Tuesday, August 20, 2013

Review of marathi movie "Govinda"

'गोविंदा' चित्रपट

Govinda

समाजप्रबोधनाचं लेबल लावलं की आपला सिनेमा जणू हाऊसफुल्ल होणार असा समज होतो आहे. बरं, एवढं करून आपण खरंच एखादा चांगला विषय घेऊन त्याच्या तळापर्यंत जातो का? तळाशी पोहोचणं दूरच. परंतु, तसा प्रामाणिक प्रयत्न तरी करतो का, हा खरा प्रश्न आहे. अपवाद वगळता अशा प्रश्नांच्या मुळाशी जाणं होतंच नाही. अशाने केवळ लोकांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा लोकांचं लक्ष वेधण्यासाठी प्रबोधनाची वल्कलं सिनेमाला नेसवली जातायत की काय असं वाटू लागतं. पुन्हा या वल्कलांच्या आत मात्र 'हवं ते' करण्याचे आपलेच हट्ट पुरवले जातानाही दिसतात. आत्माराम धर्णे दिग्दर्शित 'गोविंदा' हा चित्रपट हा अशा घिसाडघाईचा बळी ठरला आहे. आपल्याला नेमकं काय दाखवायचंय हेच या चित्रपटाच्या टीमला लक्षात आलेलं नाही. समाजप्रबोधनाचे डोसही द्यायचाय. परंतु, त्याचवेळी आज तद्दन मसाला सिनेमांमध्ये असणारं आयटम साँग, रोमान्सही त्यांना दाखवयचा आहे. या साऱ्या प्रकारामुळे गो हा गोविंदाचा नसून गो गोंधळाचा बनला आहे.

गेल्या पाच-दहा वर्षांपासून दहीहंडीच्या उत्सवावर ग्लॅमरचा प्रखर झोत येऊन स्थिरावला आहे. मोठ्या रकमांची पारितोषिकं, या उत्सवात शिरलेले राजकीय पक्ष.. थरांची स्पर्धा यांमुळे हा उत्सव आता इव्हेंट बनला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा लिहिण्यात आली आहे. निर्माते विलास वाघमोडे यांनीच ही कथा लिहिली आहे. नवं बॅनरच्या या नव्या कथालेखकाचा उद्देश चांगलाच आहे. परंतु, चांगला सिनेमा होण्यासाठी केवळ कथा चांगला असून चालणारं नसतं. तर त्या कथेवर रचलेली पटकथा, त्याचे संवादही अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणूनच कदाचित दिग्दर्शकाने पटकथा, संवाद लेखनासाठी अरविंद जगताप या अनुभवी लेखकाची निवड केली असावी. परंतु, एकूणच कथा, पटकथा, संवाद आणि एकूणच मांडणी यांची मोट बांधता बांधता दिग्दर्शक पुरता गोंधळात पडला आहे. कथा, पटकथा, संवाद या सर्वच पातळ्यांवर हा सिनेमा निरर्थक, पुरता ढोबळ बनला आहे.

राजन मयेकर हा सोसायटीच्या मुलांचा हिरो आहे. प्रत्येक सणाला, सोसायटीच्या कार्यक्रमात राजन पुढे असतो. या सोसायटीचं दहीहंडी पथकही आहे. हा उत्सव जवळ आल्यामुळे सगळी टीम मनोऱ्यांची तालीम करते आहे. अशा उत्सवात जखमी होणारे, प्रसंगी प्राणाला मुकणाऱ्या गोविंदांच्या बातम्यांचं सावट राजनच्या कुटुंबियांवरही आहे. या उत्सवात वेळ न घालवता त्याने आपलं करिअर सावरावं अशी पालकांची इच्छा आहे. परंतु, राजन मात्र बड्या रकमेची हंडी फोडून पैसे कमवण्याचे मनसुबे रचतोय. त्यासाठी भरभक्कम बक्षिसाची घोषणा करणाऱ्या नगरसेवकाकडे तो कामही करतोय. अखेर दहीहंडीचा दिवस उजाडतो आणि तो दिवस राजनला बरंच काही शिकवून जातो.


या गोष्टीत अनेक मुद्दे घुसवण्याच्या हट्टापायी ही कथा पसरट, उथळ बनली आहे. मंडळांतर्गत राजकारणासोबत या उत्सवात घुसलेलं राजकारण, या उत्सवात गोविंदांच्या आरोग्याप्रती निष्काळजी असलेले आयोजक, त्यात नायकाचं प्रेमप्रकरण, त्या दोघांच्या कुटुंबामध्ये असलेले कलह, राजनचा मित्रपरिवार.. या सर्वांमध्ये सुमार विनोद पेरण्याचा बेगडी अट्टाहास अशा सगळ्याच गोष्टींमुळे हा चित्रपट वरचे थर बांधण्यापेक्षा खालचे नवनवे थर गाठू लागतो. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे चारही खांब पोकळ बनल्याने स्वप्नील जोशी, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, अरूण नलावडे अशा नामवंत कलाकारांना घेऊन उभा केलेला मनोरा विद्युत वेगाने पुरता कोसळतो.

समाजप्रबोधनाचं इंजेक्शन द्यायचं ठरल्यानंतर सिनेमातली प्रत्येक व्यक्तिरेखा दुसऱ्याला (प्रेक्षकालाही) तसाच डोस देऊ लागते. अशा सगळ्या खेळखंडोबामुळे कलाकारांच्या व्यक्तिरेखा, त्यांचा वावर हा पुरता हस्यास्पद ठरतो. त्याला संकलन, संगीत यांमुळे पुष्टीच मिळते. असो. तर एकूणात, सूज्ञास अधिक सांगणे न लगे. या 'गोविंदा'ला लांबूनच सलामी दिलेली बरी.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive