Saturday, January 5, 2013

गॉड ब्लेस 'अमेरिकन इंडियन'

भारतीय वंशाच्या ऍमी बेरांसह तुलसी गबार्ड प्रतिनिधिगृहात

वॉशिंग्टन- अमेरिकेची लोकशाही उदारमतवादी आहे, याची साक्ष शुक्रवारी हाऊस ऑफ रिप्रेझंटेटिव्हमध्ये मिळाली. या ऐतिहासिक दिवशी भारतीय वंशाचे डॉ. ऍमी बेरा आणि हिंदू धर्मावर प्रेम करणाऱ्या तरुण राजकारणी तुलसी गबार्ड या दोन नेत्यांनी सभागृहात प्रवेश केला. पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांचे अमेरिकेतील वाढते वर्चस्व या घटनेतून प्रकर्षाने समोर आलेच; त्याच वेळी अमेरिकेची उदारमतवादी बाजूही झळाळून उठली.

यापूर्वी दलीपसिंग संधू (1950) आणि बॉबी जिंदाल (2005) अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझंटेटिव्हवर (प्रतिनिधिगृह) निवडून आले होते. त्यानंतर हा मान व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या 47 वर्षे वयाच्या बेरा यांना मिळाला. कॉंग्रेस निवडणूक जिंकणाऱ्या गबार्ड (वय 31) या प्रतिनिधिगृहात बायबलऐवजी गीतेला साक्षी ठेवून शपथ घेणाऱ्या पहिल्या नेत्या ठरल्या. प्रतिनिधिगृहाचे सभापती जॉन बोहनेर यांनी त्यांना शपथ देवविली.

बेरा यांचे वडील बाबूभाई शपथविधीसाठी उपस्थित होते. "माझा माझ्या डोळ्यांवर विश्‍वास बसत नाही,' असे भावुक होऊन त्यांनी सांगितले. "2008 मध्ये ऍमीने निवडणूक लढविण्याबद्दल सांगितले. आम्ही साऱ्या कुटुंबाने त्याला एकमुखी पाठिंबा दिला. ऍमी अतिशय कठोर परिश्रम करणारा माणूस आहे,' असे कौतुक त्यांच्या शब्दांतून ओसांडून वाहत होते. त्यांची पत्नी आणि ऍमी यांची आई शाळेत शिक्षिकेचे काम करते. तुलसी गबार्ड या बहुसांस्कृतिक जगाच्या आदर्श प्रतिनिधी मानल्या जातात. तरुण वयातच त्यांनी राजकारणात आपले स्थान बळकट केले आहे.

-------------------------------------------------
माझे वडील 1950 मध्ये गुजरातहून अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यांचे "अमेरिकन ड्रीम' माझ्या रूपाने आज पूर्ण होत आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध बळकट करण्यावर माझा भर राहील.
- ऍमी बेरा
-------------------------------------------------
भगवद्‌गीतेतील शिकवणुकीने मला आयुष्यभर प्रेरणा दिली. त्यामुळे गीतेची माझी वैयक्तिक प्रत मी शपथ घेताना सोबत आणली होती. गीतेने इतरांची आणि देशाची सेवा करण्याची शिकवण मला दिली.
- तुलसी गबार्ड

-------------------------------------------------
तुलसींचे कुटुंब कीर्तनात
तुलसी यांचे आई-वडील कॉकेशियन वंशाचे असले, तरी ते हिंदू रीतीरिवाज पाळतात. "विकीपिडिया' संकेतस्थळावरील माहितीनुसार, तुलसी यांचे वडील माईक मंत्रोपचाराद्वारे ध्यानधारणा करतात. कीर्तनात रमतात. लहान वयातच तुलसी यांनी हिंदू धर्म आचरणात आणायला सुरवात केली.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive