Friday, January 4, 2013

Now Cloud mobile started


क्लाऊड मोबाइलची नांदी



मोबाइलमध्ये ६४ जीबीचे मेमरीकार्ड असले तरी ते आजकाल आपल्याला कमी पडते . मोबाइलमधील स्टोरेजची ही वाढती गरज लक्षात घेऊन क्लाऊड कप्युटिंगचे तंत्र मोबाइलमधील मेमरीसाठीही वापरले जाणार आहे आणि त्यासाठी कुठल्या कार्डचीही गरज भासणार नाही . मुंबई आयआयटीमध्ये सुरू असलेल्या टेकफेस्टमध्ये या तंत्राची नांदी पाहायला मिळाली .

सध्या डेस्कटॉपसाठी वापरण्यात येत असलेल्या क्लाऊड टेक्नॉलॉजीचा वापर लवकरच मोबाइलमध्येही होणार आहे . नवीन वर्षात मार्केटमध्ये येणारे स्मार्टफोन याच टेक्नॉलॉजीवर आधारित असतील , असे ' रेड हॅट ' चे उपाध्यक्ष मायकल टीमन यांनी ' मटा ' शी बोलताना स्पष्ट केले . टेकफेस्टमध्ये ओपन सोर्स आणि क्लाऊड कम्प्युटिंग या विषयावर टीमन याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . यावेळी त्यांनी या दोन्ही विषयांची माहिती दिलीच , शिवाय त्यांचा वापर करताना येणाऱ्या अडचणी किती महत्त्वाच्या आहेत याचाही आढावा घेतला .

असे बदलले फेसबुक

आज वापरात असलेल्या फेसबुकचा चेहरा घडवणाऱ्या जॉयल्सिन गोल्डिफेन यांनी आयआयटीमध्ये जमलेल्या मुलांशी संवाद साधला . ' बदल हा फेसबुकचा स्थायी भाव असून या वेबसाइटवर तुम्हाला तो नेहमीच पाहायला मिळतो . हे बदल करताना आम्ही डिटरमिनेशन विरुद्ध मॅजिक , फ्रेशनेस विरुद्ध स्टेलनेस , कन्झम्पशन विरुद्ध इंटरअॅक्शन या त्रिसूत्रीचा वापर करतो ', असे त्यांनी स्पष्ट केले . सुरुवातीला फेसबुक एकदम साधे होते . यानंतर २००९ मध्ये त्यात सातत्याने बदल करण्याचे आणि एखाद्या वृत्तपत्रासारखं लूक देण्याचे ठरले . त्यानुसार न्यूज फीड , कमेंट आशा विविध सुविधा सुरू झाल्या , असेही श्रीमती गोल्डिफेन यांनी स्पष्ट केले .

कॉफी देणारा रोबो

टेकफेस्ट म्हटले की रोबोंची मंदियाळी . यावर्षी कॉफी देणाऱ्या रोबोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे . हा रोबो टेबलावरची कॉफी पाहिजे त्या ठिकाणी नेऊन देतोच , शिवाय एका ग्लासातून दुसऱ्या ग्लासमध्ये समप्रमाणात कॉफी ओतण्याचे कामही तो करतो . या रोबोप्रमाणेच टेकफेस्टमधील स्पाय विमान , छोटेखानी हेलिकॉप्टर पाहण्यासाठीही गर्दी झाली होती . दरम्यान , टेकफेस्टमध्ये पहिल्या दिवशी २४ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर मुंबई आणि पुण्यातील १६ शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांनीही भेट दिली . सर्व स्पर्धांची प्राथमिक फेरीही पार पडली .

राकेश शर्मा यांना भेटण्याची संधी

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा आज , शुक्रवारी दुपारी चार वाजता आयआयटीच्या कॉन्व्होकेशन हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive