Sunday, May 5, 2013

गर्भावस्थेतले लैंगिक संबंध सुरक्षित की धोकादायक ..?

अवघडलेले प्रश्न



गर्भावस्थेतले लैंगिक संबंध सुरक्षित की धोकादायक ..?

मातृत्वाच्या चाहुलीनं सुखावणार्‍या बायका उदरात वाढणार्‍या बाळामध्ये गुंतत, गुरफटत जातात. अशा अवस्थेत पतीबरोबर संबंध
कोणाला धोकादायक, कोणाला त्रासदायक तर कोणाला अपराधीपणाचे वाटतात. पण शास्त्रीय दृष्टिकोनातून मातृत्वाची अवस्था म्हणजे नात्यातल्या कामभावनेची रिप्लेसमेन्ट नव्हे.

सुनंदाला दिवस गेल्याचं कळताच घरात बच्च्या-कच्च्यांपासून मोठय़ांपर्यंत सगळेच आनंदून गेले. पाळी चुकली की, घरच्या घरी ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ करून पाहणं आता सहज शक्य आहे. सुनंदानं तेच केलं होतं आणि तिला दिवस गेल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर ‘सुनंदा वहिनी’, ‘सुनंदा काकी’ असं म्हणत सगळ्यांनी ‘तुला काय हवं नको ते आता आम्हाला सांगायचं. त्रास करून घ्यायचा नाही’ अशी प्रेमळ सूचना केली. सूचना, मजा संपल्यानंतर सुनंदाला एकटीला सोडून घरातले सगळे पांगले.
याच संधीचा फायदा घेत तिची आजेसासू तिच्याजवळ आली आणि हळूच तिच्या कानात पुटपुटली, ‘आता शेखरपासून लांब राहायचं. तो तुला विनवणी करेल, पण तू नाही म्हणायचं. तो माझा नातू असला तरी शेवटी पुरुषच. पण आता अशा अवघडलेल्या दिवसांमध्ये संबंध ठेवायचे नाहीत. याची जबाबदारी तुझीच.’ आजीबाईंचा सल्ला ऐकून सुनंदा बुचकळ्यात पडली होती. शेखरला हे कसं समजवायचं किंवा त्यानं ते समजून घेतलं नाही तर! तब्बल नऊ महिने आणि त्यानंतरही पुढे किमान दोन महिने शेखरला असं ‘थांब’ कसं म्हणायचं? त्याचवेळी तिला तिच्या बाळाचीही काळजी वाटत होती. शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानं गर्भाला काही इजा झाली तर! शेखरनं मात्र सुनंदाचा हा प्रश्नच संपवून टाकला. डॉक्टरांकडे गेल्यावर आपण सगळ्या शंका दूर करू अगदी शारीरिक संबंधाबाबतही, असं त्यानं सुनंदाला समजावून सांगितलं. शेखरचा समजूतदारपणा पाहून सुनंदाचा चेहरा खुलला.
हा समजूतदारपणा प्रत्येकीच्या बाबतीत येतोच, असं नाही त्यामुळे प्रत्येक गर्भवतीनं पुढाकार घेऊन या शंकेचं शास्त्रीय निरसन करणं गरजेचं आहे आणि संभाव्य धोके आपणहून टाळण्यासाठी पाऊल उचललंच पाहिजे.
‘आई होणं’ ही प्रक्रिया कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील खूप सुखद बाब असते. आपल्या पोटात आपल्याच रक्तामांसाचा एक गोळा वाढविणं.. त्याच्या अस्तित्वाची अनुभूती घेणं हा प्रत्येक गर्भवती मातेसाठी आनंद देणारा क्षण असतो. मात्र त्याचवेळी गर्भावस्था ही अत्यंत नाजूक अवस्था असते म्हणून तर गर्भवतीला ‘दोन जीवांची’ म्हणत आपण तिची विशेष काळजी घ्यायला लागतो.
गर्भधारणेचा हा कालखंड विशेषकरून पती-पत्नी या दोहोंच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असतो. या कालखंडात दाम्पत्याला आपल्या येणार्‍या अपत्याची जशी उत्सुकता असते तशीच काळजीही. त्यामुळेच ते त्यांच्या प्रत्येक हालचालीबाबत जागृत राहण्याचा प्रयत्न करतात; पण तरीही लैंगिक संबंधाबाबत काही प्रश्न त्यांना भेडसावतच राहतात.
प्रत्येक दाम्पत्य जीवनात गर्भधारणेच्या कालखंडात लैंगिक संबंध ठेवावेत की ठेवू नये, लैंगिक संबंध ठेवल्यानं गर्भवतीच्या उदरात वाढणार्‍या गर्भावर त्याचा काही परिणाम होईल का? किंवा गर्भवती महिलेवर त्याचा काही वाईट परिणाम होईल का? यांसारखे प्रश्न छळायला लागतात. याबाबत सहसा कोणाचा सल्ला घ्यायचा किंवा कोणाशी चर्चा करायची याचीही पंचाईत होते. ‘आई- बाबा’ होण्याच्या प्रक्रियेचा सुंदर अनुभव घ्यायचा की, आपल्या शारीर गरजेचा विचार करायचा? बरं हा विचार आपण स्वार्थी आहोत असं तर नाही ना दर्शवत?
मुळातच गर्भवतीची गर्भावस्था जसजशी वाढत जाते तसतशी लैंगिक संबंध ठेवण्यामधील जोखीमही वाढत जाते. संबंध प्रस्थापित होताना तिच्या पोटावर दाब येणार नाही याची काळजी घ्यावी लागते, अन्यथा गर्भ व गर्भवती दोघांसाठी धोका निर्माण होऊ शकतो

गर्भधारणेतही शारीरिक संबंध शक्य..
गर्भधारणा झालेल्या अवस्थेतही तुम्ही अगदी प्रसूतीचा काळ नजीक येईपर्यंत लैंगिक संबंध ठेवू शकता, अशी माहिती लैंगिक संबंध तज्ज्ञ (सेक्सॉलॉजिस्ट) डॉ. शशांक सामक यांनी दिली. डॉ. सामक म्हणाले, दाम्पत्य जीवनात लैंगिक संबंधाला कधीही नवृत्त करता येत नाही. ती प्रक्रिया शरीर, मन अशी दोन्हींसाठी आहे. गर्भधारणेच्या कालखंडातही दाम्पत्य आपले ‘सेक्स लाइफ’ आनंदानं जगू शकतात. अगदी पहिल्या महिन्यापासून ते प्रसूतीच्या काळापर्यंत ते लैंगिक संबंध ठेवू शकतात. केवळ यामध्ये ते संबंध प्रस्थापित करताना कोणती स्थिती घेता, कोणत्या पोझिशनद्वारे संबंध ठेवता हे पाहणं महत्त्वाचं आहे. गर्भवतीच्या पोटावर ताण येणार नाही, दाब निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन जी काही ‘कामआसनं’ असतात त्यानुसारच संबंध ठेवायला हवेत. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.
गर्भावस्थेतील या लैंगिक संबंधांना ‘समजूतदारपणा’चा एक विशिष्ट आयामही आहे. ज्यातून दोघांच्या नात्यातील एक अतिउच्च घनिष्टता दोघेही अनुभवू शकतात. एकमेकांना समजून केलेली ही क्रिया त्यांच्या नात्यालाही अधिक परिपक्व करण्यास मदत करते.

‘मातृत्व’ ही रिप्लेसमेंट नाही..
गर्भधारणेच्या कालखंडातील स्त्री-पुरुषांची कामभावना ही नेहमीसारखीच असते. मुळात ते कामजीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहतात की, केवळ बिछान्यावरील एक क्रिया म्हणून पाहतात यावर त्यांच्या भावना अवलंबून असतात. गर्भवती स्त्रियांनी कामभावनेसह मातृत्व ही भावना स्वीकारली पाहिजे. मातृत्वाची भावना ही कामभावनेतील अधिकची भर समजावी. मातृत्वाची भावना म्हणजे कामभावनेच्या ऐवजीची भावना आहे, असं समजणं चूक आहे. मातृत्व हे कामभावनेची ‘रिप्लेसमेंट’ नाही. कामजीवनातील मातृत्व ही अधिकची भर समजल्यानं कामजीवनही सुकर होतं.

अशा परिस्थितीत नवर्‍यानं समजून घ्यावं
काही महिलांना गर्भावस्थेत शारीरिक व मानसिक थकवा अधिक येत असल्यानं त्यांना आनंद घेता येत नाही. काही काही वेळा गर्भवती महिलेला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात. कंबरदुखी, उलट्या, मळमळ यामुळे काही जणी अगदी त्रस्त होतात. अशा वेळी तिला पतीची साथ-सोबत महत्त्वाची वाटत असते. मात्र संबंध ठेवण्यास ती फारशी उत्सुक नसते किंवा काही वेळा ती तिच्या मातृत्वामध्ये इतकी गुंतलेली असते की तिला त्याकाळात संबंध ठेवून आनंद मिळविण्याची इच्छा नसते. अशा परिस्थितीत पतीनं पत्नीची लहर ओळखणं आणि तिला समजून घेणं खूप आवश्यक असतं.

संबंधामुळे गर्भपात.. हा केवळ गैरसमज
लैंगिकसंबंध ठेवल्यानं गर्भावर त्याचा वाईट परिणाम होतो किंवा गर्भाला कोणत्याही प्रकारची इजा होते हा गैरसमज आहे. पती-पत्नीनं योग्य कामआसन केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका गर्भाला होत नाही. याशिवाय गर्भधारणेत संबंध ठेवल्यानं अँबॉर्शन (गर्भ निखळणं) होतो हासुद्धा चुकीचा समज आहे. अँबॉर्शन होण्याची कारणं निराळी असू शकतात व क्वचित काही दाम्पत्याच्या बाबतीत हे कारण असलं तरी त्याचं प्रमाण खूप नगण्य आहे त्यामुळेच आपल्या गर्भावस्थेची डॉक्टरांकडून योग्य माहिती मिळवून व डॉक्टरांच्या सल्ल्यानंच संबंध ठेवणं केव्हाही योग्य राहणार आहे. पण ज्या जोडप्यांना गर्भधारणेनंतर ‘अँबॉर्शन’चा इतिहास असेल त्यांनी मात्र गर्भावस्थेत लैंगिक संबंधाबाबत सावधान असणं आवश्यक आहे. अशा जोडप्यानं सुरुवातीच्या तीन महिन्यांपर्यंत संबंध न ठेवणं त्यांच्यासाठी हिताचं असतं.

नात्यातला रोमॅन्टिकपणा वाढवा
गर्भधारणेच्या काळात रोमॅन्टिकपणा वाढवा, असा सल्ला डॉ. सामक देतात. तुमच्यातील रसिकता, जिंदादिली ही तुमच्या नात्याला अधिक खुलवणारी ठरते आणि त्याचा निश्‍चितच चांगला परिणाम गर्भावर होणार असतो. केवळ लैंगिक संबंध ठेवूनच पती-पत्नी आनंद मिळवू शकतात असं नाही. तर ते एकमेकांना सहवास देऊन, एकमेकांची काळजी घेऊन, दोघांमधला रोमॅन्टिकपणा वाढवून एकमेकांना खूश ठेवू शकतात.

संबंधाबरोबरच सुसंवाद महत्त्वाचा
गर्भवती पत्नी व लैंगिक संबंध हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवायचे की नाही, ते कसे ठेवायचे याबाबतचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार त्या-त्या दाम्पत्याला आहे. दोघांमधील संवाद खूप महत्त्वाचा आहे. पत्नीला वेगळा त्रास नसला आणि तरीही तिला संबंध ठेवावेसे वाटत नसतील तर अशा वेळी नेमकी काय भूमिका घ्यावी? हा प्रसंग कसा हाताळावा? याबाबत दोघांमध्ये सुसंवाद हवा. संबंध ठेवण्याविषयी वा टाळण्याविषयी या दोन्ही बाबतीत त्यांच्यातील सुसंवादातून जो निर्णय ठरेल तो दोघांसाठीही महत्त्वाचा आणि हिताचाच असतो.

गर्भनिरोधक साधनांची आवश्यकता नाही
गर्भवती पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवताना पतीनं कंडोम किंवा तत्सम गर्भनिरोधक वापरावा का याबाबत पत्नी व पती दोघांच्या मनात शंका असतात. मात्र मुळातच गर्भधारणा झालेली असल्यानं पुन्हा गर्भनिरोधकाची काहीही आवश्यकता नसते. गर्भधारणा असल्यानं गर्भ धारण होण्यापासून रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो त्यामुळे या काळात लैंगिक संबंध ठेवताना कोणत्याही प्रकारचे गर्भनिरोधक वापरण्याची गरज नाही.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive