Monday, September 2, 2013

गणपती आणि सरस्वती

आपल्या देशातील सगळ्या संतांनी ग्रंथलेखन करीत असताना गणपती आणि शारदा यांचे स्तवन केले आहे. आम्ही गणपतीला बुद्धीची देवता मानतो तर शारदेला विद्येची देवता मानतो. समर्थ रामदासांनी आपल्या प्रत्येक ग्रंथात गणपती आणि शारदा यांचे स्तवन करून त्यांना वंदन केले आहे. कोणत्याही कार्याचा आरंभ गणेशपूजनाने केला जातो.

यावरून मराठी भाषेत 'कार्याचा श्रीगणेशा करणे' हा वाक्प्रचार कार्याचा आरंभ करणे या अर्थाने वापरला जाऊ लागला. आज गणपती आणि सरस्वती यांचे पूजन कर्मकांड ठरू लागले आहे. काही ठिकाणी तर पूजन म्हणजे त्या देवतांची विटंबना होय. एखाद्या वाईन शॉपचे उद्घाटन सत्यनारायणाच्या पूजेने करावे किंवा लॉटरीच्या दुकानात गणेश आणि शारदा यांचे फोटो असावेत हे योग्य नव्हे.

समर्थ रामदासांनी गणेश आणि शारदा यांचे यथार्थ स्वरूप वर्णन केले आहे. समर्थांच्या मते या सबंध विश्वात एक शुद्ध जाणीव व्यापून आहे. समर्थ त्याला गणपती असे म्हणतात. कार्याच्या आरंभी गणेशाचे पूजन करणे हे सांकेतिक आहे. याचा अर्थ, कार्य करताना अंत:करण शुद्ध असावे किंवा हेतू शुद्ध असावा असे आहे. हिंदू धर्मात उपजीविकेचे सगळे मार्ग ईश्वरप्राप्तीसाठी पूरक सांगितले आहेत. कर्मामध्ये सेवाभाव आणि भक्तिभाव मिसळला म्हणजे ते खरे गणेशपूजन होय. म्हणून समर्थांनी गणेशाचे रूपकात्मक वर्णन दासबोधात केले आहे. गणपतीचे रूप भव्य आहे याचा अर्थ, कर्म करताना माणसाने व्यापक असावे, क्षुद नसावे. गणपतीचे पोट मोठे आहे याचा अर्थ, कर्म करताना सर्वांचे गुणदोष पोटात घालावेत. गणपतीचे चार हात म्हणजे चार पुरुषार्थ आहेत. याचा अर्थ, आपल्या कर्मातून आपले चारही पुरुषार्थ प्रकट व्हावेत. हातात असलेला मोदक आनंदाचे प्रतीक आहे. याचा अर्थ, पुरुषार्थाचे प्रकटीकरण सर्वांना आनंददायी ठरावे. समर्थांचा गणपती एक क्षण स्थिर नाही याचा अर्थ, माणसाने सतत कर्म करीत राहिले पाहिजे. गणपतीची नृत्यकला म्हणजे आपले कर्मकौशल्य होय. गणपतीचे सौंदर्य आणि दागदागिने म्हणजे कर्माचे सौंदर्य होय. ही सारी वैशिष्ट्ये आपल्या कर्मात नसताना केवळ गणपतीच्या मूतीर्ची पूजा करणे आणि नंतर सदोष कर्म करणे हे कर्मकांड आहे.

समर्थांच्या मते सरस्वती किंवा शारदा हे शब्दांचे मूळ आहे. याचा अर्थ सगळे ज्ञान शब्दाद्वारे व्यक्त केले जाते. शारदेची कृपा नसेल तर शब्दांचे स्फुरण होणार नाही. काही संतांनी साक्षात्कारानंतर उन्मनी अवस्था स्वीकारली. त्यांच्या हातून ग्रंथलेखन घडले नाही; कारण त्यांना शारदेची साथ नव्हती. या संदर्भात स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक प्रसंग बोलका आहे. इंग्लंडमध्ये जोसेफाईन मॅक्लिऑड यांनी स्वामी विवेकानंदांचे एक व्याख्यान ठेवले होते. स्वामी विवेकानंद सभास्थानी अगदी वेळेवर पोहोचले. परंतु आयोजकांनाच काही तांत्रिक अडचणींमुळे सभा सुरू करायला अर्धा तास उशीर होणार होता. स्वामीजींना व्यासपीठामागील एका खोलीत अर्धा तास बसायला सांगण्यात आले. स्वामीजी खोलीत बसल्यावर ब्रह्माचिंतनात गढून गेले. आपण देह आहोत, याचे त्यांना विस्मरण झाले. त्यांना भाषणासाठी व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले तेव्हा ते बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते पुन:पुन्हा खोलीतील आरशासमोर उभे राहून आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत स्वत:ला देहबोधावरती आणण्याचा प्रयत्न करू लागले. थोड्या वेळाने ते देहभानावरती आले आणि शारदेच्या कृपेने त्यांचे भाषण होऊ शकले. ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे, गोविंदराव तळवलकर या माणसांच्या शब्दात अभिव्यक्तीचे विलक्षण सार्मथ्य होते. भाषेचे हे सौंदर्य त्यांना प्राप्त झाले, ते केवळ शारदेच्या कृपेमुळे. समर्थांच्या मते शारदेच्या कृपेशिवाय ज्ञानाला अभिव्यक्ती नाही. काही माणसांच्या बोलण्यात एवढे सार्मथ्य असते की आपल्या बोलण्याने ते एखाद्या माणसाचे जीवन बदलून टाकतात. एखादे सुंदर नृत्य, एखादे सुंदर गायन, एखादा मौलिक ग्रंथ, एखादा विलक्षण पराक्रम या सर्व गोष्टी समर्थांच्या मते शारदेचा आविष्कार होत.

शुद्ध जाणीव म्हणजे गणेश, शारदेमुळेच लोकांना कळतो. समर्थांच्या मते गणेश हा पुरुष आहे तर शारदा प्रकृति, गणेश शिव आहे तर शारदा शक्तीस्वरूपिणी आहे. गणेश आणि शारदा यांचे एकत्रिकरण म्हणजे अर्धनारीनटेश्वर होय. म्हणून सारे संत गणेश आणि शारदा यांचे स्तवन करतात.

- सुनील चिंचोलकर

लेखांक : ६२

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive