Tuesday, September 3, 2013

संस्कार


संस्कार



भारतीय संस्कृतीच्या अक्षुण्ण प्रवाहधारेमध्ये आपण सर्व प्रवाहित झालो आहोत. त्या प्रवाहाबरोबर जात असताना तिच्या काठावरील संस्कृतीचे संवर्धन करणे , हा प्रत्येक प्राणिमात्राचा धर्म आहे. ज्या चांगल्या गोष्टी परंपरेने आपल्याकडे आल्या , त्या पुढील पिढ्यांच्या हाती सुव्यवस्थित , संशोधित अवस्थेमध्ये पोहोचवत असताना त्यामध्ये वृद्धी करणे , हेसुद्धा आपले कर्तव्य आहे. सनातन काळापासून सर्व जिवांची प्रगती धरित्री साक्षीभावाने न्याहाळत आहे. आदिम काळापासून आजपर्यंत झालेला मानवाच्या वैचारिक प्रगतीचा अनुसंधानात्मक प्रवासही धरतीने पाहिला आहे. आज मनुष्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर अफाट भौतिक संपदा प्राप्त केली आहे ; परंतु त्याच्या मनातील संस्कारांचे , कृतज्ञतेचे बीज हळूहळू लोप पावत चालल्याचे दिसत आहे. सर्व प्राणिमात्रांच्या निरामय , शांत आणि समृद्ध जीवनासाठी संस्कारांची आवश्यकता आहे. जगामध्ये अनेक धर्म , जाती , पंथ , भाषा , संप्रदाय आहेत. जर सर्व धर्मांतील विचारांचा एकसंध अभ्यास करावयाचे ठरवले , तर आपल्या असे लक्षात येईल की , त्यामधील मानव जातीच्या समृद्ध , निरामय जीवनाचा हेतू मात्र समानच आहे. तद्वतच सर्व धर्मांच्या प्रार्थनाही समानच आहेत , असेदेखील आपल्याला दिसते.

निसर्गाने प्रत्येक वस्तूला जसे बनवले , ते प्रकृत होय. प्रकृतला उपयुक्त बनवण्यासाठी त्यावर संस्कार केले जातात. गव्हाचे दाणे संस्कृत , परिष्कृत केल्यावरच त्याची पोळी बनते , जी खाण्यायोग्य असते. आयुर्वेद मानते , निसर्गातील कोणतीही गोष्ट अनुपयुक्त नाही , त्या वस्तूवर संस्कार करून तिचा उपयोग करून घेता येऊ शकतो. निसर्गाने मानवाच्या अंगी अनेक प्रकारचे गुण दिले आहेत. त्यांना उपयुक्ततेकडे नेण्यासाठी संस्कार आवश्यक असतात. भारतीय संस्कृतीमध्ये मानवाच्या समृद्ध जीवनासाठी संस्कारांना विशेष महत्त्व आहे. अगदी जन्माच्या पूर्वी केल्या जाणाऱ्या गर्भसंस्कारापासून ते मृत्यूनंतरही केल्या जाणाऱ्या अंत्येष्टीपर्यंत अनेक प्रकारचे संस्कार वर्णित आहेत. प्राणिमात्रांच्या निरामय जीवनासाठी या संस्कारांची कल्पना केली गेली होती. परंतु कालौघात त्यामध्ये अनेक अनिष्ट रूढींचा समावेश झाला. जावळ काढण्यासाठी बोकड कापावा लागतो , कान टोचण्यासाठी कोंबडी मारावी लागते इत्यादी गोष्टींचा संस्कारांशी काहीच संबंध नाही. परंतु सामान्य लोकांना त्याचे ज्ञान नसल्याने स्वार्थापोटी काही लोकांनी उपजीविकेसाठी त्यांना रूढींचा चेहरा मिळवून दिला. त्यामुळे त्यांचा मूळ हेतू लोप पावला.

संपूर्ण आयुष्यभर माणसाच्या मनावर अनेक प्रकारचे संस्कार होतात. सुसंस्काराद्वारे मनामध्ये सम्यक विचारांचे बीजारोपण होते. मनाच्या अतुलनीय सामर्थ्यामुळे कोणताही विचार संकल्पाद्वारे कृतीत परिवर्तित करण्याची क्षमता प्राप्त होते. अलेक्सिस निकोलाय लिओवेटिच नावाच्या मानस शास्त्रज्ञाने विविध प्रयोगांद्वारे असा निष्कर्ष काढला की , ' सुसंस्कारित मनाने संकल्प केल्यास प्रयत्नपूर्वक प्रयोगानंतर नवे ज्ञान प्राप्त करता येते व त्यासाठी आवश्यक अशी शरीररचनेत सोय नसल्यास तीही मनाच्या सामर्थ्याने निर्माण करता येणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive