Thursday, November 15, 2012

वेटलॉस नव्हे फॅटलॉस Weight loss and Fat loss

वजन कमी करायचं म्हणजे शरीरातली चरबी काढायला हवी. त्यासाठी कित्येकजण योग्य आहारापेक्षा महागड्या पावडरी-गोळ्यांचा वापर करतात. असं करुन वजन उतरवणं अत्यंत चुकीचं आहे.

सध्या ठिकठिकाणी आणि विशेषतः सार्वजनिक ठिकाणी विविध कंपन्यांची महागडी उत्पादनं खपवण्यासाठी एक हुकुमी एक्का वापरला जातो आणि तो म्हणजे शरीरातील चरबी मोजण्याचं मशीन! शरीरातील चरबी , क्षार यांचं प्रमाण त्या मशिनच्या सहाय्यानं मोजलं जातं आणि त्यानुसार चरबी जास्त आहे किंवा हाडांमधलं क्षारांचं प्रमाण कमी आहे असं सांगितलं जातं. मग , चरबी कमी करण्यासाठी प्रचंड महागड्या पावडरी आणि क्षार वाढवण्यासाठी हजारो रुपयांच्या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे दिल्या जातात.

खरं तर अशा प्रकारचं मशीन आहारतज्ज्ञही वापरतात. त्याचा उपयोग नक्कीच होतो ; कारण ते आपल्या आरोग्याचा आरसा आहे. समतोल आहार आणि योग्य तो व्यायाम करून आपण आपलं आरोग्य नीट जोपासू शकतो. त्यासाठी कुठल्याही महागड्या साधनांची गरज नसते. ज्यांना व्यायामाचा कंटाळा आहे आणि ज्यांच्या जिभेवर ताबा राहातच नाही असे लोक पावडरी किंवा गोळ्यांसारख्या तत्सम सोप्या उपायांना बळी पडतात आणि हजारो रुपये खर्ची घालतात.

अनेकांना घाबरवणारी ही शरीरातील चरबी म्हणजे नक्की प्रकार तरी काय आहे हे आपण जाणून घेऊ. आपलं शरीर हे अनेक घटकांनी बनलेलं असतं. यात चरबी , हाडं , पाणी आणि स्नायू याचं समावेश असतो. या प्रत्येक घटकाचं शरीरातलं योग्य प्रमाण ठरलेलं आहे. ते कमी- जास्त झालं तर त्याचे परिणाम शरीराला भोगावे लागतातच. शरीरातली चरबी वाढणं म्हणजे अनारोग्याला आमंत्रण! बऱ्याच बारीक आणि सडसडीत दिसणाऱ्या लोकांना आपल्या वजनाचा आणि शरीराचा अभिमान असतो ; पण या लोकांमध्येही चरबीचं प्रमाण जास्त असू शकतं.

सध्या वजन कमी करताना वजनापेक्षा चरबी कमी करण्यावर जास्त भर दिला जातो आणि ते योग्यच आहे. याचं उदाहरण म्हणजे चुकीचा आणि अत्यंत कमी असा आहार , आहारात प्रथिनांची कमतरता , व्यायामाचा अभाव किंवा व्यायाम आणि आहाराचा चुकीचा मेळ यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यापेक्षा स्नायूंची झीज होऊ शकते. अशानं चरबी आणखी वाढते. यामुळे वजन कमी झालं , तरी ते योग्य प्रकारे कमी झालं असं म्हणता येत नाही , कारण त्यात शरीराला आवश्यक त्या गोष्टींची झीज होते. स्नायू कमी झाले , की शरीराचं चयापचय कमी होतं आणि शरीराची अंतर्गत ठेवण बिघडून चरबी अजूनच वाढू लागते आणि परत वजनही वाढू लागतं. अशा प्रकारे वाढलेलं वजन आधीच्या वजनापेक्षाही वाईट असू शकतं.

wetloss 
 आपलं वय जसं वाढतं तसं आपली शरीरात चरबीची साठवण करायची प्रकृती वाढीस लागते. पुरुषांमध्ये चरबीचं प्रमाण २०% पेक्षा कमी , तर स्त्रियांमध्ये ३०% पेक्षा कमी असायला हवं. योग्य त्याप्रमाणात असलेली चरबी आपल्या अनेक महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांना सुरक्षित ठेवत असते.
त्यामुळे यापुढे वजन कमी करायचे असेल तर वेटलॉसपेक्षा फॅटलॉसवर भर देणं आवश्यक आहे , तसंच ज्यांचं वजन कमी आहे किंवा नॉर्मल आहे , त्यांनीदेखील आपल्या शरीरात किती चरबी आहे ते तपासून घेणं आवश्यक आहे. तसंच हे प्रमाण नॉर्मल राहाण्यासाठी योग्य त्या उपायांचा अवलंब करा , महागड्या गोळ्या किंवा पावडरीचा नाही.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive