Tuesday, August 20, 2013

Speaking languages will make India Superpower


बोलीभाषाच करतील भारताला सुपरपॉवर

तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे की, फांद्या, खोड, पानं, फुलं, फळं, मुळं यांच्या समुच्चयाला झाड असंच का म्हणायचं?
कुणी ठरवलं तसं? कधी ठरवलं? का ठरवलं?
या समुच्चयाला डाझ असं का नाही म्हणायचं? किंवा डाझ असं का नाही म्हणायचं? किंवा हिंदीमध्ये या समुच्चयाला पेड असंच का म्हणतात? किंवा इंग्रजीमध्ये ट्री असंच का म्हणतात?
किंवा कानडीमध्ये झाडाला गिडा असं का म्हणतात?
खरं तर आपला हा प्रश्न या एकाच शब्दाबद्दल नाही तर आपल्याला माहीत असणाऱ्या सगळ्याच शब्दांबद्दल असतो. अमुक वस्तूला अमुक म्हणायचं हे कसं ठरलं? कुणी ठरवलं? आपल्याला येणाऱ्या एक-दोन भाषांपुरते हे प्रश्न आपल्यासाठी मर्यादित असतात. पण ते आहेत प्रत्यक्ष जगातल्या सगळ्या भाषांबद्दल. कशा तयार झाल्या असतील या सगळ्या भाषा? माणूस गुहेत राहायचा, कंदमुळं खायचा इथपासून ते आजपर्यंतच्या अवस्थेच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर त्याला हे कळलं असेल की इतर प्राण्यांप्रमाणेच आपल्याही तोंडातून जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांची एक व्यवस्था लावता येऊ शकते? त्या ध्वनींना अर्थ देता येऊ शकतो? त्यातून शब्द तयार होऊ शकतो.. त्यातून आपल्याला जे म्हणायचं आहे ते म्हणता येऊ शकतं?
ध्वनींची व्यवस्था तयार करणं, त्यातून अर्थपूर्ण शब्द तयार करणं, त्यातून भाषेची व्यवस्था तयार होणं, ती बरोबरच्यांना समजणं, हळूहळू त्या भाषेचं व्याकरणं, त्या भाषेतून साहित्य, काव्य, नाटक अशी निर्मिती, मौखिक परंपरेतून ती जतन करणं, त्यातून कधीतरी लिपी निर्माण होणं.. आणि ही सगळी प्रक्रिया एकाच नव्हे तर जगातल्या अनेक भाषांबाबत घडणं याचा फक्त विचार करणंच दडपून टाकणारं आहे. माणसाचा आपल्याला ज्ञात असलेला इतिहासच जास्तीत जास्त पाच-सहा हजार वर्षांचा आहे. अगदी आपल्याकडचं रामायण घेतलं तरी रामायणात जी वर्णनं येतात ती एका तत्कालीन नागरी समाजाची वर्णनं आहेत. ज्यांना राजा आहे, प्रजा आहे, नियम आहेत नीतिव्यवस्था आहे, भाषा आहे. याचा अर्थ त्या पातळीवर येण्यासाठी त्या समाजाने, त्याच्या भाषेने त्याआधी किती टप्पे पार केले असतील. तिची जडणघडण त्याआधी किती काळ सुरू असेल.
सांगायचा मुद्दा हा की माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर संवादाचं माध्यम म्हणजे भाषा तयार केली. ती प्रक्रिया सुरुवातीला कदाचित जाणीवपूर्वक झाली नसेलही, पण त्याला तिची जाणीव झाल्यावर हेच माध्यम भाषा म्हणून विकसित होत गेलं आणि तिथूनच माणूस पृथ्वीवरच्या इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा झाला. त्यानंतर काळाच्या ओघात अनेक गोष्टी नष्ट होत गेल्या असतील पण काळाच्या सगळ्या मर्यादा ओलांडून आपल्यापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत, त्या भाषा. त्यांचं स्वरूप बदलत गेलं असेल, पण माणसाची दुसऱ्याशी संवाद साधायची आस इतकी की डीएनएसारखीच भाषाही एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत आली आहे. हजारो वर्षांचा, लाखो माणसांचा वारसा घेऊन त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
या हजारो वर्षांच्या काळात माणसाने पृथ्वीवरचं जे जे काही जीवन बघितलं, अनुभवलं त्या सगळ्याचा स्पर्श, गंध आज अस्तित्वात असलेल्या सगळ्या भाषांना आहे. कारण त्या माणसाबरोबरच घडल्या आहेत. त्याच्याबरोबरच वाढल्या आहेत. पृथ्वीवर नांदलेल्या वेगवेगळ्या संस्कृतींचा परिसस्पर्श या भाषांना झाला आहे. म्हणून जन्मल्यानंतर भाषा आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा ती फक्त अक्षरं नसतात, ते फक्त शब्द नसतात, ध्वनी नसतात, तर ते त्या त्या संस्कृतीचे दूतच असतात. आपल्या पूर्वजांनी अनुभवलेल्या संस्कृतीचा अंश घेऊन त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात.
म्हणूनच भाषा म्हणजे केवळ शब्दांचा समूह नाही, फक्त अर्थाचा ढीग नाही, तर भाषा म्हणजे काळाची सगळी पटलं ओलांडून आपल्यापर्यंत पोहोचलेलं विलक्षण जिवंत असं रसायन. आपल्याला आपल्यामध्ये आणि आपल्या आसपास बघायची दृष्टी देणारं, त्याचा अर्थ लावायची ताकद देणारं, अभिव्यक्त होण्यासाठीचं माध्यम बनणारं कमालीचं रसरशीत असं रसायन. ते कळायला लागल्यापासून असं काही आपल्यासोबत, आपल्यामध्ये असतं की ते आपली अस्मिता कधी बनून जातं, हे आपल्यालाही कळत नाही.
म्हणून ती ती भाषा त्या त्या समाजासाठी महत्त्वाची असते. माहेर या शब्दामुळे मराठी मुलीच्या मनात जे काही येईल त्याचा भावार्थ इंग्रज किंवा फ्रेंच मुलीला कळू शकणार नाही. बाप या शब्दातून मराठीत जी अधिकारवाणी येते ती कदाचित फादरमध्ये नसेल. दिवाळी म्हटल्यावर भारतीय माणसाला जो अर्थ प्रतीत होईल तो कोणत्याही परकीय माणसाला कळणार नाही. काशी, वाराणसीला त्याच्या भावविश्वात जे स्थान असेल ते इतर कशालाच नसेल. या सगळ्यामागचं कारण या शब्दांनी, ती पोहोचवणाऱ्या भाषेने त्याला हे सांस्कृतिक संचित दिले आहे. फ्रेंच माणसाच्या अशा सांस्कृतिक संचिताचे संदर्भ वेगळे असतील. आफ्रिकन माणसाचे वेगळे असतील. चिनी माणसाचे वेगळे असतील. पण त्यांच्याकडे ते असेल हे मात्र नक्की. कारण हा सगळा प्रवाह भाषा आपल्यापर्यंत पोहोचवत असते. तो आपला वारसा आहे, ती आपली संपत्ती आहे, ते आपलं अक्षय्य असं धन आहे.
नेमका हाच विचार मांडला आहे, पीएलएसव्ही म्हणजेच पीपल्स लिंग्विस्टिक सव्‍‌र्हे म्हणजेच भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण या प्रकल्पाने. इंग्रजीचं आक्रमण होत असल्यामुळे भारतीय भाषा नष्ट होत आहेत या सतत सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी तीन हजार कार्यकर्त्यांच्या मदतीने भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांचं सर्वेक्षण करण्याचा महाप्रकल्प हातात घेतला. तीन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर पूर्ण झालेल्या या प्रकल्पातून पुढे आलं आहे की संपूर्ण देशभरात मिळून ७८८ भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात. तर महाराष्ट्रात मराठीसह पन्नासपेक्षा जास्त भाषा बोलल्या जात आहेत. म्हणजे भाषांच्या पातळीवर आपण केवढे ऐश्वर्यसंपन्न आहोत. एवढय़ा प्रकारच्या भाषा म्हणजे एवढय़ा प्रकारच्या संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांच्या चालीरीती, त्यांचं लोकसाहित्य, त्यांची गाणी.. आपल्या देशातली ही सगळी विविधता विलक्षण आहे. आणि त्या सगळ्याच्या वाहक अशा भाषा आपल्याकडे आहेत. याशिवाय काळाच्या उदरात अनेक भाषा नष्टही झाल्या असतील पण त्याबद्दल उसासे टाकण्यापेक्षा जे हातात आहे, त्यांचा विचार केला तर काय चित्र दिसतं?
आपण मराठीवर होणाऱ्या इंग्रजीच्या आक्रमणाबद्दल सतत चिंता व्यक्त करीत असलो तरी आजही महाराष्ट्रात प्रमुख भाषा मराठी हीच आहे हे या सर्वेक्षणातून पुढं आलं आहे. एवढंच नाही तर डॉ. गणेश देवी यांच्या मते इंग्रजीच्या प्रभावाला मराठीने टक्कर दिली. एवढंच नाही तर तिने तिच्या परिघात असलेल्या इतर भाषांनाही स्पेस दिली. त्यांना नष्ट करून टाकलं नाही. हे इंग्रजीने जगात इतरत्र केलं पण ते आपल्याकडे झालं नाही याला कारण मराठीची सहिष्णुता आणि तिची टिकून राहण्याची ताकद. स्वत:कडे ही ताकद असताना मराठीने इतर भाषांनाही तो चिवटपणा दिला हे विशेष.
डॉ. गणेश देवी म्हणतात, या भाषा हे आपलं केवळ सांस्कृतिक वैभव नाही, तर ते आपलं सांस्कृतिक भांडवल आहे आणि आर्थिक भांडवल बनण्याची त्याची क्षमता आहे. हे स्पष्ट करताना याच अंकात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केलेली मांडणी आवर्जून समजून घेण्यासारखी आहे. त्यांच्या मते यापूर्वीच्या काळात पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, गणित या शास्त्रांच्या आधारे प्रगती झाली. तर या पुढच्या काळातले तंत्रज्ञानातल्या बदलांमध्ये भाषा हा मुख्य आधार ठरणार आहे. आज कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाइल यांच्यासाठी भाषा हा महत्त्वाचा आधार आहे. आज तुम्ही बोलता ते लिहू शकणारे कॉम्प्युटर आले आहेत. त्याचा तातडीने अनुवाद करणाऱ्या यंत्रणा आहेत. अशा वेळी एखादी भाषा न येणं हा प्रगतीमध्ये अडसर राहणार नाही. उलट तुमच्याकडे असलेल्या विविध भाषा, एकाच वेळी अनेक अर्थ व्यक्त करण्याची त्यांची क्षमता हे तुमचं महत्त्वाचं बलस्थान असेल. भटके विमुक्त, मागास समाज, त्यांच्या भाषा हे आपण प्रगतीमधले अडथळे समजत आलो आहोत. पण यापुढच्या काळात त्याच भाषा आपली आर्थिक बलस्थानं होणार आहेत फक्त गरज आहे ती आपण त्यांची ताकद ओखण्याची. ती ओळखली तर आपण आपली सांस्कृतिक संपत्ती ही आर्थिक संपत्तीमध्ये रूपांतरित करू शकतो. आपल्या बोलीभाषा याच आपलं बलस्थान ठरू शकतं..
थोडक्यात, आपल्या भाषा ही या आपल्याला विकासाच्या वाटेवर नेणारी नवी बोली आहे..


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive