Thursday, August 23, 2012

पर्यावरणाचे पुनरुज्जीवन - resurrection of nature

पर्यावरण वाचविण्याची हाकाटी अनेक जण देत आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करत त्याचे पुनरुज्जीवन करणे, जैवविविधता वाढविणे ही काळाची गरज, असे सांगितले जाते; परंतु नेमके काय करायचे, हेच सांगितले जात नाही. आपल्या दिनचर्येच्या अगदी साध्या गोष्टीतून आपण ते सहजपणे करू शकतो. नेमके काय करायचे, याचे धडे देण्याचे काम केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या करीत आहेत.

केतकी ही मूळची चाळीसगावची, तर मानसी पुण्यातीलच. चाळीसगावला रसायन आणि वनस्पती शास्त्र या दोन्ही विषयांत पदवी घेतल्यानंतर केतकी पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली. तर उपकरण शास्त्रात (इन्स्ट्रुमेंटेशन) अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर पर्यावरण शास्त्रात मानसीने एमएसस्सी केले. दोघींना पर्यावरणाची प्रचंड आवड, त्यातूनच त्यांनी प्रकाश गोळे यांच्याकडे "नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट' हा कोर्स केला. या ठिकाणीच दोघींची ओळख झाली. आवड एकच असल्याने सूर जुळत गेले आणि सुरू झाले "पर्यावरण पुनरुज्जीवनाचे' काम.

पर्यावरणाची आवड असल्याने वनस्पती शास्त्रात करिअर करायचे होते, मात्र पुरेसे विद्यार्थी नसल्याने तो कोर्स महाविद्यालयात सुरू होऊ शकला नाही, असे सांगत केतकी म्हणाली, ""वनस्पती शास्त्रात पदवी पूर्ण करत असताना प्रकाश गोळे यांच्या संस्थेबद्दल माहिती मिळाली. आपल्याला आवडते काम याच शिक्षणातून होऊ शकते, याची जाणीव झाल्याने पुणे गाठले. याठिकाणी मानसीची भेट झाली. दोघींची आवड आणि नक्की काय काम करायचे, हे स्पष्ट असल्याने दोघींनी मिळून काम करायचे ठरवले. आमच्याबरोबर मृणाल नावाची मैत्रीणही होती. पर्यावरणाचे काम करायचे म्हणजे स्वयंसेवी संस्था पाहिजे, असे काही समज होते. आम्हाला "सोशल' आणि "कमर्शिअल' यांचा मध्य साधत काम करायचे हे निश्‍चित केले. त्यातूनच दहा वर्षांपूर्वी "आयकॉस'ची स्थापना केली. सुरवातीला आम्हाला पर्यावरण म्हणजे काय, ते कसे वाचविता येईल, त्यासाठी सामान्य नागरिकांचाही कसा सहभाग घेता येईल याचे प्रबोधन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. मी नोकरीत कधीच रमले नसते. बंद काचेच्या तावदानात वातानुकूलित यंत्रणेच्या कृत्रिम थंड हवेपेक्षा मला नैसर्गिक हवा साद घालत होती. चार भिंतींच्या आत काम करणे अशक्‍यच होते. जे शिकलो, ज्याची मनापासून आवड आहे तेच करायचे, हे निश्‍चित होते. पर्यावरण आपल्याला खूप काही शिकवतो. निसर्ग आपल्याला जे काही देतो, ते केवळ जपणे आपल्या हातात आहे. तो कसा जपावा, त्याचे पुनरुज्जीवन कसे करावे, हेच आम्ही करीत आहोत.''

मानसीला लहानपणापासूनच प्राणी आणि पर्यावरणाची प्रचंड आवड. ती म्हणाली, ""मी "वाइल्ड' या संस्थेबरोबर काम करीतच होते. सामान्य नागरिकांमध्ये साप, नाग याबद्दल खूप भीतीवजा कुतूहल असते. खास करून नागांची सुटका करणे, त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज दूर करणे, या विषयात जागृती करीत होते. त्यातूनच पर्यावरणाच्या पुनरुज्जीवनाची संकल्पना पुढे आली. आम्ही जेव्हा काम सुरू केले, त्या वेळी जमिनी विकत घेण्याचे प्रमाण वाढले होते. शहरीकरणामुळे सिमेंटची जंगले उभी राहिली होती व ती प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होती. अशा वेळी पर्यावरणपूरक काय उपाय देता येईल, याचा आम्ही विचार केला. तीन प्रमुख विषयांवर काम करायचे, हे निश्‍चित होते. त्यातील पहिला भाग म्हणजे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन. त्यामध्ये प्राणी, झाडी, माती याचे व्यवस्थापन करणे, नैसर्गिक ओढ्यांना बांध घालणे, काढ राखणे हे महत्त्वाचे आहे. त्यातून पाणी आणि वाहून जाणारी माती वाचते. त्याचा फायदा प्राण्याबरोबर माणसांनाही होतो. दुसरा भाग म्हणजे "इको लॅंडस्केपिंग'. म्हणजे देशी झाडे वापरून बागा तयार करणे. शहरातही सोसायट्यांमध्ये देशी झाडे वापरून आपण पर्यावरण संवर्धन करू शकतो. यासाठी सांडपाण्याचा उपयोग करता येतो. तिसरा भाग म्हणजे "निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास'. आपल्याकडे डोंगरांचे सपाटीकरण होत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अंधश्रद्धेतून वणवे लावले जातात. डोंगरावर निसर्ग फुलवायचा आणि तेथे पर्यटन स्थळ विकसित करायचे. वणवे लावल्यानंतर जे गवत येते, ते निकृष्ट दर्जाचे असते.''

नागरिकांना केवळ उपाय सांगून भागणार नाही. त्यांना पर्यायसुद्धा दिले पाहिजेत, असे स्पष्ट करीत केतकी म्हणाली, ""आठ वर्षांपूर्वी आम्ही देशी झाडांची नर्सरी सुरू केली. सुमारे दीडशे जातींची झाडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता आली आहे. फक्त त्याला दिशा देता आली पाहिजे. स्वतःचे घर प्लॅस्टिकमुक्त ठेवणे, आठवड्यातून एक दिवस "नो व्हेईकल डे' अथवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, सोसायटी अथवा बंगल्याला सिमेंटचे कुंपण घालण्याऐवजी तारेचे कुंपण घालून त्याभोवती देशी वनस्पती लावणे हे प्रत्येकालाच सहज शक्‍य आहे. अनेक मोठ्या कंपन्यांकडे खूप जमीन असते, अशा ठिकाणी देशी झाडे लावून प्रदूषण कमी करता येऊ शकते. दिवसेंदिवस "देवराई' कमी होत आहे. त्याचे गावाला महत्त्व पटवून देऊन त्याचे व जंगलांचे पुनरुज्जीवन करण्याचा आमचा मानस आहे.''

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive