Friday, March 22, 2013

Dictionary-man Marathi to English

डिक्शनरीमॅन
वेगवेगळ्या क्षेत्रात पायाभूत काम करणा‍-या यंग अचिव्हर्ससाठी गेल्या वर्षांपासून ' महाराष्ट्र टाइम्स ' ने ' यूथ आयकॉन ' पुरस्कार द्यायला सुरुवात केली. मागच्या वर्षीचा पहिला यूथ आयकॉन होता , काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी तिथेच अनाथाश्रम सुरू करणारा पुण्यातील तरूण अधिक कदम. यंदा हा किताब पटकावलाय बारा भाषांतली डिक्शनरी तयार करणा‍ऱ्या , नाशिक जिल्ह्यातल्या एका खेड्यात लहानाचा मोठा झालेल्या सुनील खांडबहाले या तरूणाने.
http://archive.loksatta.com/images/stories/newlok/newdaily/20100809/edt02.jpg
 







नाशिकपासून २० किलोमीटर अंतरावरचं महिरावणी खेडं. तिथल्या एका शेतवस्तीवर खांडबहाले नावाचं शेतकरी कुटुंब राहतं. नातेवाईकांमध्ये आणि फारतर आजूबाजूच्या पंचक्रोशीपलीकडे खांडबहाले हे नाव पोहोचण्याचं तसं काही कारण नाही. पण , आज दीडशे देशांतल्या सहा कोटी लोकांना खांडबहाले हे नाव परिच‌ित झालंय. साधारण पाच लाख लोक खांडबहाले हे नाव दिवसांतून एकदा तरी घेतात. ही करामत साधलीय khandbahale.com चा निर्मात्या सुनील खांडबहाले या 'MAD' तरुणाने. सुनीलच्याच भाषेत सांगायचं तर 'MAD' म्हणजे मोटीव्हेटेड अँड डेडीकेटेड.

हातातोंडाची मिळवणी करण्याच्या संघर्षाने आयुष्य व्यापलेल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात सुनील लहानाचा मोठा झाला. जीवनानुभवाच्या चटक्यानी जगणं पोळत राहिलं , तरी सुनीलने ' स्वतःचं काहीतरी भव्यदिव्य ' करण्याचा मनातला अंकुर कधीच करपू दिला नाही. त्यालाच गेल्या तेरा वर्षांपासून जोपासत , कष्टाच्या घामाचं सिंचन करत सुनीलने khandbahale.com नावाचा वटवृक्ष फुलवला आहे. प्रचंड मोठ्या शेतकरी खटल्यामध्ये मुलांना वाढवतांना सुनील आणि त्याच्या भावंडाना त्यांच्या आईवड‌िलांनी शिक्षणाचं बाळकडू पाजण्यात कधीच कसूर केली नाही. पाण्यात भाकरी बुडवून खाण्याच्या दिवसांमध्येही त्यांनी या मुलांचा हात शिक्षणापासून सुटू दिला नाही. त्यातूनच सुनील दहावीला चांगल्या मार्कांनी पास झाला आणि इंजिनिअरिंग डिप्लोमाला गेला. पण , तिथलं इंग्रजी शिकवणं पूर्णपणे त्याच्या डोक्यावरून जाऊ लागलं. न्यूनगंडाने उमेद खच्ची करून टाकली होती. शिक्षण सोडण्याचे विचार मनात गर्दी करू लागले. अशा अवघड वळणावर सुनीलला डिक्शनरी नावाचा प्रकार समजला. या डिक्शनरीशी सुनीलचं मैत्र जुळलं आणि मग त्याने डिप्लोमात चक्क पहिला नंबर पटकावला.

' आपणासी ठावें ते दुसऱ्यासी सांगावे ' या उक्तीनुसार सुनीलला त्याच्यासारख्याच अन्य लोकांपर्यंत डिक्शनरी पोहोचावी , असं वाटू लागलं. त्यासाठी त्याने आधी झेरॉक्स , मग प्रकाशन अशा पर्यायांचा विचार सुरू केला. पण , सगळं गणित पैशाशीच अडत असल्याने सुनीलने तो विचार बाजूला ठेवला. एकीकडे ' स्वतःचं काहीतरी ' करण्याची ओढ आणि दुसरीकडे आर्थिक ओढगस्त. अखेर त्याने नोकरीची शोधाशोध सुरू केली. दरम्यान , अनेक खस्ता खाल्ल्यावर नोकरी मिळाली खरी. पण तिथे मन रमत नव्हतं. तरी सुनिल नोकरी करत राहिला. कारण तिथेच त्याला कम्प्युटर नावाचं अजब यंत्र प्रथम भेटलं. त्याने सुनीलला पार झपाटून टाकलं. सुनील म्हणतो , ' मी पहिल्यांदा माऊस हातात धरला तो चेंडूसारखा! ' पण , स्वतःच अभ्यास आणि प्रॅक्टीस करत सुनीलने कम्प्युटरशी दोस्ती केली. या कंपनीतील प्रॉडक्ट वारंवार दुरूस्तीसाठी येतं , हे पाहून सुनीलने त्याच्या साहेबांना त्यामागचं कारण विचारलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं , ' हे मशिन आपण संभाव्य क्लायंटकडे पाठवतो. त्यासोबत कंपनीची चार माणसंही जातात आणि तिथे डेमो देतात. तो पसंत पडला तर क्लायंट मशिन घेतो नाहीतर परत पाठवतो. ही ये-जा करण्यात मशिनला इजा होते आणि ते दुरुस्तीसाठी येतं. '

हा ' द्राविडी प्राणायाम ' कसा टाळता येईल , जेणेकरून कंपनीचा इतका मोठा खर्च वाचू शकेल ,' असा विचार सुनील करू लागला. अखेर त्याने स्वतःच उपलब्ध सुविधा वापरून त्या मशिनची इत्यंभूत माहिती देणारं एक साधं सॉफ्टवेअर तयार केलं. ते त्याने साहेबांना दाखवलं आणि त्यांनीही लगोलग सुनीलची ही कामगिरी कंपनीच्या प्रेसिडेंटसमोर मांडली. सुनीलच्या इनोव्हेशनवर खूश होऊन त्यांनी सुनीलला हे सॉफ्टवेअर अधिक सक्षम बनवण्यासाठी कामाची पूर्ण मोकळीक आणि हवी ती मदत उपलब्ध करून दिली.

मिळालेल्या संधीचं सोनं करत सुनीलने असं काही प्रभावी सॉफ्टवेअर तयार केलं की , आता यापुढे कंपनीला ना मशिन प्रत्यक्ष पाठवावं लागणार होतं , ना चार-चार लोकांच्या येण्या-जाण्याचा खर्च करावा लागणार होता. यामुळे मोठी बचत होणार होती. सुनीलच्या या सॉफ्टवेअरचं प्रेझेंटेशन पाहण्यासाठी स्वतः मालक त्या दिवशी कंपनीत हजर होते. सुनीलला खूप शाबासकी मिळाली. कंपनीच्या प्रेसिडेंटने खूश होत त्याच्या पगाराइतकी बक्षिसी आणि अशाच काही सॉफ्टवेअरची पर्चेस ऑर्डरही सुनीलला दिली. कंपनीची नोकरी सोडून बाहेर पडण्याआधीच सुनीलच्या हातात स्वतःची कंपनी होती , तिला लागणारं भांडवल आणि पर्चेस ऑर्डरही होती. हाती आलेल्या पैशातून सुनीलने कम्प्युटर घेतला. त्यावर सॉफ्टवेअरची कामंही सुरू केली. कामं आणि त्यासोबत पैसाही मिळू लागला. पण स्वतःचं काहीतरी करण्याची ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देईना. तेव्हा सुनीलला आठवली ती डिक्शनरी. मग कम्प्युटरवर वापरता येईल अशी इंग्रजी-मराठी डिक्शनरी तयार करण्यासाठी सुनील झपाटून कामाला लागला. तब्बल अडीच वर्षं सुनील वेड्यासारखा या डिक्शनरीवर काम करत होता. इतका की सारखा बसून राहिल्याने त्याच्या कमरेतून एके दिवशी रक्त येऊ लागलं. पण , अखेर त्याने ही डिक्शनरी बनवलीच. त्यात शब्द शोधण्यासाठी सुनीलने तयार केलेला प्रोग्राम म्हणजे सर्च इंजिनच होतं. ते साल होतं १९९९. सध्या सर्च इंजिनचा पर्यायी शब्द बनलेल्या ' गुगल ' चा जन्मही त्यानंतरचा म्हणजे २००२ सालचा!

इंग्रजी-मराठी डिक्शनरी बनवली तरी मराठी माणसाला मराठीतून इंग्रजी डिक्शनरीची अधिक गरज आहे , हे लक्षात घेऊन मग सुनीलने तेही काम पूर्ण केलं. मग अन्य भाषांसाठीही हेच काम सुनीलने हाती घेतलं. तोवर डॉटकॉमचं वारं वाहू लागलं होतं. त्याची दिशा ओळखून सुनीलने मग डिक्शनरी इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला. पण डिक्शनरीशी संबंधित बहुतांश नावांच्या वेबसाईट आधीच रजिस्टर झालेल्या. अखेर सहज म्हणून त्याने khandbahale.com असं नाव घेतलं आणि वेबसाईट सुरू केली. ही इंटरनेटवरची पहिली इंग्लिश-मराठी डिक्शनरी. मराठीप्रमाणेच अन्य भाषांमध्येही अशा डिक्शनरीजची गरज होतीच. ती ओळखत सुनीलने एकेक भाषा अॅड करण्यास सुरूवात केली. त्याचा हा प्रवास १२-१२-१२चा मुहूर्त साधत वेबसाईटवर बारा भाषांची डिक्शनरी उपलब्ध करून देण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे khandbahale.com युजर्सची संख्या ६ कोटींवर पोहोचली आहे. या वेबसाईटला दिवसाला ५ लाख हिटस् मिळतात आणि दीडशे देशांतून लोक ही वेबसाईट पाहतात.

मोबाईलचा बोलबाला सुरू झाला तसा सुनीलने त्यावरही डिक्शनरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण दररोज बदलत जाणारं मोबाईलचं विश्व काही त्याच्या आवाक्यात येईना. पण त्यावरही मात करण्यात तो यशस्वी ठरला. पण , ९६० कोटी मोबाईलपैकी अवघे ७ टक्केच स्मार्टफोन आहे आणि डिक्शनरीची खरी गरज उरलेल्या लोकांनाच अधिक आहे , हा विचार सुनीलला स्वस्थ बसू देईना. सामान्य माणसाकडे असणाऱ्या साधारण फोनवरही डिक्शनरी उपलब्ध असावी या तळमळीतून सुनिलने २०१२ साली जगातली पहिली इंग्रजी-मराठी एसएमएस डिक्शनरी बनवली आणि ती कुठल्याही व्यावसायिक लाभाशिवाय लोकांना खुली करून दिली. आजमितीस १५ लाख लोक ती वापरतात. गुगलचा लँग्वेज पार्टनर , नोकीयाचा डेव्हलपर अशा अनेक संधी सुनीलला लाभल्या आहेत. काम करण्यासाठी प्रचंड अवकाशही त्याला उपलब्ध आहे. पण , काम वाढविण्याइतकंच महत्त्व सुनील केलेलं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यालाही देतो. याच ओढीतून पाड्यापाड्यावरच्या मुलांची एम्पॉवरमेंट व्हावी म्हणून सुनील त्याचं कुटुंब आणि मित्रपरिवारासह ' एज्युकेशन ऑन व्हील्स ' या प्रयोगासाठी झोकून देतो. या प्रयोगातून तो पाड्यापाड्यांवरच्या मुलांपर्यंत शिक्षण घेऊन जाण्यासाठी धडपडतो आहे. कारण , त्यांच्यातून त्याला त्याच्यासारखे अनेक सुनील घडवायचे आहेत!

पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाच्या मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे होता होईतो कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहचवायचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले याने वयाच्या अवघ्या तिशीतच पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे जगात प्रथमच कॉम्प्युटरवर ‘मराठी डिक्शनरी’, पहिली ‘ऑनलाइन मराठी डिक्शनरी’ व आता पुन्हा एकदा सर्वप्रथम भारतीय भाषेतील ‘मोबाइल डिक्शनरी’ प्रत्यक्षात आणणारा सुनील आजही आपल्या गावातल्या मातीशी निष्ठेने इमान राखून आहे. आपल्या अभिनव आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे आजमितीस दररोज लाखभराहून अधिक जणांना आपल्या वेबसाइटकडे आकर्षित करणाऱ्या सुनीलची पाश्र्वभूमी अत्यंत सामान्य. नाशिकजवळच्या महिरावणी या खेडेगावात टिपिकल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या सुनीलने पहिल्यांदा नाशिक पाहिले ते दहावीच्या परीक्षेसाठी आणि प्रथम मुंबई पाहिली तीदेखील एकविसाव्या शतकातच. जात्याच बुद्धिमान असणारा सुनील कोश वाङ्मयासारख्या अत्यंत किचकट क्षेत्राशी बांधला गेला तो जीवनाची गरज म्हणून. दहावीला चांगले मार्क मिळविल्यावर त्याने अहमदनगरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इन्स्ट्रमेंटल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला, पण खेडय़ातल्या मराठी शाळेत झालेल्या शिक्षणामुळे त्याला तेथे माध्यमाची आणि भाषेची चांगलीच अडचण जाणवू लागली. अगोदरच मराठीऐवजी इंग्रजी माध्यम आणि त्यातही संपूर्ण अपरिचित अशा तांत्रिक शब्दांचा भरणा. कुणाला विचारण्याची सोय नाही. अशा वातावरणात सगळा अभ्यास त्याच्या डोक्यावरून जाऊ लागला. त्याने मग वर्गात न समजलेले इंग्रजी शब्द वहीत उतरवून घ्यायचे आणि रूमवर आल्यावर त्याचे ‘डिक्शनरी मिनिंग’ जाणून घ्यायचे, असा परिपाठ सुरू केला. त्यामुळे त्याची ‘व्होकॅबिलिटी’ समृद्ध होऊ लागली आणि प्रथम वर्षांला ६० पैकी जे केवळ चौघे उत्तीर्ण झाले, त्यातही अव्वल म्हणून स्थान पटकावत त्याने बाजी मारली. तीन वर्षांंत त्याच्याकडे तब्बल २० हजार शब्द जमले. त्याचा आपल्याला फायदा झाला, तसाच हजारो-लाखो तरुणांनाही तो व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या वापरात सुलभता यावी, या उद्देशाने सुनीलने याच क्षेत्रात काम करायचे ठरवले. अनेकांची मदत व मार्गदर्शन घेत अत्यंत चिकाटीने त्याने वर उल्लेखलेले एक-एक उपक्रम अथक मेहनतीने पूर्ण केले. सुनीलच्या घरची पाश्र्वभूमी शिक्षणाची अजिबातच नाही. वडील केवळ चौथीपर्यंत शिकलेले, तर आई निरक्षरच. सुनील आणि त्याच्या भावांनी आईला चांगली अक्षर ओळख करून दिल्याने ती वाचू लागली आहे. नाशिकच्या महात्मानगर परिसरात त्याने सध्या आपले कार्यालय सुरू केले असले तरी आजदेखील त्याचे वास्तव्य आहे ते महिरावणी गावातील शेतातल्या घरातच. त्यामुळेच त्याच्या सामाजिक जाणिवा अजूनही घट्ट आहेत. तो गावाकडच्या मुलांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. हजारो रुपये फी भरण्याची ऐपत नसल्याने संगणकाच्या अधिकृत अभ्यासक्रमापासून आपल्याला वंचित राहावे लागले, तसे इतरांना लागू नये, ही त्याची मनस्वी इच्छा आहे. त्यातूनच त्याने ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’ विकसित केल्यावर आपल्या गावातील मुलांवर एक प्रयोग केला. अर्धवट शाळा सोडावी लागलेल्या वा शिक्षण थांबवून शेतीकडे वळलेल्या काही तरुणांच्या मोबाइलवर त्याने ही डिक्शनरी लोड करून दिली व महिन्याभराने त्यांच्या इंग्रजी शब्दसंग्रहाची चाचणी केली. यामध्ये त्याला सकारात्मक प्रतिसाद आला आणि मग हुरूप वाढवून त्याने हा उपक्रम तडीस नेला. आता अन्य भारतीय भाषांवरही त्याचे अशाच स्वरूपाचे काम सुरू आहे. शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख अजय बोरसे यांनी सुनीलच्या ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’चा उपक्रम उचलून धरत तरुणांसाठी अशा पाच हजार डिक्शनरी पुरस्कृत केल्या आहेत. त्याला अर्थातच उत्तम प्रतिसाद मिळतोय, पण शासनस्तरावरून मात्र या बाबतीत अजूनही ‘सारे कसे शांत शांत’ अशीच स्थिती आहे.

खांडबहाले डॉट कॉम... कदाचित तुमच्या कानाला काहीतरी चुकतंय असं वाटलं असेल....पण शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुनील खांडबहाले या तरुणाच्या खांडबहाले डॉट कॉम या भाषा प्रसाराच्या वेबसाईटशी टाय अप करण्याची तयारी विकीपीडीयानं दाखवली आहे.

प्रादेशिक भाषांना सपोर्ट करत नसलेल्या मोबाईलमधेही सुनीलनं तयार केलेली भारतीय भाषांची डिक्शनरी सहज इन्स्टॉल होते. नोकीयासारख्या कंपनीनं त्याबद्दल सुनिलला खास गौरवलं देखील आहे. त्यानंतर सुनिलनं इंटरनेट एक्सप्लोररव्यतिरीक्त इतर ब्राउझर्ससुद्धा सपोर्ट करतील, अशा पद्धतीचं प्रादेशिक भाषांचं सॉफ्टवेअर खांडबहाले डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिलंय.

जगभरातल्या दीडशे देशांधले चार कोटी नेटीझन्स त्याच्या साईटला भेट देउन भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या याच कामाची दखल घेउन विकीपीडीयानं एकत्रित काम करता येईल का याची चाचपणी सुरु केली आहे.

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भारतीय भाषांच्या प्रचारासाठी सुनिलनं केलेल्या कार्याची दखल घेत त्याला भेटीसाठी आमंत्रित केलं होतं.

सुनिलकडे त्याच्या साईटबाबत असलेला डाटाही अतिशय इंटरेस्टींग आहे. ऑस्ट्रेलिया आणि चीन मधून हिंदी भाषेसाठी सर्वाधिक हिट्स त्याला मिळतात, तर अमेरीका, युरोप आणि बेल्जियमधूनही मराठी भाषा शिकण्यासाठी अनेक जण त्याची साईट अॅक्सेस करतात. 

इंटरनेट क्षेत्रात कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या संकेतस्थळांमध्ये, दीर्घ काळ केवळ अमेरिकी कंपन्यांची मक्तेदारी होती. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. या स्पर्धेत भारतीय कंपन्याही आपला प्रभाव दाखवू लागली आहेत.

फेसबुक, ट्विटर, गुगल यांसारख्या अमेरिकी नेटवर्किंग वेबसाईटसचा बोलबाला असतानाच, www.khandbahale.com या भारतीय वेबसाईटने दरमहा १ कोटी हिट्सचा महत्वपूर्ण टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे. सप्टेंबर महिन्यात ही संख्या ९६ लक्ष ६६ हजार होती, तर ऑक्टोबर महिन्याचा अखेरच्या दिवशी या साईटला भेट देणाऱ्यांची संख्या १ कोटी २२ लाख नोंदविण्यात आली.

भारतीय प्रादेशिक भाषांच्या आदान-प्रदानासाठी प्रसिद्ध असलेल्या या संकेतस्थळाला, जगभरातून रोज लाखो लोक भेट देत असतात. भाषातज्ज्ञ, भाषांतरकार, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये ही वेबसाईट विशेष लोकप्रिय मानली जाते. गुगलसारख्या सर्च इंजिनने आपणहून खांडबहाले.कॉमचे एकूण ५३ लक्ष ५० हजार पानांचे सूचिकरण आपल्या संग्रहात करून घेतले आहे, यावरूनच या वेबसाईटचा दबदबा लक्षात येतो.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य मायक्रोसोफ्टने भारतीय भाषा उद्योगांमध्ये प्रमुख म्हणून, खांडबहाले.कॉमचा गौरव केला आहे. मराठीसह, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळी, पंजाबी, बंगाली, संस्कृत अशा विविध भाषांमधील ४० लाखांहून अधिक शब्दसंग्रह असलेले शब्दकोश या साईटवर उपलब्ध आहेत. विशेष नमूद करायचे, तर हे शब्दकोश सर्वांसाठी ‘मोफत’ खुले करण्यात आले आहेत. त्याबरोबरच मोबाईल व टॅबलेटवरही ते डाउनलोड करता येतात.

मराठी माणूस उत्तम व्यवसाय करू शकत नाही, अशी मानसिकता असलेल्या व परदेशी स्थायिक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुण पिढीसाठी आपल्याच देशात राहून जागतिक स्तरावर काम केले जाऊ शकते, असा आदर्श वस्तुपाठच या कंपनीने घालून दिला आहे. हल्ली एखादी वेबसाईट सुरु करून ती परदेशी कंपन्यांना विकण्याचा प्रथा पडली आहे. अनेक परदेशी कंपन्यांकडून चांगल्या ऑफर्स धुडकावत नाशिकमधील सुनील खांडबहाले यांनी ही वेबसाईट स्वबळावर सुरु ठेवण्याचा धाडसी निणर्य घेतला. सध्या खांडबहाले.कॉमचे जगभरातील १५० देशांमध्ये ६ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.

कुठल्या देशातून किती लोक भेटी देतात, कोणत्या दिवशी कोणत्या वेळी ही संख्या कमी अधिक होते, मोबाईल अथवा संगणकाच्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टममधून आणि कोणत्या ब्राऊझरचा वापर केला जातो, अशी सर्व आकडेवारी नोंदविणारी सांख्यिकी-प्रणाली या संकेतस्थळावर कार्यरत आहे. विशेष बाब म्हणजे जगभरात विखुरलेले भारतीय या वेबसाईटच्या माध्यमातून एकत्र जोडलेले असतानाच, तब्बल १५ ते २० टक्के वापरकर्ते हे परदेशी म्हणजेच परकीय आहेत.

'तुम्ही भारतीय भाषा शिका, असे सांगायला आम्ही कुणाकडे गेलो नव्हतो, तर ती काळाची गरज आहे. शिकण्याचा ध्यास असलेले आपणहून उपलब्ध संसाधनांचा शोध घेतात', असे सांगताना सुनील खांडबहाले म्हणाले, की भारतीय भाषांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान हे एकमेव प्रभावी माध्यम आहे. आज अनेक परदेशी गुंतवणूकदार भारताशी सहकार्य करण्यास उत्सुक आहेत. भारतीय तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे हे खांडबहाले.कॉम च्येा उदाहरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सोबत - सांख्यिकी अहवाल आणि चित्र


Rony Dutta @ Prasad Bidapa Fashion ...

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive