Monday, September 2, 2013

भगवंताजवळ काय मागावे?

सकाम भक्त आणि निष्काम भक्त असे भक्तांचे प्रमुख दोन प्रकार सांगितले जातात. सामान्य मनुष्य भगवंताची भक्ती करतो; पण या भक्तीच्या मोबदल्यात भगवंताने आपली संसारातील दु:खे दूर करावी, अशी त्यांची इच्छा असते. असा भक्त भगवंताजवळ सतत काहीना काही मागत असतो. सगळ्याच संतांनी सकाम भक्ताचा धिक्कार केलेला आहे. पण समर्थ रामदासांनी यावर एक तोडगा काढला आहे. सामान्य भक्त भगवंताजवळ काहीतरी मागणार हे त्यांनी गृहीत धरले. मग भगवंताजवळ मागायचेच झाले तर काय मागावे याचा एक वस्तूपाठ समर्थांनी ठेवला. ते लिहितात-

कोमळ वाचा दे रे राम। विमळ करणी दे रे राम।।

प्रसंग ओळखी दे रे राम। धूर्तकळा मज दे रे राम।।

हीतकारक दे रे राम। जनसुखकारक दे रे राम।।

अंतरपारखी दे रे राम। बहुजनमैत्री दे रे राम।।

विद्यावैभव दे रे राम। उदासिनता दे रे राम।।

संगीत गायन दे रे राम। आलापगोडी दे रे राम।।

या ठिकाणी समर्थांनी तडजोड स्वीकारली. भगवंताजवळ मागायला हरकत नाही. हे त्यांनी मान्य केले; पण त्याचबरोबर भक्ताला भगवंताजवळ काय मागावे याचे योग्य मार्गदर्शन केले. भगवंताजवळ सांसारिक सुखे मागण्यापेक्षा सद्गुण मागावेत असे समर्थ म्हणतात.

कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक नेते यांच्यामध्ये जे सद्गुण असायला हवेत, त्यांची यादीच समर्थांनी या ठिकाणी दिली आहे. माणसाने गोड बोलले पाहिजे. त्याची वाणी रसवंती असावी. तसेच त्याचे आचरण शुद्ध असावे. त्याशिवाय त्याला लोकसंग्रह करता येणार नाही अथवा समाजावर त्याचा प्रभाव पडणार नाही. भक्ताकडे व्यवहारचातुर्य असले पाहिजे. त्याला प्रसंगाचे भान असावे. केव्हा कसे वागावे याचे भान नसेल, तर असा भक्त समाजाच्या निंदेचा विषय होऊ शकतो. समर्थांचा देशकाळ प्रसंगावर विलक्षण भर होता. भक्ती म्हणजे एककल्लीपणा नव्हे. दुसऱ्याचे अंत:करण जाणण्याऐवढा धूर्तपणा भक्ताजवळ असला पाहिजे. भक्ताला अनेक मित्र असले पाहिजेत. मूर्ख लक्षणे सांगताना. 'जो बहुतांचा वैरी। तो एक मूर्ख।' असे समर्थ म्हणतात.

आपल्या मागण्यातून स्वत:चे कल्याण झाले पाहिजे आणि लोकांनाही सुख प्राप्त झाले पाहिजे. भक्त जर दरिदी असेल तर त्याचे जीवन आशाळभूत होऊन जाईल. म्हणून भक्ताजवळ विद्यावैभव असले पाहिजे. समर्थ रसिक असल्यामुळे त्यांना संगीताचे व गायनाचे भारी वेड हे सगळे सद्गुण जर भक्ताने संपादन केले, तर तो समाज प्रचाराच्या दृष्टीने चांगला तयार होईल. अशा भक्ताजवळ नृत्यकला आणि भाषावैभव असावे, अशी अपेक्षा समर्थ व्यक्त करतात.

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात भगवंताजवळ 'पसायदान' मागितले. पण या पसायदानात त्यांनी स्वत:साठी काहीच मागितले नाही. समाज सुखी असावा हीच सर्व संतांची तळमळ होती. समर्थांनी व्यक्तीसाठी ज्याप्रमाणे सद्गुणांची याचना केली, त्याचप्रमाणे समाजासाठी पुढील प्रार्थना केली -

रघुनाथदासा कल्याण व्हावे। अतिसौख्य व्हावे आनंदवावे।

उद्वेग नासो वर शत्रू नासो। नानाविलासें मग तो विलासो।।

कोंडे नसो रे कळहो नसो रे। कापट्य कमीर् सहसा नसो रे।

निर्वाणचिंता निरसी अनंता। शरणागता दे बहु घातमाता।।

अजयो न होरे जयवंत होरे। अपदा नकोरे बहुभाग्य हो रे।

श्ाीमंतकारी जनहीतकारी। परऊपकारी हरिदास तारी।।

मुळात संताचे अवतरण समाजाच्या कल्याणासाठी होत असते. 'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती' असे तुकाराम महाराज म्हणतात. उलट संतांची व्याख्या सांगताना ''तुका म्हणे तोची संत। सोशी जगाचे आघात।'' असे ते म्हणतात. समाजामध्ये भांडण असणे, आपापसात हेवेदावे असणे, एकमेकात संघर्ष असणे हे कधीही राष्ट्रहिताचे असत नाही, भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ६० वर्षांत आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे जातीय दंग्यांमुळे अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर सामाजिक आरोग्य प्रस्थापित करण्यासाठी किंवा निकोप आणि निरामय समाजजीवन निर्माण होण्यासाठी समर्थांनी केलेली वरील सामाजिक प्रार्थना फार महत्त्वाची आहे, असे मागणे भगवंताजवळ मागितले तर या भक्ताला कोण नावे ठेवील?

- सुनील चिंचोलकर

- लेखांक : २०

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive