Tuesday, August 20, 2013

72 mail ek pravas - Review of marathi movie


सुसंस्कृत बनवणारा प्रवास - '७२ मैल एक प्रवास'  चित्रपट



mail


कवी गुलजार यांचा दोन वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम झाला होता. कुसुमाग्रजांच्या कवितांचं भाषांतर त्यांनी उर्दूमध्ये केलं होतं. त्यावेळी बोलता बोलता गुलजार म्हणाले, 'ठरवल्या ठिकाणी आपण आज ना उद्या पोहोचूच. परंतु, त्या दरम्यानचा प्रवास तितकाच रंजक होणं महत्त्वाचं.' हा प्रवास वेधक झाला की ठरल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तुम्हाला शहाणं करणारी अनुभवाची असंख्य गाठोडी काखोटीला जमा होतात... ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९७० च्या दशकात अशोक व्हटकर या मुलालाही अशाच एका प्रवासाने 'मोठं' केलं. या प्रवासात भेटलेल्या राधाक्का या एका निरक्षर परंतु कमालीच्या सुसंस्कृत बाईने या मुलाला चालता चालता अनुभवातून आलेलं जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवलं. याच शिकवणुकीचं बोट धरून अशोकने आपल्या आयुष्याची बाग फुलवली. पुढे '७२ मैल' या कादंबरीतून त्यांनी आपलं जगणं आणि राधाक्काचं तत्त्वज्ञान यांचा पुन्हा ताळा मांडला. राजीव पाटील यांनी '७२ मैल एक प्रवास' या चित्रपटातून राधाक्काचं कालातीत तत्त्वज्ञान पुन्हा एकदा लोकांसमोर मांडण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. सिनेमातल्या सर्वांनीच दिग्दर्शकाला पुरेपूर साथ दिल्याने हा प्रवास रंजक बनला आहे.


अशोक हा १३ वर्षांचा मुलगा आपल्याच दुनियेत मश्गुल असलेला.. अभ्यासात फारशी रूची नसलेला असा. पोहणं.. उनाडक्या करणं.. मुलांना गोळा करून हुंदडणं असं त्याचं दिवसभराचं वेळापत्रक. या वांडपणामुळे वेळोवेळी मामाचा, वडिलांचा मार खाणारा अशोक आपल्याच घरातला कौटुंबिक झगडाही पाहातो आहे. त्यातून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. या उनाड मुलाला 'सरळ' करण्यासाठी त्याला साताऱ्यात हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय होतो. मुलाला हॉस्टेलमध्ये दाखल केलं जातं. तिथल्या अनोळखी वातावरणात, शिस्तीमध्ये, शिक्षकांच्या दराऱ्यात अशोक पुरता एकटा पडतो. यातून बाहेर पडायचं आणि थेट आपल्या घरी कोल्हापूरला आईकडे जायचं असा ठाम निश्चय करून तो हॉस्टेलमधून पोबारा करतो आणि सातारा सोडून थेट लागतो तो कोल्हापूर रस्त्याला. खिशात एक पैसा नसताना दोन दिवस अथक चालून या मुलाने ७२ मैल अंतर कापून कोल्हापूर गाठलं, हा प्रवास म्हणजेच '७२ मैल एक प्रवास'.




