंजिनिअरिंग) इ.चा समावेश आहे. 

मुक्त विद्यापीठाने आपल्या शिक्षणक्रमांची रचना अशी केली आहे, की विद्यार्थाची नोकरी मिळण्याची क्षमता (employability) वाढली पाहिजे. त्यामुळे बहुतेक शिक्षणक्रम उपयोजित स्वरूपाचे आहेत. मागच्या वर्षी एम.पी.एस.सी.च्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेत राज्यातून पहिला आलेला विद्यार्थी, सर्व विद्यार्थिनींमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी, सर्व अपंग विद्यार्थ्यांत पहिला आलेला विद्यार्थी हे सर्व मुक्त विद्यापीठाचे पदवीधर होते. यावर्षी तर यू.पी.एस.सी.ला निवड झालेले रमेश घोलप हेही मुक्त विद्यापीठाचे पदवीधर आहेत. त्यांनी आपल्या मुलाखतीत मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकांचा यू.पी.एस.सी.च्या परीक्षेसाठी खास उपयोग झाल्याचे आवर्जून सांगितले आहे.

विद्यार्थ्याला नोकरी आणि नोकरी देणा-या कंपनीला चांगले कर्मचारी उपलब्ध करून देणे हे विद्यापीठाचे कर्तव्य आहे, अशी मुक्त विद्यापीठाची भूमिका राहिली आहे. अगदी वानगीदाखल एकच उदाहरण सांगायचे म्हटले तर लुपिन लिमिटेड या आंतरराष्ट्रीय औषध कंपनीचे देता येईल. तिच्याबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे मुक्त विद्यापीठाचे जे विद्यार्थी बी. एस्सी. इंडस्ट्रीयल सायन्स या शिक्षणक्रमाला प्रवेश घेतात, त्यांची संपूर्ण फी तर ही कंपनी भरतेच, शिवाय त्यांना दरमहा रु. 7000चे विद्यावेतनही देते. त्यानंतर त्याच कंपनीत नोकरीची हमी! विद्यापीठाने महाराष्ट्र पोलिसांबरोबर केलेल्या करारानुसार आज पोलिस दलातील अनेक कॉन्स्टेबल्स पदवीचे शिक्षण घेत आहेत, तर अनेक पोलिस अधिकारी खास पोलिसांसाठी विकसित केलेला ‘एम. बी. ए. पोलिस प्रशासन’ हा शिक्षणक्रम पूर्ण करत आहेत. आपले आहे ते काम करत किंवा दुसरा शिक्षणक्रम शिकताना मल्टी स्किलिंगसाठी या पद्धतीचा वापर करणे सर्वांच्याच, विशेषत: स्मार्ट विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. प्रमुख, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ      

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive