Sunday, September 15, 2013

शोकंतिका भारतीय फुटबॉलची


शोकंतिका भारतीय फुटबॉलची


UJ
तालिबानी राजवटीत अफगाणी नागरिकांना जगणं मुश्किल होत असताना हा देश फुटबॉलमध्ये विलक्षण झपाट्याने प्रगती करतोय अन् आपल्याकडील तरूण पिढी तसेच मिडीयादेखील ईपीएल, चॅम्पियन्स लीग्, ला लिगा पाहण्यातच दंग असते. ज्यादिवशी भारत सॅफ स्पर्धेत अफगाणिस्तानकडून मानहानीकारक पराभवाला सामोरे जात होता तेव्हा बहुतांशी वृत्तपत्रातील जागा व्यापली होती ती २०१४ च्या वर्ल्ड कप पात्र ठरू पाहणाऱ्या संघांच्या निकालांनी.

फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ पण भारत या सर्वाधिक लोकप्रिय खेळात आहे १५५ व्या क्रमांकावर. फिफाच्या ताज्या रँकिंगनुसार मालदिव आहे १५२ व्या क्रमांकावर, याच मालदिवला भारताने नुकत्याच आटोपलेल्या दक्षिण आशियाई (सॅफ) फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत १-० असे हरविले खरे पण अंतिम फेरीत मात्र अफगाणिस्तानने भारताला २-० असे सहज हरवून रँकिंगमध्ये १३२ व्या क्रमांकावर झेप घेतली!

तालिबानी राजवटीत अफगाणी नागरिकांना जगणं मुश्किल होत असताना हा देश फुटबॉलमध्ये विलक्षण झपाट्याने प्रगती करतोय अन् आपल्याकडील तरूण पिढी तसेच मिडीयादेखील ईपीएल, चॅम्पियन्स लीग्, ला लिगा पाहण्यातच दंग असते व त्याचेच गोडवे गाण्यात धन्यता मानते. ज्यादिवशी भारत सॅफ स्पर्धेत अफगाणिस्तानकडून मानहानीकारक पराभवाला सामोरे जात होता तेव्हा बहुतांशी वृत्तपत्रातील जागा व्यापली होती ती २०१४ च्या वर्ल्ड कप पात्र ठरू पाहणाऱ्या संघांच्या निकालांनी.

भारतीय फुटबॉल बेदखल होत चाललाय पण त्याचे सोयरसुतक ना भारतीय प्रेक्षकांना ना अखिल भारतीय फुटवॉल फेडरेशनला (अेआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल पटेल तर कुठे गायब झाले आहेत कुणास ठाऊक? भारताच्या दारूण पराभवानंतर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. परंतु फुटबॉल वर्ल्डकप २२ ते २४ डिसेंबर दरम्यान भारतात येईल तेव्हा त्यासोबत त्यांची छबी झळकली तर आश्चर्य वाटायला नको. मिडीयात आपली छबी कशी आणि केव्हा झळकायला हवी याचे भान या क्रीडाप्रेमी राजकारण्यांना नििश्चतपणे असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ८८ देशात वर्ल्डकप फिरवण्यात येणार आहे तो कोकाकोलातर्फे, वर्ल्डकप स्पर्धेत अजूनपर्यंत कधीही स्थान न मिळवू शकणाऱ्या भारतात मात्र त्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो फुटबॉलप्रेमी गर्दी करतील. अलीकडे क्रिकेटचा उल्लेख राष्ट्रकुल देशात खेळला जाणारा खेळ असा करण्यात येतो पण त्यात भारताने निदान दोनदा वर्ल्डकप जिंकला तसेच तीनदा वर्ल्डकपचे आयोजनही यशस्वीपणे केले आहे ही बाब नजरेआड करून चालणार नाही अन जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळात भारत आहे १५५ व्या क्रमांकावर!

सॅफ फुटबॉल स्पर्धेतील भारताची कामगिरी अतिशय लाजिरवाणी होती. या स्पर्धेच्या साखळीत भारताने पाकिस्तानवर १-० असा विजय मिळवला खरा पण हा गोल भारताने केलाच नाही तर हा गोल भारताला आयताच लाभला तो पाकच्या कर्णधारामुळे. त्याने स्वयंगोल केल्यामुळे भारत जिंकला. बांगलादेशाला भारताने १-१ असे बरोबरीत रोखले ते कर्णधार सुनील छेत्रीने अगदी अखेरच्या क्षणी गोल केल्यामुळे. इंज्युरी टाइममध्ये सुनीलने गोल करून भारताची लाज राखली अन याच कर्णधार सुनीलला प्रशिक्षक कोवरमन यांनी अफगाणिस्तानविरूध्द अंतिम लढतीत पहिली ६० मिनिटे मैदानात उतरवलेच नाही (तो दुखापतग्रस्त होता) अन तासाभरानंतर तो मैदानात उतरला पण गोल करण्याची एक संधी त्याने वाया घालवली. साखळी लढतीत आपला शेजारील हिंदु राष्ट्र नेपाळने भारताचा २-१ असा पराभव केला. उपांत्य फेरीत सुदैवी ठरलेल्या भारताने मालदिवला १-० असे नमविले खरे पण अंतिम फेरीत त्यांना अफगाणिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागलेच. पराभवाची सुफळ संपूर्ण कहाणी सॅफ स्पर्धेत दिसून आली.

भारतीय फुटबॉल दिवसेंदिवस गाळात चाललाय पण अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला ना खंत ना खेद. आय लीग स्पर्धैबाबत घोळ सुरू असून आयएमजी-रिलायन्स स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. भारतातील फुटबॉल क्लब या स्पर्धेवर नाराज असून आपल्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळू देण्याबाबत त्यांचा विरोध आहे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनची अवस्था आहे. नव्या स्पर्धेआधी प्रचंड धुमश्चक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईत तर फुटबॉल ठप्प झाल्यातच जमा आहे. मुंबई शालेय फुटबॉल संघटनेमार्फत विविध वयोगटातील मुलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येतात पण शालेय स्पर्धेंनंतर कॉलेज स्पर्धा नीट आयोजित करण्यात येत नाहीत. तेथे सावळा गोंधळ दिसून येतो. रोव्हर्स कप ही प्रतिष्ठेची स्पर्धा तर कित्येक वर्षापासून बंदच पडलीय. विफाचा कारभारही कासवछाप पध्दतीने सुरू असून कूपरेजवर तर कित्येक वर्ष सामने होतच नाहीत. आयलीगचे मुंबइंच्या संघांचे सामने मुंबईत न होता इतरत्रच खेळवण्यात येत आहेत.

मुंबईतील स्थानिक सामने परळच्या सेंट झेवियर्स, चेंबूरच्या आरसीएफ, रे रोड येथील मैदानात खेळले जातात. नव्या कार्पोरेट लाइफस्टाईलमध्ये क्रीडापटूंना नोकऱ्या मिळणं दुरास्पास्तच. नवीन पिढी प्रत्यक्ष मैदानात उतरण्यापेक्षा इएसपीएन, स्टार, टेन स्पोर्टस, निओ या स्पोर्टस चॅनलवर सामने बघण्यात मशगुल झाल्यास नवल ते काय? मुंबईसारख्या महानगरात खेळण्यासाठी मैदान आहेतच कुठे? अेआयएफएफ, विफाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या प्रफुल पटेलांना याबाबत काही चिंता वाटत नाही अन भारतीय फुटबॉलची वाढ खुंटली तरी त्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. एकेकाळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा, एशियाड फुटबॉलमध्ये पदके पटकावणारा भारत तसेच मेर्डेका फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणारा भारत आता वर्ल्ड, ऑलिम्पिक, एशियाड तर दूरच राहो पण दक्षिण आशियातही अव्वल नाही याबाबत कुणालाही ना खंत ना खेद

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email