प्रवास अविस्मरणीय बनवण्यासाठी या प्रवासामध्ये काहीतरी अनपेक्षित 'घडणं' अपेक्षित असतं. तसं या प्रवासातही ते आहेच. अशोक एकाकी चालत कोल्हापूरला गेला असता तर त्याने गाव नक्कीच गाठलं असतं, पण त्या दरम्यानच्या प्रवासात त्याला सोप्या शब्दांतला आयुष्यातल्या तत्त्वज्ञानाचा बहर गवसला नसता. तो त्याच्या वाट्याला आला राधाक्काच्या रूपाने. त्यामुळे या प्रवासाची नायिका राधाक्का आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा यथार्थ वठणं ही सिनेमाची प्रमुख गरज बनते. स्मिता तांबे ही अवघड भूमिका अत्यंत जबाबदारीने जगली आहे. 'राधाक्का' ही तिच्या आजवरच्या भूमिकांमधला मैलाचा दगड ठरू शकेल. आयुष्याची फरफट झेलता झेलता आलेलं रापलेपण, सोशिकतेतून आलेलं वयापलीकडचं शहाणपण आणि सततच्या टक्क्याटोणप्यातून आलेली परिस्थितीकडे तटस्थपणे पाहण्याची वृत्ती तिने बिनचूक दाखवली आहे. आपल्या अभिनयाने व संवादफेकीमुळे सहज, सोप्या संवादांना वेगळी उंची दिली आहे. तिच्यासोबत चिन्मय कांबळी (राणू), श्रावणी सोलास्कर (बायजा), इशा माने (भीमा) या तिघांनीही भूमिकेत जीव ओतला आहे. विशेष उल्लेख अशोक अर्थात चिन्मय संत याचा.

सिनेमाची पटकथा दिग्दर्शकानेच लिहिली आहे. कादंबरीचं अवकाश दिग्दर्शकाने अवघ्या ९५ मिनिटांमध्ये बसवल्यामुळे कादंबरीतले काही प्रसंग वगळणं अपरिहार्य बनतं. ते वगळून सिनेमाला चपखल अशी पटकथा रचली गेली आहे खरी. परंतु, या प्रवासातले प्रसंग विशिष्ट टप्प्या-टप्प्याने येत रहातात. पटकथेत आणखी काही उत्कंठावर्धक प्रसंग पेरता आले असते, तर ते कदाचित 'धक्कातंत्र' ठरलं असतं. पार्श्वसंगीत व गीतांमुळे सिनेमाला अपूर्व खोली लाभली आहे. अपवाद भीकेच्या गाण्याचा किंवा सापाच्या प्रसंगाचा. गाण्यामुळे सिनेमा 'टीपिकल' होतोय की काय अशी भीती स्पर्शून जाते. ट्रक-सापाचा प्रसंगही एकूण चित्रपटाच्या तुलनेत ढोबळ वाटतात. या व्यतिरिक्त सिनेमातल्या प्रसंगांमधले एक-दोन ठिकाणचे कंटिन्यूटीचे अपवाद वगळले तर चित्रपट चांगला बनला आहे. सर्वांत महत्त्वाची आणि खटकणारी बाब ही मध्यंतराची. अत्यंत चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या वेळी पूर्वार्ध संपल्यामुळे रसभंग होतो. राष्ट्रीय स्तरावर नाव मिळवलेल्या दिग्दर्शकांनी सिनेमाच्या अशा प्रत्येक अंगाकडे अत्यंत बारकाईनेच पाहायला हवं, किंवा असे विषय बनवताना दिग्दर्शकाला अभिप्रेत ते सर्व करण्याचा हट्ट निर्मात्यांनी धरायला हवा. सत्तरीतले बस स्टँड, त्यावेळच्या बसगाड्या आदी गोष्टी कलादिग्दर्शनातून नेमक्या साकारल्या आहेत. संजय जाधव यांची कामगिरीही चांगली आहे.

एकुणात, '७२मैल'सारख्या कादंबरीवर सिनेमा बनवल्याच्या धाडसाची नोंद घ्यावीच लागेल. आज लोकांनी 'दुनियादारी', 'श्रीमंत दामोदरपंत', 'टाइमप्लीज'ला चांगला प्रतिसाद दिलाय. याच सिनेमांसारखा हाही एक वेगळा, चांगला सिनेमा आहे. सिनेमाने दरवेळी रंजन करावं असं नाही, तर मनोरंजनासोबत तो कधीकधी आपल्या डोळयात अंजनही घालतो. आपल्या जगण्यातल्या काही मूल्यांना पुन्हा पुन्हा अधोरेखित करतो, सिनेमा असाही असतो. व्हटकरांच्या कादंबरीवरचा राजीवचा हा सिनेमा म्हणजे असा सुसंस्कृत बनवणारा प्रवास आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive