Saturday, August 24, 2013

"My Dear Yash" Marathi movie review


माय डिअर यश
कलाकार : उमेश कामत, लोकेश गुप्ते, सुखदा यश, प्रदीप वेलणकर, वैभव बोरकर, ज्योती जोशी
निर्माता : जगदीशसिंग राव
दिग्दर्शक : शेखर सरतांडेल
संगीत : रवींद्र शिंदे
वेळ : 130mins

 my-dear-yash
मानसिक आणि शारीरिक कमतरता असलेल्या व्यक्तिरेखांच्या गोष्टी आपण यापूर्वी मराठी ‌आणि हिंदी चित्रपटांमधून अनेकदा पाहिल्या आहेत. या व्यक्तिरेखांना आयुष्याशी दोन हात करताना येणारे अनुभव, त्यांच्या नातेवाइकांसमोरच्या समस्या यांचंही दर्शन अनेकदा झालं आहे. विविध आजारांनी, कमतरतांनी ग्रस्त असलेल्या मुलांच्या कथाही हिंदीमध्ये 'तारे जमीं पर', मराठीमध्ये 'आम्ही असू लाडके' या चित्रपटांमध्ये तरल आणि संवेदनशीलरीत्या मांडण्यात आल्या आहेत. शेखर सरतांडेल दिग्दर्शित 'माय डिअर यश' हा चित्रपटही अशीच एका ऑटिझमने (स्वमग्नता) ग्रस्त असलेल्या मुलाची कथा मांडतो. एक उत्तम आशय आणि आशयाला सुसूत्र राहणारी कथा मांडण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न कौतुकास्पद नक्कीच आहे. मात्र, कथेतील ताणतणावांच्या अनेक प्रसंगांमुळे आणि चित्रपटाच्या वाढलेल्या अनावश्यक लांबीमुळे स्वमग्नतेची समस्या मांडणारा चित्रपट कंटाळवाणा होऊन जातो. चित्रपटातून दिला जाणारा मेसेज ‌देण्यामध्ये दिग्दर्शक कोठेच कमी पडत नाही. मात्र, असा गंभीर विषय निवडताना आणि त्याची मांडणी करताना प्रेक्षकाला खेळवून ठेवण्यासाठी काही स्वरूपात चित्रपटात रंजकताही आणणे गरजेचे असते, याचा दिग्दर्शकाला विसर पडतो. ऑटिझमच्या समस्येचे मूळ, त्याची लक्षणे, ऑटिझम मुलांना कोणत्या स्वरूपाची ट्रीटमेंट द्यावी, आई-वडिलांनी या मुलांचे संगोपन कसे करावे हे पडद्यावर सारं काही दाखविताना काही नाट्यमयता दिग्दर्शक नक्कीच दाखवितो. मात्र, चित्रपटाच्या लांबीमुळे फिचर फिल्मच्या अँगलने न जाता तो माहितीपटाच्या दृष्टिकोनातूनच पुढे सरकतो.

'माय डिअर यश' ही कथा आहे, समीर देसाई (लोकेश गुप्ते) आणि वैदेही देसाई (सुखदा यश) या जोडप्याच्या यश (अथर्व बेडेकर) या ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलाची! कायम बिझनेस आणि पैशाच्या मागे लागलेल्या समीर देसाईला आपल्या मुलानेही आपल्याप्रमाणेच हुशार आणि कर्तबगार व्हावे, असे वाटत असते. मात्र, लहानपणी यशच्या वागणुकीमध्ये, हालचालींमध्ये चित्र-विचित्र बदल होण्यास सुरुवात झाल्यावर देसाई दाम्पत्याला त्याच्यातील या कमतरतेविषयी माहिती समजते. यशची ही कमतरता लक्षात घेऊन त्याचे संगोपन करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ आपल्याप्रमाणेच समीरनेही द्यावा, अशी वैदेहीची इच्छा असते. मात्र, व्यवसाय आणि पैशाच्या मागे धावणाऱ्या समीरला यशची जबाबदारी नकोशी होते आणि यश आणि वैदेहीला एकटेच गोव्यात सोडून समीर बेंगळुरूला निघून जातो. दुसरीकडे नवरा आयुष्यातून निघून गेलेली. वैदेही खचून न जाता आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी कंबर कसते. ऑटिझमग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेतील मानसोपचारतज्ज्ञ अंशुमन कर्णिक (उमेश कामत) वैदेहीला यशच्या जडण-घडणीसाठी मदत करतो. अंशुमनच्या मार्गदर्शनाखाली यश अकरावीत असतानाच स्वतः एक कम्युटर गेमची निर्मिती करतो. त्याच्या या कर्तबगारीचा एका विशेष सोहळ्यामध्ये गौरवही केला जातो. आपल्या कुटुंबापासून लांब गेलेल्या समीर देसाईलाही आयुष्यात फार काही गवसत नाही आणि स्वतःची कंपनी स्थापना करण्याच्या उद्देशाने तो पुन्हा गोव्यात परततो आणि समीरची कंपनी यशच्या भवितव्यासाठी अर्थसाह्य देण्याचे मान्य करते. मात्र, वैदेही आपल्या आयुष्यात समीरला स्थान देत नाही. अनेक टप्प्यावरून, भावनिक आंदोलनातून शेखर सरतांडेल आणि रोहन सामंत यांची कथा जाते. यशच्या आयुष्यामध्ये अनेक संघर्षानंतर त्याला हमखास यश मिळणार, याची खूणगाठ प्रेक्षक मध्यंतरानंतर मनामध्ये बांधतो. त्यामुळे चित्रपटात काही तरी 'हॅपनिंग' घडेल अशी आशा फोल ठरते.यशच्या आयुष्याचा काही वर्षांचा प्रवास दाखविताना दिग्दर्शकाने थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन प्रेक्षकाला बांधून ठेवणारे प्रसंग चित्रपटामध्ये दाखविण्याची आवश्यकता होती. मात्र, असे कोणतेच प्रसंग आपल्यासमोर येत नाहीत. यश आणि त्याच्या आईचा संघर्ष हादेखील खूप वरवरचा वाटतो. सुखदा यश आपली भूमिका उत्तम रंगवितेही. मात्र, चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या अर्थव बेडेकरचा यश म्हणावासा ठसत नाही. स्वमग्नतेची लक्षणे ही व्यक्तिरेखा दाखवितेही. मात्र, त्याचा मुद्राभिनय काहीसा कमी पडतो. एक वेगळा प्रयत्न आणि एक वेगळा विषय मांडल्याबद्दल दिग्दर्शकाचे निश्चित अभिनंदन करायला हवे. मात्र, ऑटिझमसारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय गोष्ट रूपातून मांडताना तो काहीसा रेंगाळतो, लांबतो हेदेखील तितकच महत्त्वाचं आहे. मनोरंजनाच्या अपेक्षेने चित्रपटगृहाकडे जाणाऱ्यांना तो फारस काही देत नाही. मात्र, वेगळं काही पाहण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी एक दर्जेदार विषय मांडण्यात बऱ्यापैकी 'यश' दिग्दर्शकाला आलं आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive