Wednesday, April 10, 2013

अध्यात्मवादी कॅलेंडर चित्रकार पी. सरदार Spiritual Calender painter P. Sardar

हिंदू धर्मात ब्रह्मा , विष्णू , आदी देवता धर्म , अर्थ , काम यांचे दाता साक्षात मोक्ष देणारे एकमात्र ज्ञानस्वरूपी , अविनाशी ज्ञानगम्य व उद्वैत महादेव शंकर आहेत. सृष्टीच्या निर्मितीत निर्गुण परमात्मा सगुण महादेव बनून अवतीर्ण झाले आहेत. सर्व देवतांचे लय महादेवातच आहे. देवांचे देव महादेव शंकर आहेत. म्हणूनच आपण महाशिवरात्री उपासना पूजा अर्चा करतो , पण या भगवान महादेव शंकराची विविध रूपांतील शेकडो चित्रे ज्यांच्या हातातून घडली. त्यांच्या कुंचल्यातून तयार झालेल्या शिवप्रतिमांची लाखो कॅलेंडर्स छापली गेली. घराघरात मंदिरात त्याची विधिवत पूजा अर्चा आजही आपण करत आहोत ते कोल्हापूरचे चित्रकार ' पी. सरदार ' कॅलेंडर चित्रांचा सरदार म्हणून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व जाती धर्मांची देव देवतांची कॅलेंडर्स तयार करून कला जगतात आपल्या कोल्हापूरच्या चित्रकाराने कीर्ती मिळवून दिली.

चित्रकार पी. सरदार हे मुस्लिम समाजात जन्मले. सरदार महम्मद पटेल असे त्यांचे नाव. ६ ऑगस्ट १९३८ साली हातकणंगले येथे जन्मले. प्रथम काही काळ मुंबई येथे व नंतर परत आपल्या मातृभूमी कोल्हापुरात राहून कॅलेंडर आर्स्टिस्ट म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. चेन्नई , कोलकाता , दिल्ली , मुंबई , शिवकाशी येथील कॅलेंडर प्रेस कंपन्यांचे व्यापारी प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी कोल्हापूर येथे येऊन त्यांच्याकडून कॅलेंडर चित्रे बनवून घेत आणि त्यांच्या लाखो प्रती मुद्रांकित करून घराघरात , मंदिरात , दुकानात , कारखान्यात त्या पोहोचल्या जात. पी. सरदार यांनी सा‍ऱ्या जाती धर्माची देवदेवतांची चित्रे तयार केली. ' सबका मालिक एक ' हे त्यांच्या चित्रातून पुढे आले. त्यांची बहुतेक चित्रे हिंदू धर्माच्या देवदेवतांची आहेत. रामायण , महाभारताचा त्यांनी बारकाव्याने अभ्यास केला. आणखी एक गुण त्यांच्या अंगी होता तो आध्या‌त्मिकतेचा. जनमानसातील अध्यात्म्याचा त्यांनी अभ्यास करून लोकांच्या भावना , निष्ठा यावरून त्यांनी देवदेवतांची चित्रे तयार करताना देवांचा देव महादेव शंकर यांची शेकडो चित्रे त्यांच्या कुंचल्यातून साकारली. भगवान शंकराच्या चरित्र्यावरून त्यांची विविध रूपांतील , विविध अवतारांतील चित्रे त्यांनी घडवली. शंकर पार्वती , गणपती , नंदी अशी अनेक रूपके त्यांच्या शिवचरित्र चित्रात दिसून येतात. शिवशंकराचे अस्सल दर्शन त्यांनी आपल्या चित्रात दाखवले म्हणून आजही त्यांची शिवचित्रांचे आपण पूजन करत आहोत. त्यांच्या या चित्रांना अध्यात्माचा चिरंतर भावनांचा गंध आजही दरवळत आहे. १५ मे १९९४ रोजी ते पैगंबरवासी झाले. पण त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा दारा सरदार हे चित्रनिर्मितीचे काम अखंडपणे करत आहे. त्यांच्याही हातून अशी सर्वधर्मीय चित्रे तयार होत आहेत. प्रतिभानगरात त्यांचा स्टुडिओ आहे.
कोल्हापूरच्या कलानगरीतील पी. सरदार हे चित्रकार कलाजगतात कॅलेंडर चित्राचे सरदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी रंगलेपणाचे माध्यम निवडले ते अपारदर्शक जलरंग (ओपेक पोस्टर कलर). हे अत्यंत अवघड असे तंत्र आहे. या तंत्राने चित्र काढणारे चित्रकार मोजकेच या जगात होऊन गेले. त्यातील हे एक अपारदर्शी जलरंगावर प्रभुत्व असणारे ; अभ्यासपूरक रेखांकन , रेखीव व सुबक रंगाच्या कोमल रंगछटांचा वापर करून भावस्पर्शी आध्यात्मिक चित्रनिर्मिती करणा‍ऱ्या या कलावंतास अभिवादन!
चित्रकार प्रशांत जाधव
समन्वयक , कोल्हापूर आर्ट फौंडेशन

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive