Tuesday, August 20, 2013

Review of Marathi Movie "Duniyadari"


दुनियादारी पडेगी निभानी



duniyadari.jpg

मराठी इंडस्ट्रीतला हरहुन्नरी अभ्यासू कॅमेरामन म्हणून संजय जाधव यांची ओळख आहे. अनेक चित्रपटांना त्यांनी आपल्या 'नजरेने' आकर्षक बनवलं. यातून त्यांची एखादा विषय समजून घ्यायची हुशारीही दिसायची. पुढे त्यांनी 'चेकमेट'द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यानंतर 'रिंगारिंगा', 'फक्त लढ म्हणा' असे सिनेमे त्यांनी केले खरे. परंतु त्यात दिग्दर्शकापेक्षा त्यांच्यातल्या सिनेमेटोग्राफरचा वरचष्मा होता. दिग्दर्शन आणि सिनेमेटोग्राफी या दोन्ही जबाबदाऱ्या संजयने सांभाळल्यामुळे त्यांनी आपल्यातल्या दिग्दर्शकाला नेहमी दु्य्यम स्थान दिलं. परिणामी तीन सिनेमे नावावर होऊनही जाधव यांची ओळख 'कॅमेरामन' इतकीच होती. नंतर या दिग्दर्शकाने शिरवळकरांच्या 'दुनियादारी' हात घातला. हा आपला 'ड्रीम प्रोजेक्ट' असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं. परंतु दरवेळी होणारी चूक यावेळी केली नाही. यावेळी कॅमेरामन होता पूर्णवेळ दिग्दर्शन करण्याचा चांगला निर्णय घेतला. याचा परिणाम सिनेमा पाहताना जाणवतो. मूळ 'दुनियादारी' पडद्यावर आणताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं अपरिहार्य बनतं. कादंबरी वाचलेल्यांना कदाचित हे स्वातंत्र्य पटणार नाही. परंतु, हे स्वातंत्र्य घेताना पटकथेला हिसके बसणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमा एकसंध बनला आहे. तो आपल्या लयीने पुढे गेला आहे आणि हृदयस्पर्शीही बनला आहे. आपल्या चौथ्या सिनेमात जाधव यांनी दिग्दर्शनात एक पाऊल पुढे टाकलं..

शिरवळकरांची 'दुनियादारी' तुफान गाजली. श्रेयस, मिनी, एमके, दिग्या अशी सगळी मित्रावळही लोकांच्या गळ्यातली ताईत बनली. सिनेमाचा विषय मैत्री असल्यामुळे त्यात येणाऱ्या भावभावनांचे हिंदोळे वैश्विक बनले. म्हणूनच २५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही ही पात्रं लोकांच्या लक्षात आहेत. त्यामुळे कॉलेजमध्ये जाणारा वा गेलेला प्रत्येकजण स्वतःला त्यातल्या व्यक्तिरेखांशी रिलेट करू लागतो. हा नेमका धागा दिग्दर्शकाने हेरला. शिवाय, त्यातल्या 'रेट्रो' लूकमुळे सिनेमा जास्त गोंडस बनला आहे. यात सर्वांत महत्त्वाचे योगदान आहे ते पटकथेचे. सिनेमातला काळ सत्तरच्या दशकातला 'दिसावा' म्हणून दिग्दर्शकाने योग्य ती खबरदारी घेतली, परंतु तो काळ आजच्या प्रेक्षकांनाही आपलासा वाटावा यासाठी पटकथेत योग्य ते 'स्वातंत्र्य'ही घेतल्याने सिनेमा खिळवून ठेवतो. कॉलेजला जाणाऱ्या तरुणाईचं विश्व चितारणारी म्हणून ही कादंबरी गाजली, हा एक भाग झाला. याशिवाय, यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट होती ती ही की हा सगळा कॅम्पस 'पुण्याचा' असतो. श्रेयस हा एकटा मुंबईचा मुलगा वगळला तर बाकी त्याला भेटलेले सगळे मोहरे हे अट्टल पुणेरी होते. त्यामुळे त्यांची भाषा, त्यांची भांडणं, ही अस्सल पुणेरी होती. त्यातून घडणाऱ्या विनोदांनी ही कादंबरी खुसखुशीत बनली होती. सफाईदार पटकथेमुळे, संवादांमुळे, कॅमेऱ्यामुळे 'दुनियादारी' विचार करायची उसंत देत नाही. परंतु, कादंबरीला असलेला हा 'पुणेरी स्पर्श' सिनेमाला नाही. तसे असण्यात खरेतर यातील व्यक्तिरेखांची गंमत दडली होती. सिनेमाची तुलना थेट कादंबरीशी केली तर अशा काही 'रिकाम्या' जागा काही आढळतात. उत्तरार्धात पटकथेचा वेग मंदावतो. पण एकुणात इट्स प्युअरली एंटरटेनिंग. कारण सिनेमाची गोष्टच तशी मजेदार आहे.

 श्रेयस हा मुंबईतल्या बड्या बापाचा मुलगा. श्रेयसच्या आई-वडिलांचं एकमेकांशी पटत नाही. अशातच त्याला पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये पुढच्या शिक्षणासाठी पाठवायचा निर्णय होतो. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याची गाठ पडते ती कॉलेजचा दादा असलेल्या दिग्या अर्थात डीएसपीशी. दिग्या उनाड असला तरी आहे दिलदार. दिग्याभवती अशोक, सॉरी, नितीन, श्रीकांत आदीचं टोळकं आहे. पुढे टीम डीएसपीचा श्रेयसही सदस्य होतो. त्यानंतर शिरीन तिचा भाऊ प्रीतम, सुरेखा, मिनाक्षी अशा सगळ्यांचा ग्रुप होतो. दिग्या-सुरेखाचं 'सेटिंग' सुरू असतानाच शिरीन-श्रेयस-मीनाक्षी यांचंही गणित आकारायला येऊ लागतं. तर दुसरीकडे कॉलेजमधला दिग्याचा दुश्मन असतो तो साईनाथ. त्याचा काटा काढायला सदैव टपलेला. कथेतली यांची प्रेमप्रकरणं नेमकी कशी आकाराला येतात.. श्रेयसचं पुढे काय होतं.. साईनाथ हा फॅक्टर कसा दरवेळी मिठाचा खडा बनतो यांचा 'तरुण' अनुभव म्हणजे 'दुनियादारी'.

श्रेयस ही व्यक्तिरेखा ठाशीव बनवण्यासाठी घेतलेली लिबर्टी कौतुकास्पद आहे. त्यामुळेच सिनेमाचं दुसरं टोक हृदयस्पर्शी बनतं. सर्व कलाकारांनी दिग्दर्शकाला चांगली साथ दिली. अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, रिचा प्रियाली यांनी अनुक्रमे डीएसपी, श्रेयस, प्रीतम, शिरीन, सुरेखा यांच्या भूमिका यथार्थ निभावल्या. श्रेयस-शिरीनचा 'इच्छे'चा प्रसंग तर लाजवाब. उर्मिला कानेटकरही सुंदर दिसली आहे. साईनाथला (जितेंद्र जोशी) दिलेली ट्रीटमेंट मात्र विचित्र वाटते. या सर्व कलाकारांनी आपापली वजनं आणखी १०-१० किलो कमी केली असती तर या सिनेमाचं दिसणं आणखी 'तरुण' झालं असतं. या चांगल्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर एकमेव खटकणारी गोष्ट आहे ती सिनेमाचा शेवट. एका विशिष्ट लयीत सिनेमा आपल्या ध्येयाकडे जातो. अपेक्षित परिणाम साधतो. परंतु त्यानंतर मुख्य पात्रांचा अपवाद वगळला तर बाकीची सगळी पात्रं एकांकिकांमधली वाटू लागतात. रंगभूषेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अत्यंत भावोत्कट प्रसंग असलेली ही फॅन्सी ड्रेस स्पर्धा वाटते. हा एक अपवाद वगळला तर मुव्ही इज गुड. सिनेमाची गाणी छान आहेत. विशेष उल्लेख 'टिक टिक वाजते..' 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' एकूणात 'दुनियादारी'चं टीमवर्क अफलातून झालंय. यह दुनियादारी अच्छी है... यह अगर अच्छी है तो निभानी तो पडेगी।

निर्मिती ड्रिमिंग ट्वेंटी फोर बाय सेव्हन
दिग्दर्शन संजय जाधव, कथाः सुहास शिरवळकर
कॅमेरा प्रसाद भेंडे
पटकथा, संवादः चिन्मय मांडलेकर.
संगीत अमितराज, समीर साप्तीसकर, पंकज पडघन.
गीत मंदार चोळकर, मंगेश कांगणे, सचिन पाठक
कलाकार स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, ऊर्मिला कानेटकर, जितेंद्र जोशी, रिचा प्रियाली, नागेश भोसले, सुशांत शेलार, राजेश भोसले, अजिंक्य जोशी.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive