Tuesday, March 19, 2013

Aarti Ankalikar-Tikekar संगीताची श्रीमंती आरती अंकलीकर - टिकेकर


चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (रियाज) आणि संधी या चार गोष्टींची गरज असते. आरती अंकलीकर - टिकेकर यांना आवाजाची देणगी तर मिळालीच होती, जोडीला आईवडिलांचे संस्कार, गुरूंची आणि परमेश्‍वराची कृपा यांमुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनंच केलं...

आईनं शिकवलेलं पहिलं गाणं आठवतंय मला. "तार मय्या रघुकूल रामचंद्रैय्या.' आमच्या बाल्कनीत बांधलेल्या झोपाळ्यावर बसून मी झोके घेते आहे आणि आईनं शिकवलेली गाणी एका पाठोपाठ एक म्हणते आहे. पाच वर्षांची असेन मी! गाण्याचं जणू वेड लागलेलं... त्यातल्या सुरावटीचं, लयीचं आणि नादमय शब्दांचं. आई-बाबा दोघांनाही गाण्याची खूप आवड. गाणं हे व्यवसाय म्हणून स्वीकारायचा काळ नव्हता तो. त्यामुळं आई-बाबा हौशी गायक होते. माझ्या रियाझाची खरी सुरवात या झोपाळ्यावर झाली आणि पहिला गुरू म्हणजे माझी आई!

कालांतरानं मी वसंतराव कुलकर्णींकडे तालीम घेतली; आग्रा-ग्वाल्हेर घराण्याची. त्यानंतर किशोरीताईंकडे. मला असं वाटतं, चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (मेहनत, रियाझ) आणि संधी या चारही गोष्टींची गरज आहे; त्याचं प्रमाण कमी-जास्त असू शकतं. अतिशय उत्तम आवाज असणाऱ्याला मेहनत कमी करावी लागते; परंतु, जड आवाज असणाऱ्याला मेहनत जास्त करावी लागते. नैसर्गिक देणगी म्हणावी, तर मला निसर्गानंच जरा "बरा' म्हणता येईल अशा आवाजाचं वरदान दिलेलं. कष्ट करून घेणारे आई-वडील, तेव्हा जागोजागी होणाऱ्या संगीत कार्यक्रमांना जाण्याची मिळालेली संधी, प्राथमिक शाळेतील संगीतवेडे जागरूक संगीत शिक्षक आगाशे सर, वेळोवेळी स्पर्धांमधून व कार्यक्रमांमधून गायला मिळालेल्या संधी, गुरुकृपा आणि परमेश्‍वरी कृपा या सगळ्यांमुळंच मी गाण्याचा आनंद घेऊ आणि देऊ शकते.

वसंतरावांकडचा सकाळचा नऊचा क्‍लास आठवतोय. मला पोचायला 2-3 मिनिटं उशीर झाला असावा. सर त्यांच्या गादीवर तक्‍त्याला टेकून बसलेले. पांढरं शुभ्र धोतर, पांढरा झब्बा, व्यवस्थित विंचरलेले कुरळे केस. समोरच्या तबकात तंबाखू, सुपारी, विड्याची पानं, सरांच्या अंगठ्याच्या नखात चुना, डाव्या हातात तळहातावर तंबाखू. मला पाहताच चेहऱ्यावर नाराजी. मला म्हणाले, ""घड्याळात पाहतेस ना किती वाजले?'' मी- ""पण सर..'' ""बस.. उशिरा आली.'' सर - ""ख्यालाच्या आवर्तनामध्ये दुसऱ्या मात्रेवर समेवर येऊन चालेल का? वेळेचं भान नको का ठेवायला?'' ताल म्हणजे काय, आवर्तन म्हणजे काय, याचा मिळालेला पहिला धडा होता तो. असे शिस्तप्रिय, वक्तशीर, मितभाषी, आतून खूप प्रेम करणारे, वरवर कोरडे वाटणारे सर.

त्यांच्याकडची बारा वर्षं अतिशय शिस्तबद्ध, तालमीत गेली. गुरुकुल पद्धतीतून बाहेर पडली होती संगीत शिक्षण पद्धत. तो काळ होता "क्‍लासिकल' संगीत शिक्षणाचा, म्हणजे क्‍लासमध्ये जाऊन शिकण्याचा. सरांच्या क्‍लासला अनेक दिग्गज कलाकार येत असत. अभिषेकी बुवा, माणिकताई वर्मा, पं. सी. आर. व्यास वगैरे. आमचा गुरुपौर्णिमेचा उत्सवही दणक्‍यात होत असे. मोठमोठे गायक आमची गाणी ऐकायला येत असत. प्रोत्साहन देत, कौतुक करत व वेळोवेळी मार्गदर्शनही करत. माणिकबाईंनी बुद्धिमत्तेचं गाणं सहज व गोड करून कसं गायचं ते सांगितलं. अभिषेकीबुवांनी सोपे हृदयस्पर्शी सूर कसे लावायचे, उत्कटता, स्वरभाव, स्वराचा लगाव काळीज पिळवटणाऱ्या स्वराकृती हे सगळं दाखवून दिलं. व्यासबुवांकडून रागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, रागविचार, आकर्षक बंदिशी हे शिकलो. प्रत्येक क्षण मला खरं तर काहीतरी शिकवून गेला, अजूनही शिकवत असतो.
आता मला लक्षात येतं, की माझ्या शिष्यांकडूनही मी शिकत असते.

किशोरीताईंकडे चाललेला यमन मनात रुंजी घालतोय, समोर दिसतोय, दरवळतोय, जिभेवरदेखील यमनचीच चव रेंगाळतेय. केवळ त्या आठवणींनी मन जणू यमनच झालंय. ताईंकडे यमनची तालीम चाललेली असतानादेखील असंच वाटायचं, मीच यमन झाल्यासारखं. सगळं जग यमन झाल्यासारखं वाटे. त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतरदेखील यमनमध्ये तरंगल्याचा आभास होई. अंतर्मनामध्ये यमनच चालू असे. ताई म्हणत, ""रागाला शरण जा, तोच तुम्हाला वाट दाखवेल.'' ताईंचा श्‍वास म्हणजेच संगीत. संगीत हेच जीवन. त्यांची गुरूवर अपार भक्ती. गुरू म्हणजे त्यांचीच आई- गानतपस्विनी - "मोगूबाई.' ताईंनी शिस्तबद्ध गायकी पचवून आपली स्वयंभू, स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. रागाचं विशाल रूप त्यांना दिसलं आणि आम्हालाही त्याची अनुभूती दिली. मी स्वत: यमन होते तेव्हा काय घडत असतं, याचा साक्षात्कार करवला.

यश म्हणजे काय? पैसा, नाव, कीर्ती मिळवणं म्हणजे यश; मनातली स्वप्न पूर्ण होणं म्हणजे यश; की श्रोत्यांना भावविभोर करणं म्हणजे यश? चांगला माणूस बनणं म्हणजे यश की यशस्वी कलाकार होणं म्हणजे यश? निरंतर साधनेत रमणारं मन घडवणं म्हणजे यश, की सातासमुद्रापलीकडे कार्यक्रम करणं म्हणजे यश? या विचारांच्या भोवऱ्यात मन भरकटत असताना आठवतो तो माझ्या गुरूंबरोबर गायलेला राग भैरव. पं. दिनकर कायकिणी- आग्रा घराण्याचे अध्वर्यू- त्यांनी भैरव शिकवला. खरं तर उभाच केला डोळ्यांसमोर. राग ही केवळ एक स्वराकृती नसून, तरल भावाचं एक वलय आहे. अलगद तरंगणारं, गायकाच्या आणि श्रोत्याच्या तरल मनाला तरंगवणारं. पं. कायकिणी गुरुजींची काही वाक्‍यं इथं आठवतात-
"शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नसून आत्मरंजनासाठी आहे.'
"भारतीय संगीत हे दोन स्वरांना जोडणाऱ्या दुव्यात दडलेलं आहे.'
मागं वळून पाहताना वाटतं, शिस्तप्रिय, कडक स्वभावाच्या माझ्या वडिलांनी माझा रियाझ करून घेतला नसता, तर मी गायिका झाले असते का? साधना सरगमसारखी गायिका अनेक स्पर्धांमध्ये माझी प्रतिस्पर्धी नसती, तर मला स्फूर्ती कोठून मिळाली असती? वेळोवेळी मिळालेल्या संधी हेच यशाचं रहस्य नाही का?

मी दहावीत असताना श्रीधर फडक्‍यांनी दूरदर्शनवर एक गाणं गाण्यासाठी बोलावलं. संगीतकार म्हणून त्यांचाही सुरवातीचाच काळ. शब्दप्रधान गायकीकडे मी डोळसपणे पाहू लागल्याचं आठवतंय. आपला आवाज माईकमार्फत कसा पोचतोय याची जाणीव झाल्याचं आठवतंय. शब्दोच्चार, आवाजाचा लगाव, श्‍वास घेण्याच्या जागा, शब्दांना न्याय देणं, संगीतकाराच्या स्वराकृतीला न्याय देणं आणि या सगळ्या पलीकडे जाऊन त्या गाण्यावर आपला ठसा उमटवणं म्हणजे काय, याचा तेव्हा शोध घेऊ लागले.

अकरा वर्षांची असतानाची एक स्पर्धा आठवतेय. मुंबईतल्या शिवाजी पार्कमधील वनिता समाजाचा हॉल गच्च भरलेला. परीक्षक होते सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे. साधना सरगम गायला बसली. भरपूर आत्मविश्‍वास, सुमधुर गळा, उत्तम तयारी, यामुळं तिचं गाणं बहारदार झालं. पहिला नंबर हिचाच येणार, अशी सगळ्यांची खात्री झाली. यापेक्षा चांगलं गाणं या व्यासपीठावर आजतरी होणं शक्‍य नाही, असंही वाटत होतं. आणि माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जाऊन बसले. प्रचंड दडपण जाणवत होतं. समोर बसलेले दिग्गज, साधनाच्या गाण्यानं तयार झालेलं वातावरण यामुळं स्फुरण चढल्यासारखं वाटू लागलं. दडपणातून आत्मविश्‍वास वाट काढू लागला. काही क्षणांतच मला समोरचे श्रोतेदेखील दिसेनासे झाले. नजरेसमोर केवळ माझं गाणं, त्यातला भाव दिसू लागला. परमेश्‍वरावर विश्‍वास ठेवल्याचं फळ मला मिळतंय असं वाटू लागलं. सकारात्मक दृष्टिकोनाचं महत्त्व कळलं. माझं सादरीकरणदेखील उत्तम झालं. चांगली स्पर्धा आपल्याला सशक्त बनवते, याचा प्रत्यय आला. प्रतिस्पर्धी जितका चांगला, तेवढं मोठं आव्हान. प्रतिस्पर्धी हादेखील गुरूच नाही का? या प्रसंगात माझा नंबर पहिला आला, हे मला इथं महत्त्वाचं वाटत नाही. अनेक स्पर्धांमध्ये कधी साधनाचा पहिला, तर कधी माझा पहिला येत असे; परंतु, महत्त्वाचं हे वाटतं, की साधना जितका आपल्या गाण्याचा दर्जा उंचावत असे, तेवढंच मोठं आव्हान ती माझ्यासमोर ठेवत असे. आणि माझ्या क्षमतेचं, कुवतीचं इलॅस्टिक ताणण्याची शक्ती माझ्यात निर्माण करत असे.

आज साधना चित्रपट संगीतातील आघाडीची गायिका आहे. मला चित्रपटात गायला मिळालेली पहिली संधी शाम बेनेगलांच्या "सरदारी बेगम' या चित्रपटातील. गायिकेच्या जीवनावरचा चित्रपट होता. स्टुडिओत शामबाबू, संगीतकार वनराज भाटिया, त्यांचे असिस्टंट अशोक पत्की, गीतकार जावेद अख्तर. शामबाबूंनी चित्रपटातील प्रसंग वर्णन करून सांगितला. जावेदजींनी थोड्याच वेळात गाणं लिहिलं. अशोकजींनी चाल दिली. तिथंच मला गाणं शिकवलं. संगतकारांना मधले म्युझिक पिसेस, ठेका समजावून सांगितला. पाच-सहा वेळा रिहर्सल झाली. गाणं रेकॉर्ड होऊन तयार. या सगळ्याला लागलेला वेळ केवळ तीन तास. या रेकॉर्डिंगमध्ये मला प्रचंड शिकायला मिळालं. शामबाबूंनी एका गाण्यासाठी मला बोलावलं होतं आणि त्या चित्रपटातील जवळ-जवळ आठ गाणी मी गायिले. हे रेकॉर्डिंग चालू असताना आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस स्टुडिओत साजरा झाला. सरप्राईझ गिफ्ट घेऊन स्टुडिओच्या दरवाजात उभा असलेला उदय (टिकेकर) आठवतोय आणि आठवत आहेत कॉलेजचे दिवस.

दहावीत बरे मार्क मिळाले होते. बाबा रियाझाच्या मागे असत आणि आई अभ्यासाच्या. चांगले मार्क मिळाले नसते तरच नवल म्हणा. पोदार कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. अभ्यास, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा सुरू झाल्या. काही वर्षांतच उदयची ओळख झाली. तबला वाजवत असे तो. अभिनयातही निपुण. दिलदार, देखणा, मनमिळावू, काहीसा रागीट. आमचे सूर जुळू लागले. माझ्या गाण्याला तो ठेका धरू लागला. गायनात जसं साथीला महत्त्व, तसंच जीवनातदेखील - संगतकार ठीक नसला, तर कार्यक्रम फसलाच म्हणून समजा.

आपला छंद हा आपला व्यवसाय होण्यासारखा दुसरा आनंद नाही. मी जेव्हा गाणं शिकायला सुरवात केली, तेव्हा त्याचं व्यवसायात रूपांतर होईल किंवा व्हावं अशी कोणतीही योजना मनात नव्हती. केवळ गाण्यासाठी गाणं होतं. जसजसा अनुभव मिळत गेला, गुरूंकडून तालीम मिळत गेली, साधनेत आनंद मिळू लागला, तशी बाहेरून गाण्यासाठी आमंत्रणं येऊ लागली. एखाद्या रागाचा केलेला अभ्यास, विचार, मिळालेली अनुभूती आणि त्याप्रत श्रोत्यांना घेऊन जाणं, आपल्या आनंदात त्यांना समाविष्ट करून घेणं, आपल्या अनुभूतीचा अनुभव त्यांना देणं, गायनात साधलेली मनोअवस्था आणि श्रोत्यांची मनोअवस्था एकाकार होणं, हेच मैफलीच्या यशाचं रहस्य असू शकेल का? गायकासाठी सगळ्यात महत्त्वाचा श्रोता म्हणजे तो स्वत:. स्वत:ला संतुष्ट करणं महत्त्वाचं आणि महाकठीणदेखील. कारण हा आपल्यातला श्रोता आपली क्षमता पूर्णपणे जाणणारा आणि याच्या वरची पायरी म्हणजे स्वत:ला विसरून जाऊन गाणं. स्वत:तल्या गायकालाही आणि श्रोत्यालाही. संगीताला संपूर्ण शरणागती. आपणच संगीत होऊन जाणं. जिथं गायक उरत नाही, श्रोता उरत नाही, उरतं ते केवळ संगीत.

अमेरिकेच्या दौऱ्यातील एक प्रसंग आठवतोय- अटलांटा शहरात संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होता. मी आणि माझे साथीदार तयार होऊन गाडीत बसलो. चार वाजले होते. गप्पा मारता मारता अचानक समोरची गाडी आमच्या गाडीवर येऊन आदळली. आमच्या गाडीला अपघात झाला. तसं कोणालाही जास्त लागलं नाही; परंतु सगळे मनातून घाबरलेले. कोणाला किती लागलंय याचा अंदाज येईना. गाडी परत चालू होणं अशक्‍य होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी श्रोते जमू लागले होते. आणि अमेरिकेत तर अगदी 100-200 किलोमीटर दूरवरूनदेखील श्रोते येतात. थोड्याच वेळात दुसरी गाडी आली. आम्ही त्या गाडीत बसून कार्यक्रमाच्या ठिकाणी साडेसहाला पोचून थेट रंगमंचावर जाऊन बसलो. दहा मिनिटांत गायला सुरवात केली. तानपुरा वाजायला सुरवात झाली, की एक वेगळं स्फुरण चढतं. आम्ही अपघात पूर्णपणे विसरलो, नादब्रह्मात बुडालो; मात्र दुसऱ्या दिवशी अंग ठणकू लागलं आणि अपघाताची आठवण करून देऊ लागलं.

याच दौऱ्यामधला शेवटचा कार्यक्रम होता. विमान उशिरा पोचल्यानं आम्ही तयार होऊन थेट रंगमंचावरच पोचलो. श्रोत्यांनी भरलेलं सभागृह, साथीदारांनी आपली वाद्यं बॅगांमधून काढली. हार्मोनिअम काढली, तानपुरा काढला, तबला-डग्गाही काढला. पाहतो तर काय, डग्गा फुटला होता. दोन मिनिटांत कार्यक्रम सुरू करायचा होता. पडदा उघडलेलाच होता. श्रोत्यांनाही डग्गा फुटल्याचं लक्षात आलं. अमेरिकेच्या त्या छोट्याशा शहरात दुसरा डग्गा मिळवणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं होतं. संयोजक म्हणाले, ""तुम्ही आलापी सुरू करा, आम्ही डग्गा घेऊन येतो.'' मी जवळ जवळ 20 मिनिटं तबल्याशिवाय गायले. आणि नंतर डग्गा मिळाला. कार्यक्रम सुरळीत पार पडला.

अशा तऱ्हेनं एक गायिका म्हणून जगताना, गाताना, प्रवास करताना अनेक अनुभव आले. काही चांगले, काही बरे; वाईट नाहीच. अनुभवसंपन्न, श्रीमंत झाल्यानं प्रत्येक क्षण सुंदर वाटू लागलाय. तो पूर्णत्वानं जगावा असं वाटतं. आपल्या संवेदनांशी ओळख होते आहे. आपली ओळख पटते आहे. आपलं आपल्याशी नातं दृढ होतं आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive