Tuesday, November 20, 2012

नियोजन, शिस्त आणि संयम!


महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठी जनांच्या मनावर गारूड केलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कारावेळी मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत लाखो शिवसैनिक , सामान्य जनांनी गर्दी केली होती . एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या जमावाचे नियोजन , त्यांची सुरक्षा आणि अंत्ययात्रा सारे काही विनासायास , शांततेत पार पाडण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांनी चोख पार पाडली . मोठ्या संख्येने व्हीआयपींनी हजेरी लावूनही या व्यवस्थेला गालबोट लागले नाही . यासाठी आधीपासूनच पोलिसांनी केलेले नियोजन कामी आलेच . त्याचबरोबर उपस्थित शिवसैनिकांनीही शिस्त आणि संयमाचे अनोखे दर्शन घडवले .

पोलिस झाले शिवसैनिक

अंत्ययात्रा मातोश्रीपासून सुरू होणार असल्यामुळे येथील सुरक्षा हा कसोटीचा विषय होता . इथे राज्य राखीव पोलिस दल , शीघ्र कृती दल आणि स्थानिक पोलिस मिळून दोन शिफ्टमध्ये हजार जवान तैनात करण्यात आले होते . कलानगर परिसराचे पाच भागात विभाजन करून प्रत्येक भाग एकेका एसीपीच्या अखत्यारित दिला होता . निधनाच्या दिवशी इथे प्रचंड तणावाचे वातावरण होते . ते हाताळण्यासाठी सुमारे ५० पोलिस भगवे कपडे घालून शिवसैनिकांच्या रुपात जमावात मिसळले . मीडियाच्या ओबी व्हॅनवर असलेला शिवसैनिकांचा राग लक्षात ठेवून त्यावर भगवे झेंडे लावण्यात आले होते . ​ शिवसैनिकांना हाताळण्यासाठी आम्ही पब्लिक अनाऊन्समेण्ट सिस्टीमचा उत्तम वापर केला . भावनिक आवाहन करून शांतता पाळा असे सांगितले , तेव्हा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला . एसआरपीएफचे पोलिस हिंदीतून बोलतात , त्यामुळे शिवसैनिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांकडे देण्यात आली . हे एकाप्रकारचे सायकॉलॉजिकल वॉरफेअर होते आणि बळाचा वापर करता भावनिक पातळीवर ते हाताळून आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली , अशी नांगरे पाटील यांनी दिली .

जबाबदारीचे वाटप

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग , तेथील सुरक्षा याचे नियोजन पोलिसांनी आधी तयार केले . त्यासाठी अंत्ययात्रेच्या मार्गाचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला . अंत्ययात्रेच्या दिवसाची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाटून घेतली होती . सहपोलिस आयुक्त ( गुन्हे ) हिमांशू रॉय तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण सांळुके यांच्याकडे शिवाजी पार्क परिसराची जबाबदारी सोपवण्यात आली होती . सहपोलिस आयुक्त ( प्रशासन ) हेमंत नगराळे यांच्याकडे अंत्ययात्रेची जबाबदारी होती . अतिरिक्त पोलिस आयुक्त ( पश्चिम विभाग ) विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे मातोश्री परिसराची तर सह पोलिस आयुक्त ( कायदा आणि सुव्यवस्था ) सदानंद दाते यांच्याकडे या सर्वांच्या समन्वयाची जबाबदारी होती . प्रत्येक अधिकाऱ्यासोबत एक ते दोन पोलिस उपायुक्तांची टीम देण्यात आली होती .

व्हीआयपींचे नियोजन

अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने व्हीआयपी हजर होते . त्यांच्या आगमनामुळे गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून शिवसेनाप्रमुखांचे पार्थिव ठेवलेला रथ शिवाजी पार्कवर येईपर्यंत त्यांना व्हीआयपींना विमानतळावरच थांबवण्यात आले . व्हीआयपींच्या आगमनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग राखीव ठेवला होता . त्याच मार्गाने शिवसेनाप्रमुखांचे पार्थिवही शिवाजी पार्कवर आणण्यात आले .

रस्ते बंद

शिवाजी पार्कवर पाचशे कामगारांच्या मदतीने बॅरीकेड्स लावण्याचे काम हाती घेण्यात आली . पहाटे पाचपर्यंत ते पूर्ण करण्यात आले . शिवाजी पार्क परिसरात साडेतीन हजार पोलिस तैनात होते . आजूबाजूच्या शाळा आणि लग्नाच्या हॉलमध्ये रात्री काही तास या पोलिसांना विश्रांती देण्यात आली . शिखांच्या गुरुसभेने त्यांच्यासाठी फूड पॅकेट्सची जबाबदारी घेतली होती . शिवाजी पार्कच्या क्षमतेपेक्षा जास्त जमाव अंत्ययात्रेला उपस्थित राहणार याची कल्पना असल्यामुळे पाच किमीच्या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले . त्यामुळे शिवाजी पार्कच्या क्षमेतेपेक्षा पाचपट लोकांना या परिसरात सामावून घेता आले , अशी माहिती हिमांशू रॉय यांनी दिली आहे . दर्शनासाठी आलेल्या लोकांना मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्या जवळ असलेल्या प्रवेशद्वाराने प्रवेश देण्यात आला .

कलानगरचा तो क्षण

शिवसेनाप्रमुखांची तब्बेत सुधारतेय , असे सतत मातोश्रीमधून सांगितले जात असल्याने साहेब कधी दर्शन देणार असा सवाल शिवसैनिकांकडून विचारला जात होता . मात्र शनिवारी सायंकाळी डॉ . जलील परकार बाहेर आले आणि त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची बातमी दिली . ती ऐकताच शिवसैनिक हंबरडा फोडून रडू लागले आणि काही क्षणातच अश्रू सावरणाऱ्या गर्दीच्या मुठी आवळल्या . साहेबांची प्रकृती आश्चर्यकारकरित्या सुधारत असून ते तुम्हाला दर्शन देण्यासाठी बाहेर येतील , असे शिवसेना नेते सतत सांगत होते . त्यामुळे आमच्याशी खोटे बोलणाऱ्या या नेत्यांना बाहेर बोलवा , त्यांनी संघटनेची वाट लावली आहे त्यांना धडा शिकवायचा आहे , असे सांगत काही शिवसैनिक पोलिसांच्या अंगावर धावून गेले . यावेळी सहायक पोलिस आयुक्त मधुकर संख्ये यांनी त्यांना शांत केले . मातोश्रीबाहेरचा ताबा त्यांच्याकडेच असल्याने ते रोज त्यांच्याशी संवाद साधत त्यांना शांत करीत होते . त्यामुळे त्यांचा चेहरा ओळखीचा होता . सुमारे दोन तासांच्या कसरतीनंतर या गर्दीला आवर घालण्यात त्यांना यश आले .

सेफ्टी ऑडिट

कोणत्याही प्रकारे तणाव निर्माण होऊ नये , यासाठी मुंबईतल्या २५ धार्मिक नेत्यांशी पोलिसांनी संपर्क ठेवला होता . कोणतीही अनुचित घटना होणार नाही , तुम्ही मात्र संयम पाळा , असे आश्वासन पोलिसांनी नेत्यांना दिले . शिवसेनेचे खासदार संजय राऊत , चिटणीस अनिल देसाई , विनायक राऊत , सुभाष देसाई हे नेते उद्ध्व ठाकरे यांच स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी पोलिस संपर्कात होते . अंत्ययात्रेत लाखोंचा जमाव येऊनही अनुचित प्रकार झाला नाही याचे श्रेय शिवसैनिक आणि पोलिसांच्या टीम वर्कला जाते . पोलिसांनी सर्व परिसराचे सेफ्टी ऑडिट केले होते , अशी माहिती दाते यांनी दिली .


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive