Wednesday, April 10, 2013

Iron Lady - Margaret Thatcher's Kind Heart

मृदू स्वभावाची ‘आयर्न लेडी!’ 

Iron Lady - Margaret Thatcher's Kind Heart

- भारतकुमार राऊत

ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर गेल्या आणि एरवी खमक्या वाटणाऱ्या , सरावलेल्या पत्रकारांच्याही मनाचा बांध फुटलाच . थॅचरबाईंची जादूच तशी होती . त्या पंतप्रधान असताना त्यांच्यावर अखंडपणे टीकेचे आसूड ओढणारेही खासगी जीवनात त्यांचा सल्ला घेत राहिले आणि थॅचरबाई मोकळ्या मनाने साऱ्यांच्या सुख - दुःखांशी समरस होत राहिल्या .

' मॅगी इज नो मोअर ...!' लंडनस्थित पत्रकार महिलेनं फोनवर ही बातमी फोडली आणि तिच्या अवसानालाच रडू फुटलं . खरं तर ब्रिटिश पत्रकार तसे खमक्या स्वभावाचे . पण ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर गेल्या आणि सरावलेल्या पत्रकारांच्याही मनाचा बांध फुटलाच . थॅचरबाईंची जादूच तशी होती . त्या पंतप्रधान असताना त्यांच्यावर अखंडपणे टीकेचे आसूड ओढणारेही खासगी जीवनात त्यांचा सल्ला घेत राहिले आणि थॅचरबाई मोकळ्या मनाने साऱ्यांच्या सुख - दुःखांशी समरस होत राहिल्या .

मार्गारेट थॅचर उर्फ मॅगी यांना पहिल्यांदा अगदी जवळून पाहिलं , तेव्हा त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्याला सात वर्षे लोटली होती . आता त्या ब्रिटिश संसदेच्या सदस्य नव्हत्या . एक दिवस बिग बेन घड्याळाखालच्या ऐतिहासिक ब्रिटिश पार्लमेंट इमारतीच्या मुख्य दरवाज्याच्या पायऱ्या चढत असताना एक वयस्कर महिला लगबगीने बाहेर पडताना दिसली . ज्या वेगानं ती पायऱ्या उतरली , त्याच झपाटयाने ती कार पार्किंगच्या दिशेने गेली . काही मिनिटांतच एक छोटी गाडी संसदगृहाच्या आवाराच्या बाहेर पडली . गाडी ती महिलाच चालवत होती . सोबतीला कुणीच नाही . आणि एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला , ती महिला म्हणजे साक्षात मार्गारेट थॅचर होत्या . सोबत मागे - पुढे धावणारे बंदुकधारी सुरक्षारक्षक नाहीत , पुढे मोठ्ठयानं टाहो फोडणारी पायलट व्हॅन नाही ... फार काय , ड्रायव्हर आणि सेक्रेटरीही नाही . ब्रिटनवर विक्रमी ११ वर्षे राज्य करणारी ही ' आयर्न लेडी ' असं साधंसुधं जीवन जगत होती . ते पाहिलं आणि भारतातील लोकशाहीचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या अवती - भवतीची सुरक्षा व्यवस्था ओघानेच आठवली .

दोनच दिवस गेले आणि मॅगी पुन्हा दिसल्या . आता त्या पार्लमेंटच्या कॉफी शॉपमध्ये गरम कॉफीचे घुटके घेत काहीसं वाचत बसल्या होत्या ... अगदी एकट्याच ! भेटावं का त्यांना !... हा प्रश्न मनात रेंगाळत असतानाच त्या उठल्या . आपला कप काऊंटरवर ठेवला आणि हातातली पर्स सावरत निघाल्या . पाय आपसूक त्यांच्या दिशेने वळले आणि त्यांची वाट अडली . चेहऱ्यावर त्यांचं ते ओळखीचं स्मितहास्य होतंच . ' तू आशियातला आहेस ?' त्यांनी अचानक विचारलं . मी भारतातून आलेला पत्रकार आहे , ही ओळख पटताच म्हणाल्या , ' तुला रस असेल , तर आपण पुन्हा भेटू या . मला भारतातील काही घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत .' मी हो म्हटलं आणि त्या तशाच लगबगीनं निघाल्या . आता यांना कुठे भेटायचं ?, हे भलं मोठं प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतंच . इतक्यात त्याच वळल्या . खुणेनंच मला जवळ बोलावलं आणि म्हणाल्या , ' तू जर रोज इथं येत असशील , तर उद्या दुपारी दोन वाजता इथेच ये . आपण १५ मिनिटं बोलू ... पण छापण्यासाठी नाही . जस्ट वन ऑन वन !'... वाक्य संपलं आणि त्या तशाच गेल्यासुद्धा .

दुसऱ्या दिवशी त्याच टेबलवर त्याच खुर्चीत त्या बसलेल्या होत्या . स्वागताचे प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांनी पर्समधून एक नोंदवही काढली . त्यात त्यांच्या काही शंका आणि प्रश्न यांची टिपणे होती . मॅगीची शिस्त अशी बिनतोड होती .

बोलायला सुरुवात होण्यापूर्वी त्या म्हणाल्या , ' आजच्या कॉफीचं बिल मी भरणार आहे .' मला या वाक्याचा अर्थ तेव्हा समजला नाही . पुढे लंडनच्या शिरस्त्यांची ओळख झाल्यावर कळलं की , ही बिलं ज्याची त्यानं भरायची असतात आणि कुणाला दुसऱ्याचं बिल द्यायचं असेलच , तर त्याची आगाऊ सूचना द्यायची असते . माझ्यासारख्या भारतीय पत्रकाराला ही बाब चमत्कारिकच वाटली .

मॅगीला भारताबाबत अनेक शंका प्रश्न होते . भारतात तेव्हा राजकीय अस्थैर्य होते . अटलबिहारी वाजपेयी यांचं १३ दिवसांचं सरकार पडलं होतं . नंतर एच . डी . देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांची सरकारं देशाने अनुभवली होती . या साऱ्या अस्थैर्याचा देशाच्या व्यवस्थेवर काय परिणाम होतो , ते मॅगीना जाणायचं होतं . त्यांनी शेकडो प्रश्न विचारले . माझी उत्तरं टिपून घेतली . पुनःपुन्हा शंका विचारल्या . हे करताना बैठकीची विहित वेळ संपली . वही बंद करत त्या म्हणाल्या , ' मला आणखी किती तरी वेळ बसायला आवडलं असतं . पण वेळ नाही .' ' तुम्हाला दुसरी अपॉईटमेंट आहे का ?', माझा भाबडा प्रश्न . ' तसं नाही . पण तुझ्याकडे मी इतकाच वेळ मागितला होता . आपण पुन्हा भेटू '. दोन कप कॉफीचं बिल देऊन त्या उठल्या . देशाच्या माजी पंतप्रधानाला कॉफीचे संसदगृहातच पैसे मोजावे लागतात , हेही भारतीय मनाला झेपणारं होतं .

नंतर त्या वारंवार भेटत राहिल्या . ब्रिटिश संसदगृहातील ऐतिहासिक लायब्ररी त्यांच्याचमुळे पाहता आली . स्वतःचा ' गेस्ट ' म्हणून त्या तिथे घेऊन गेल्या आणि अनेक दुर्मिळ ग्रंथ त्यांनी दाखवले . शेक्सपियरपासून सर विस्टन चर्चिल यांच्या युद्धकथांपर्यंतची अनेक पुस्तकं आपल्या हातात घेऊन न्याहाळता आली . नंतर त्यांनी स्वाक्षरी केलेले ' १० डाऊनिंग स्ट्रीट ' हे राजकीय आत्मचरित्राचं पुस्तकही दिलं . १९७७मध्ये ( कै ) ना . . गोरे भारताचे उच्चायुक्त म्हणून लंडनला गेले . त्यावेळी मॅगी पंतप्रधान नव्हत्या . पण ब्रिटिश राजकारणात त्यांचा दबदबा होता . नानासाहेबांचा आणि त्यांचा चांगला स्नेह जमला होता . मी महाराष्ट्र्रातला आहे आणि नानासाहेबांना ओळखतो , हे समजल्यावर त्यांना विशेष आनंद झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं .

स्वतःच्या आयुष्याबद्दल मॅगी फारच थोडं बोलत . एकदा त्यांना खोदून विचारलं की लोक तुम्हाला आयर्न लेडी म्हणतात , तुम्हाला काय वाटतं ? पुस्तकातून डोकं वर काढून मंद स्मित करत त्या म्हणाल्या , ' मला परिस्थितीनं तसं बनवलं . १९७९ साली मी सूत्रं हाती घेतली तेव्हा परिस्थितीच अशी होती की , लोकेच्छेच्या विरोधी जाऊन काही निर्णय घ्यावे लागले आणि एकदा निर्णय घेतला की , त्याला चिकटून राहायचं असं कुठल्याही महिलेप्रमाणं मलाही वाटलं , तशीच मी वागले आणि मीडियानं मला आयर्न लेडी बनवलं . प्रत्यक्षात मी आई आहे , आजी आहे ...' हे महिला जगताचं वैश्विक सत्यच त्या वदल्या .

जगातल्या अनेक देशांत त्या फिरल्या , पण त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांना भारतातच सापडल्या . म्हणाल्या , ' ताजमहालसारखी आपली स्मृती जपली जाणार असेल तर कोणाही महिलेला मुमताजमहल व्हायला आवडेलच .' कधी पंतप्रधान होऊ असं वाटलं होतं का , या प्रश्नावर त्यांनी एक आठवण सांगितली , ' भारतात मी आले असता एक गुरू मला भेटले . तेव्हा तेथे आणीबाणी जारी होती . ते गुरु मला म्हणाले की , तू तुझ्या देशाची पंतप्रधान होशील ... अजून चार वर्षांनी , आणि तो कालावधी सात , नऊ किंवा ११ वर्षांचा असेल . आणि मी ११ वर्षं पंतप्रधान राहिले . हा योगायोग होता की द्रष्टेपणा हे ठाऊक नाही .'

मॅगीचं वाचन अफाट होतं . दादाभाई नवरोजी आणि रवींद्रनाथ टागोरांपासून मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांपर्यंत अनेक भारतीय लेखक , विचारवंत , राजकीय नेते यांच्या विचारांचं वाचन त्यांनी केलं होतं . ' निवृत्तीच्या आयुष्यात तुम्ही वेळ कसा घालवता ?'... ' अतिशय आनंदात ', त्या चटकन म्हणाल्या . ' इतक्या वर्षांच्या सार्वजनिक जीवनात स्वतःचं आयुष्य वाटयाला कधी आलंच नाही . ते आता उपभोगते . इतकी पुस्तकं वाचायची राहिली आहेत , ती वाचून पुरी होईपर्यंत जगावं , इतकीच आता इच्छा आहे '... त्या असं म्हणाल्या आणि त्यांनी गाडी चालू केली . टेम्सच्या किनाऱ्यावरून गाडी वळेपर्यंत मी पाहातच राहिलो .

या गोष्टीला आता १४ वर्षं झाली . मॅगी गेल्या . त्यांची वाचायची पुस्तकं वाचून झाली असतील का ?

1 comment:


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive